नवीन लेखन...

अण्णासाहेब किर्लोस्करांचे ‘संगीत सौभद्र’

आजच्या दिवशी सन १८८२ साली, अण्णासाहेब किर्लोस्करांचे ‘संगीत सौभद्र’ हे नाटक रंगभूमीवर आले होते.
नाटककार अण्णासाहेब किलरेस्करांचं १८ नोव्हेंबर १८८२ साली रंगभूमीवर आलेलं ‘संगीत सौभद्र’ हे नाटक आज तब्बल १३५ वर्षांचा प्रदीर्घ काळ लोटूनही तितक्याच आवडीनं रसिक उचलून धरतात यातच या नाटकाची अभिजातता दडलेली आहे. कलावंतांच्या अनेक पिढय़ांनी आपल्या गान-अभिनयानं हे नाटक तोलून धरलं, त्यात आपले रंग मिसळले आणि तरीही ‘संगीत सौभद्र’ची जादू कधीच ओसरली नाही. ‘संगीत सौभद्र’ मध्ये सुरुवातीला साकी, दिंडय़ांसह १४५ हून अधिक पदं होती. हाही एक विक्रमच होय. त्याकाळी पहाटेपर्यंत नाटकं चालत. त्यामुळेच बहुधा नाटकाची रंगत वाढविण्यासाठी तेव्हा पदांची संख्या इतकी असावी. यावर मल्लिनाथी करताना आद्य नाटककर्ते विष्णुदास भावे यांनी ‘संगीत सौभद्र’चा प्रयोग पाहून ‘यात फक्त डोअरकीपरला तेवढं गाणं द्यायचं राहिलंय,’ असे उद्गार काढल्याचं सांगतात. सौभद्र’ने नट, नाटक आणि नाटककाराबरोबरच मराठी रंगभूमीलाही प्रतिष्ठा मिळवून दिली. ही बाब फक्त पहिल्यांदा सौभद्र सादर झाले तेव्हाच घडली नाही, तर जेव्हा जेव्हा नवीन संचात ‘सौभद्र’ सादर झाले, त्या त्या वेळी घडली. या निमित्ताने एकाच नाटकाने अनेक महान दिग्दर्शक, नट, संगीतकार, नेपथ्यकारच नाही तर अनेक नाटक कंपन्यांना ओळख निर्माण करून दिली.

सुभद्रा-अर्जुनाच्या प्रेमाची आणि त्यांना एकत्र आणण्यासाठी कृष्णानं रचलेल्या चालींची कहाणी ‘संगीत सौभद्र’मध्ये उलगडते. ‘नमुनि ईशचरणा’, ‘नभ मेघांनी आक्रमिले’, ‘राधाधर मधुमिलिंद जय जय’, ‘लग्नाला जातो मी’, ‘प्रिये पहा..’, ‘जरतारी लाल शालजोडी’, ‘नच सुंदरी करू कोपा..’, ‘वद जाऊ कुणाला शरण’, ‘कोण तुजसम मज सांग गुरुराया कैवारी माझा’, ‘पावना वामना या मना..’, ‘बलसागर वीरशिरोमणी’, ‘अरसिक किती हा शेला’, ‘किती किती सांगू तुला..’ अशा एकाहून एक सरस पदांनी या नाटकातले नाटय़पूर्ण क्षण चढत्या रंगतीनं उत्कर्षबिंदूप्रत जातात. आज महाराष्ट्रात ज्या काही संगीत नाटक करणा-या कंपन्या झाल्या आणि आहेत, त्यातली अशी एकही कंपनी नाही, ज्या कंपनीने ‘सौभद्र’ केले नाही.

