नवीन लेखन...

संधीचं सोन! – Part 2

‘आई, सांगा काय काय कामं आहेत? किती वाजता आहे साखरपुडा? कोणता हॉल घेतला आहे? मला एकदा सगळं सांगा, मग तुम्ही फक्त इथं खुर्चीवर बसून ऑर्डर सोडायची.बाकी सगळं मी बघतो.काय? आलं का लक्षात?’ बाळा.

‘अहो बाळाभाऊ, कसला हॉल? अहो या हॉलमधेच होणार आहे साखरपुडा. अगदी साधा घरगुती मामला आहे. आमच्या घरची माणसं आणि व्याह्यांची घरची माणसं, बस झालं.’

“काय सांगताय? हा हॉल? अहो इथं पाचदहा माणसं जेमतेम बसतात, तिथं पन्नास साठ माणसं कशी बसणार? काय? आलं का लक्षात?’

‘पन्नास साठ? अहो कुठली पन्नास-साठ?’

‘आई, अहो, तुमच्या भजनी मंडळाच्या बायकाच तर तीससाळुंके जणी, शिवाय घरची, शेजारची अशी तुमची पन्नास-साठ जणांची टोळी?’

‘अहो बाळाभाऊ, ते मतदानासाठी फक्त, इथं घरी साखरपुड्याला त्यांचे काय काम? अरे बाबा, तशी माणसं खूप आहेत पण एवढ्या सगळ्यांची उठ-बस माझ्याच्याने नाही बाबा होणार. बरं चल, बोलत काय बसलोत आपण? आमची मोलकरीण पण आजच गेलीय दांडीयात्रेला. भांड्यांचा आणि कपड्यांचा हाऽ मोठा ढिगारा पडला आहे. पाणी पण जायचंय थोड्यावेळाने. म्हणतात ना नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न तसं आमच्या या मंगळीच्या लग्नाचं झालंय. आता या घराची नाही तरी निदान या हॉलची साफसफाई नको का करायला? फरशी पुसायची, दरवाजे खिडक्या पुसायच्या, पडदे बदलायचे, फर्निचर सरकवायचं, माळ्यावरून चौरंग काढायचा, हॉलची सजावट, अरे एक का काम आहे? तायडीचे बाबा बाहेरचे काय ते काम बघतील, तुम्ही जरा हे साफसफाईचे बघा. धुण्याभांड्याचं बघते मी. चला लागा कामाला. अहो तुम्ही? उठा, व्हा बाहेर!’

‘आई, ते सगळं मी बघतो. आधी सांगा, तुम्ही मतदानाला किती वाजता जाणार? पाच वाजेपर्यंत जावे लागेल. तुमची वेळ सांगा. त्याप्रमाणे मी सगळी कामे मार्गी लावतो.”

‘अहो, बाळाभाऊ, ते मतदानाचे राहू द्या हो. ते कधीही करु. तुम्ही एकच काम करा.या आता.राम!राम! म्हणे मतदानाला कधी जायचं?’

‘आई, तुम्ही आता बिलकुल टेंशन घ्यायचं नाही. मी बघतो. आजोबा, द्या ती यादी माझ्याकडे, तुम्ही मस्त टीव्ही बघत बसा. आई, कामांची काळजी करु नका. मी आत्ता माणसं घेऊन येतो. फटाफटा सगळं उरकतो. काय? आलं का लक्षात?’ गोविंदरावांच्या हातातली यादी घेऊन सटकतो.

‘अहो, बघताय काय? तो गेला सुध्दा! जरा बघा काय करतोय ते? या लोकांचा काय भरवसा? बाहेरच्या बाहेर सटकला म्हणजे? निदान त्या गोरसवाल्याकडे जाऊन संध्याकाळच्या मिठाईचे तरी बघून या. फुलांचे हार, गुच्छ घेऊन या.’ गोविंदराव घाईघाईने बाहेर पडतात. राधाक्का बाथरुममध्ये घुसतात, तोच बाळा येतो. बेल वाजते. आईचं चरफडत दार उघडते.

‘बाळाभाऊ? आलात?’

‘आई, ही बघा लीला. ही सगळी धुणंभांडी, साफसफाई उरकेल. घरात हवी
ती मदत करेल. आणि हॉलच्या साफसफाईची आता काही गरज नाही.’

‘म्हणजे?’

‘मी शेजारच्याच गल्लीतला ताई हॉल साखरपुड्यासाठी बुक करून आलोय. शंभर माणसांची खानपान व्यवस्थाही करुन आलोय. संध्याकाळी पाच पासून हॉल आपल्याला मिळेल. आपण फक्त जावईबापूंना घेऊन तिथं जायचं, बाकीचं सगळं आमचे बाबूकाका आणि नवी विटी नवा दांडू पक्षाची महिला ब्रिगेड पाहून घेईल.’

‘काय सांगता बाळाभाऊ? अहो हा नसता उपद्व्याप सांगितला कोणी तुम्हाला? आम्ही घरगुतीच करणार आहोत सांगितले ना तुम्हाला?’

‘हे पहा आई, आता बोलण्यात वेळ नाही घालवायचा. तायडी ताईंचा साखरपुडा दणक्यात करा असं कुमारसाहेब म्हणाले ना? मग दणक्यातच होणार! तुम्ही फक्त त्या पन्नास साठ सीटची बस सांगून ठेवली आहे. सगळ्यांना तयार रहायला सांगा.’ ‘काय? पन्नास मतांची जबाबदारी सांभाळा. मी दुपारी चार वाजता एक पन्नास साठ सीटची बस? ती कशाला? अहो इथं पलीकडच्या गल्लीतच तर आहे मतदान केंद्र, त्याला बस काय करायची?’

‘आई, मतदान झाल्यावर सगळ्या भजनी मंडळाला आणि मित्रांना
वर्तकनगरला साईदर्शनाला न्यायचंय.”

‘अहो, पण बाळाभाऊ मला कुठं वेळ मिळणार?’

‘छे, छे, तुम्ही मतदान करुन घरी यायचं. आमचे बाबूकाका आणि नवी विटी नवा दांडू पक्षाची महिला आघाडी घेईल बाकी सगळं सांभाळून आणि घरी येऊन जावईबापूंना आणि पाहुण्यांना घेऊन फक्त हॉलवर जायचं. हॉलवर जायला एक दहाबारा सीटची व्हॅन पण सांगून आलोय.

‘अहो, हे म्हणजे फारच होतंय हो!

‘आई, हे तर काहीच नाही. हॉलवर बघा कसा थाटमाट उडवून देतो ते!’

‘अरे बाबा, हे तुम्ही काय चालवलंय?’

‘आई, काही पैशांचा प्रॉब्लेम आहे का?’

‘नाही रे बाबा. पैशाचा काही प्रश्न नाही. माझी दोन पोरं बक्कळ पैसा पाठवतात. पण आम्हालाच साखरपुडा साधासुधा करायचाय. काय हौसमौज करायची ती लग्नात करु. तोपर्यंत आमची दोन्ही मुलं पण येतील.’

‘आई, एवढंच ना? लग्नाचं पाहू पुढचं पुढे. आज साखरपुडा मात्र दणक्यात करायचा. तुमच्या शेजाऱ्यांना, मित्रमैत्रिणींना, भजनी मंडळाला तुम्ही फक्त संध्याकाळी चार वाजता सोसायटी समोर गोळा करा. दुपारचे मस्त जेवण करुन थोडा आराम करा. मी जातो आता पुढची व्यवस्था बघायला.’

‘लीला, आईंना काय काम आहे विचारून घे. पटापटा उरक. आई, आज स्वैपाकाचा पसारा करू नका. मी जेवणाचे डबे पाठवून देतो. जेवण करा. कपडे बिपडे करून तयार रहा.’ राधाक्कांना पुढे काही बोलायची संधी न देताच बाळा सटकतो.

‘अरे हा गेला सुद्धा! काय करावं बाई? लीला हा बोलला तसं करेल ना? नाहीतर वेळेवरसगळी फजिती व्हायची.’

‘नाय आई, त्यो कुमारसायबांचा खास मानूस हाये. येक डाव त्यानं अंगावर घेतला का, काय बी करून ह्ये पार पाडनारच हाये.” एवढ्यात गोविंदराव येतात. चिडलेलेच असतात.

‘अगं हे काय चाललंय काय?’

‘का? आता काय झालं?’

‘अग, तो गोरसवाला म्हणतोय शंभर माणसांचं कॅटरींगचं काम दिलंय आपण. सगळी मिठाई बिठाई सहा वाजता ताई हॉलवर ठेवायची ऑर्डर दिलीय म्हणे! हे कुणी सांगितलं? आणि शंभर माणसं? काय वेडबीड लागलंय की काय तुला?’

‘अहो, ही सगळी त्या कुमारसाहेबांची कृपा! मघाशी ते म्हणाले ना की तायडीच्या साखरपुड्याची चिंता करू नका. त्यांनीच माणसांना लावलंय कामाला. त्यांनीच हॉल बुक केलाय आणि शंभर माणसांची कॅटरींगची ऑर्डरही त्यांनीच दिलीय.’ ‘

काय सांगतेस? अग पण ही सगळी धावपळ मला जमणार नाही म्हणून तर
आपण घरच्या घरी करणार होतो ना सगळं?’

‘अहो, तुम्हाला, मला काहीच करायचं नाही. आपण फक्त पाहुण्यांना घेऊन हॉलवर जायचं. बाकी सगळं तो बाळाभाऊ पाहून घेणार आहे. आपण फक्त पन्नास मतदारांना तयार करायचं. तुम्ही असं करा, तुमच्या नेहमीच्या मित्रमंडळींना सांगा, चार वाजता तयार रहायला. माझा भजनी मंडळालाही मी चार वाजता बोलावते. सोसायटी समोर एक मोठी बस येणार आहे आपल्या ग्रुपला एकदम मतदानाला न्यायला!’

‘काय? मोठी बस?’

‘हो ना. आणि मतदान झाल्यावर सगळ्यांनी जायचंय साई दर्शनाला!’

‘साई दर्शनाला? म्हणजे शिर्डीला? आणि मग साखरपुड्याचं काय करायचं?’
‘अहो, शिर्डीला नाही हो. इथंच आपल्या वर्तकनगर साई मदिरात. आणि आपली सगळी मंडळी जातील साई दर्शनाला. आपण मात्र घरी यायचं आणि जावईबापूंना घेऊन हॉलवर जायचं. बाकीची मंडळी नंतर येतील हॉलवर. सगळ्या समारंभाची जबाबदारी बाळाभाऊ आणि नवी विटी, नवा दांडू पक्षाची महिला आघाडी सांभाळणार आहे.

–विनायक अत्रे

विनायक रा अत्रे
About विनायक रा अत्रे 91 Articles
श्री विनायक अत्रे हे महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त मुख्य वास्तुविशारद (Retd Chief Architect) आहेत. हास्यनाटिका, कथासंग्रह, काव्यसंग्रह तसेच विविध मासिके, नियतकालिके आणि दिवाळी अंकांतून त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी बालगोपालांसाठी अनेक पुस्तके, एकांकिका वगैरे लिहिल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..