वारसा ही जतन करण्याचीच गोष्ट नव्हे तर संवर्धन करणंही त्यात अपेक्षित आहे. संवर्धनासाठी जतन आवश्यक. वारसा मग तो कोणताही असो सांस्कृतिक, नैसर्गिक त्याची वर्षावर्षाला घसरण होत चाललीय. शास्त्रीय संगीत नामशेष होत चाललं असून “स्त्री” या विषयाभोवती संगीत पिगा घालीत आहे. सामाजिक, कौटुंबिक परिस्थितीचे भावनिक प्रसंगाच सोनं करणारं संगीत आजही काहींच्या मनावर राज्य करुन आहे म्हणून “जतन” संवर्धनाच्या थोड्या आशा आहेत.
कर्णमधूर संगीत जाऊन कानफटी संगीत आलं आहे. आशयहीन गीताला संगीतही तसेच दिले जात आहे. दर्जा घसला की, वारसा स्वतःचं अस्तित्व गमावून बसतो. नैसर्गिक व सांस्कृतिक वारसाच मूळात नष्ट होत चालला आहे. संगीत फुलतं ते निसर्गात व संस्कृतीत, निसर्गाची जागा प्रदूषण व्यापत आहे व संस्कृती लोप पाऊन विकृती सर्वत्र दिसत आहे. संगीत पोकळीत तयार होत नाही. मानवी मनाचं भावनिक स्पंदन म्हणजे संगीत. भावनाच बोथट व्हायला लागल्या आहेत. कुटुंबातील, सामाजिक संवाद कमी होत चालले आहेत. मानवी मनाच्या आंतरक्रियाही कमी होत चालल्यात. संवाद व आंतरक्रिया संगीत समृध्द करतं. निष्क्रिय व एकतर्फी समूहसंपर्क साधनांनी माणसाच्या हालचाली सीमित केल्या आहे. पूर्वीप्रमाणे वारसा नैसर्गिकरित्या जतन केला जात नाही. कारण निसर्गच उद्ध्वस्त करणं चाललं आहे. वारसा जतन करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सर्व क्षेत्रात सुरु आहेत.
सा रे ग म ला खुंटीला टांगून वारसा जतन कसा होईल. कुत्रे चावल्यावरचा आवाज, कुठेही कसंही अंग वेडं करण्यासाठी संगीत आवश्यक आहे का? संथ नदीप्रमाणे निखळ झर्याप्रमाणे वाहणारं संगीत जाऊन अवखळ, रौद्रमुद्रा धारण करणारं, समुद्राच्या भरतीच्या लाटेप्रमाणे पण त्याच गतीनं आहोटी लागल्याप्रमाणे ओसरणारं ठरत आहे. कर्णमधूर ते कानठळी बसविणारं संगीत असा प्रवास चित्रपट संगीताचा चालू आहे. सध्याचं संगीत तकलादू व इतकं क्षणभर ठरत आहे की, आजचं संगीत उद्या ऐकावं वाटत नाही. जुन्या संगीताने “वेड” लावलं. आजच्या संगीतानं “वेडं” केलयं. पूर्वीचे हिंदी चित्रपट संगीत संस्कारक्षम होते. देशभक्ती, देवभक्ती, समाज, कुटुंब यांच्या उदात्त प्रेमाची महती गाणारं होतं. नायक नायिका स्वतःचा डांगोरा पिटत नव्हती. स्वतःच्या वासनेचा गीतातून, संगीतातून जाहीर लिलाव करत नव्हती.
“संगीत” काय चीज आहे हेच आजच्या पिढीसमोर येत नाही. आलेलं संगीत हेच व एवढंच संगीत आहे असं त्यांना वाटत आहे. शास्त्रीय संगीत ऐकण्याआधीच डोकेदुखी वाटत आहे. शास्त्रीय संगीत निसर्गातील संगीत याचा विचार देखील न करण्याइतकी परिस्थिती आजच्या हिदी चित्रपट संगीताने त्यांच्यासमोर आणली आहे. सिनेमाचं नाणं चालतं करण्यासाठी त्यांनी शास्त्रीय संगीत मोडीत काढलं. व्यक्तिमत्व विकासात संगीताला स्थान आहे. मनातील भावनिक पोकळी संगीतानेच भरुन येते. मानवी जीवनाला सुंदर पडलेलं स्वप्न म्हणजे संगीत. आजच्या चित्रपटांना अनेक कुबड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. सगळच टुकार असलेल्या चित्रपटात संगीतही भिकार संगीताच्या अनेक पैलूचं दालन खुलं करण्यात चित्रपट अयशस्वी ठरत आहेत. संगीताचं व गाण्याचं वर्चस्व असलेली चित्रपट नामशेष होऊन संगीताचाही दुष्काळ पडत आहे. कथानक नसलेल्या चित्रपटात कोवळी मुले व निसर्ग सौंदर्याचा आधार सगळ्याच प्रेमकथा घेत आहेत. प्रेमाची, प्रेमाच्या संगीताचीच बाजू त्यांच्यासमोर येत आहे. उदात्त, संगीत, करुण संगीत त्यांच्यासमोर येत नाही, आणलं जाऊ देत नाही. संगीतावर मान डोलावायची असते, वेडे वाकडे अंगविक्षेप नव्हे. दर्दभरीत संगीत त्यांना नकोच आहे. हिदी चित्रपट संगीत आज उपभोग संस्कृतीच्या जबड्यात अडकले आहे. नाना प्रकारच्या संगीताच्या कॅसेटस्नी माणसांना हतबल केले आहे, नादी लावले आहे. कविता, श्लोक ऐकाकाळी पाठ म्हणणारी मुले आई वडिलांसमोर अश्लील गाणे, संगीताच्या धूनवर पाठ करीत आहेत. गाणं लक्षात राहतं ते आशयामुळे पण आशयाची जागा संगीतानं घेतली.
