सॅनफ्रान्सिस्को प्रत्येक शहराला त्याचा असा इतिहास असतो. त्याला स्वतःचा चेहरा मोहरा असतो. त्याची खास राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, ऐतिहासिक आणि भौगोलिक परंपरा, पार्श्वभूमी आणि संदर्भ असतात. शिवाय त्याला जसा भूतकाळ असतो, तसाच वर्तमानही असतो. या साऱ्यातून त्याची जडणघडण होत असते. म्हणून त्याचे सर्वांगीण नसले तरी शक्य तितके परिपूर्ण आकलन करून घेण्याचा प्रयत्न करणे गैर वाटू नये. अमेरिकेला येणारे पर्यटक, टुरिस्ट यांना न्यूयॉर्क, वॉशिंगटन, लॉस एंजलीस, लास वेगास, ग्रँड कॅनेनीयन, फ्लोरिडा यांच्या बरोबरीने सॅनफ्रान्सिस्को पाहाण्याचे कुतूहल असते.
१७७६ साली स्पॅनीश लोकांनी इथे वसाहती करायला सुरुवात केली. सेंट फ्रान्सिस यांच्या नावाने त्या वसाहतीला नाव मिळाले. कॅलिफोर्निया स्टेटमध्ये १८४९ साली gold rush सुरू झाले. त्यामुळे या शहराच्या विकासाला मदत झाली. १९३९-१९४५ या काळात दुसऱ्या महायुध्दात सॅनफ्रान्सिस्को बंदराचे फार मोठे योगदान आहे. कारण हे शहर कॅलिफोर्निया राज्याच्या उत्तरेकडे पॅसिफिक महासागर आणि सॅनफ्रान्सिस्को बे हे एकत्र येतात तिथे किनाऱ्यावर वसले आहे. १९०६ साली हे शहर तीव्र भूकंपाने हादरले आणि जवळजवळ उद्ध्वस्त झाले. पण अल्पावधीतच ते पुन्हा उभे राहिले.
आपल्याकडे हॉलिवूडचे चित्रपट फार पूर्वीपासून येत आहेत. त्यापैकी युध्दपटांमधून, हाणामारीच्या चित्रपटांमधून विशेषत: जेम्सबाँडच्या चित्रपटांमधून सॅनफ्रान्सिस्को इथल्या गोल्डनगेटचे दर्शन होते आणि त्याचा बोलबाला झाला आहे. जगातील आश्चर्यांपैकी एक असे त्यासंबंधी म्हटले जाते. म्हणून त्यासंबंधी सर्वांना कुतूहल असते. सॅनफ्रान्सिस्को आणि त्यापलिकडील मरीन काऊंटी या दरम्यान त्याआधी जलवाहतूक होती. बदलत्या काळानुसार सॅनफ्रान्सिस्को शहराला आणि बंदराला येत गेलेले महत्त्व लक्षात घेऊन पूल बांधण्याची कल्पना पुढे आली त्यानुसार १९३३ साली त्याचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू झाले. आरविंग मॉरो या स्थापथ्यविशारदाने ( architect) त्याचा plan तयार केला आणि जोझफ स्टॉस या इंजीनियरने कामाची जबाबदारी घेतली. हा पूल १९३७ साली तयार झाला आणि त्यावर्षी मे महिन्यात तो खुलासा करण्यात आला. एकूण ४२०० फूट लांब आणि मध्यभागी ४७६ फूट उंच असा हा पूल आहे.
