भाग १ : भेटीची आवडी । उतावीळ मन ।।
वळणावर उभ्या असलेल्या अश्वत्थाची पानं सळसळली .
कसलीतरी चाहूल लागली होती त्याला .
पानं पुन्हा सळसळली . पुन्हा पुन्हा सळसळली .
आणि इतकावेळ संधिप्रकाशात न्हाऊन निघणाऱ्या , रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या सगळ्या घनदाट वनराईला मंद वाहणाऱ्या वाऱ्यानं प्रत्येकाच्या कानात हळूच सांगितलं ,
” कुणीतरी येतंय ! ”
रस्ता आत्तापर्यंत निर्मनुष्य होता पण आत्ता त्या रस्त्यावरून तिशीतला एक तरुण आपल्याच नादात चालत येताना दिसला .
बहावानं टवकारून त्याच्याकडे पाहिलं . चारदोन फुलं ओघळली . पण जुन्या जाणत्या अश्वत्थाकडे नजर जाताच बहावा शांत उभा राहिला .
” तो आपल्याकडेच येतोय .”
आंबा , फणस , गुलमोहर एकाच सुरात म्हणाले .
अश्वत्थानं कपाळावर हात मारून घेतला .
न बोलता तो रस्त्याकडे पाहू लागला .
आता त्या तरुणाचं लक्ष त्या झाडांकडे गेलं .
संधिप्रकाशातली ती झाडं मोहक वाटत होती . झाडांवरच्या सुरकुत्या झाडांचं वय सांगत होत्या . झाडं वेगवेगळ्या प्रकारची होती . वृद्धावस्थेकडे झुकलेल्या त्या झाडांची उंची , जाडी आणि फांद्यांचा विस्तार कमी अधिक प्रमाणात असलेला दिसत होता . पण एक साम्य होतं त्यांच्यात . संधिप्रकाशात सगळी वृक्षराजी प्रसन्न वाटत होती . खूप ऊन पावसाळे अनुभवल्याचं संचित , फांद्या पानांच्या विस्तारानं समृद्ध झाल्यासारखं वाटत होतं .
तो नकळत अश्वत्थाच्या बुंध्याशी बसला .
” आज याला तुपाच्या विहिरीची गोष्ट सांगू या .”
अश्वत्थानं सळसळ करून सांगितलं .
त्या तरुणाला ऐकू गेलं असावं बहुधा .
” कसली गोष्ट ? ”
सगळी वनराई हसली .
बहावा , गुलमोहर , बकुळ मनसोक्त हसले .
फुलं टपटप ओघळली . सगळा संमिश्र गंध त्याच्या नाकापर्यंत पोहोचला .
आणि पानापानातून संधिप्रकाशाचे चारदोन कवडसे डोकावले .
हे काहीतरी विशेष होतं .
हवंहवंसं वाटणारं होतं .
वनराईचं विश्व न्यारं वाटत होतं .
खरंतर सगळ्या गोष्टीला कंटाळून तो बाहेर पडला होता . वाट फुटेल तिकडे जायचं असं ठरवून . पण हा रस्ता त्याला दिसला आणि त्याच्या दुतर्फा असलेली झाडी दिसली आणि तो इकडे वळला . पुढचा रस्ता कुठं जातो हे पाहण्यासाठी समोरच्या वळणापर्यंत जावं असं एकदा त्याला वाटलं , पण तो मोह टाळून तो झाडांकडे वळला .
आणि वातावरण बघून तो तिथंच बसला .
खूप कंटाळला होता तो .
रोजच्या धकाधकीच्या जीवनाला .
कुठल्या ना कुठल्या कारणानं येणाऱ्या नैराश्याला .
दिशाहीन अस्तित्वाला .
तुटत चाललेल्या रोजच्या संवादाला आणि नात्याला .
कमालीच्या असहिष्णू वृत्तीला आणि का जगावं असा संभ्रम निर्माण करणाऱ्या परिस्थितीला .
सकारात्मकता नसलेल्या वर्तमानाला आणि अंधारमय भविष्याला सुद्धा !
पार कंटाळून गेला होता तो .
” मग तुपाच्या विहिरीची गोष्ट सांगू ? ”
त्याच्या मनातील भावना ओळखून अश्वत्थानं विचारलं .
” त्यामुळं काय होईल ? ”
” ते आम्ही आत्ता नाही सांगणार . पण आता इथं आला आहेस तर गोष्ट ही ऐकावी लागणारच . ”
त्यानं मान हलवली , होकारार्थी .
” …तर लग्नाची ऐन धामधूम सुरू होती . मुहूर्ताची वेळ जवळ येत चालली होती . लगबग , आरडाओरडा , धावपळ सुरू होती . आणि तेवढ्यात कुणीतरी बातमी आणली . नवरा मुलगा बोहोल्यावर चढायला तयार नाही . मग काय , मुलीकडील सगळे हवालदिल झाले . काय करावं , कुणाला कळेना . जो तो आपापल्या कुवतीनुसार सांगू लागला . कुणी म्हणाला , मानपान वाढवा . कुणी सुचवलं हुंडा हवाय का बघा . कुणी बुलेट तर कुणी ट्रॅक्टर . कुणी काय तर कुणी काय , जो तो सुचवू लागला .
