७० च्या दशकातील ही घटना आहे. दक्षिणेतील सुप्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक ए.भिमसिंग हे दिलिपकुमार यांच्याकडे चित्रपटाचा एक प्रस्ताव घेऊन् गेले. ए.पी. नागराजन हे प्रसिद्ध तामिळ लेखक-दिग्दर्शक त्यांचे मित्र. त्यांनी १९६४ मध्ये शिवाजी गणेशन् यानां घेऊन “नवरात्री” हा चित्रपट तयार केला होता. ए.भिमसिंग यानां या चित्रपटाचा हिंदी रिमेक करायचा होता. दिलीपकुमार यांनी पटकथा लक्षपूर्वक वाचली आणि ते म्हणाले- “हा चित्रपट फक्त एकच कलाकार करू शकतो आणि माझा आग्रह आहे की तुम्ही त्यानाचं या चित्रपटात घ्यावे.” उत्तर ऐकून ए.भिमसिंग यानां आश्चर्य वाटले की इतका दिग्गज अभिनेता दुसऱ्या कुणा अभिनेत्याची शिफारस करत आहे. ते रिकाम्या हाताने परत आले.
साधरण १९६३ चे वर्ष असेल. एक २५ वर्षांचा तरूण मुंबईतील प्रसिद्ध नाटयसंस्था “इप्टा”च्या नाटकात एखादी भूमिका करायला मिळावी म्हणून धडपडत होता. त्याची धडपड बघून प्रसिद्ध अभिनेते ए.के. हंगल यांनी त्याला एक छोटी भूमिका देऊ केली. “डमरू” या नावाच्या नाटकातील ही भूमिका एका ७० वर्षीय म्हाताऱ्याची होती. ए.के. हंगल स्वत: त्यात भूमिका करत होते. या तरूणाने त्यांच्या वडीलाची भूमिका साकारली होती. गमंत बघा..ए.के. हंगल त्यावेळी त्या तरूणापेक्षा वयाने २४ वर्षे मोठे होते. त्याच्या अभिनयाने त्या तरूणाने वाहवा पण मिळवली. मात्र पूढे आयुष्यभर हे वृद्धत्व त्या तरूणाला गोचीडा सारखे चिकटले. पूढे हा तरूण चित्रपटसृष्टीतला एक महान कलावंत झाला…… चित्रपट क्षेत्रातील हा कदाचित एकमेव अभिनेता असेल ज्याने एकाच वेळी अभिनेत्रीचा नायक, वडील आणि पती म्हणून भूमिका साकारली असेल…..मी संजीवकुमार या अभिनेत्या बद्दल बोलत आहे.
पहिल्या प्रसंगात दिलीपकुमारने जी शिफारस केली होती ती संजीवकुमारची. या अभिनेत्यात किती ताकद आहे हे दिलीपकुमारने पूरेपूर ओळखले होते असेच म्हणावे लागेल. ए.भिमसिंग यांनी जी पटकथा दिलीपकुमारला वाचायला दिली होती त्यात ९ प्रकारच्या वेगवेगळ्या भूमिका एकाच अभिनेत्याने साकार करायच्या होत्या. आणि प्रत्येक भूमिका एकमेकापेक्षा सर्वस्वी वेगळ्या होत्या. ए. भिमसिंघ यानीही मग संजीवकुमारवर विश्वास दाखवला. १९७४ मध्ये आलेल्या “नया दिन नयी रात” या चित्रपटात संजीवकुमारने ९ प्रकारच्या भूमिका अप्रतिमपणे साकार केल्या. हरीहर जरीवाला हे त्यांचे मूळ नाव. वडील जरीचा व्यवसाय करीत म्हणून जरीवाला. त्यांच्या कुटूबांत एक विचित्र अंधश्रद्धा होती-’कुटूंबातील मोठ्या मुलाचा मुलगा १० वर्षांचा झाला की वडीलांचा मृत्यू होतो’ त्यांचे आजोबा,वडील आणि भावा सोबत असे घडले होते. जसा प्रत्येकाचा संघर्ष सुरू होतो तसा संजीवकुमारचा ही सुरू झाला. जी मिळेल ती भूमिका करत रहाणे हा त्यांचा शिरस्ता. १९६० ते १९६८ पर्यंत अशा अनेक छोट्या मोठ्या भूमिका ते करत राहिले पण आणखीही ओळख मिळाली नव्हती. १९६८ मध्ये त्यांनी “शिकार” या चित्रपटात धमेंद्र सोबत भूमिका साकारली. मात्र यात धमेंद्र नायक असल्यामुळे ते केंद्र भूमिकेत होते. याच वर्षी एस.एच. रावेल यांचा “संघर्ष” रिलीज झाला. यात दिलीपकुमार बरोबर त्यांना एक भूमिका मिळाली. आणि या छोट्याशा भूमिकेत त्यांनी आपल्या अभिनय क्षमतेची चूणूक दाखविली. स्वत: दिलीपकुमारही त्यांच्या अभिनयाने प्रभावीत झाले. या चित्रपटाच्या पटकथेचे एक लेखक गुलजारही होते. त्याच वेळी त्यांच्या डोक्यात संजीवकुमार पक्के घुसले. ६८ ते ६९ या काळात संजीवकुमारचे १६ चित्रपट प्रदर्शीत झाले. पण एक वगळता सर्वच चित्रपटात ते सहनायकाच्याच भूमिकेत होते. १९७० मध्ये संजीवकुमारचा “खिलौना” प्रदर्शीत झाला. खरं तर या चित्रपटात जितेंद्र नायक होता. पण बोलबाला झाला तो संजीवकुमारचाच. त्यातील वेड्याची भूमिका त्यांनी अप्रतिमपणे साकार केली.या चित्रपटा नंतर मात्र त्यांनी सर्वानां आपली दखल घेण्यास भाग पाडले.
भारतीय चित्रपटाचा “हिरो” आजही पुष्कळ प्रमाणत टिपीकल असतो. तो स्टार वा सुपर स्टार असतो. तरूण व हीमॅन असतो. मला व्यक्तीश: संजीवकुमार हा अत्यंत संवेदनशील अभिनेता वाटतो. तो स्टार होता की नाही माहित नाही पण प्रचंड ताकदीचा अभिनय करायचा. संजीव कुमारला भलेही आपण एकवेळ विसरू पण त्याने साकार केलेल्या व्यक्तीरेखा कधीच विसरता येणार नाहीत. त्या व्यक्तीरेखेत तो व्यक्तीगत संजीवकुमारचा शिरकाव होऊ द्यायचा नाही म्हणूनच की काय तो एकाच वेळी जया भादूरीचा प्रेमळ पिता (परीचय), पती (कोशीश),सासरा (शोले), प्रियकर (अनामिका) अशा भूमिका सहज साकारीत असे आणि प्रेक्षकांनीही त्याचा सहजपणे स्विकार केला. संजीवकुमारचे डोळे विलक्षण बोलके, बिटवीन द लाईन मधला गॅप हे डोळे अतिशय ताकदीने भरून काढत असत. त्यांच्या चेहऱ्यावरीन नस न नस थरथरत असे असाच बोलका चेहरा मला राजकपूरचा दिसे. मात्र संजीव कूमार यानां वयस्कतेचे जे कवच चिकटले ते कायम. त्यांच्या प्रत्यक्ष वयापेक्षा अधिक वयाच्या भूमिका सतत भेटल्या पण त्यांनी आपल्या अभिनयाशी कधीच अप्रामाणिकपणा केला नाही.
हरीहर जरीवाला ते संजीव कूमार असा बीग्रेड चित्रपटा पासून सुरूवात करत अभिनयाच्या उच्च शिखरा पर्यंतचा त्यांचा प्रवास दिपवून टाकणारा आहे. १९७१ मध्ये आलेल्या बाबूराम ईशारा यांच्या ”दस्तक”ने त्यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. तर १९७३ मधील गुलजार यांच्या “कोशीश” ने दुसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. कोशीश हा त्यांच्या अभिनय क्षमेतचा कळच म्हणावा लागेल. जया आणि संजीवकुमार जेव्हा जेव्हा त्यांच्या देहबोलीने संवाद म्हणत तेव्हा ते संवाद कानाला स्पष्ट एकू येत असत…यातील एका प्रसंगात जेव्हा त्यांचा मुलगा लग्नाला नकार देतो कारण ती मुकी बहीरी असते त्यावेळचा संजीकुमारचा अभिनय म्हणजे अक्षरश्: अंगावर काटे आणतो……हे फक्त आणि फक्त तोच करू जाणे. संजीव कुमारने १४ फिल्मफेअर पुरस्कार पटकावले व या शिवाय १३ विविध पुरस्कार देखील मिळवले. विनोदी भूमिकेतील त्यांची संवादफेक तर लाजबाब असायची. “अंगूर’ आणि “पती पत्नी और वो” मध्ये त्यांनी धमाल केलीय. ओठांची विशिष्ट हालचाल करून ते जबरदस्त पंच मारत. १९७४ मध्ये दाक्षिणात्य दिग्दर्शक आर. कृष्णन् यांचा शानदार नावाचा चित्रपट आला होता. यातील एका प्रसंगात संजीव कुमार यांचा दीर्घ क्लोजअप आणि तितकाच दीर्घ संवाद होता. पडद्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील प्रत्येक पेशी अभिनय करत होती. इतका अप्रतिम क्लोजअप नंतरच्या चित्रपटात आभावानेच बघायला मिळाला. मी तर म्हणेन त्यांच्या सर्वच अभिनय क्षमता बघायच्या असतील तर त्यांचा “नया दिन नयी रात” हा एकच चित्रपट पूरेसा आहे.
संजीव कुमार यांचे वैयक्तीक आयुष्य मात्र गुंतागुंतीचेच राहिले. हेमा मालिनी सोबत विवाह करायची ईच्छा पूर्ण नाही झाली. तर सुलक्षणा पंडीत सोबत सूर जुळत असतानां त्यानीच नकार दिला व सुलक्षणा पण अविवाहित राहिली. राजेश खन्ना, शशी कपूर, देवेन वर्मा, शिवाजी गणेशन्, बी. नागीरेड्डी, शर्मिला टागोर, तनुजा हे त्यांचे अत्यंत जवळचे मित्र. आपल्यापेक्षा ज्युनीअर कलावंताशी ते खूपच प्रेमळपणे वागत असत. त्यांच्या कुटूंबाला जणू एखादा शाप असावा कारण कुटूंबातील सर्वच पुरूष पन्नाशीच्या आतच मृत्यू पावले. १९७६ मध्ये संजीव कुमार यांना पहिला हार्ट अटॅक आला त्यावेळी त्यांनी अमेरिकेत जाऊन बाय पासही केली. पण १९८५ मध्ये त्यांनी अल्विदा केले त्यावेळी ते ४७ वर्षांचे होते. आज ते जीवंत असते तर ७९ वर्षांचे राहिले असते आणि कुणास ठावूक त्यांनी शंभरी पार झालेल्या एखाद्या वृद्धाची अफलातुन भूमिकाही साकार केली असती……..प्रत्यक्षात जरी त्यांनी जरीकामाचा व्यवसाय केला नाही तरी अभिनायाची एकापेक्ष एक सरस अशी भरजरी वस्त्रं मात्र सुंदर गुफली. त्यांच्या अभिनयाला मन:पूर्वक नमन.
-दासू भगत(९ जुलै २०१७)
Leave a Reply