किर्लोस्कर नाटक कंपनीनंतर महाराष्ट्रात कोणतीही नवीन नाटक कंपनी निघाली, मग ती ललितकलादर्श, नाट्यकलाप्रवर्तक, यशवंत, नूतन संगीत मंडळी, बलवंत, नूतन संगीत विद्यालय, राजाराम ते अगदी कालपरवाच्या नाटक संस्था असोत, ज्यांनी ज्यांनी संगीत नाटके केली, त्या सर्व संस्थांचे/कंपन्यांचे पहिले प्रयोग ‘संगीत सौभद्र’चेच असत. आजवर जवळपास शेकडोच्या वर संस्था, कंपन्या, क्लबांनी सौभद्र सादर केले आहे. जे नाटक १८८२ मध्ये लिहिले गेले, सादर झाले, ते आज २०१७ मध्येही कुठे ना कुठे, कुठल्या तरी संस्थेतर्फे सादर होत असते.
अण्णासाहेब किर्लोस्करांनी सौभद्र कसे लिहिले हे पाहणे खरेच मनोरंजक आहे. किर्लोस्करांनी लिहिलेले पहिले नाटक ‘शाकुंतल’ खूप गाजले. पण कितीही झाले तरी ते होते भाषांतरित. सच्च्या लेखकाला स्वत:चे स्वतंत्र नाटक लिहिण्याची ऊर्मी अधिक तीव्र असते. त्यानुसार अण्णासाहेब किर्लोस्करांना स्वत:च्या नाटकाने पछाडले होते. त्यांच्या डोक्यात ‘अर्जुन सुभद्रा’ हा विषय घोळत होता. त्या काळानुसार नाटकांचे विषय हे प्रामुख्याने पौराणिक असत. कारण त्या गोष्टी सामान्य माणसाला माहीत असत आणि पुराणकथांतल्या नीतिमूल्यांचे, भव्यतेचे, लार्जर दॅन लाइफ व्यक्तिमत्त्वांचे, राजा-राण्यांच्या संबंधांचे समाजमनावर गारूड असणे स्वाभाविकच होते. आणखी त्याहूनही महत्त्वाची बाब म्हणजे, सामान्य माणसाचे आयुष्य नाटक लिहिण्याएवढे, विचार करण्याएवढे त्या काळी गंभीर नव्हते. सामान्य माणूस हा प्रहसनातच असायचा. तोही असल्यास. असो.

तर अण्णासाहेबांनी ‘सौभद्र’ची कथा कल्पिली आणि पहिले तीन अंक लिहून काढले. त्या कथेचा विषय ऐकून त्या वेळच्या मुंबई हायकोर्टाचे प्रख्यात वकील महादेव चिमणाजी आपटे यांनी किर्लोस्करांना पत्र लिहिले होते की तुमचे ‘शाकुंतल’ हे नाटक सर्व रसपरिपोषक आहे. त्यातली पदे उत्तम आहेत. लोकांना ते आवडले आहे. नवीन नाटकात तीनच रस प्रामुख्याने दिसतात, त्यानुसार येणारी पदे किती वैविध्य निर्माण करणार? आणि हा विषय लोकांना किती रुचेल याबद्दल शंका वाटते. त्यामुळे ‘सौभद्र’विषयी पुनर्विचार करावा. हे पत्र १८८२ च्या ऑक्टोबरला किर्लोस्करांना मिळाले. आणि किर्लोस्करांनी १८ नोव्हेंबर १८८२ रोजी पुण्याच्या ‘पूर्णानंद’ नाट्यगृहात पहिल्या तीन अंकांचाच प्रयोग सादर केलाही. एक तर पूर्ण नाटकाऐवजी फक्त तीन अंकांचेच नाटक ते लोक कसे काय सादर करत याचे राहून राहून आश्चर्य वाटते. (कारण अण्णासाहेबांनी ‘शाकुंतल’चाही सुरुवातीला फक्त पहिल्या चारच अंकांचा प्रयोग सादर केला होता.) ‘सौभद्र’चा प्रयोग इतका अभूतपूर्व झाला की लोकांनी त्याचे प्रचंड प्रमाणात स्वागत केले. सर्वसामान्य प्रेक्षकांबरोबरच समाजातील मान्यवरांनी, प्रतिष्ठितांनी या नाटकाला गौरवले. त्या काळच्या या काही प्रतिक्रिया बोलक्या ठराव्यात. त्या वेळच्या एका प्रतिष्ठित वर्तमानपत्रात अशी समीक्षा केली होती, की ‘मराठी भाषेत निबंधमाला व संगीत सौभद्र ही दोनच काय ती नवीन व उत्कृष्ट पुस्तके आहेत.’ ना. सी. फडके लिहितात, ‘हल्लीच्या चंदेरी आणि सोनेरी ज्युबिल्यांच्या काळात सौभद्रची ज्युबिली करायची झाल्यास रेडियम ज्युबिली करावी लागेल.’

वि. स. खांडेकर म्हणाले, ‘देवांना कधीही वार्धक्य येत नाही, अशी समजूत आहे. अशा देवकोटीला पोहोचलेल्या मराठी नाटकांची यादी करू लागल्यास तिच्यात श्रीकाराच्या खाली ‘सौभद्र’चे नाव घालावे लागेल.’ या अशा आणि कित्येक प्रतिक्रिया वाचायला मिळतात. पण त्या काळी या नाटकाचा फक्त गवगवाच झाला असे नाही; तर श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, गंगाधर गाडगीळ यांसारख्या टीकाकारांनी कठोर टीकाही केली.

किर्लोस्कर अत्यंत दृढनिश्चयी असावेत. कारण एकदा एखादी गोष्ट डोक्यात घेतल्यावर ती हवी तशी केल्याशिवाय ते कधीही गप्प बसले नाहीत. संगीत नाटक असले तरी नटांना मनमुराद मुक्तपणे ताना आणि आलापी त्यांनी कधी करू दिली नाही. गाणे आवश्यक त्या वेळेत पूर्ण करण्याबाबत ते अतिशय आग्रही असत. तसेच नाटकाच्या विषयाबद्दल, पदे किंवा त्यांच्या चालींबद्दल भलताच युक्तिवाद केलेला त्यांना खपत नसे. आपण लिहिलेल्या पदांबद्दल, शब्दांबद्दल, चालींबद्दल त्यांना प्रचंड आत्मविश्वास असायचा. परंपरेनुसार पडद्यातली नांदी त्यांनी स्टेजवर आणली; त्याबद्दल नाट्यशास्त्राचा नियम दाखवणा-याला ते उभे करत नसत. कदाचित महादेव आपट्यांच्या शंकेला तडकाफडकी प्रयोग करूनच त्यांनी उत्तर दिले की काय असे वाटते.

तर १८८० ला सौभद्रचे पहिले तीन अंक लिहून त्याचा प्रयोगदेखील झाला, पण पुढच्या अंकाचे गाडे काही पुढे सरकेना. अशातच एकदा ते बाजारातून येताना त्यांना एका दुकानात काचेचा गणपती दिसला; त्यांनी तो चांगलीच किंमत देऊन विकत घेतला. बाजारातून येतायेताच त्यांना सौभद्रच्या पुढच्या अंकांची कथा सुचली आणि त्यांनी दुस-याच दिवशी सगळ्यांना पूर्ण नाटकाचे कथानक ऐकवले. अशी सुरस कथा अण्णांच्या चरित्रात वाचायला मिळते. ज्या तिस-या अंकावर गाडे अडले होते, त्याच्या पुढे कथानक नेण्यास अचानक नाटकात ‘गर्गमुनी’ आल्याने अण्णासाहेबांच्या लेखी पुरेसा गुंता सुटला होता. नाटक वाचल्यास पहिल्या तीन अंकांमध्ये आणि पुढच्या अंकांमध्ये नाटकाच्या रचनेचा, पात्रांच्या संगतीचा, स्थायिभावाचा निरनिराळा परिणाम दिसून येतो. पण हे सगळे नाटक अभ्यासणा-यांसाठी. सामान्य लोकांवर याचा काहीच परिणाम झाला नाही आणि एक वर्षानंतर पुढचे अंक लिहून १८८३ मध्ये ‘संगीत सौभद्र’च्या पाचही अंकांचे पूर्ण लांबीचे नाटक पुण्यात सादर झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०७१३३
संदर्भ. इंटरनेट / हृषीकेश जोशी

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..