केवळ प्रेमाच्या गाण्यासाठीचं संगीत खर्ची पडत आहे. आज प्रेम सोडून कोणतंच गाणं संगीतानं
नटत नाही. कारुण्यानं ओथंबलेली गाणी, संगीत ऐकवणारा वर्ग ही कमी होत आहे. संगीताची अभिरुची घसरतच नाही तर कोसळत आहे. मुळात गीत चांगलं नाही म्हणून संगीतही चांगलं नाही. आशयातसुध्दा एक प्रकारचं संगीत असते हे कळायला मानवी मनाची स्पंदन एवढी तरल असावी लागतात. फुलाला चुरगळल्याने सुगंधात फरक पडतो. संगीतालाही नको तसं चुरगाळलं जात आहे, हाताळलं जात आहे. संगीत समृध्द होण्यासाठी रियाझ, तपश्चर्या हवी. ऑर्केस्ट्रावाले आज प्रसिध्द संगीतकार बनत आहेत. नावीन्याच्या नावाखाली जे जे येत आहे ते फॅशन म्हणून रुळत आहे.
भारताची संगीत परंपरा समृध्द वैभवशाली होती. संगीतानं नेहमीच मानवी मनाला दिलासा दिला आहे. संगीतानं रडवलं आहे, अंतर्मुख व्हायला लावलं आहे. मानवी मनाला केवळ रिझवण्याचं काम संगीताने केलं नाही. पाश्चात्याचं अंधानुकरण व बॉक्स ऑफिसकडे लक्ष ठेवूनच संगीत आपली वाटचाल करत आहे. त्यामुळे परंपरा जतन होत नाही. भारतीय संगीताची परंपरा फार मोठी आहे. ही परंपरा चित्रपटांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत यायला पाहिजे. संगीताची अनेक घराणी आहेत. बडे गुलाम अली खान, पंडित विष्णू दिगंबर पलूस्कर, मास्टर दीनानाथ अशी अनेक नावे आहेत.
सुरात नवे, तालात नवे, शोधायला हवे. संगीताची आराधना नृत्यातून, वाद्यातून करता येते. एखादी हळूवार धून फार मोठा दिलासा देते. गीतामध्ये जादू आहे. तशीच संगीतामध्येही आहे. आज गीत नसलेल्या शब्दांना संगीत दिलं जात आहे. गीताचं सोनं करते ते संगीतच. रुक्ष शब्दामध्ये झंकार आणण्याचं काम संगीताचं. कागदावरचे शब्द संगीताच्या धूनवर नाचायला लावतात. बेभान व्हायला लावतात व माणसांनाही बेभान करतात. मनाला गुंतवून ठेवण्यासाठी, दुःखातून वाट शोधण्यासाठी संगीतासारखे माध्यम नाही. कातर, हळवे सूर तरंगत आले की मन हलकं होतं.
नैसर्गिकरित्या परंपरा टिकवण्यासारखी परिस्थिती नसल्यावर, जाणूनबुजून परंपरा टिकविणे
आवश्यक असते. जुन्या संगीतानं पिढी घडविली. नव्या चित्रपट संगीतानं पिढी बिघडत आहे. ब्रेक
डान्सबरोबर संगीत मुत्त््तपणे आपला आविष्कार करत नाही. हे सर्व पाहता हिदी चित्रपटातील संगीत आपला वारसा पुढे चालवू शकेल का काय याबद्दल शंका वाटणं साहजिक आहे. कारण संगीताला फुलवणं सोडून चुरघाळणं चाललं आहे. संगीत हे फुलासारखं मोहक, सुगंध पसरविणारं, मनाला धुंद करणारं असतं. संगीताच्या धारात भिजायचं सोडून गटांगळ्या खाण्यासारखी परिस्थिती आहे.
आजच्या पिढीला के. एल. सैगल, गुरुदत्त, तलत मेहमूद माहित नाही व त्याचे त्यांना वैषम्यही
नाही. हे कोण? अनेकाचं योगदान काय? त्यांनी एका पिढीला समृध्द केलं, तृप्त केलं हे त्यांच्या गावीही नाही. मधुबालाचं सौदर्य, जूनी गाणी त्यांना पहायचे नाहीत, गाणी ऐकायची नाहीत, त्यावाचून त्यांचं काहीच अडत नाही. पूर्वीच्या प्रेमकथेने समाज समृध्द केला. आजच्या प्रेमकथांनी वासनेची लक्ष्मणरेषा केव्हाच ओलांडली आहे. लताची गाणी, चाफा बोलेना, मधु मागचि माझ्या सख्यापरी, यांच्याशी त्यांना काही कर्तव्य नाही. तंत्रज्ञानाला कवटाळून भावनांकाची तिलांजली बुध्दांकापुढे सर्व फिके वाटत आहे. हे सर्व बदलायला हवं म्हणत आजची पिढी यापेक्षा काही करु शकत नाही.
– डॉ. अनिल कुलकर्णी
मोबा. नं. ९४०३८०५१५३
ई-मेल – anilkulkarni666@gmail.com
अे-१३, रोहन प्रार्थना, गांधी भवन,
कोथरुड, पुणे ४११ ०३८.
Leave a Reply