नवीन लेखन...

संघर्ष यात्रा

डॉ. अनुराधा यांना आज जिवन सार्थकी झाल्याचे समाधान वाटत होते. त्यांच्या दोन्ही मुलांचे विवाह होऊन ती आता त्यांच्या जिवनात रमणार होती. मोठा मुलगा अमीत एम. डी. झाला होता व त्याने स्वताचे स्वतंत्र हॉस्पिटल सुरू केले होते. त्याने स्वतः मुलगी निवडली होती. तिही डॉक्टर होती. डॉ. अनुराधानी मागच्या वर्षी मोठ्या ऊत्साहात मुलगा अमीत व अनुपमा यांचा विवाह केला होता. दोघांचा संसार सुखात सुरु होता. अमीत व अनुपमाचे हॉस्पिटल सुध्दा आता हळूहळू प्रसिद्ध होत होते. धाकटी मुलगी अर्पिताने आपले ईंजीनिअरींगची मास्टर्स डिग्री पुर्ण करुन एका मोठ्या कंपनी मधे नोकरी सुरू केली होती. डॉ. अनुराधा यांना आता कधी एकदा अर्पीताचे लग्न करुन लवकरात लवकर जबाबदारीतुन मुक्त होऊ असे झाले होते. त्यामुळे त्यांनी अर्पीताच्या पसंतीने मुलगा पसंत केला होता. आकाश एक हुशार व कष्टाळू मुलगा होता. अत्यंत कठीण परिस्थितीत त्याने आपले शिक्षण पुर्ण केले होते. दोघेहि एकमेकांना अगदी अनुरूप होते. डॉ. अनुराधांनी अत्यंत आनंदाने दोघांच्या विवाहास अनुमती दिली होती.

आज अखेर तो दिवस ऊजाडला होता. डॉ. अनुराधांची अनेक वर्षाची तपश्र्चर्या पुर्ण होत होती. घरात सर्व पाहुणे मंडळी आल्यामुळे ऊत्साहाचे वातावरण होते. मुलगा अमीत व अनुपमा सर्व पाहुण्यांची आस्थेने चौकशी करून त्यांना काय हवं नको ते बघत होते. सकाळी ११:१५ चा मुहूर्तहोता. त्यामुळे सर्वजण आवरून लग्नहॉल कडे निघाले होते. सर्वांनाच सोईस्कर म्हणून दोन मोठ्या गाड्यांची व्यवस्था केली होती. घरातील सर्व नातेवाईक व ईतर स्नेही गाड्यांमधून हॉलकडे रवाना झाले. त्यांच्या सोबत स्वतः सुनबाई अनुपमा हॉलवर गेली. आता घरी फक्त स्वतः डॉ. अनुराधा मुलगा अमीत व नवरी मुलगी अर्पीता राहिले होते. शेवटची आवराआवर करून अनुराधाबाईंनी देवासमोर समई लावली व त्या दोन मिनीटे हात जोडून शांतपणे ऊभ्या होत्या. त्यांनी आज आवर्जून त्यांच्या लग्नातली पैठणी नेसली होती. तेवढ्यात अमीत त्यांना हाक मारत आत आला. शेवटी आता त्यालाही रहावले नाही व तो म्हणाला आई अग आजतरी बाबा येतील का ग? तु अशी किती दिवस वाट पहाणार आहेस? अनुराधाबाई म्हणाल्या आजतरी त्यांनी यावे अशी देवाकडे मागणी केली आहे. मला खात्री आहे जरी त्यांना आज यायला जमले नाही तरी ते एकनाएक दिवस निश्चित येतील. यावर अमीतने काहीही प्रतिसाद न देता आईकडे फक्त शांतपणे बघीतले व चल आता लवकर ऊशीर होतोय असे म्हणून तो बाहेर आला. त्याच्या पाठोपाठ अनुराधाबाई बाहेर आल्या व मुलीसह कारमध्ये बसुन लग्न हॉलकडे रवाना झाल्या.

