नदी पार करण्यासाठी पूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात जागोजागी पूल नसल्यामुळे सर्रास लोकांना पोहत जावे लागायचे.ब-याच ठिकाणी टोकरा असायचा.टोकरा अर्थात छोटी नाव. काही ठिकाणी कलई मधून माणसांची ने आण केली जायची. कलई म्हणजे गोल आकाराची लोखंडी नावच. तो काळही तसाच, गावोगाव पट्टीचे पोहणारे लोक होते.पावसाळ्यात नदी काठोकाठ भरुन वहायची लोक बिनधास्त ये-जा करायचे.गंगथडी म्हणजे गंगेच्या काठावरच्या गावात राहणा-या लोकांना उत्तम पोहायला जमायचे.सपासप हात मारत पाण्याची धार कापण्याची सवय होती.कधी तरी प्रसंग येईल म्हणून लहाणपणापासूनच पोहणे शिकवले जायचे.एवढंच काय गंगथडीच्या मुलीसुद्धा पट्टीच्या पोहणा-या असायच्या.
आज पोहायला न येणा-यांचे आणि पाण्याची भीती वाटणा-याचे प्रमाण खूप मोठे आहे.जागोजागी पूल त्यामुळे पोहत नदी पार करण्याचे प्रसंगही कुणावर येत नाहीत.म्हाता-या माणसांना विचारले तर प्रत्येकाकडे पोहत धाडस दाखवल्याचा एक तरी प्रसंग असतोच.माझ्या आईच्या तोंडून तर अजोळचा एक प्रसंग मी खूपवेळा ऐकला आहे.मन्याड नदीकाठी आलूर नावाचे छोटे खेडे माझे अजोळ.सायंकाळची वेळ मुसळधार पाऊस पडत होता.माझे मामा आणि वडील मन्याडकाठी पलीकडच्या तीरावर येऊन पोहचले.नदी दुथडी भरुन वाहत होती.घरी कसे जाणार? दोघांसमोर प्रश्न पडला. परत जाऊन मुक्काम करणे ही लांबच, दुसरा पर्याय सांगळीला धरुन नदी पार करायची. सांगळ म्हणजे वाळलेले कद्दू अर्थात दुधी भोपळे चार बाजूला दोरीने गुंफून यांच्या सहायाने नदी पार करण्यासाठी तयार केलेली असायची. थोड्याशा मोबदल्यात लोकांना पैलतीरावर पोहचवाचे काम काही लोक करायचे. अगदीच अडलेले काम असले की लोक याव्दारे नदी पार करायचे. खरं तर हे अतिशय धाडसाचे काम होते. दोघांनीही आपले अंगावरचे कपडे डोक्यावर बांधून सांगळीची दोरी हातांनी गच्च पकडून सांगळीवाल्यासोबत नदीतून पोहत निघाले.मधूनच सांगळीवाला धीर देत होता.सांगळीवरचा प्रवास सुरु झाला.अखेर दोघेही रात्रीच्या वेळी भर पावसात नदी पार करून सुखरूप आले खरे पण आजोबांनी त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.राग शांत झाल्यावर त्यांच्या धाडसाचे कौतुक केल्याचा प्रसंगही आई सांगते.
पैलतीरावर जाणारे शेतकरी दम लागू नये बैलाच्या शेपटीला धरून पोहत पलीकडे जायचे.फार सपासप हात मारायची गरज नसते.बैल पोहत नदी पार करतो बरोबर आपणही जातो.मी तसा प्रयत्न एक-दोन वेळेस केला तेंव्हा एक काळजी घ्यावी लागते काठाच्याजवळ आलो की शेपटी सोडून द्यावी लागते नाही तर बैल लाथ मारण्याची शक्यता असते.पाण्यात बैल लाथ मारु शकत नाही अन् मारली तरी काही लागत नाही हे साधं तत्व सर्वांना माहित असायचं. बरेचवेळा नदीकाठावर अशा गंमती-जंमती बघायला लहानपणी खूप मजा यायची.कुत्रे,शेळ्या–मेंढ्या,प्राणी कसे पोहत जातात हे पाहणे औत्सुक्याचे होते.
डोळ्यावर वाटरप्रुफ चष्मा आणि डोक्यावर कॅप घातलेल्या जलतरणपटूच्या स्पर्धा टिव्हीवरुन पाहतांना मला आठवतात स्वतःचे कपडे,दिवसभराची भाकरी डोक्यावर बांधून पाणी न लागू देता पोहत नदी पार करणारी गावाकडची माणसं त्यांचे ते जलमय जीवन.त्यांची कोणाशी स्पर्धा नव्हती किंवा त्यांना कोणते मेडलही जिंकायचे नव्हते.गावाकडची माणसं अगदी आतापर्यंत नदी ओलांडतांना पायातील वाहना हातात घेऊन हळूहळू नदी सोबत जीवनही पार करायची.
— डॉ. संतोष सेलूकर,परभणी
7709515110
Leave a Reply