नवे वर्ष नवे कालनिर्णय ह्या प्रमाणे नवे वर्ष नवे संकल्प हे धोरण कालनिर्णय च्या निर्मिती पासूनच सूरु झाले असावेत अशी माझी आपली एक मनोकामना आहे.
दर वर्षी नवीन कॅलेंडर खरेदी करून पहिल्या दिवशी अगदी आनंदाने संपूर्ण चाळून मग ते जस वर्षभर भिंतीवर एका जागी पडून राहते त्याचप्रमाणे हे संकल्प वर्षाच्या सुरुवातीला एकमेकांना सांगून मग वर्षभर मनाच्या एका कोपऱ्यात पडून राहतात त्याच्या मागे लागून ते पूर्णत्वास नेणारा विरळाच !
संकल्पाची व्याख्याच जणू वर्षाच्या पहिल्या दिवशी लोकांनी आपल्याला विचारल्यावर जे चांगलं सुचेल ते एकमेकांना सांगत फिरणे अशीच काहीशी झालेली दिसते.
मग कोणीतरी काका ओळखीच्या मुलांना शुभेच्छा देत मग बाळा या वर्षाचा संकल्प काय? अस विचारतात अन् क्षणार्धात काका मी रोज नियमित पुस्तक वाचण्याचा संकल्प केलाय,मी रोज सकाळी उठून एक किलोमीटर चालण्याचा संकल्प केलाय असे काही ठराविक संकल्प सांगितले जातात. आणि मग विचारणारा आणि सांगणारा
दोघेही ते विसरून जातात ते पुढील वर्षापर्यंत.
मागे एकदा असच वर्षाच्या सुरूवातीला माझा एक मित्र मला वर्षाच्या सुरुवातीला भेटला.खूप दिवसांच्या गप्पा सोबत नविन वर्षाच्या शुभेच्छा या सोबत संकल्पाचा विषय न येईल तेच नवल! त्याने माझा संकल्प विचारला? आणि मग मीही अगदी निश्चयाने तो त्याला सांगितला.मग मलाही त्याचा संकल्प ऐकण्यास भलतीच उत्सुकता निर्माण झाली आणि मीही विचारलं तुझा काय संकल्प आहे?
“मी ह्या नवीन वर्षी एखादा क्षुल्लक संकल्प नाही करणार आहे” ?
म्हणजे तू काहीच नाही करणार नवीन वर्षी नवं नवं? मला त्याची बोलती उघडायचीच होती.
“अरे तस नाही मी एकदा साधा सुधा संकल्प न करता एक नियोजन च केलं आहे त्यानुसार त्या त्या गोष्टी या वर्षी मी अंगवळणी पडणार आहे”.
नक्की असा कोणता पराक्रम हा करणार आहे हे पाहण्यासाठी मी विचारलं,” म्हणजे नक्की काय ठरवलं आहेस तू ?सांग तरी”
सर्वप्रथम मी रोज पहाटे पाच ला उठणार आहे.(बेट्या आजपर्यंत कधी नवाशिवाय उठला नाही.कॉलेज ची दोन लेक्चर कधीही बसला नाही) त्यानंतर रोज दीड तास व्यायाम ,योगसाधना (आत्तापर्यंत वजनाने शंभरी गाठली पण कधीही हा योग जुळला नाही)नंतर पहिल्या लेक्चर पासून रोज कॉलेज अटेंड ते झालं की लाईट ब्रेकफास्ट(रोज कॉलेज ला आल्यावर दोन प्लेट मेदूवडे,समोसा आणि चहा याशिवाय टेबल रिकाम झालं नाही)कॉलेज संपल्यावर एकतास लायब्ररीत वाचन(पेपरातल्या चंदेरी दुनिया आणि क्रीडा याशिवाय काही घेतल्याचं दोन वर्षात मला ज्ञात नाही.) दुपारी जेवण ,विश्रांती, संध्याकाळी फिरणं,घरी सामानसुमान लागेल ते आणून देणं,कॉलेज चा नियमित अभ्यास(दोन सत्रांना मिळून एक शंभर पानी वही तीही अर्धी कोरी) रात्री जेवण आणि शतपावली(एकंदरीत पाहता अविश्वसनिय)आणि लवकर झोपून सकाळी पाच चा गजर(पहाटे तीन चा लास्टसिन कधी चुकलेला नाही)…
बोल काही आणखीन सुधारणा पाहिजे का?
नको रे एकदम परफेक्ट केलयस?(यावर मी काही बोलणं
म्हणजे माझ्याच ज्ञानाची परीक्षा घेण्यासारख आहे)
आज बरोबर एक वर्ष झालं फरक इतकाच मी दुसऱ्या वर्षातून तिसऱ्या वर्षात आलोय(यावरून पाहिले दोन संकल्प त्याच दिवशी मोडीत निघाले) ब्रेकफास्ट विषयी आपण न बोललेच बरं(आपणहून सारख दुसऱ्याच खाणं कशाला काढा).आजही कॉलेज ओळ्खपत्रकावर एकही पुस्तकाची नोंद झाली नाहीच आणि ह्यावरून पुढच्या नियोजनाच काय झालं हे सांगायची गरज च नाही.
सांगायचा मुद्दा हाच की आपल्याला झेपेल,आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला पटेल असेच संकल्प केले पाहिजेत.आणि ठाम निश्चयाने वर्षभर त्याची कास न सोडता ते पूर्णत्वास नेण्याचे प्रयत्न शर्थीने केले पाहिजे.
नाहीतर नवे वर्ष नवे संकल्प हे कोड कधीच सुटणार नाही.
मी मझ्यापासून सुरुवात केव्हाच केली कारण माझा संकल्पच हा होता वर्षभरात मोजकच पण काहीतरी लिहीत राहावे प्रसंगी इतरांचे वाचीत जावे….
— तेजस खरे.
Leave a Reply