नवीन लेखन...

संगीतजीवी आपण !

तुमच्या लक्षात आलं आहे का, दिवसाच्या धबडग्यात असताना अचानक कानी तुमच्या आवडत्या गीताचे सूर येतात तेव्हा क्षणार्धात तुम्ही वेगळे होऊन जाता. ही आयुष्याच्या खऱ्या तोंडओळखीची सुरुवात असते आणि कालयंत्रातून तुम्ही मागे पाऊल टाकता. संगीताची ताकत आपल्याला आनंदी किंवा दुःखी करून जाते. काहीवेळा कार्यालयातून दमून-भागून घरी यावे आणि आरामखुर्चीत विसावत हाती कॉफीचा मग घ्यावा आणि कानांवर मस्त संगीत असावं, एवढंच मर्यादित सुख आपल्याला अपेक्षित असते. उत्तम संगीत आपल्या जीवनाच्या सगळ्या परिघांना (शारीरिक, मानसिक, भावनिक) स्पर्शून जाते. संगीत प्रत्येक सहृदय व्यक्तीच्या मनाचा एक अदृश्य भाग असते आणि सांस्कृतिक वास्तव तसेच वारसाही असते.

काही हजार वर्षांपूर्वी बासरीचा शोध लागला. तेव्हापासून मानवी मेंदू आणि वाद्ये यांचे प्राचीन नाते जडले. अश्मयुगापासून काही ऑस्ट्रेलियन आणि आफ्रिकन जमातींमध्ये कठीण घडीच्या वेळी (दुष्काळ, अतिवृष्टी इ) प्रार्थना करण्यासाठी,किंवा सण समारंभ साजरे करण्याच्यावेळी संगीत उपयोगात आणले जायचे.

ग्रीक संस्कृतीनेही मनःशांतीसाठी संगीताचा वापर पूर्वापार करत आणला आहे असे दाखले आहेत. अमेरिकन संगीतोपचार संस्था ही जगातील सर्वात मोठी संगीतोपचार संस्था आहे. त्यांच्या मते संगीतोपचाराची औपचारिक सुरुवात १७८९ साली झाली आहे. ग्रीनबर्गचे २०१७ मधील संशोधन एका जुन्या मुद्द्याकडे अंगुलीनिर्देश करते की पायथॅगोरस सुद्धा शारीरिक आणि मानसोपचारविषयक समस्यांसाठी संगीत हा उपाय सुचवित असे.

ज्यूइश बायबल मध्ये शरीर आणि मनाच्या जखमा भरून काढण्यास संगीत सक्षम असते असा एक उल्लेख आहे. हा संगीतोपचाराचा सर्वात प्राचीन उल्लेख मानता येईल. डेव्हिड नावाच्या वादकाने सौल राजाला औदासिन्यामधून संगीताच्या साहाय्याने बाहेर काढले होते. प्रेषिताच्या १६ व्या प्रकरणात खालील वर्णन केले आहे-

“जेव्हा जेव्हा सौल राजाला एकाकी वाटत असे, त्याच्या मनात खिन्नता दाटून येई, त्यावेळी डेव्हिड वाद्य वाजवून त्याची करमणूक करीत असे. राजाला त्यामुळे चांगले वाटत असे आणि त्याचे औदासिन्य दूर होत असे. “अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये असे संगीताचे माणसावरील परिणाम नमूद केलेले आहेत. फक्त त्यातील ऐतिहासिक तथ्य वेळोवेळी तपासणे आवश्यक आहे.

हिंदुस्थानी संगीताला प्राचीन परंपरा आहे. अनेक गवय्ये, अनेक घराणी आजही अभिमानाने त्याची पताका खांद्यावर मिरवत आहेत. ते गळ्यातून निघण्यासाठी साधना करावी लागते, बोटांमधून उमटण्यासाठी सराव करावा लागतो आणि कानांनी आस्वाद घेण्यासाठी तप करावे लागते. संगीत सम्राट तानसेन आणि ताना-रिरी च्या दंतकथा इथल्या मातीत खऱ्या मानल्या जातात. याचं मूळ “शास्त्रीय “संगीतात आहे. नवनवे राग, स्वरमाला, आरोह-अवरोहाचे तानेबाने, आलाप, गायनाच्या वेळा आणि विशेष प्रहर, बंदिशी सगळं एका जन्मात अवगत करणं अशक्य आहे. आमच्या यच्चयावत भावना व्यक्त करायला संगीतरचना आणि वाद्ये लागतात. आयुष्यात काहीही साजरे करायचे असेल तर संगीत काखोटीला मारल्याशिवाय ते पूर्णत्वाला जात नाही. भावगीत,भक्तीगीत,गज़ल, प्रेमगीत,कव्वाली, भूपाळी, लावणी, अंगाई किती किती रूपांमध्ये ते अहर्निश आपल्या आसपास असतं. आपण संगीत महोत्सव भरवतो, मुशायरे आयोजित करतो, खासगी/ सार्वजनिक मैफिलींचे संयोजन करतो, संगीतविषयक शिष्यवृत्ती /पुरस्कार देतो. थोडक्यात आपण सतत संगीताला साजरे करीत असतो. संगीत जगत असतो.

जीन रिचटर च्या मते “आपल्या जीवनाच्या खिन्न, उद्विग्न रात्रीचा चंद्रप्रकाश म्हणजे संगीत!”

आणि हक्सलीने एके ठिकाणी विधान केलंय – “मौनापाठोपाठ अव्यक्त ते व्यक्त करण्याचे साधन म्हणजे संगीत!”

संगीताच्या वादनातून, गायनातून आणि श्रवणातून जी स्वर्गीय अनुभूती वाट्याला येते ते कलात्मक अंग असते संगीताचे! अनेक मैफिली, रेडिओ /दूरदर्शनचे कार्यक्रम, टेपरेकॉर्डरवरील आवडती गाणी (भलेही त्यामागील रागदारी अथवा ख्याल गायकी समजत नसेल तरीही) आपणांस अतीव आनंद देतात, स्मृती देतात. नामवंत गायक,संगीतकार,वादक आपले आदर्श असतात आणि त्यांच्यासारखे होण्यासाठी आपण परिश्रम करतो. संगीत ही संघभावनेतून निर्माण होणारी सर्जनकला आहे त्यात कवी (गीतकार), गायक,संगीत-दिग्दर्शक, वादक आणि गायक यांचे अमूल्य योगदान असावे लागते मगच त्या रचना “अक्षर ” होतात.

मानवी संस्कृतीच्या सर्व हद्दी पार करणारे सर्वव्यापी आकाश म्हणजे संगीत!

मानसिक स्वास्थ्यावर खालील प्रकारे संगीत सकारात्मक परिणाम घडवून आणते-

१) संगीत प्रेरणा देते.

२) एकाकीपणाच्या भावनेवर मात करण्यासाठी हा सिद्ध झालेला इलाज आहे.

३)  शब्दात व्यक्त न होऊ शकणारे आघात संगीतामध्ये न बोलता व्यक्त होतात.

४) सामाजिक अभिसरणात संगीत हा महत्वाचा दुवा ठरते.

५) आनंद,समाधान, जीवनमान उंचावण्यात संगीताचा मोठा हातभार असतो.

६)  स्व-मूल्य वाढविण्यासाठी अपेक्षित असलेले सकारात्मक अनुभव संगीताच्या श्रवणानंदातून मिळतात.

७) साधारणपणे आपण बाह्य-नियमनाचे बळी ठरतो. संगीतोपचारातून स्वतःची तोंडओळख होते आणि क्षमतांची जाणीव होते. आपोआप अंतर्गत नियमनाकडे माणसे वळतात.

८) संगीत मानसोपचाराचे एक महत्वाचे साधन मानले जाते आणि ते औदासिन्याच्या छटा काही प्रमाणात सुसह्य करते.

९) संगीत ऐकण्याच्या सवयीमुळे भयगंड कमी होतो आणि वास्तवाच्या स्वीकारासाठी मानसिकता तयार होते.

१०) संगीताच्या आवडीमुळे नातेसंबंध सुधारतात.

११) शरीर, मन सैलावणे, शांत वाटणे, प्रसन्नता अनुभवता येणे, भावनिक गुंतवणूक वाढणे अशा अनुभूती संगीतामुळे जगता येतात.

संगीतोपचारांना महत्व आले ते पहिल्या आणि दुसऱ्या जागतिक महायुद्धांदरम्यान! त्यावेळी रुग्णालयांमध्ये दाखल केलेल्या रुग्णांना बरे वाटावे, त्यांचे शारीरिक आणि मानसिक आघात हलके होऊन जखमा बऱ्या व्हाव्यात म्हणून हौशी आणि व्यावसायिक संगीतकार तेथे जाऊन मनोरंजनाचे कार्यक्रम सादर करीत असत. हा सकारात्मक परिणाम बघून डॉक्टर आणि नर्सेसनी रुग्णालयाच्या व्यवस्थापनांना विनंती करून वादकांची नेमणूक करायला लावली. त्यानंतर संगीतोपचारांच्या औपचारिक अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली.

संगीतोपचारांविषयी काही मनोरंजक माहिती –

१) संगीतोपचारांमुळे परस्परसंबंध सुधारतात आणि सामाजिक कौशल्ये वाढीला लागतात.

२) कानावर पडणाऱ्या संगीतानुसार हृदयाचे ठोके बदलतात आणि त्यांची नक्कल करतात.

३) पोटातल्या गर्भाला आवाजाच्या स्पंदनांमधील फरक जाणवतात.

४) आनंदी अथवा दुःखी संगीत ऐकण्यानुसार आपला मूड बदलतो आणि (तात्पुरता का होईना) जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो.

५) मेंदूतील डोपामाईन हा आनंदी रस संगीताच्या श्रवणाने स्त्रवतो.

६) संगीत ऐकल्यावर मेंदूतील न्यूरॉन्सचे जाळे संघटित हालचाली करतात.

७) वाद्य शिकताना हालचालींमधील कौशल्य वाढते.

संगीतोपचाराची तीन तंत्रे-

१) ढोल नाद

आपल्याकडे आजकाल विशेषतः गणेशोत्सवात आणि नवरात्रात मिरवणुकीच्या वेळी ढोलपथक असते आणि त्यात युवकांबरोबर युवतींच्याही पथकांची नोंद घ्यावी असं त्यांचं कर्तृत्व आहे. ढोल वादनात गंमत असतेच, पण त्याबरोबरच त्याचे किंचित व्यसन लागणे आणि दमछाकी बरोबर गटातील सर्वांचे भावबंध घट्ट होतात हेही दिसून आले आहे. ढोलवादनातून मज्जासंस्थेचे आणि अंतःस्रावांच्या ग्रंथींचे विकार दुरुस्त होऊ शकतात यावर शास्त्रज्ञांचे एकमत आहे. शरीराच्या तक्रारींबरोबर ढोलवादन सामाजिक एकीकरणावर उपाय ठरत आहे. रिक ऐलन हा सुप्रसिद्ध ड्रमवादक म्हणतो- “ढोल वादन आपल्यातील वैमनस्य, चिंता, वैरभाव, ताणतणाव कमी करण्यास मदत करते आणि उर्जावान समूहाचे मनोहारी प्रदर्शन घडवून आणते”. भावनिक विरेचन (दबून राहिलेल्या क्रोध, आक्रमकता यासारख्या भावनांना बोलतं करणं) ढोल वादनाने साध्य होते.

२) गायन

सर्व वयोगटातील आणि पार्श्वभूमी असलेल्या रुग्णांसाठी गायन ही एक वैश्विक उपचारपद्धती आहे. अनेक मनोविकास तज्ज्ञांनी संगीत हे “मेंदूसाठी महत्वाचे जीवनसत्व” आहे असं ठामपणे प्रतिपादन केलेलं आहे. चांगले संगीत ऐकणे किंवा गायन हे मेंदूच्या नादुरुस्त पेशींना ठीक करण्यासाठी वापरले जाते. गेर्डनेर आणि स्वनसोन यांनी १९९३ साली पर्किन्सन (कंपवात), डिमेंशिया (मानसिक ऱ्हास) आणि अल्झायमर (वार्धक्यातील विस्मृती) अशा आजारांवर संगीतोपचार महत्वाचा मानला जावा असे नमूद केले.

३) कंपन-ध्वनीशास्त्राद्वारे उपचार –

कमी आवर्तनाची कंपने जर हलक्या सुमधुर संगीताशी जोडली तर हा शास्त्रीय उपाय करता येतो. ध्वनीलहरींद्वारे शरीरभर सकारात्मक ऊर्जा पसरविता येते हे व्हायब्रो -अकोस्टिक थेरपी (व्ही ए टी) च्या आंतरराष्ट्रीय संस्थेने सिद्ध केलेलं आहे. या उपचारपद्धतीद्वारा शरीर सक्रिय होते आणि शरीरांतर्गतची यंत्रणा मन आणि देहाला स्थिर करते.

संगीतोपचार दोन प्रकारचे असतात-

१) क्रियाशील उपचार– नृत्य, गटाने गायन, संगीत खेळ इत्यादींमध्ये रुग्ण आणि उपचार करणारी व्यक्ती दोघेही सामील होतात.

२) ग्रहण उपचार– यामध्ये रुग्ण प्रत्यक्ष सहभागी न होता संगीत ऐकणे आणि योगसाधनेच्या सूचनांचे ग्रहण करतो.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..