संगीताचा सखोल अभ्यास असलेले एक गुरु होते. संगीत हेच जीवन मानून त्यांनी संगीताची आराधना केली होती. त्यामुळे त्यांच्याकडे दूरवरून संगीत शिकायला तरुण येत असत. त्यांच्याकडून फारशी अपेक्षा न ठेवता गुरूही त्यांना संगीत शिकवित असत.
एकदा एक तरुण त्यांच्याकडे सतार शिकण्यासाठी आला. त्या तरुणाला संगीताचे उपजतच ज्ञान होते. त्यामुळे तो लवकरच सतारवादन शिकला. परंतु तो तरुण वृत्तीने फारच चंचल होता. त्याचे स्वतःचे कोणत्याच गोष्टीवर नियंत्रण नव्हते. त्यामुळे तो अनेकदा दुःखी व असमाधानी असायचा. त्याच्या गुरूच्या लक्षात ही गोष्ट केव्हाच आली होती.
जीवनात सुख आणि समाधान कसे असते व ते मानायचे असते हे त्याला संगीताच्या आधारेच पटवून सांगायचे असा गुरूंनी निश्चय केला. एकदा हा तरुण असाच एकटा विमनस्क अवस्थेत बसला असताना गुरू त्याच्याजवळ गेले. त्यांनी त्याची चौकशी केली तेव्हा तो दुःखी व असमाधानी असल्याचे त्यांना कळले. याचे कारण मात्र त्या तरुणालाच माहीत नव्हते. तेथे बाजूलाच एक सतार होती. गुरूंनी तिच्या सर्व तारा सैल केल्या व त्या तरुणाला सतार वाजविण्यास सांगितले.
त्यावर तो तरुण म्हणाला, या तारा इतक्या सैल आहेत की, कोणालाही सतार वाजविणे अशक्य आहे. त्यावर गुरूंनी पुन्हा सतार हातात घेतली व तिच्या तारा एकदम ताणून बसविल्या व त्याला पुन्हा सतार वाजविण्यास सांगितले. तो तरुण लगेच म्हणाला तुम्ही सतारीच्या तारा एवढ्या ताणल्या आहेत की, ती वाजवायचा प्रयत्न केला तर ताराच तुटू शकतील. त्यावर गुरू त्याला म्हणाले की, तुझ्या दुःखाचे कारण तूच सांगितले आहेस. जीवनात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाल्यास दुःख निर्माण होऊ शकते, जसे सतार अगदी सैल व फार ताणली तर तिच्यातून चांगले सूर येत नाहीत. तसेच जीवनात प्रत्येक गोष्टीत समतोल साधला तरच सुखासमाधानाचे संगीत निर्माण होऊ शकतं. त्या तरुणाला गुरूंचा हा उपदेश पटला व त्याने त्याप्रमाणे वागण्याचा निश्चय केला.
Leave a Reply