एका पावसाळी संध्याकाळी मी कोल्हापूरमधील “लक्ष्मी” या रंकाळ्या जवळील थिएटर मध्ये “काजल” हा सिनेमा पहिला ते साल होते १९८१ बहुधा जुलै महिना असावा. जुने हिंदी चित्रपट पाहणे हे आमच्या ग्रुपचे व्यसन होते काजल मधील गाणी खूप छान आहेत असे ऐकले होते पण आज खर तर माझे पाय थिएटरला लागले होते ते राजकुमारच्या अभिनयासाठी. या चित्रपटात राजकुमारची एन्ट्री होते इंटर्वलला. चित्रपटाच्या सुरवातीलाच मीनाकुमारीवर वर चित्रित झालेले “तोरा मन दर्पन” हे आशाच्या स्वरातील अवीट भजन. आशानेच गायलेले “मेरे भय्या” हे गीत, महेंद्रकपूरची “आपके पास जो आयेगा” आणि “मुद्दत की तमन्ना का” ही सोलो आणि “अगर मुझे न मिले तुम” हे आशाबरोबरचे द्वंद्व गीत अशा थोड्या वेगळ्या चालींच्या गाण्यांनी मला अजून राजुमारची एन्ट्री झाली नाही याचा विसर पडला. इंटर्वल नंतर राजकुमारवर चित्रित झालेली “छू लेने दो नाजूक होठोंको” आणि “ये झुल्फ अगर खुलके बिखर जाये तो” ही रफीच्या स्वरातली गाणी कान तृप्त करून गेली. पद्मिनीचा सुंदर डान्स व आशाच्या आवाजातील “छम छम घुंगरू बोले” हा तर दुग्ध शर्करा योग होता. चित्रपट बघून बाहेर पडलो तेव्हा धर्मेंद्र, मीनाकुमारी, पद्मिनी आणि राजकुमार ह्या दिग्गजांच्या अभिनया बरोबरच मी या चित्रपटातील गाण्यांच्या प्रेमात पडलो. सुरवातीला येणाऱ्या नामावलीत “रवी” या संगीतकाराच नाव झळकल होतं. ओपी माझा फेवरीट संगीतकार असला तरी रवीच्या संगीताने प्रभावित केल होत साहजिकच रवीने संगीत दिलेले सिनेमा पाहणे रवीची गाणी ऐकणे सुरु झाले……
या महान संगीतकाराचा जन्म ३ मार्च १९२६ ला नवी दिल्ली येथे झाला. रवीचे संपूर्ण नाव रवी शंकर शर्मा. वडिलांची भजने ऐकत तो संगीत शिकला. १९५० साली तो मुंबईत आला तो गायक बनण्यासाठी. तेव्हा त्याला राहायला घर नव्हते मालाड रेल्वे स्टेशन वर तो झोपत असे. १९५२ साली गायक व संगीतकार हेमंतकुमार याने आपल्या “आनंदमठ” या चित्रपटात “वंदे मातरम’ गाण्यात कोरसमध्ये गायची संधी दिली. हेमंत कुमारने त्याच्यातले संगीत गुण ओळखून त्याला स्वतंत्र पणे संगीत दिग्ददर्शक बनण्यासाठी प्रोत्साहन दिले. “अलबेली” (१९५५) या चित्रपटापासून रवीची हिंदी चित्रपट संगीताची वाटचाल सुरु झाली. १९५८ साली आलेल्या महान गायक आणि अभिनेता किशोर कुमार याच्या “दिल्ली का ठग” याला रवीचे संगीत होते यातील आशा किशोरचे “ये राते ये मौसम नदी का किनारा” हे सुरेख द्वंद्व गीत आजही पुनः पुनः ऐकावेसे वाटते.रवी चित्रपट सृष्टीत आला तो काळ हिंदी चित्रपट संगीताचा सुवर्ण काळ होता. मदन मोहन, ओ पी नय्यर ,शंकर जयकिशन, नौशाद, रोशन, एस डी बर्मन, सी रामचंद्र, खय्याम सारखे अनेक संगीतकार स्पर्धेत होते. नुसत्या गाण्यांवर चित्रपट चालत होते. पण या स्पर्धेत पण रवी आपल्या वेगळ्या संगीताचा ठसा उमटवण्यात यशस्वी झाला. त्या काळी प्रत्येक संगीतकाराचा अनेक वाद्यांनी युक्त असा मोठा ऑर्केस्ट्रा असे त्यातुलनेत रवीचा ऑर्केस्ट्रा लिमिटेड वाद्यांचा होता. आपल्या संगीतात त्याने प्रामुख्याने शेहनाई,संतूर व गिटार ह्यांचा वापर केला आणि साध्या सोप्या वाटणार्या पण लक्ष वेधून घेणाऱ्या अशा गीतांची रचना केली. १९६० साली आलेल्या “चौधवी का चांद” या गुरुदत्त च्या चित्रपटातील गाण्यांनी रवीला प्रसिद्धी मिळाली. “चौधवी का चांद हो” या रफीच्या गाण्याला फिल्मफेअर अवार्ड मिळाले..
१९६० ते १९७२ या काळात रवीने अनेक हिट चित्रपट संगीत बद्ध केलेत. काही मोजकीच नाव घ्यायची तर त्यात “घरांना” “चायना टाउन” “आज और कल” “गुमराह” “काजल” “वक्त” “दो बदन” “हमराज” “आंखे” “नीलकमल” “एक फुल दो माली” “दो कलीया” इत्यादी. ख्यातनाम चित्रपट निर्माते बी आर चोप्रा यांचे बरोबर रवीची जोडी चांगली जमली.या जोडीने एकत्र नऊ चित्रपट केले.गुमराह (१९६३) वक्त (१९६५) हमराज (१९६७) आदमी और इन्सान (१९६७) इत्यादी. रवीने महमंद रफी, महेंद्र कपूर हे मेल सिंगर व आशा भोसले फिमेल सिंगर हे त्याच्या संगीतासाठी प्रामुख्याने वापरले. महेंद्र कपूर कडून रवीने खूप चांगली गाणी गाऊन घेतली.मला वाटते रवी एवढी गाणी दुसर्या कोणत्याही संगीतकारांनी महेंद्र कपूरला दिली नसतील. “आप आये तो” “चलो एक बार फिरसे” (फिल्म गुमराह), “तूम अगर साथ देनेका” हे “निले गगन के तले”(फिल्म हमराज) “आज की मुलाकात बस इतनी” लता महेंद्र (फिल्म भरोसा), “इन हवावो मे” आशा महेंद्र (फिल्म गुमराह), “दिन है बहारके” आशा महेंद्र (वक्त) “आप के पास जो आयेगा” “मुद्दत की तमन्ना का” “अगर मुझे न मिले तुम” (काजल) दिल की ये आरजू (निकाह) इत्यादी.
आशा भोसलेला पण रवीने ज्यास्त संधी दिली. आशाने लतापेक्षा ज्यास्त सोलो गाणी रवी कडे गायलीत तसेच रफीबरोबर बरीच छान द्वंद्व गीत पण आहेत.उदा. तोरा मन दर्पण (काजल), जब चली थंडी हवा (दो बदन), “आगे भी जाने न तू” “कौन आया के निगहोमे” (वक्त), मुझे गले सो लागा लो (आज और कल) इत्यादी. महान गायक महमंद रफीच्या आवाजाचा पण रवीने आपल्या संगीतात चांगला वापर केलाय “ये वादिया ये फिजाये” (आज और कल), “बार बार देखो” (चायना टाउन), छू लेने दो (काजल), “चौदवी का चांद हो” (चौदवी का चांद), रहा गर्दीशोमे (दो बदन), दूर रहकर न करो बात (अमानत), “बाबुल की दुवाये लेके जा” (नीलकमल) इत्यादी.
१९८० च्या सुमारास रवीने मल्याळम चित्रपटांसाठी संगीत द्यायला सुरवात केली. साउथ इंडिअन मधील चित्रपट सृष्टीत तो Bombay रवी म्हणून प्रसिद्ध होता. त्याने साधारणपणे १५ मल्याळम फिल्म्सना संगीत दिले. वास्तविक नॉर्थ इंडिअन बेस असलेल्या रवीने मल्याळम भाषेचे ज्ञान नसताना चांगले यश कमावले हे विशेष. या काळात तो हिंदी चित्रपट सृष्टी पासून थोडा दूर होता.त्यानंतर १९८२ ला “निकाह” या बी आर चोप्रा यांच्या चित्रपटासाठी संगीत दिले. त्यामध्ये महेंद्र कपूर लीड गायक होताच पण गायिका व अभिनेत्री सलमा आगा हिला पण गायची संधी दिली.यात सलमा आगा ने गायलेले “दिल के अरमा आसूओ में बह गये” या गाण्याला बेस्ट फिमेल सिंगरचे फिल्म फेअर अवार्ड मिळाले. खाली रवीने संगीतबद्ध केलेली काही निवडक गाणी दिली आहेत.
गीताचे बोल | गायक/गायिका | चित्रपट |
हुस्नवाले तेरा जवाब नही | रफी | घराना |
जबसे तुम्हे देखा | आशा रफी | घराना |
बार बार देखो | रफी | चायना टाउन |
मुझे गले से लागा लो | आशा रफी | आज और कल |
इतनी हसीन इतनी जवा रात | रफी | आज और कल |
ये वादिया ये फिजाये | रफी | आज और कल |
आप आये तो | महेंद्र कपूर | गुमराह |
चलो एक बार फिरसे | महेंद्र कपूर | गुमराह |
इन हवावो मे | महेंद्र कपूर आशा | गुमराह |
आज की मुलकात | महेंद्र कपूर लता | भरोसा |
वो दिल कहासे | लता | भरोसा |
तुम्ही मेरी मंझील | लता | खानदान |
ए मेरी झोहारा झबीन | मन्नाडे | वक्त |
कौन आया के निगाहो | आशा | वक्त |
दिन है बहारके | महेंद्कपूर आशा | वक्त |
आगे भी जाने न तू | आशा | वक्त |
लो अ गयी उनकी याद | लता | दो बदन |
जब चली थंडी हवा | आशा | दो बदन |
भरी दुनियामे | रफी | दो बदन |
रहा गर्दीशोमे हरदम | रफी | दो बदन |
नसीब मे जो | रफी | दो बदन |
तूम अगर साथ देनेका | महेंद्र कपूर | हमराज |
हे निले गगन के तले | महेंद्र कपूर | हमराज |
मिलती है जिंदगी मे | लता | आंखे |
गैरो पे रेहम | लता | आंखे |
आजा तुझको पुकारे | रफी | नीलकमल |
बाबुल की दुवाए | रफी | नीलकमल |
हे रोम रोम में | आशा | नीलकमल |
गरिबोंकी सुनो | रफी आशा | दस लाख |
जिंदगी इत्तेफाक है | आशा | आदमी और इन्सान |
ये परदा हटा दो | आशा रफी | एक फुल दो माली |
तुझे सुरज कहो या चंदा | मन्नाडे | एक फुल दो माली |
ओ नन्हे से फरिश्ते | रफी | एक फुल दो माली |
आज मेरी यार की शादी है | रफी | आदमी सडक का |
दिल की ये आरझू | महेंद्र सलमा आगा | निकाह |
दिल के अरमान | सलमा आगा | निकाह |
दूर रहकर न करो बात | रफी | अनामत |
मतलब निकल गया | रफी | अनामत |
सौ बार जनम लेंगे | रफी | उस्तादोंके उस्ताद |
तुम्हारी नजर | रफी लता | दो कलीयां |
बच्चे मनके सच्चे | लता | दो कलीयां |
आपल्या अवीट चालींनी रसिकांना तृप्त करणाऱ्या रविला गुरुदत बरोबर अधिक चित्रपट करता आले नाहीत ही व्यथा होती.खर तर “चौदवी का चांद” या चित्रपटानंतर गुरुदत्त च्या अनेक फिल्मला संगीत देण्याचे प्लान ठरले होते पण गुरुदतच्या अकाली मृत्यूने ते पूर्ण होऊ शकले नाहीत.
रवीला “घरांना” (१९६२) आणि “खानदान” (१९६६) या साठी “बेस्ट म्युझिक डिरेक्टर” साठी फिल्म फेअर अवार्ड मिळाले. या खेरीज त्याला १९९५ मधे “सुकृथम आणि परिणयम” या मल्याळम चित्रपटा साठी “National Film Award for Best Music Direction” मिळाले. तसेच १९८६ आणि १९९२ सालासाठी बेस्ट म्युझिक डायरेक्टर केरळ राज्याचा पुरस्कार मिळाला. अशा प्रकारे शेवट पर्यंत कार्यरत राहून ह्या महान संगीतकाराने आपल्या वयाच्या ८६ वर्षी दिनांक ७ मार्च २०१२ ला या जगाचा निरोप घेतला………
(सदर लेखासाठी संबधित वेब साईटचा आधार घेतला आहे)
— विलास गोरे
Leave a Reply