लन हॉल नातेवाईक व मित्र मंडळींनी गच्च भरला होता. जो तो डॉ. अनुराधा यांचे कौतुक करीत होता. पण प्रत्येक जण म्हणत होता की आजच्या दिवशी तरी डॉ. अनिरुद्ध येतील असे वाटत होते पण अजून तरी तो योग आलेला नाही. अजून किती वर्षे परमेश्वर डॉ.अनुराधांची परीक्षा पहाणार आहे कोणास ठाऊक. पण अनुराधा बाईंच्या धेय्यनिश्र्ठेचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. पतीची एकनिश्र्ठेने वाट पहात त्यांनी आपले सासू सासरे यांची शेवटपर्यंत चांगली सेवा केली. लहान मुलांना स्वतःच्या हिमतीवर मोठे केले. चांगले ऊच्च शिक्षण देउन सुसंस्कारित केले. त्याच बरोबर त्यांनी डॉक्टर झाल्यावर मनाशी जे गरीबांची सेवा करण्याचे धेय्य ठेवले होते त्यात कोणत्याही कारणास्तव बदल केला नाही.आजची लग्नसमारंभातील लहान थोर तसेच त्यांच्या सामाजिक कार्याचे प्रतीक असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील आमलपूर या छोट्याशा गावातील घरटी माणूस लग्नासाठी ऊपस्थीत होता. एवढ्यात हॉलबाहेर एक भारतीय लष्कराची जीप ऊभी राहीली व एक लष्करी वेशातील अधिकारी बाहेर आले. डॉ. अनुराधांनी पुढे येऊन त्यांचे स्वागत केले व त्यांची मुलगा अमीत व सुनबाई अनुपमाची ओळख करून दिली. अनुप हे कर्नल दिपक मिश्रा, तुझ्या बाबांचे जिवश्र्च कंठश्र्च मित्र. दोघांनी एकाच वेळी लष्करी सेवा सुरु केली होती. एवढे बोलून त्या ईतर पाहुण्यांकडे वळल्या. डॉ. अमीतला चैन पडत नव्हते तो कर्नल मिश्रा याचेशी बोलत होता. शेवटी न रहावून त्याने विचारले अंकल क्या आपको लगता है की पापा वापस आ पायेंगे? यावर कर्नल मिश्रा डोळे मिटून म्हणाले भगवानपर भरोसा रखो सब ठिक होगा. एवढ्यात कोणीतरी हाक मारल्याने अमीत तिकडे गेला. पण कर्नल मिश्रा यांना चष्म्यातून सुध्दा आपल्या डोळ्यातील पाणी लपवताआले नाही.तिकडे लग्नाचे विधी पुर्ण होत आले होते. बरोबर ११:१५ वाजता गुरुजींनी मंगलाक्षता सुरु केल्या. नवरा नवरीनी एकमेकांच्या गळ्यात पुष्पहार घातले व विवाह विधी संपन्न झाला. अनुप व अनुपमा सर्व पाहुणमंडळीना भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी आग्रह करत होते. ईकडे कर्नल दिपक अनुराधा बाईंची भेट घेण्यासाठी त्यांना हुडकत होते. आसपास कोणी नाही याची खात्री करून त्यांनी अनुराधा बाईंना हाक मारली भाभीजी शादी बहूत बढीया हो गयी. क्या अब हम कुछ देर बातचीत कर बैठ सकते है. एवढ्यात गुरुजीनी अनुराधा बाईंना हाक मारली. त्यामुळे त्या कर्नल दिपक यांची क्षमा मागून ऊठल्या व जाता जाता त्यांनी कर्नल दिपक यांना भाईसाब अगर हो सके तो कल सुबह घर आ जाना कल हम बच्चोंके साथ बैठकर बातचीत करेंगे. यावर कर्नल दिपकनी ठिक है मै सुबह घर आत हूँ असे म्हणून ते हॉलमधून बाहेर पडले. सर्व लोकांनी भोजन घेतल्या नंतरनवर नवरी व आई वडील अशी खाशी पंगत बसली. सर्व एकमेकांना आग्रह करत हसत खेळत भोजन करीत होते. भोजन ऊरकल्यावर सर्वांनी एकमेकांना आहेर केला. शेवटी जड अंतकरणाने साश्रू नयनांनी अनुराधा बाईंनी लेकीला निरोप दिला. सर्व पाहुणे गेल्यावर अनुराधा बाई मुलगा व सुन याचेसह घरी आल्या. सर्वच जणांची दमणूक झाल्याने सर्वांना कधी अंथरुणावर पाठ टेकू असे झाले होते. अनुराधा बाईंनी मुलगा व सुनेस सर्व नातेवाईकांची व्यवस्था बघण्यास सांगीतले व त्या त्यांच्या बेडरूममध्ये झोपण्यासाठी गेल्या.

अनुराधाबाई आत येऊन बेडवर जाऊन शांतपणे पडल्या. लेकीच्या लग्नाच्या जबाबदारीतून मोकळे झाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. नेहमी प्रमाणे त्यांनी डायरी लिहायला घेतली. आज त्यांना अनिरुद्धची आठवण दाटून आली. डायरीची पाने वाऱ्याने ऊडत होती. डायरीची पाने वाचता वाचता अनीरुध्दच्या आठवणीने डोळ्यातून अश्रुधारा वहात होत्या. न राहवून त्या ऊठल्या वकपाटातून अनिरुद्ध बरोबरचा लग्नाचा अल्बम पाहू लागल्या त्याच वेळी अल्बम मधून एक पत्र व एक टेलीग्रामचा कागद खाली पडला. ते पाहताक्षणी अनुराधा बाईंच्या डोळ्यासमोर सर्व भूतकाळ ऊभा राहिला व एक एक प्रसंग त्यांच्या मनात रुंजी घालू लागला.

आज अनुराधा एकदम जाम खुष झाली होती. इंटर सायन्सचा रिझल्ट लागलाहोता व ती विशेष प्राविण्यासह ऊत्तीर्णझाली होती. त्याच बरोबर ती आवडीच्या पीसीबी ग्रुपमधे ती कॉलेजमधे प्रथम आली होती. तिला आता तिच्या आवडीच्या बी.जे.मेडिकल कॉलेजमध्ये निश्र्चीत प्रवेश मिळणार होता. दुसरे दिवशी सकाळी लवकर ऊठून तिने पटकन स्वतःचे सर्व आवरुन पुणे स्टेशन बस पकडली. केव्हा एकदा कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेऊ असे तिला झाले होते. बसमधुन ऊतरुन ती जवळजवळ धावतच कॉलेजमध्ये आली. सकाळची ११ ची वेळ व प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होती. रांगेत दोन तास थांबल्यावर तिचा नंबर आला तिने प्रवेश अर्ज व माहिती पत्रक घेतले व फॉर्म भरणेसाठी ती एका मोकळ्या टेबलपाशी जाऊन बसली. कॉलेजमधील गर्दी मुळे तिला थोडे भांबावल्या सारखे झाले होते. फॉर्म कसा भरावा कायकाय माहिती लिहायची हा सर्व ती परत परत वाचत होती. व तिचा हा थोडासा गोंधळ तिच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. एवढ्यात पाठीमागून, एक्सूज मी एनी प्रॉब्लेम असा आवाज आला. अनुराधाने वळुन बघितले तर एक रुबाबदार तरुण तिला विचारणा करीत होता. आपण, एवढे बोलून पुढे बोलणार एवढ्यात त्या तरुणाने आपली ओळख करून दिली. मी अनिरुद्ध जोशी मी येथे एम. बी. बी. एस. च्या तिसऱ्या वर्षांत आहे. मी आपणास काही मदत करु शकतो का? अनुराधाला कोणी तरी मदतीला आहे म्हणल्यावर थोडासा धीर आला. अनिरध्दने तिला फॉर्म भरण्यासाठी व्यवस्थित माहिती दिली. त्याप्रमाणे तिने फॉर्म भरून दिला.तिला मिळालेले गुण विचारात घेता तिला प्रवेश मिळण्याची खात्री होतीच. त्यानंतर अनिरुद्धचे आभार मानून ती घरी आली. अपेक्षेप्रमाणे तिला कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला व तिचे कॉलेज रुटीन सुरु झाले. मुळातच हुशार व प्रत्येक गोष्ट मन लाऊन करण्याच्या सवयी मुळे कॉलेजमध्ये ती सर्व प्राध्यापकांची आवडती विद्यार्थीनी बनली होती. कॉलेजचे दिवस झपाट्याने पुढे जात होते व तिची अनिरुद्ध बरोबरची मैत्रीही तशीच दिवसेंदिवस बहरत चालली होती. त्या मैत्रीचे हळूहळू प्रेमात रुपांतर व्हायला लागले होते. तिच्या मनाने तर केंव्हाच कौल दिला होता पण अनीरुध्द बरोबर स्पष्टपणे बोलणे न झाल्याने तीला थोडी धास्ती वाटत होती. अनीरुध्दचे हे शेवटचे वर्ष होते व पुढील वर्षी तो कॉलेज सोडून जाणार होता त्यामुळे लवकरात लवकर त्याच्याशी बोलून आपले मन मोकळे करण्याची तीला घाई झाली होती. पण तो समोर आला की तिचे अवसान गळायचे व त्याला काही विचारायचे तिचे धाडस व्हायचे नाही. आज सकाळी कॉलेजमध्ये आल्यानंतर बरीच मुले, मुली नोटीसबोर्ड पशी जमा झाली होती व सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वहात होता. अनुराधा ऊत्सुकतेने नोटीसबोर्डकडे वळली. या वर्षी शैक्षणिक सहल बंगलोर येथे जाणार होती व त्यासाठी नावनोंदणी करण्यासाठी नोटीस लावण्यात आली होती. सहलीसाठी टिम लिडर म्हणून सर्वांचा आवडता विद्यार्थी अनिरुद्ध सहभागी होणार होता. अनुराधाने हि संधी सोडायची नाही असे ठरवले व काही करून आपण या चार दिवसांत आपल्या मनातील भावना अनिरुद्ध पर्यंत पोहोचवायच्याच अशी खुणगाठ मनाशी बांधली. सहलीचा दिवस केव्हा ऊजाडतोय असे तिला झाले होते.

