जगण्याची साधी सोपी सूत्रे – एकशे बावन्न
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – भाग तेरा
सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग दहा
आपण पूर्वाभिभाषी असावे, असे वाग्भटजी म्हणतात. म्हणजे स्वतःहून इतरांशी बोलायला जाणे. समोरून ओळखीचा कोणी येताना दिसला की, आपणच त्याला हाय, हॅलो, राम राम नमस्कार, नमस्ते, कसं काय, अशा शब्दांनी बोलायला सुरवात करावी. म्हणजे समोरच्या व्यक्तीला आपण त्याचे वाटू लागतो.
आपल्याला यापूर्वी मदत केलेली व्यक्ती, ओळख झालेली व्यक्ती, उपयोगी ठरणारी व्यक्ती, डोक्यावरून पाणी नेणारी स्त्री, ज्येष्ठ नागरीक, ओझे घेऊन जाणारा, खूप जोरजोरात चालणारा, किंवा विद्वान व्यक्ती समोर आल्यास त्यांना स्वतः बाजूला होऊन रस्ता मोकळा करून द्यावा.
आज अॅम्ब्युलन्स, शालेय वाहाने, शववाहिका, पोलिसांच्या गाड्या, यांना रस्ता मोकळा करून द्यावा. त्यांना कोणतीही असुविधा आपल्यामुळे होऊ नये असे पाहावे.
आपली गाडी एखाद्या ठिकाणी पार्क करत असताना, दुसऱ्याला त्याची गाडी आत बाहेर करायला त्रास होऊ नये, याचा विचार करून आपले वाहन कुलुपबंद करावे, अन्यथा आपल्यामुळे इतरांचा खोळंबा होऊ शकतो, याची जाण ठेवावी. याने वाद वाढून आपल्या सोसायटीमधील माणसे देखील दुरावतात. हे लक्षात घ्यावे.
माणसं जोडण्याची ही कला आहे. ती जोपासली पाहिजे. कारण ऐनवेळी मोबाईल पेक्षा माणसेच उपयोगी होतात. ती आधी पासूनच जोडून ठेवावीत.
मी बरा माझे काम बरे, ही वृत्ती आता सोडून दिली पाहिजे. मला काय त्याचे चंद्र सूर्य प्रकाशतात, असे म्हणून चालणार नाही. सतर्कता हवीच. आजूबाजूला काय चाललंय हे समजून घेतलं नाही तर बाजूच्या घराला लागलेली आग आपल्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही.
मान दिला की मान मिळतो, मान मिळवण्यासाठी मान थोडी खाली झुकवावी लागली तरी चालते. लोकांनी आपल्याला मान दिला पाहिजे, ही अपेक्षा सोडून दिली की लोकमान्य होता येते, असे लोकमान्य टिळकांनी सुद्धा सांगितले आहे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
१०.०९.२०१७
Leave a Reply