नवीन लेखन...

संकर आणि संकरित प्रजाती

भाभा अणूसंशोधन केंद्रातील दिवंगत ज्येष्ठ शास्त्रज्ञ  कै. गजानन वामनाचार्य यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेला हा शेवटचा लेख. गजानन वामनाचार्य यांचे दि. २ जून २०२२ रोजी निधन झाले.  त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी त्यांचे काही अप्रकाशित लेख तसेच पूर्वप्रकाशित लेख मराठीसृष्टीवर पुन्हा प्रकाशित करणार आहोत. याचसोबत त्यांची काही पुस्तके इ-बुक स्वरुपात उपलब्ध आहेत. 


पृथ्वीवरील सजीव आणि वनस्पती यांच्यात, सध्याच्या वेगानं संकर होत राहिला तर कदाचित, हजारो वर्षानंतर, अेकच संमिश्र किंवा संकरीत प्रजाती अस्तित्त्वात राहतील.
मानवाच्या बाबतीत, सर्व मानववंशात संकर होअून, कदाचित अेकमेव वंश निर्माण होण्याची शक्यता आहे. कसा असेल तो मानव? त्या संमिश्र प्रजाती? पण तोच खरा `पृथ्वीमानव` असेल आणि पृथ्वीवरील त्याच पृथ्वीप्रजाती असतील.

अुंट आणि लामा (LLAMA) यांच्या संकरातून ‘कामा’ (CAMA, CAMEL+ LLAMA ) या संकरीत प्रजातीचा प्राणी दुबअी येथे जन्मल्याची बातमी १० फेब्रुवारी १९९८ च्या टाअिम्स ऑफ अिंडीयात वाचली.

सिंहाचा नर आणि वाघाची मादी यांच्या संकरातून ‘लायगर’ आणि वाघाचा नर आणि सिंहाची मादी यांचा संकर होअून निर्माण झालेला `टायलॉन` या संकरीत प्रजातींचे हिंस्त्र प्राणी निर्माण झाल्याची बातमीही बर्‍याच वर्षापूर्वी वाचली होती. घोडा आणि गाढव यांच्या नैसर्गिक संकरातून खेचर हा प्राणी निर्माण झाला आहे हे सर्वश्रुतच आहे.

घोडा आणि झेब्रा यांच्या संकरातून फक्त अर्ध्या अंगावरच काळे पट्टे असलेला अेक नवा ‘घोब्रा’ हा संकरीत प्राणी निर्माण झाल्याचं दृष्य टीव्हीवर पाहिल्याचं आठवलं. याक या केसाळ तिबेटी बैलाचा, मेंढीबरोबर संकर होअूनही नवा प्राणी घडला आहे.

१०० वर्षांपूर्वी, मध्य आफ्रिकेच्या दाट जंगलात, झेब्रा आणि जिराफ यांचा नैसर्गिक संकरीत प्राणी आढळला. त्याला `ओकापी` असं म्हणतात.

अेकाच प्रजातीच्या वेगवेगळ्या भौगोलिक खंडात ठळक वैशिष्ठ्यं असलेल्या पोटप्रजातीही असतात. अुदा. आफ्रिकन हत्ती आणि भारतीय हत्ती यांच्या संकरातून नवीनच पोटजाती निर्माण होण्याची शक्यता आहे. कुत्र्यांच्याही अनेक पोटप्रजाती (क्रॉस ब्रीड) आहेत. त्यांच्या संकरातूनही वेगळ्याच पोटप्रजाती आतापावेतो नक्कीच निर्माण झाल्या असणार. गायी म्हशी यांच्याही अधिक दूध देणार्‍या संकरीत प्रजाती निर्माण करून दुग्धोत्पादनाच्या बाबतीत ‘श्वेत क्रांती’ घडवून आणलेली आहे.