कुणी तरी सुचवलं ,
” अरे त्यांना जाऊन विचारा , की बाबा तुला काय हवंय , का रुसला आहेस , आम्हाला कळणार कसं ? ”
पळाला मग एकजण तिकडे आणि आला परत तोंड वाकडं करून .
” काय रे , काय म्हणतात ते ? ”
” ते म्हणतात की त्यांच्या आवारातील मोठी विहीर पाण्यानं तुडुंब भरली आहे , ती सगळी शुद्ध साजूक तुपानं भरून द्या , तरच नवरा बोहोल्यावर येईल , नाहीतर हे लग्न मोडलं असं समजा . ”
झालं . मुलीकडील सगळे रडू लागले . एकमेकांना दोष देऊ लागले . काहीजण पिळदार शरीराचे होते , ते नवऱ्या मुलाला मारायला निघाले . सगळ्यांनी त्यांना कसंबसं थांबवलं . पण प्रश्न तसाच होता . काही सुचत नव्हतं . मुहूर्ताची वेळ जवळ येतंच होती . काय करावं कळत नव्हतं . इतक्यात कोपऱ्यात बसलेली नव्वद वर्षांची म्हातारी सरकत सरकत नवरीजवळ आली . तिला जवळ घेतलं आणि म्हणाली , ” घाबरू नका , रडू नका , मी सांगते तो निरोप त्यांच्याकडे पोचवा . त्यांना म्हणावं , तुम्हाला तुमच्या आवारातील मोठी विहीर शुद्ध साजूक तुपानं भरून हवी आहे ना , मग लगेच देतो . ”
” आजी तुला काय वेड लागलंय ?इतकं तूप कुठून आणणार ? त्या विहिरीतल्या पाण्याचं काय करायचं ? तुझा उपाय म्हणजे शुद्ध वेडेपणा आहे . तुला म्हातारचळ लागलाय . असं कुठं होतंय होय .”
कुणीतरी म्हाताऱ्या आजीवर संतापला .
” माझं बोलणं पूर्ण ऐकून घेतलं नाही तुम्ही कुणी . त्यांना माझा निरोप द्या , म्हणावं , शुद्ध साजूक तुपानं विहीर लगेच भरून देतो , पण त्या विहिरीतील सगळं पाणी बाहेर काढून टाका लगेच . पूर्ण कोरडी करा विहीर . पाण्याचा एक थेंब त्या विहिरीत दिसता कामा नये . ”
एकजण पळाला नवऱ्यामुलाकडे , आणि दुसऱ्या मिनिटाला आनंदानं निथळत परत आला .
” काय रे काय म्हणाले ते ? ”
” ते म्हणाले आमची काय अट नाही आणि मागणी नाही , आम्ही लगेच येतो बोहोल्यावर . तूप नको आणि काही नको .”
सगळे आनंदात उड्या मारायला लागले . म्हातारीच्या चतुराईचा सगळ्यांना अभिमान वाटला . लग्न लागलं आणि सगळे म्हातारीला डोक्यावर घेऊन नाचू लागले .
गोष्ट संपली .”
तो अवाक होऊन बघू लागला .
” असं बघतोस काय ? आम्हाला हेच सांगायचंय तुला. आम्ही वृद्ध झालोत, पण टाकाऊ नाही झालोत. हा संधिप्रकाश दिसतोय ना तो आमचा ऊर्जास्रोत आहे. सूर्य मावळल्यानंतर आणि अंधार पडायच्या आधी जो प्रकाश असतो ना, त्याला संधिप्रकाश म्हणतात. आमची सावली संधिप्रकाशातसुद्धा दिसते. ती अनुभवानं समृद्ध असते. त्या सावलीत बसून तुम्ही स्वतःचा शोध घेऊ शकाल. जीवन कसं जगायचं हे आम्हाला, आमच्या सावलीला विचारा. सकारात्मक आयुष्य मिळेल तुम्हाला. आनंदी जीवनाचे धडे गिरवायचे असतील तर संधिप्रकाशातील सावलीत बसण्याखेरीज पर्याय नाही. बघ, तूच ठरव, म्हातारीचं ऐकायचं की आपलाच हेका चालवून आपलं अस्तित्व धोक्यात घालायचं ? ”
वनराई हसू लागली .
तो विचारात पडला .
उठला .
इकडेतिकडे पाहिलं . संधिप्रकाशातील सावल्या गडद झाल्या होत्या .
तो निघाला , म्हणाला ,
” उद्या येतो नक्की . मला संधिप्रकाशातील सावलीत बसायला आवडेल .”
अश्वत्थानं सगळ्यांकडे पाहिलं .
सगळी वनराई दिलखुलास हसू लागली होती …
– डॉ. श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी
९४२३८७५८०६
———-
संधिप्रकाशातील सावल्या, ही कथामाला आहे. आपल्याला आवडल्यास नावासह सर्वांना जरूर पाठवा.
सध्याच्या परिस्थितीत सकारात्मकतेची गरज आहे, आपण ती पूर्ण करू या.
आणि हो, अभिप्राय पाठवा. वाट पाहतोय.
डॉ. श्रीकृष्ण जोशी यांची नवी कोरी कथामाला… सुरु होत आहे… आज… आणि … दर रविवारी दुपारी १२ वाजता…
खूपच सुंदर कथा आहे… पुढची कथा लवकर टाका…