शेवटी एकदाचा तो दिवस ऊजाडला व सर्वजण स्पेशल लक्झरी बसने बंगलोरला रवाना झाले. संपुर्ण रात्र प्रवास झाल्याने सर्वजण खुपच कंटाळले होते. त्यामुळे सर्वचण निवांत ऊठून आवरून जेवणासाठी १२ वाजता जमले. अनिरुद्धने सर्वांना आजचा दिवस कोणताही प्रोग्रॅम नसल्यामुळे आपण आपल्या आवडीनुसार भटकंती करून शॉपिंग करुन घ्या असे सांगितले व ऊद्या आपण येथील मेडिकल कॉलेजमध्ये भेट देऊन तेथील प्राध्यापक व विद्यार्थ्याशी संवाद करून आपले काही प्रश्न शंका याचे समाधान करणे व विचारांचे आदानप्रदान करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे सर्वांनी संध्याकाळ आपापल्या आवडी प्रमाणे फिरण्यात व शॉपिंगची धमाल करण्यात घालवला. दुसरे दिवशी सर्वजण सकाळी ९ वाजता आवरून कॉलेजला भेट देण्यासाठी तयार झाले होते. अनिरुद्ध यापूर्वी एकदा येथे येऊन गेल्याने त्याची तेथील काही विद्यार्थ्यांशी चांगली मैत्री होती. तसेच कॉलेजमधील बऱ्याच प्राध्यापकांची वैयक्तिक ओळख होती. त्यामुळे त्याने स्वत: पुढाकार घेऊन सर्वांची तेथील प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांबरोबर ओळख करून दिली. संपुर्ण दिवस कसा व कुठे संपला हे कोणालाही कळले नाही. लॉजवर आल्या आल्या अनिरुद्धने ऊद्या आपण येथील स्थानिक प्रेक्षणीय स्थळांना भेट देणार असून ऊद्याची संध्याकाळ आपण प्रसिद्ध लालबाग बोटॅनिकल गार्डन येथे घालवणार असल्याचे जाहीर केले.दुसरे दिवशी सर्वजण आवरून सकाळी ९ वाजता तयार होते. माहिती साठी एक लोकल गाईड बरोबर घेतला होता. दिवसभर त्याचे सुचनेनुसार शहरातील विविध प्रेक्षणिय ठिकाणी भेट देऊन सायंकाळी ठिक ५ वाजता सर्व जण लालबाग येथे पोहोचले. प्रत्येक जण आपल्याला ईच्छे नुसार बागेत फिरून आनंद घेत होता. थोडा वेळ फिरून अनुराधा एका झाडाखाली येऊन बसली थोड्या वेळाने अनिरुद्ध फिरत फिरत तेथे आला. काय कंटाळलात काय, अनिरुद्धने विचारले. नाही तसे नाही अशीच निवांत आकाशातील विविध रंग व पक्षांचे आवाज ऐकण्यात बसले. नंतर अनिरुद्ध हि तेथेच जवळ बसून गप्पा मारु लागला. शेवटी न राहवून तिने विचारले. अनिरुद्ध मला आपणास थोडे विचारायचे होते, विचारु का? यावर थोडावेळ शांतपणे तिच्याकडे पहात तो म्हणाला. अनुराधा तुला काय विचारयचे ते विचार मनात कोणताही आडपडता ठेऊ नकोस. अनिरुद्ध आपण मला खुप आवडता व माझे आपणावर खुप प्रेम आहे. हे बोलताना सुध्दा अनुराधाचे डोळे पाण्याने भरुन आले होते. हे ऐकुन तिच्याकडे पाहून एक स्मितहास्य देत अनिरुद्धने मी हे खुप दिवसां पासून ओळखून आहे, तसेच मलाही तुम्ही मनापासून आवडला आहात असे सांगितले. त्यानंतर दोघेही बराच वेळ गप्पा मारत बसले. शेवटी लग्नाचा विषयांवर अनिरुद्ध थोडा गंभीर झाला. अनुराधा मलाही तुझ्याबरोबर लग्न करण्यात खचितच आनंद झाला असता पण माझे आयुष्य मी वेगळेपणाने जगण्याचे ठरवले आहे आणी ते तितके सुखावह असणार नाही याची मला खात्री आहे त्यामुळे मी तुझ्याशी लग्न करून तुझ्या आयुष्यात त्रास निर्माण करावा असे मला वाटत नाही. त्यावर तिने खोदून विचारल्यावर मी मेडिकल शिक्षण पुर्ण होताच