संकर म्हणजे काय? :

दोन शुद्धांपासून अेक मिश्र किंवा दोन मिश्रांपासून अेक संमिश्र तयार होणं म्हणजे संकर होणं असं म्हणता येअील. ८० टक्के शुद्ध नायट्रोजन आणि २० टक्के शुद्ध ऑक्सीजन यांचं मिश्रण झाले म्हणजे ढोबळमानानं १०० टक्के हवा निर्माण होते. म्हणजे हवा ही नायट्रोजन आणि ऑक्सीजन यांचा संकर आहे. तांबं आणि जस्त, विशिष्ट प्रमाणात अेकमेकात मिसळलं की पितळ हा संकरीत मिश्र धातू तयार होतो. २४ कॅरट सोन्यात ठराविक प्रमाणात दुसरे धातू (तांबं किंवा चांदी) मिसळलं की २२ कॅरट आणि १४ कॅरट कसाचं संकरीत सोनं तयार होतं. निरनिराळी धातूमिश्रणं म्हणजे अॅलॉअीज, संकरीत धातू आहेत असं म्हणता येतं.

गुलाबी फुलं येणार्‍या राकट गुलाबावर, पिवळी फुले येणार्‍या गुलाबाचं कलम करून अेकाच वेळी गुलाबी आणि पिवळी फुलं येणारा गुलाब अस्तित्त्वात येतो, हाही विशिष्ट प्रकारचा संकरच आहे.

निंबोणीसारखी परंतू मधुर फळं येणार्‍या खिरणी या वृक्षावर चिकूचं कलम करतात. मुळं खिरणी वृक्षाची परंतू पानं आणि फळं मात्र चिकूची असा हा वेगळ्याच प्रकारचा संकर आहे.
संकरीत बियाणं तर आता अितक्या विपुल प्रमाणात अुपलब्ध आहेत की मुळची बियाणी जवळजवळ नष्टच झाली असावीत. बटाटा आणि तमाटा यांच्या संकरातून निर्माण झालेला ‘पोमॅटो’ बाजारात सर्रास मिळतो.

यापूर्वी कधी पाहिली नव्हती अशा आकाराची आणि रंगांची शेवंतीची फुलं पहावयास मिळतात. गुलाबाच्या बाबतीत तर विचारूच नका. पांढरा, पिवळा, लाल, नारिंगी, भगवा या मूळ रंगांच्या आणि त्यांच्या मिश्र छटा असलेली अनेक रंगांची आणि आकाराची फुलं येणारे गुलाब आढळतात.

संकरीत प्राणी :

नैसर्गिक संकर होतो त्यावेळी, त्या प्राण्यांचा प्रत्यक्ष शरीरसंबंध होतो. खेचर ही प्रजाती नैसर्गिक संकरातून निर्माण झाली आहे आणि या संकरीत प्रजातीचं जनन होअून आता ती स्वतंत्र प्रजाती म्हणून अस्तित्त्वात आहे.

आता विज्ञान आणि तंत्रज्ञान यांत, अितकी प्रगती झाली आहे की परीक्षण नळीत, शुक्राणू आणि बीजांडं यांचं फलन करून, फलित गर्भ, त्याच मादीच्या किंवा दुसर्‍या मादीच्या गर्भाशयात वाढविता येतो. हे तंत्र आणि फुटव्याचं तंत्र (क्लोनिंग) वापरून आणखी कोणकोणते प्राणी निर्माण होतील सांगवत नाही. जिराफ, झेब्रा, गोरिला ही आफ्रिकेची किंवा शहामृग, कांगारू आणि अेमू (EMU) ही ऑस्ट्रेलियाची मक्तेदारी असलेले प्राणी संकरतंत्रामुळे वेगळ्याच स्वरूपात निर्माण होण्याची शक्यता आहे.

सजीव आणि वनस्पती यांच्या काही विशिष्ट प्रजातीतच म्हणजे तोलामोलाच्या प्रजातीतच संकर होणं शक्य आहे. अशाच दोन प्रजातींचा संकर होतो की जो निसर्गाला मान्य असतो. म्हणजे गुणसूत्रं, जनुकं वगैरे संकरीत पेशीत सामावून घेतले जाअू शकतात. ससा आणि सिंह यांचा किंवा अुंदीर आणि कुत्रा यांचा परीक्षण नळीतही संकर करणं कदाचित अशक्य असावं. वाघाची हुबेहूब प्रतिकृती असलेली मांजर मात्र कशी निर्माण झाली असावी हे अेक कोडंच वाटतं. गाय आणि म्हैस यांचा संकर झालेला अैकिवात नाही.

निसर्ग खरोखर महान आहे. नैसर्गिक संकर होणार नाही याची पुरेपूर काळजी तो घेतो. स्वयंप्रेरणेमुळे सजीव फक्त स्वत:च्याच प्रजातीतील जोडीदाराशी रममाण होतात. विशिष्ट आवाज, वास वगैरेमुळे ते आपला जोडीदार बरोबर हुडकून काढतात आणि नवरा-बायको प्रमाणं अेकनिष्ठ राहतात. या प्रेरणेमुळेच अनेक पिढ्यांनंतरही शुद्ध प्रजाती टिकून राहिल्या आहेत.

पूर्वी पृथ्वीवरील भूप्रदेश, समुद्र, पर्वत वगैरेमुळे अेकमेकापासून अलग अलग राहिले होते. मानवी विकास झाला नव्हता, दळणवळणाची साधनं नव्हती म्हणून निरनिराळे मानववंश बर्‍याच शुद्ध स्वरूपात टिकून राहिले. आपापल्या गटातच किंवा टोळीतच सोयरिका होत असल्यामुळे, प्रजातीची शुध्दता हजारो वर्षे टिकून राहिली. टोळीतच विवाह होत असल्यामुळे सगोत्र विवाहांची संक्या बरीच असावी.

मानवी विकास झाल्यानंतर मुला-मुलींचे विवाह, आअी-वडील किंवा वडीलधारी माणसंच जुळवीत असत. त्यामुळे आपल्याच वंशाच्या घराण्याशी सोयरिक करणं कटाक्षानं पाळलं जात असे ही पद्धत म्हणजे पशुपक्ष्यांच्या स्वयंप्रेरणेसारखीच आहे.

निरनिराळ्या राजवंशातही तुल्यबळ, तोलामोलाचं घराणं किंवा खानदान यातच सोयरिक होत असे. दासीपासून किंवा भिन्न वंशाच्या स्त्रीपासून बळजबरीनं किंवा भिन्न वंशाच्या अंगवस्त्रापासून निर्माण झालेली प्रजा मिश्र जातीची किंवा मिश्रवंशाची होत असे. परंतू आता शिक्षण, कलासाधना, खेळ, नोकरी, व्यापार-व्यवसाय वगैरेमुळे भिन्न वंशाच्या स्त्री-पुरूषांचे संबंध प्रेमविवाहांमुळे जुळू लागले आहेत आणि निरनिराळ्या मानववंशात सरमिसळ होअू लागली आहे.

आफ्रिकेतील काळे, युरोपातील गोरे, आशियातील तपकिरी किंवा गहूवर्णी, मध्यपूर्वेतील वंश, मंगोलियातील पिवळे वगैरेंच्या संकरातून मिश्र वंशाची मानवप्रजा निर्माण होअू लागली आहे. दोन शुद्धांपासून मिश्र आणि दोन मिश्रांपासून संमिश्र अशा प्रजाती मानवसहित सर्व सजीवात आणि वनस्पतीत निर्माण होत आहेत.

संकर करणार्‍या प्रजातीपैकी ज्या प्रजातीचे DNA, RNA गुणसूत्रं (क्रोमोझोम) किंवा जनुकं (जीन्स) जास्त प्रभावी असतील त्या प्रजातीचे अधिक गुणधर्म असलेल्या पेशी संकरीत प्रजातीमध्ये अुतरतील आणि ही मूलभूत पेशीद्रव्यं ज्या प्रजातीमध्ये जुळवून घेअू शकणार नाहीत त्या प्रजातींचा संकर होअू शकणार नाही हे अुघड आहे. संकरीत प्रजातीमध्ये नराचा प्रभाव जास्त असावा. मादीचाही प्रभाव काही प्रजातीमध्ये असण्याची शक्यता आहे.

विज्ञानात अतीमहत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे विश्वातील घटना नैसर्गिकरित्या शिस्तबद्धतेकडून गैरशिस्तीकडे किंवा बेशिस्तीकडे जाणार्‍या दिशेनं घडत असतात. म्हणजे From Order to Disorder. महास्फोटाच्या वेळी (Big Bang) ह्या विश्वात १०० टक्के शिस्त होती (Perfect Order) आणि अुष्णतामान प्रचंड होतं. तेव्हापासून म्हणजे सुमारे १३ अब्ज वर्षांपासून विश्व प्रसरण पावत आहे आणि त्याची वाटचाल गैरशिस्तीकडे होते आहे आणि तापमान कमीकमी होतं आहे. अशारितीनं हळूहळू १०० टक्के बेशिस्त (Perfect Disorder) झाली आणि तापमान शून्य अंश केल्व्हिन (अुणे २७३.३ अंश सेल्शियस) झालं की विश्व आकुंचन पावू लागेल आणि शेवटी महाआकुंचन (Big Crunch) होअील आणि सगळं विश्व परत अेका बिंदूत सामावेल आणि प्रचंड अुष्णतामान निर्माण होअील.

नैसर्गिकरित्या विरूद्ध दिशेनं म्हणजे बेशिस्तीकडून शिस्तीकडे अशा घटना घडणं कदापिही शक्य नाही. शुद्ध नायट्रोजन आणि शुद्ध ऑक्सीजन आपोआप अेकमेकात मिसळतील आणि हवा निर्माण होअील परंतू निर्माण झालेल्या हवेपासून ते आपोआप शुद्ध स्वरूपात कदापिही अलग होणार नाहीत. सजीवांच्या आणि वनस्पतींच्या संकरीत प्रजातींनाही हा नियम लागू आहे. संकरीत प्रजातीपासून मूळच्या शुद्ध प्रजाती कदापिही निर्माण होअू शकणार नाहीत. म्हणूनच सध्या आहे या वेगानं पृथ्वीवरील सजीव आणि वनस्पती यांच्यात संकर होत राहिला तर कदाचित हजारो वर्षानंतर अेकच संमिश्र किंवा संकरीत प्रजाती अस्तित्त्वात राहतील.

मानवाच्या बाबतीत सर्व मानववंशात संकर होअून कदाचित अेकमेव वंश निर्माण होण्याची शक्यता आहे. कसा असेल तो मानव?

–- गजानन वामनाचार्य

संदर्म : मराठी विज्ञान महासंघाचं मुखपत्र : मार्च १९९८.

Hybrid Animals

गजानन वामनाचार्य
About गजानन वामनाचार्य 85 Articles
भाभा अणुसंशोधन केन्द्र, (BARC) मुंबई येथील किरणोत्सारी अेकस्थ आणि किरणोत्सारी तंत्रज्ञान विभागातून निवृत्त वैज्ञानिक. मराठीसृष्टीवरील नियमित लेखक. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या कामात स्वारस्य घेतले. मविप च्या पत्रिका या मुखपत्राच्या संपादक मंढळावर त्यांनी १६ वर्षं काम केलं. ७५,००० हून जास्त मराठी आडनावांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. आडनावांच्या नवलकथा यावर त्यांनी अनेक लेख लिहीले आहेत. बाळ गोजिरे नाव साजिरे हे मुलामुलींची सुमारे १६५०० नावं असलेलं पुस्तक त्यांनी २००१ साली प्रकाशित केलं आहे.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..