मी आणि वसंतराव देशपांडे
(१) साल असावे १९६९-७०. जळगांवला मी, माझा मामेभाऊ आणि मामा प्रत्येकी एक रुपयाचे तिकीट काढून बालगंधर्वाच्या ओट्यावर ऐसपैस बसलो आणि रात्री १० ते पहाटे अडीच “कट्यार “पाहिले. “वन्स मोअर “ची नवलाई पहिल्यांदा अनुभवत ! तो आमचा पहिला दृष्टिक्षेप ! नाटकाला का गेलो होतो, आठवत नाही, पण खूप गाणी आणि किंचित खलनायकी छटा असलेला “खांसाहेब ” फारसा रुचला नाही. प्रसाद सावकार,फैय्याझ, रघुनंदन पणशीकर, प्रभाकर पणशीकर, भार्गवराम आचरेकर आणि दस्तुरखुद्द वसंतराव एवढी प्रभावळ, पाठीमागे पंडीत जितेंद्र अभिषेकी, दारव्हेकर मंडळी तरीही माझ्या त्या वयाला याची भुरळ पडली नाही.
(२) १९८० च्या आसपास वालचंदला अनेकदा “अष्टविनायक ” पाहिला. त्यांत (“घेई छंद नामक “) वीजेचे लोळ सौम्य, शांत झालेले, मृदू/हात जोडणारे वसंतराव दिसले.सगळं संघर्षयुक्त जीवन चेहेऱ्यावर स्थिर पण अपार शांत. सचिनला ही लॉटरी कशी लागली माहीत नाही, पण गायक /वडीलधाऱ्या पात्रासाठी वसंतराव पडद्यावर आले आणि संयत भूमिकेने लक्षात राहिले. मात्र अष्टविनायक दर्शन, वंदना पंडीत, शांताबाई शेळके, तळवलकर, राजा गोसावी, पद्मा चव्हाण या मांदियाळीत ते किंचित साईडट्रॅक झाले. हे त्यांचे माध्यम नव्हते.
(३) वालचंदला असताना आम्ही राहात असलेल्या घरमालकांच्या मुलीची मंगळागौर होती. मी ” दाटून कंठ येतो” गायलो, सोबत अभय हार्मोनियम वर आणि हेम्या तबल्यावर ! गाणं झाल्यावर साधेभोळे घरमालक सदगदित झाले. हेम्याने ठोकून दिले – ” अहो,वसंतराव देशपांडे म्हणजे नितीनचे काका! ” घरमालकांच्या नजरेत मी मावेनासा झालो.
(४) १९८३ साली वसंतराव गेल्यावर पुण्यात भनाम ला श्रद्धांजली सभा होती आणि साक्षात मराठी सारस्वतांचे दैवत- पुलं येणार होते. त्यादिवशी दाटलेल्या कंठाने पुलंनी सुमारे १५-२० मिनिटे वसंतराव चितारले. कोलाहल दडवीत सुनीताबाई नेहेमीच्या गहिऱ्या रूपात शेजारी बसलेल्या आणि स्टुलावरील फोटोतल्या वसंतरावांच्या चेहेऱ्यावर “आता समेवरी हे कैवल्य गान आले ” असे भाव होते! त्यादिवशी वसंतराव काहीसे उलगडले.
त्यानंतर काल दोन तास पंचावन्न मिनिटे पडद्यावर नातवाने आजोबांची ” ज्योतीने तेजाची आरती ” सादर केली आणि माझी आणि वसंतरावांची ओळख पूर्ण झाली.
नुकतीच हृदयनाथांनी ते साडेचार वर्षांचे असताना आईच्या मांडीवर पडून ऐकलेली ” श्रीगौरी ” रागातील बंदिश (जी खुद्द दीनानाथांनी वसंतरावांना शिकविलेली) कशी ऐकली ,लक्षात ठेवली आणि आशाताईनी त्यांवर आधारित “जिवलगा ” कसे अजरामर केले, त्याआधी शांताबाईंची मनधरणी,एच एम व्ही च्या अटी वगैरे आठवणी साद्यन्त सांगितल्या. वसंतराव जायच्या वेळी चार वर्षांचा असलेल्या राहुलच्या आयुष्यात त्याचप्रकारे आजोबांचे संगीत झिरपत आले . गुरु-शिष्य असे पुढील पिढ्यांमध्ये संक्रमित झाले.