भारतीय लष्करात भरती होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे तु माझ्याशी लग्न करण्याचा विचार सोडून तुझे करीअर कर असे सांगितले. त्यावर माझा निर्णय पक्का आहे माझेही एक धेय्य आहे व ते साध्य करीत असताना मलाही व माझ्या जोडीदाराला थोडा त्रास होणारच आहे. त्यावर तिच्या भावी योजनांबद्दल विचारता मेडिकल शिक्षण पुर्ण झालेवर मी पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरात मेडीकल व्यवसाय सुरु करणार नसून रत्नागिरी जिल्ह्यातील आमचे मुळ गावी सुरू करुन माझ्या गावातील लोकांची सेवा हेच माझे धेय्य आहे असे सांगितले. नंतर दोघेही बराच वेळ गप्पा मारत बसले. दोघांच्या आवडी निवडी तसेच विचार जुळत असल्याचे लक्षात आले. अनिरुद्ध तिला त्यांच्या लष्करी पेशातील धोका समजावून तिने आपल्या बरोबर लग्न करण्याचा विचार सोडून द्यावा हे समजाऊन सांगत होता. पण अनुराधा स्वतःच्या विचाराशी व निर्णयाशी ठाम होती. शेवटी ती म्हणाली एक तर तुझ्याशी लग्न करीन नाहीतर कोणाशीही नाही. माझे धेय्य ठरलेले आहेच. त्यातच मी माझे पुर्ण आयुष्य व्यतीत करीन. शेवटी अनिरुद्धला माघार घ्यावी लागली व तिचे शिक्षण पुर्ण होताच दोघांनी लग्न करण्याचे ठरवले. ट्रिपवरुन घरी परत येताना अनुराधा एकदम खुषीत होती. बरेच दिवसतिने पाहिलेले स्वप्न साकार होणार होते. घरी आल्यावर तिने आई वडिलांना हि बातमी दिली. डॉक्टर जावई व तो सुध्धा स्वजातीतला त्यामुळे त्यांच्या साठीही ही आनंदाची बातमी होती. वडिलांनी त्याची आवश्यक माहिती म्हणजे आई वडील काय करतात गाव कोणते ईत्यादी जुजबी माहिती विचारली व आनंदाने लग्नाला संमती दिली. एम.बी.बी.एस.चा रिझल्ट लागला व अनिरुद्ध त्याने ठरविले प्रमाणे लष्करात रुजू झाला. ईकडे अनुराधाचे शिक्षणचालू होते. आता तिला पदवी मिळण्यास अजुन दोन वर्ष अवधी होता. अनिरुद्ध १५ दिवसातून फोन करत होता. बाकी अन्य संपर्काचे काही साधन नव्हते. त्यामुळे अनुराधा त्याच्या फोनची वाट बघत असायची. लष्करी शिस्तीमुळे अनुराधाला वारंवार फोन करणे शक्य होत नव्हते.अशीच दोन वर्ष संपली व अनुराधा तिची एम.बी.बी.एस. परिक्षा प्रथम श्रेणीत ऊत्तीर्ण झाली. घरातील सर्व आनंदात होते. आता लवकरच अनिरुद्ध बरोबर लग्न होणार म्हणून अनुराधाही एकदम खुष होती. ही बातमी केव्हा एकदा अनिरुद्धला सांगू असे तिला झाले होते. रात्री अनिरुद्धचा फोन आल्यावर तिने त्याला ही बातमी दिली. दोघांनी बराच वेळ गप्पा मारल्या व मी पुढच्या महिन्यात एक महीना रजा घेऊन येत असून आपण लग्न करु असे सांगितले. त्याप्रमाणे अनिरुद्ध एक महिन्याची रजा घेऊन आला. दोन्ही कुटुंबातील प्रमुख व्यक्ती एकत्र येऊन लग्नाची तारीख व ईतर सर्व गोष्टी ठरवल्या. एकच महिना असल्याने हॉल ठरवणे, निमंत्रण पत्रिका पाठवणे,कपडे खरेदी, या साठी सर्वांची खुप धावपळ झाली. पण दोन्ही कुटुंबानी एकत्र येऊन सर्व प्रकारची कामे मोठ्या ऊत्साहात पुर्ण केली व एक शुभ दिनी अनिरुद्ध व अनुराधा विवाहबध्द झाले.एक महिना अनुराधा बरोबर व्यतीत करुनअनिरुद्ध पुन्हा आपल्या लष्करी सेवेत रुजू झाला.

