
मराठी वाक्प्रचारामध्ये अनेक फळभाज्यांची नावं सर्रास वापरली जातात. उदाहरणार्थ, पुराणातील वांगी पुराणातच, वांग्याचं तेल वड्याला, सांगीवांगी, इत्यादी. आमच्या शाळेतील एक शिक्षक फार कडक होते, ते गोंधळ घालणाऱ्या मुलांना दम देताना म्हणायचे, ‘तुम्ही जर माझं ऐकलं नाहीत तर मी एकेकाच्या पार्श्वभागाचं भाजून सोललेलं भरताचं वांग करेन..’ असा दम ऐकल्यावर त्या मुलांच्या डोळ्यापुढे, कल्पनेनं त्यांचा पार्श्वभाग दिसायचा आणि ते ‘शांत’ बसायचे.
मला सर्व पालेभाज्या व फळभाज्या आवडतात. त्यातूनही मला सर्वात प्रिय आहे ते गर्द जांभळ्या रंगाचं रसरशीत ‘वांगं’! वांग्याच्या कोणत्याही प्रकारची सुकी अथवा पातळ भाजी मला सर्वाधिक आवडते.
वांग्याचे तसे बरेच प्रकार करता येतात. अगदी पहिलं म्हणजे ‘भरलं वांगं’, दुसरं..हरबऱ्याची डाळ वापरुन केलेलं ‘डाळवांगं’. वांगी आणि बटाटा यांची मिक्स भाजी खेडेगावात तर पंगतीला ठरलेली असते. शहरातील बुफेमध्ये सुद्धा ‘भरलं वांगं’ आवडीने खाल्ले जाते. मूगडाळ, तूरडाळ घालून सुद्धा वांग्याचा रस्सा चांगला होतो. सांबार करताना देखील काहीजण इतर भाज्यांबरोबर वांगं देखील वापरतात.
वांग्याचा सर्वात प्रसिद्ध प्रकार म्हणजे ‘भरीत’! उडुपी हाॅटेलमधील मेनूमध्ये देखील ‘बैंगन भरता’ असतोच. मंइईत खास भरीतासाठी वांगी मिळतात. साधारणपणे मोठ्या आकाराची वांगी त्यासाठी वापरतात. अलिकडे भरीत करण्यासाठी जांभळी तुकतुकीत मोठ्या आकाराची वांगी मिळतात.
वांग्यामध्ये आकार व रंगावरून अनेक प्रकार आहेत. पहिला नंबर लागतो, तो कृष्णाकांठच्या वांग्याचा! वसईची गर्द जांभळी वांगी, ही लांब काकडी सारखी असतात. तशीच हिरव्या रंगाचीही असतात. देठाला काटे असणारी जांभळ्या रेषांची छोटी वांगी भरुन करायला चविष्ट असतात. हिरव्या मोठ्या वांग्यामध्ये बिया अधिक प्रमाणात असतात. फोडी करुन आमटी करायची असेल तर मध्यम आकाराची गावरान वांगी योग्य ठरतात.
लहानपणी मी आईबरोबर मंडईत भाजी आणायला जात असे. तेव्हा नव्या मंडईत शेडगे आळीतील थोरात नावाचे पांढरी टोपी, सदरा, धोतर घालणारे गृहस्थ वांगी विकायचे. आम्ही दोघे त्यांच्याकडून वांगी घेत असू. काही वर्षांनंतर मी एकटा मंडईतून भाजी खरेदी करताना वांगी त्यांच्याकडूनच घेत असे.
आई गावी गेल्यावर, मला पाककलेची आवड असल्यामुळे जमेल तसा मी स्वयंपाक करायचो. वरण, भात भाजी करुन आम्ही जेवायचो. चपाती मात्र शेजारच्या मामी करुन द्यायच्या.
माझी पद्मा नावाची चुलत बहीण तिच्या मिलीट्रीमधील पती व मुलांबरोबर दिघीला क्वार्टरमध्ये रहात असे. त्यांच्याकडे शुक्रवारी फॅमिलीसाठी हिंदी चित्रपट दाखविले जात असत. आम्ही बंधू तिच्याकडे संध्याकाळी जात असू. गेल्यावर सोबत खरेदी करुन नेलेल्या वांग्यांची मी ‘भरली वांगी’ करीत असे. यथेच्छ जेवण झाल्यावर आम्ही सगळे चित्रपट पहायला जात असू.
गावी गेल्यावरही नागठाणे मधील मंगळवारच्या बाजारातून मी वांगी घेऊन जात असे. घरी गेल्यावर मी केलेल्या वांग्याच्या भाजीचा चट्टामट्टा होत असे. आजपर्यंत मला वांगी करण्याचा व खाण्याचा कधीच कंटाळा आलेला नाही.
एकदा आम्ही घरातले आणि शेजारचा मित्र, अमृतलाल जैन, त्याची पत्नी व मुले औरंगाबादच्या सहलीला गेलो होतो. वेरूळ येथील कैलास लेणी पाहिल्यावर मुक्कामाला खुलताबादला आलो. तेथील रेस्टहाऊस मधील आचाऱ्याने माझी आवडती भरली वांगी केली होती. आम्ही सर्वजण जेवायला बसल्यानंतर अमृतलाल व त्यांच्या पत्नीने ती वांगी ‘नाॅनव्हेज’सारखी दिसतात म्हणून खाण्याचे नाकारले. त्यांच्यासाठी दुसरी भाजी केली गेली व आम्ही ती सर्व वांगी, गट्टम केली.
संस्कृती प्रकाशनचं काम करीत असताना एक दिवस माईंनी (सुनीताराजे पवार) मला विचारलं, ‘आमच्याबरोबर माळशेजला येणार का?’ मी लगेच होकार दिला. आम्ही सर्वजण माळशेजला निघालो. माळशेजला पोहोचण्याआधी आम्ही जेवण केले. त्यावेळी ‘सुगरण माईं’नी स्वतः केलेली ‘भरली वांगी’ आणलेली होती. सोबत ज्वारीची भाकरी, मग काय.. आम्ही सगळे त्यावर तुटून पडलो. माईंनी केलेली वांगी नावालाही राहिली नाहीत. ती ‘भरली वांगी-भाकरी’ अविस्मरणीय अशीच होती.
कधी आॅफिसवर जाताना घरुन डबा आणला नसेल तर मी नव्या पेठेतील ‘आस्वाद’ला जेवायला जातो. तिथे बाहेरच्या पाटीवर ‘आजच्या भाज्या’ लिहिलेल्या असतात. त्यामध्ये वांग्याची भाजी असेल तर माझे जेवण ‘मनसोक्त’ होते.
आता देखील मी जेव्हा कधी मंडईत भाजी खरेदीसाठी जातो, पहिल्यांदा वांगी खरेदी करतो. काहींना वांगं हा प्रकारच आवडत नाही, त्यांच्याबद्दल मला आश्र्चर्य वाटतं की, इतकी चांगली भाजी खायला ते कसे नाकारु शकतात? काहींना वांगं खाल्लं की, जळजळ होते, पित्त होतं. मला मात्र तिन्ही त्रिकाळ रोज जरी ‘वांगी’ दिलीत तरी मी खायला तयार आहे…
ही काही ‘सांगीवांगी’ ची गोष्ट नाही, खरीखुरी गोष्ट आहे….
© – सुरेश नावडकर
मोबाईल ९७३००३४२८४
या रचनेचे सर्वाधिकार रचयिता © सुरेश नावडकर यांच्याकडेच आहेत.
१६-५-२१
Leave a Reply