सॅनफ्रान्सिस्को शहराच्या परिसरात सॅन होजे, फ्रिमाँट, प्लेझंटन, लिव्हरमोर ही छोटीमोठी शहरं आहेत. फ्रिमाँटकडून सॅनफ्रान्सिस्कोला दोन मार्गाने जाता येते. दोन्ही मार्गांवर आपल्याला मोठे पूल लागतात. ते वेगळे. सॅनफ्रान्सिस्को शहर समुद्राने वेढलेले आहे. त्यामधून मोठमोठ्या आगबोटी, मालवाहू जहाजे ये-जा करीत असतात आणि इथल्या पीअर्सचे वैशिष्ट्य असे की या बोटी तिथे सहज जेटीला लागू शकतात. या जेटींवर अनेक प्रकारची दुकाने आहेत. शहराचा हा भाग नेहमीच गजबजलेला असतो. कारण इथूनच शहर दर्शनासाठी बसेस सुटत असतात. जगभरातील असंख्य प्रवासी दररोज हे शहर पाहायला येतात. इथे जेटींवर मासे खायला मिळतील या आशेने असंख्य बगळे आढळतात. कबुतरेही वातावरणात फेऱ्या घालीत असतात. शिवाय अगणित पेंग्विन समुद्राच्या पाण्यात लाटांबरोबर खेळत असतात. कित्येकदा ते जेटीच्या खालच्या भागातील लाकडी लॉग्जवर आपले अंग सैलावून विश्रांती घेताना दिसतात. इथून समोर आपल्याला लाईटहाऊस दिसते. यापैकी पीअर नंबर थर्टी नाईन खास खवय्यांचे पसंतीचे आहे. कारण तिथे मांसाहारी आणि त्यातही सीफूड-विशेषत: खेकडी (crabs) सहज आणि ताजी उपलब्ध असतात. इथून आपल्याला क्रूझ म्हणजे सागरी सैर करणाऱ्या बोटी उपलब्ध आहेत. साधारण दीडेक तासाच्या सफारीमुळे दूरवरचा समुद्रप्रवास घडतो. ही आगबोट आपल्याला थेट गोल्डनगेट पुलाखालून नेऊन आणते. या सैरीवर असताना आपली बोट डीपसीमधून जात असते. आजूबाजूला लाटाच लाटा आणि त्यांचे विशिष्ट गतीने खालीवर होणे, त्याबरोबर आपल्या पोटात उठणारा गोळा, भीतीची एक अनामिक भावना, त्या मुळे अंगावर उभा राहाणारा शहारा विलक्षण. सॅनफ्रान्सिस्को शहर बऱ्याचदा ढगाळ वातावरणाने कुंद झालेले असते. महासागरावरील वारेही झोंबणारे असतात. एका खडकावर उभ्या असलेल्या भव्य पण जुनाट, अनेक खिडक्यांच्या इमारती समोरून आपली बोट जाते. ती इमारत म्हणजे पूर्वी चाचे चढाया करायचे तेव्हा त्यांना पकडून ठेवण्यासाठी बांधलेला तुरुंग आहे, अशी माहिती मिळते. क्रूझवरून आपल्याला तिन्ही दिशांनी दूरवरचा किनारा आणि त्यापलिकडील वसाहती, कारखाने, दीपगृह, चर्च आकाशात झेपावणारी टोकदार शिखरे दिसतात. आपल्याबाजूने लहानमोठ्या आगबोटी, बार्ज जात येत असतात. त्या क्वचित भोंगे वाजवतात, तो आवाज वातावरणात भरून राहातो.
सॅनफ्रान्सिस्को शहराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. ते उंच टेकडीवरील वसवलेले शहर आहे. त्यातील रस्ते कमालीचे काटकोनात आणि परस्परांना समांतर जाणारे आहेत. इमारतीही जवळजवळ सारख्याच रचनेच्या आणि परस्परांशी जोडलेल्या आहेत. त्यांचे रंगही जुन्या युरोपियन पध्दतीचे. उतरावरील या इमारतींची भूमितीनुसार रचना दूरवर क्रूझमधून पाहाताना आपल्याला सुखद धक्का बसतो.
सॅनफ्रान्सिस्को हे शहर अनेक बागांचे आहे. त्यापैकी जपानी बाग हे खास आकर्षण आहे. तिथे तलाव आहेत. बांबूची बने आहेत, फुलझाडे आहेत, बुध्दचा भला मोठा पुतळा आणि जपानी शैलीतील कमानी आहेत. बागांमध्ये अनेक जातींचे वृक्ष, रंगीत फुले दिसतात. इथली झाडेही कित्येक वर्षांची जुनी असावीत. ती उंच, अनेक शाखांची, मोठ्या विस्तारलेल्या बुंध्याची असतात. ती आपल्या फारशा परिचयाचीही नसतात. आपण आता बसराईड घेतली असली तरी रस्ते, इमारती, इमारतींच्या वरवर जाणाऱ्या उभ्या किंवा फिरत्या पायऱ्या, जिने, रस्ते, चौक, नाके, रस्त्यांवरून चालत, सायकलींवरून जाणारे स्त्री-पुरुष, त्यांच्या भिन्न वेषभूषा, भिन्न भाषा सारेच विलक्षण पाहत असतो. अधूनमधून ड्रायव्हर आपल्याला काही माहिती पुरवत असतो, पण त्याचे अमेरिकन उच्चार आपल्याला कळतातच असे नाही.
‘आता आपण चायना टाऊन भागातून चाललो आहोत. ते पाहा इमारतींच्या खिडक्या खिडक्यांमधून चिनी लोकांनी कपडे वाळत टाकले आहेत. हे चित्र तुम्हांला इथेच आढळेल.” तो सांगत असतो. आणि खरेच इमारतींच्या प्रत्येक मजल्याच्या खिडक्यांमधून दाटीवाटीने कपडे वाळत घातलेले दिसतात. इकडे सहसा आढळत नाहीत अशी जवळजवळ असलेली चायनीज दुकाने, रस्त्यांवर आपल्याकडे असतात तसे फळगाड्या, प्राय: चायनीज माणसांची रहदारी आढळते. एका ठिकाणी “गोवा” नावाचे हॉटेल दिसले, मन सुखावले.
शहरात Presidio म्हणजे राष्ट्रीय उद्यान आहे. एकेकाळी तिथे लष्करतळ होता. कॅलिफोर्निया ॲकॅडमी ऑफ सायन्स, वॉशिंग्टन स्वेअर, क्वाईट टॉवर (ही १९३० ची इमारत), प्राचीन आणि युरोपीय आर्ट, पॅलेस ऑफ फाईन आर्टस, सॅनफ्रान्सिस्को सिटी हॉल (इथे सरकारी आणि खाजगी ऑफिसीस आहेत) एशियन आर्ट म्युझियम, येरबा ब्युना सेंटर फॉर द आर्टस, सॅनफ्रान्सि म्युझियम ऑफ मॉडर्न आर्टस, कॅलिफोर्निया ॲकॅडमी ऑफ सायन्सीस, कॉन्झरव्हेटरी ऑफ फ्लावर्स अशा अनेक सांस्कृतिक विज्ञानविषयक, कलाविषयक संस्था, इमारती, बागा आहेत. अनेक ठिकाणी आकर्षक, सुंदर पुतळेही बसवण्यात आलेले आहेत.
अमेरिकेतील नवनवीन उदारमतवादी चळवळींचे केंद्र म्हणूनही सॅनफ्रान्सिस्को प्रसिध्द आहे. चित्रकलेच्या, स्त्रियांच्या, तृतीयपंथीयांच्या चळवळी इथेच झाल्या.
शेवटी आता Lombard Street ची नोंद करतो. हा रस्ता शहराच्या अत्युच्य ठिकाणी सुरू होतो आणि खाली अतिशय Sharp वळणावळणाने उतरतो. त्यावरील आठ ठिकाणे तर धोकादायक आहेत. पासष्ट-सत्तर डिग्री उतार आहे. तो चिंचोळाही असून तिथे खालून आणि वरून अशी दोन्ही दिशांनी वाहतूक होत असे. पुष्कळसे कारड्रायव्हर्स तिथून गाडी चालवण्याचे thrill अनुभवणेच पसंत करतात.
-सॅनफ्रान्सिस्को अशी रम्य नगरी आहे!
-डॉ. अनंत देशमुख
(अनघा प्रकाशन ने प्रकाशित केलेल्या ओ अमेरिका ह्या पुस्तकामधून)
Leave a Reply