दिवस भराभर जात होते. अनुराधाने पदवी नंतर स्त्रीरोग विषयासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतला होता. दोघांचे वैवाहिक जीवन आनंदमय झाले होते. एम.डी. पुर्ण होईपर्यंत मुलांचा विचार करायचा नाही असे दोघांनी ठरवले होते. दोन वर्षांत अनुराधा एम.डी. पुर्ण करुन तिने तिच्या इच्छेनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या गावी व्यवसायास सुरुवात केली. तिचा मनमिळाऊ स्वभाव, वैद्यकीय व्यवसायातील कौशल्य यामुळे तीची एक उत्तम स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून आसपासच्या गावात प्रसिद्धी झाली होती. त्यानंतर वर्षभरात आमीतचा जन्म झाला. अनिरुद्ध त्याला फार रजा नसल्याने आठ दिवस येऊन भेटून गेला. हॉस्पिटलचा पसारा दिवसेंदिवस वाढत चालला होता त्यामुळे अनुराधाचा बराच वेळ हॉस्पीटल मध्ये जात होता. तिकडे सिमेवर युध्दाचे ढग जमू लागले होते. पूर्व बंगाल मधे पाकिस्तानी सैन्याचे अत्याचार वाढले होते. डॉ. अनिरुद्ध घरी आले होते पण कोणत्याही क्षणी त्यांना परत जावे लागणार होते. ईकडे अनुराधाचे दुसरे बाळंतपण जवळ आले होते. स्वतः डॉक्टर असला तरी अनिरुद्ध सुध्दा काळजीत होता. शेवटी त्याला जी शक्यता वाटत होती तसेच घडले पाकिस्तान बरोबर युध्दाची घोषणा झाली. सर्व सैनिकांच्या रजा रद्द करण्यात आल्या व अनिरुद्धला तातडीने हजर होण्याची तार आली. सर्व परिस्थिती समजावून सांगून त्याने अनुराधाचा निरोप घेऊन तो लगोलग पठाणकोटला रवाना झाला. अनुराधा बरोबर छोटा अमीत व डॉ. अनिरुद्धचे वडील एवढेच होते. त्यानंतर दोनच दिवसांत अनुराधाने एका गोड मुलीस जन्म दिला. अनिरुद्धला तारेनी बातमी कळवण्यात आली. युध्दामुळे त्याला केव्हा बातमी कळेल हे कुणालाही सांगता येत नव्हते. पण आठ दिवसांत अनिरुद्धचे पत्र आले. त्यात त्याने तिचे अभिनंदन करुन युध्द संपताच येत असल्याचे कळवले होते. तसेच युध्दात काही बरेवाईट घडल्यास धिराने परिस्थितीला तोंड देउन वडिलांची काळजी घेण्याची विनंती केली होती. पंधरा दिवसांनी युध्दबंदीची घोषणा झाली. त्यामुळे अनुराधाला कधी एकदा अनिरुद्धला डोळेभरुन पाहीन असे झाले होते. मुलगी दोन महिन्याची झाली होती त्यामुळे तिचे बारशाच्या कार्यक्रम ठरविला होता. बारशाला नातेवाईक व मित्रमंडळी हजर होती. जेवणाची पंगत सुरु होती व तेवढ्यात पोस्टमन तार घेऊन आला. अनुराधा लोकांना पंगतीत लोकांना वाढण्यात व्यस्त असल्याने अनिरुद्धच्या वडिलांनीच तार घेतली व वाचून खिशात ठेवली .अनुराधाने पोस्टमन येऊन गेल्याचे पाहिले होते पण पाहुण्यांच्या गडबडीत तिलाही सासऱ्यांबरोबर बोलायला वेळ नव्हता.संध्याकाळी घरीआल्यावर तिला आठवण आली व ती सासऱ्यांना विचारणार एवढ्यात अनिरुद्धचे वडील तिथे आले व म्हणाले तुला गडबडीत सांगायचे राहिले दुपारी पोस्टमन येऊन तार देऊन गेला.अनिरुद्धचा जरा प्रॉब्लेम्स झालाय युध्दात त्यांना घेऊन जाणारे विमान भरकटलेय व लष्कराकडून शोध चाललाय पण अजून काही तपास लागला नाही. बातमी ऐकून अनुराधाच्या डोळ्यासमोर एकदम अंधारी आली ती खाली कोसळणार पण अनिरुद्धच्या वडिलांनी तिला सावरले तिच्या चेहऱ्यावर पाणी मारून तिला सावध केले व म्हणाले सुनबाई अधी पाणी पी अग तस काळजीच कारण नाही लष्कराकडून शोध चाललाय व लवकरच अनिरुद्ध परत येईल. मीही त्याच्या मित्राला फोन करुन माहिती घेतो. त्यानंतर महिनाभर काहीच हालचाल नव्हती अनिरुद्ध बाबत काहीच माहिती कळत नव्हती. एक दिवस सकाळी लष्करी जीप दारासमोर येऊन थांबली. त्यातून एक लष्करी अधिकारी समोर येऊन ऊभे राहिले. अनिरुद्धच्या वडिलांनी त्यांचे स्वागत केले. मी दिपक मिश्रा त्यांनी आपली ओळख करुन दिली. अनुराधाने त्यांच्यासाठी चहा आणला व ती तेथेच ऊभी राहिली. एक गंभीर गोष्ट सांगण्यास मी येथे आलोय अनिरुद्ध पाकिस्तान लष्कराच्या तावडीत सापडलाय व त्याला युध्दकैदी म्हणून पाकिस्तान लष्कराने कैदेत ठेवले आहे. आता युध्द संपले आहे व त्यामुळें युध्दकैद्यांच्या अदलाबदली बाबत चर्चा सुरू होईल व अनिरुद्ध लवकरात लवकर घरी येईल. दिपक मिश्रा यांच्या बोलण्याने अनुराधाला थोडा धीर आला. अनिरुद्ध लवकरच घरी येईल अशी सर्वांना खात्री होती.

दिवस भराभर जात होते पण अनिरुद्ध परत येण्याची काही चिन्हे नव्हती. हळूहळू मुले मोठी होत होती. एक दिवस अचानक अनिरुद्धच्या वडिलांना जोरात ह्रदय विकाराचा झटका आला व तातडीने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. तेथील तज्ञ डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. अनिरुद्धच्या वडिलांनी अनुराधाला दिपक मिश्रा यांना लगेच बोलवून घेण्याचा आग्रह
धरला होता. अनुराधाला कळत नव्हते की त्यांनी दिपक मिश्रा यांना कशासाठी बोलावले असेल. दुसऱ्या दिवशीच दिपक मिश्रा हॉस्पीटलमधे भेटण्ण्याया साठी आले.अनिरुद्धच्या वडिलांची अवस्था पाहून त्यांचे डोळे भरुन आले होते. हॉटेलमधील रुममधे अनुराधा व दिपक मिश्रा यांचे शिवाय अन्य कोणी नव्हते. अनिरुद्धचे वडील अनुराधाला म्हणाले, सुनबाई येथे माझ्या जवळ बैस तुझ्याशी जरा महत्त्वाचे बोलायचे आहे. बोलताना त्यांचे डोळे भरुन आले होते व शब्दही फुटत नव्हता. अनुराधा आपला अनिरुद्ध आपल्याला सोडून गेलाय. त्याला भारत पाकिस्तान युध्दातच विरमरण आले होते. ईतकी वर्ष मी हे मुद्दामच तुझ्यापासून लपवले होते व त्याला काही कारण होते. एक तर तू वयाने लहान होतीस तसेच मुलेही लहान होती. तुला विधवा स्त्री च्या रुपात पाहण्याची मी कल्पनाही करु शकत नव्हतो. हे सर्व दिपक मिश्रा यांनाही माहित होते व माझ्या मुळेच त्यांनी ही बाब कोणालाही कळू दिली नाही. मुले अजून शिकत आहेत त्यामुळे तू मला वचन दे की तू सुध्दा मुलांना ही बातमी ती मोठी होऊन मार्गी लागेपर्यंत देऊ नकोस. हे बोलत असताना त्यांनी अनुराधाचा हात हातात घेतला व एक कागद हातात दिला. तो कागद म्हणजे अनिरुद्धच्या म्रुत्युची बातमी देणारी तार होती जी ईतकी वर्ष त्यांनी सांभाळून ठेवली होती. अनुराधाने एकदा तारेतील ती दुःखद बातमी साश्रू नयनांनी वाचली व नजर वर करून पाहिलं तर अनिरुद्धच्या वडिलांनी आपली ईहलोकीची यात्रा केव्हाच संपवली होती. तिने दिपक मिश्रा यांच्याकडे पाहिले व त्यांना ही बातमी अशीच तुमच्याजवळ गुप्त ठेवा अशी विनंती केली. त्यांनीही त्याप्रमाणे बातमी गुप्त ठेवण्याचे वचन दिले. दिलेले वचन त्यांनी पाळले. अनुराधाने नेहमी प्रमाणे रुटीन चालू ठेवले व मुलांना आपले वडील हयात नाहीत याची पुसटशी सुध्दा जाणीवहोऊ दिली नाही.आज लेकीची पाठवणी केल्यवर त्यांना आपले कर्तव्य आपण पुर्ण केल्याचे एक आत्मीक समाधान वाटत होते. नेहमी प्रमाणे त्यानी आपली डायरी काढली व लिहायला सुरुवात केली.

लग्नाच्या दगदगीने अनुप व अनुपमा जरा ऊशीराने ऊठले. अजून अनुराधाही ऊठलेली नव्हती. त्यांनी अंघोळ व चहापाणी ऊरकले. आता ९ वाजून गेले होते त्या दोघांनाही हॉस्पिटलमध्ये जायचे होते म्हणून आईला सांगून बाहेर पडावे असा अनुप विचार करत होता तेवढ्यात दारावरची बेल वाजली. अनुपने दार ऊघडले तर दारात कर्नल दिपक मिश्रा आले होते. अनुपने हसून त्यांचे स्वागत केले. पाच मिनीटे त्यांची चौकशी करून त्यांना बसण्यास सांगत अनुपमा आईला सांगण्यासाठी गेली. अनुप व कर्नल दिपक हॉलमधेच गप्पा मारत होते तेवढ्यात अनुपमाची आई अशी जोरात किंकाळी ऐकू आली. अनुप व कर्नल दिपक धावतच बेडरूममध्ये गेले अनुपमा बेडवर बसली होती. अनुराधा डोळे मिटून शांत पडून होती. एका हातात अर्धवट ऊघडलेली डायरी होती. अनुपने पुढे होऊन नाडी बघीतली व शांतपणे डोक्यावर हात ठेवून तिथेच शेजारी बसला. डायरीची पाने वाऱ्याने फडफडत होती. अनुपने डायरी घेतली व वाचायला सुरुवात केली व एकदम शेवटच्या पानावर त्याची नजर गेली. त्यातील अनुराधाचे शब्द वाचून त्याचा ऊर अभिमानाने भरून आला व डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. अनुराधाने डायरीत लिहिले होते.

प्रिय अनिरुद्ध तुम्हाला दिलेल्या वचनाप्रमाणे मी तुमच्या वडिलांची शेवटपर्यंत काळजी घेतली. बाबांनी तुमच्या मृत्यूची बातमी मला त्रास होऊ नये म्हणून शेवटपर्यंत मला कळू दिली नव्हती व मृत्यूसमयी मी हे मुलांनाही सांगू नये असे माझ्याकडून वचन घेतले होते व त्यांना दिलेल्या वचनाप्रमाणे मी ही बाब दोन्ही मुलांपासून लपवून ठेवली.आज आता मी माझ्या सर्व जबाबदाऱ्यातून मुक्त झाले आहे व त्यामुळेच मी ऊद्या मुलांना सर्व सत्य सांगणार आहेच. त्यासाठीच मी तुमचे मित्र कर्नल दिपक मिश्रा यांनाही सकाळी बोलवले आहे. काय दैवगती आहे बघा तुमच्या मृत्यूची बातमी मला त्रास होऊ नये व मुलांना पोरके वाटू नये म्हणून बाबांनी व तुमच्या मित्रानी लपवून ठेवली होती व बाबांनी त्यांच्या मृत्युसमयी मला सांगीतली ती खरेतर मला आधीच समजली होती. एकदा चुकून त्यांचे कपाट उघडले राहिले होते. मी बंद करायला गेले त्यावेळी तारेचा कागद तसाच एका पुस्तकात होता.मला तार आली त्यावेळीच शंका आली होती ती खरी ठरली होती.मी आहे तिथेच तो तारेचा कागद ठेवून दिला.त्यानंतर सुध्दा त्यांना कधीच मला हे सर्व माहिती असल्याची जाणीव होऊन दिली नाही. कारण मला दुःख होऊ नये यासाठी त्यांची धडपड व माझ्यावरील त्यांचे प्रेम यांचा त्यांना मिळणारा आनंद व समाधान मला हिरावून घ्यायचे नव्हते. आता सर्व जबाबदाऱ्यातून मी मुक्त झालेय. ऊद्या मुलांना सर्व गोष्टी उघड करुन तुमच्या भेटीला मी मोकळी असेन.
सदैव तुमचीच
अनुराधा.

***समाप्त***

— सुरेश काळे
सातारा
मो.९८६०३०७७५२

सुरेश गोपाळ काळे
About सुरेश गोपाळ काळे 48 Articles
मी आयडीबीआय या बँकेच्या सेवेतून अधिकारी म्हणून जुन २०१७ मधे निवृत्त झालो. महाविद्यालयीन जीवनापासून काव्य लेखनाची आवड होती. नोकरीतील व्यापामुळे मधील काही वर्ष लेखन कमी होते. निवृत्तीनंतर त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. विविध विषयांवर वैचारिक लेख लिहून ठेवले आहेत. परंतु लेख लिहिण्यापेक्षा कविता लिहिण्यामागे जास्त कल आहे. जुन २०१७ मधे "शब्दसूर" हा काव्यसंग्रह प्रकाशित.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..