राहुलच्या किर्तीमुळे, यू -ट्यूब मुळे शास्त्रीय संगीताकडे वळलेली तरुण पिढी काल मोठ्या संख्येने चित्रपट गृहात होती. अन्यथा १९८३ साली निवर्तलेल्या या सूर्यासारखे दाहक गाणाऱ्या गायकासाठी चाळीस वर्षांनी नवी माणसे (जी कदाचित त्यावेळी जन्मलेलीही नसतील) फिरकली नसती.
आमच्यासाठी भीमसेन, वसंतराव, जसराज, कुमार, अभिषेकी बुवा, मल्लिकार्जुन मंसूर असे अनेक कैवल्याचे लोळ होते. सध्याच्या मंडळींसाठी राहुल,आनंद भाटे,शौनक आणि महेश अशी नवी फळी आहे -तितक्याच ताकतीने वारसा पुढे नेणारी ! बाकीच्यांनी राहुलचे उदाहरण गिरवत अनुक्रमे भीमसेन, अभिषेकी आणि दुर्गाने जसराज/ मुकुल शिवपुत्र यांनी कुमारांचे चरित्र असेच पडद्यावर आणायला हवे.केव्हढे मोलाचे अर्काइव्ह होईल ते जगासाठी !
या साऱ्यांनी खस्ता खात,संघर्ष करीत हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत जागतिक पातळीवर प्रातः वंदनीय केले- त्यातल्या किराणा, ग्वालियर,पतियाला अशा घराण्यांच्या प्रवाहांसमवेत ! घराणी कदाचित कालौघात विरतीलही पण या उत्तुंग गायकांनी बळ दिलेला अभिजात संगीताचा हा प्रशस्त खळाळता प्रवाह आता सुरु राहील याचे आश्वासन काल या चित्रपटाने दिले. ” एकाच या जन्मी जणू — ” असं काही वचन वसंतरावांनी नातवाला दिलं होतं की काय, पण त्यांचा पडद्यावरील पुनर्जन्म सखोल, आशादायी आणि परिपूर्ण आहे.
प्रत्येक कलावंताने आपले शंभरहून अधिक टक्के योगदान दिलेले आहे- अगदी क्षणिक आलेल्या यतीनने सुद्धा ! ठाशीवपणे भावली अनिता दाते- वसंतरावांच्या आईच्या भूमिकेत तिने स्त्रीत्वाचे सगळे पैलू सादर केले आहेत. ती पिढी मीही माझ्या आजीच्या, वडिलांच्या मामीच्या रूपात अनुभवली आहे. त्यामुळेच हे आईचे पात्र अजिबात विसरता येणार नाही.
अंगाई ते लावणी व्हाया शास्त्रीय रागदारी चित्रपटातील एक पात्र वाटावे अशी संथपणे दिग्दर्शकाने अंथरली आहे. तो गालिचा ओलांडून जाणे सर्वथैव अशक्य!
काल सकाळी मी कोरोनाचा “बूस्टर ” डोस घेतला- शरीराची रोगप्रतिकारक्षमता वाढावी म्हणून ! रात्री वसंतरावांचा सांगीतिक डोस घेतला -आता मानसिक प्रतिकार शक्ती खूप काळ वाढलेली असेल.
” आयत्या घरात घरोबा ” चित्रपटात शेवटी जाणाऱ्या अशोक सराफकडे अंगुलीनिर्देश करीत सचिन आपल्या पत्नीला म्हणतो- ” बघितलंस मधुरा, सगळ्यांना आनंद वाटून जगातला सर्वात श्रीमंत माणूस चालला आहे. ”
वसंतराव असेच आनंद वाटून निघून गेले. फरक इतकाच- काल चित्रपटगृहातून बाहेर पडताना मीही त्यांच्याबरोबर श्रीमंत होऊन बाहेर पडलो.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply