मी जी छोटी गोष्ट पुढे सांगणार आहे, त्यावर बहुतेकांचा विश्वास बसणार नाही आणि ज्यांचा बसेल, ते लोक, इतर लोकांनी त्यांना अंधश्रद्ध वैगेरे आहेत असं समजू नये यासाठी, विश्वास बसल्याचं किंवा असल्याचं कबूल करणार नाहीत. पण ‘जे जे आपणांसी ठावे, ते ते इतरांसी सांगावे’ या उक्तीनुसार, मला जो अनुभव आला किंवा येतो हा शब्दबद्ध करणारच मग ‘लोकांना काय वाटेल’ हा विचार मी करणार नाही. असंही इतरांना काय वाटेल याचा विचार करूनच आपण आपल्याला मनापासून कराव्याश्या वाटलेल्या कित्येक गोष्टी केलेल्या नसतात. असो.
आपल्या समाजात पूर्वीपार काही संकेत रुढ आहेत. वैयक्तीक पातळीवर त्या संकेताचं पालन करण्याचा आजही कसोशीने प्रयत्न केला जातो, मात्र जाहिरित्या तसं कबूल केलं जात नाही. मांजर आडवं गेलं की अशुभं, सकाळीच झालेलं गायीचं दर्शन शुभं, घुबडाचं दर्शन अशुभं वैगेरे वैगेरे.
मी आज अशाच, परंतू काहीश्या वेगळ्या संकेतांसंबधी आपल्याला सांगणार आहे, आपला विश्वास बसो वा न बसो, हा माझा विषय नाही व तसा दुराग्रहही नाही.
आज महाराष्ट्र राज्याच्या ‘CET’ परिक्षेचा निकाल लागला. खरं तर काल रात्रीच लागलाय तो. इयत्ता बारावी नंतर इंजिनिअरींगला प्रवेश घेण्यासाठी ही महत्वाची प्रवेश परिक्षा असते. आम्ही काल रात्रीपासूनच नेटवर रिझल्ट बघायचा प्रयत्न करत होतो, पण अशा कठिण आणि उत्कंठेच्या वेळी नेहेमी जो अनुभव येतो, तो या वेळीही आला, भंगली ती रिझल्टची वेबसाईटच ओपन होईना. एवढ्यात मला मालवणातून माझ्या एका परिचितांचा फोन आला. त्यांच्या मुलाला सीईटीत १०६ मार्क्स, तर जेईईत २२ मार्क्स मिळाल्याचं त्यांनी सांगीतलं. आता आमची उत्कंठा अधिक वाढली, तर परत तेच, वेबसाईट दाद देईना. त्यात या वेळी रिझल्ट अत्यंत कठीण आल्याची बातम्या आला आणि आमची (म्हणजे बायकोची, पोरगं या बाबतीत स्थितप्रज्ञ आहे व मी बेफिकीर..!) पाचावर धारण बसली.
इथं माझं ज्योतिषास्त्रीय डोकं आपोआप कामाला लागलं. मला ज्योतिष शास्त्रतल्या ‘न्युमराॅलाॅजी’ या शाखेचं प्रचंड आकर्षण आहे. मला का कोण जाणे, पण आकड्यंमधे ( म्हणजे नंबर्स विषयी, ‘आकडा’ म्हटलं की तुमच्या भुवया वर जाऊ शकतात म्हणून स्पष्टीकरण..!) खूप काही दडलेलं आहे असं सापखं वाटतं व अनेकदा ते बरोबरही ठरतं.
त्या परिचितांच्या मुलाला मिळालेले मार्कस अचानक मला काही तरी सुचवायला लागले. त्यांच्या मुलाला जेईईला २२ तर सीईटीत १०६ मार्क्स मिळाल्याचं त्यांनी कळवलं. खरं तर त्यांनी मला तसं मुद्दामहून कळवण्यामागचा त्यांचा उद्देश मला कळला नाही कारण मी त्यांच्याशी आजतागायत पहिल्यांदाच फोन वर बोललो व त्यांना १२वीचा मुलगा आहे हे ही मला माहित नव्हतं, तरी मी त्यांचं अभिनंदन केलं होतं. आता मला त्या मुलाच्य् मार्कांच्या आकड्यातून काही संकेत मिळू लागले. ते आत्ताच का मिळतायत याचं स्पष्टीकरण देणं अवघड आहे, मात्र हा अनुभव मला अनेकदा येतो. त्या क्षणाचं देणं असतं ते. तर, त्या मुलाच्या जेईई व सीईटी मार्कांतला फरक, १०६ वजा २२ म्हणजे ८४ आला. माझ्या मुलाला जेईईत ८१ मार्क्स मिळाले होते. मी हे मार्क्स व परिचिताच्या मुलाच्या दोन मार्कातला ८४ गुणांचा फरक, माझ्या मुलाच्या जेईईच्या मार्कांत मिळवला, तर मला ८१ अधिक ८४ म्हणजे १६४ मार्क्स अंसं उत्तर मिळालं व ते बरोबर असल्याचा कौल माझ्या मनाने दिला व मी बायकोला सांगीतलं, की काळजी करू नकोस, शौनकला किमान १६४ ते १७० मार्क्स मिळतील. निदान १६४ तर मिळतीलच. प्रत्यक्षात १६९ मार्क्स मिळाले.
हे संकेत असतात आणि ते बरोबर ठरतात याचा मला तरी यापूर्वीही कित्येकदा अनुभव आला आहे. हे संकेत त्या त्या वेळीच चटकन काहीतरी सुचवून जातात आणि मग ते त्याच वेळी का सुचले हे नंतर खुप विचार करूनही कळत नाही. हे अनुभवावं लागतं, याचं स्पष्टीकरण देता येत नाही. असे संकेत डिकोड करून मिळालेली उत्तरं, पुढे अगदी १०० टक्के नसली तरी ९९ टक्क्यांपर्यंत बरोबर येतात हा माझा गेल्या कित्येक वर्षांचा अनुभव आहे.
आपल्या संस्कृतीत अशी अनेक गुपितं दडलेली आहेत व त्या सर्वांवर ‘अंधश्रद्धा’ असा कोणाच्या तरी नादाला लागून वा ते काय म्हणतील हा विचार करून सरसकट शिक्का मारणं अन्याय्य आहे.
माझा सिद्ध झालेला अनुभव आपल्याशी शेअर केलाय, माझी यावर अनुभवजन्य ‘श्रद्धा’ आहे, आपण त्याला ‘अंधश्रद्धा’ असं नांव दिलात तरी माझी हरकत नाही..
-नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply