मी अजून शाळेत जावयास लागलो नव्हतो.
त्या वेळी आम्ही वर्ध्याला केळकर वाडीत खळदकर यांचे घरात भाड्याने राहत होतो. नानांनी म्हणजे माझ्या वडिलांनी तेथेच माझ्या हातून पाटीवर श्रीगणेशा गिरवून घेतला. माझ्या दोन मावश्या वर्ध्यालाच राहत होत्या. मोठी ताई मावशी रामनगर येथे तर दुसरी माई मावशी रेल्वे स्टेशन जवळ बोरगावला रहात होत्या. रेल्वेमार्गावरील पूल उतरला की लगेचच काही अंतरावर माई मावशीचे घर होते.
त्यावेळी गावात ये-जा करण्याची मुख्यत: दोनच साधने होती. एक म्हणजे दुचाकी (सायकल) व दुसरे घोड्याने ओढला जाणारा टांगा. कधी कधी दोनचार फटफटी वा मोटारी पहावयास मिळत. माझ्या दोन्ही मावश्यांचे ठरलेले टांगेवाले होते. ताई मावशीचा शंकर टांगेवाला तर माईमावशीचा नत्थु टांगेवाला. आम्हाला देखील सर्वांना कोठे बाहेर जायचे असल्यास या दोघांपैकी एकाला निरोप देत असू.
मला नीट आठवते. तो दिवस मकर संक्रांतीचा होता. माई मावशीच्या नातवाचे म्हणजे आमच्या मालुताईच्या मुलाचे, एक वर्षाच्या प्रकाशचे, बोरन्हाण होत. त्या निमित्य माझी सर्वात धाकटी बहिण मंगल आईच्या खांद्यावर, २ वर्षांची विद्या हाताशी तर ४ वर्षांची बेबी व मी हातात हात घालून माई मावशीकडे नत्थूच्या टांग्यातून सकाळीच गेलो होतो.
तेथेच जेवणे वगैरे आटोपल्यावर दुपारी साधारण चार वाजण्याच्या सुमारास बोर नहाण्याचा कार्यक्रम होता. एक वर्षाच्या प्रकाशला मालुताईने छान छान कपड्यांनी सजवले व हलव्याच्या दागिन्यांनी मढवले होते. मी नवीन सदरा-कोट, अर्धी विजार व डोक्यावर छानशी टोपी घातली होती. बोरनहाण कार्यक्रम सूरु झाला. प्रकाशचे औक्षवण वगैरे धार्मिक विधी नंतर सजवलेल्या लहानग्या प्रकाशच्या डोक्यावर निर् निराळ्या रंगाचा काटेरी हलवा, लिमलेट-चॉकलेट, काजू-किसमिस तसेंच खारीक बदामांचा वर्षाव होउ लागला.
बोर नहाणाच्या निमित्त्याने जमलेले आम्ही मुले तो मेवा भर-भरून लुटत होतो. माझे तर विजारीचे व कोटाचे सर्व खिसे काजुबदाम, किसमिस व चॉकलेट्सनि भरून गेले होते. तेथे जमलेल्या माझ्याच वयाच्या लहान बाल-गोपालांनी नंतर दंगा सुरु केला. खेळत खेळत आम्ही बाहेर अंगणात आलो.
बाहेर नत्थूचा टांगा उभा होता. टांगा चांगला ऐसपैस व सजावटीचा होता. समोरील टांगेवाल्याच्या आसनाच्या दोन्ही बाजूस लाल-काळ्या रंगाचे नक्षीदार, रात्रीचे मार्ग-दर्शक कंदील बसवलेले होते. दोन बाजूला दोन छोटे गोल आरसे. त्याच्या जोडीला बाजूलाच अडकवलेला कमानदार असा लवलवता लांबसडक चाबूक.
टांग्याला जुंपलेला उमदा काळ्या रंगाचा, भरपूर आयाळाचा, डोक्यावर लाल-हिरवा तुरा धरण केलेला आणी दोन्ही डोळ्यांना झापड लावलेला सरळमार्गी देखणा असा हा अबलख वारू, त्या टांग्याची शान वाढवत होता. असा तो दिमाखदार टांगा व एका हाताने लगाम सावरत दुसऱ्या हातात लांब सडक चाबूक घेउन तोंडाने चक चक करणाऱ्या त्या चाबूक-स्वाराचे दृश्य माझ्या मनात आधी पासूनच ठसलेले होते. आपणही एकदा असे चाबूक-स्वार बनून टांगा हाकावा अशी माझी पुष्कळ दिवसांपासूनची सुप्त इच्छा होती.
नत्थु टांगेवाला आजूबाजूला दिसत नव्हता. बहुदा काही कामासाठी बाहेर गेला असावा. ही संधी साधून मी त्या टांग्यात मागच्या बाजूने चढलो. माझ्या पाठोपाठ माझे बाल सवंगडी देखील टांग्यात चढले. मी व माझ्या सोबत बेबी असे आम्ही समोरच्या आसनावर गेलो. बाकीचे सवंगडी मागच्या बाजूस बसले. मी टांगेवाला बनून डाव्या हातात लगाम घेतला व उजव्या हाताने बाजूचा चाबूक उपसला.
घरा बाहेरच्या तक्तपोसावर माझा नऊव्या इयत्तेत शिकत असलेला मावस-भाऊ रमेश दादा बसला होता. मी टांग्यात बसून मोठ्या वीरश्रीने हातात घेतलेला चाबूक व आत बसलेली मुले बघून पुढील प्रसंगाचे गांभीर्य त्याच्या लक्षात आले. तो मोठ्ठ्याने अवि S S अशी हाक मारून माझेकडे धावत निघाला. तो पर्यंत माझा चाबूक त्या घोड्याच्या पाठीवर बरसला होता.
केवळ इशाऱ्यानेच पळणारा तो अश्व पाठीवरच्या त्या अनोळखी फटक्याने कळवळून एकदम उधळला. टांगा खाड-खाड उडत रस्त्यावरून धावू लागला. उधळलेल्या टांग्यावरील या बाल चाबूक स्वारास पाहून रस्त्यावरील लोकांच्या काळजात चर्रर्र होत होते. उरात धडकी भरवणारे हम रस्त्यावरील ते दृश्य बघ्यां मध्ये देखील भिती व काळजी निर्माण करत होते.
रमेशदादा घोड्याला आवरण्यासाठी टांग्याच्या बरोबरीने धावू लागला व समोरच्या बाजूच्या पायरीवरून आत चढण्याचा प्रयत्न करू लागला. आता तो स्वैर-भैर टांगा रेल्वे स्टेशनच्या पुलावर आला होता. रस्त्यातील वाहने व पादचारी उधळलेल्या टांग्याला घाबरून वाट करून देत होते. तो सर्व प्रसंग अनुभवताना माझे अवसान गळाले. मी भेदरून गेलो. माझ्या लहानग्या बेबीने मला घट्ट धरले व भाऊ-भाऊ करून रडू लागली. मागे बसलेल्या माझ्या सोबत्यांनी देखील आकांत केला. त्यांनी टांग्याच्या मिळेल त्या भागाला घट्ट धरून ठेवले.
रमेशदादा कसाबसा टांग्यात चढण्यात यशस्वी झाला व त्याने माझ्या हातातून गळून पडलेला लगाम स्वत: जवळ घेतला व घोड्यास आवरण्याचा प्रयत्न करू लागला पण त्याला देखील धावणारा घोडा आवरत नव्हता. प्रसंग अतिशय गंभीर होता. माझा एकट्याचाच नव्हे तर माझ्याबरोबर माझ्या इतर सवंगड्यांचा जीव देखील धोक्यात आला होता. अशा रितीने आमचे समोर प्रत्यक्ष काळच उभा ठाकला होता पण…
पण वेळ आली नव्हती. त्या लहानग्या निरागस बालकांना संकटात पाहून त्या कनवाळू देवास पाझर फुटला. पुलाच्या दुसऱ्या टोकाकडून विरुध्द बाजूने स्वत: टांग्याचा मालक नत्थुच येत होता. त्याने आमचे सकट स्वत:चाच उधळलेला समोरून येणारा टांगा बघितला आणी हात पसरून तोंडाने चक चक असा परवलीचा आवाज केला. त्या मुक्या इमानदार प्राण्याने, त्याच्या स्वामीने घातलेली साद ऐकली. अन एखाद्या आज्ञाधारक सेवका प्रमाणे तो थोडासा दूर जाऊन नत मस्तक होऊन थांबला.
नत्थुने मग टांग्यावर स्वार होऊन त्या घोड्यास थोपटले आणि टांगा वळवून घेउन आम्हा सर्वांसह माघारी आला.
एव्हाना आमच्या पराक्रमाचा बोभाटा होऊन घरात एकच हा: हा:कार माजला होता. घरातील सर्व मंडळी घरा बाहेर जमून अशुभ समाचारच्या आशंकेने चिंतातूर होऊन आमची वाट पहात उभे होते. आमच्या सकट सुखरूप माघारी परतणारा नत्थूचा टांगा व त्या वरील नत्थूस पाहून त्यांचा जीव भांड्यात पडला व गळालेले अवसान परत आले.
त्या प्रसंगाने माझ्या मावशीचे यजमान गोपाळराव सहस्त्रबुद्धे संतापाने अनावर होऊन थरथरत होते. मी टांग्यातून उडी मारून खाली उतरताच त्यांनी रागाने माझ्या थोबाडीत दिली. घडलेल्या प्रसंगाने मी तर भेदरुनच गेलो होतो. कितीतरी वेळ मग मी गाल चोळत एका बाजूला जाऊन हमसून हमसून रडत होतो. अचानक माझ्या खांद्यावर हात पडल्याने मी चमकून वर बघितले. गोपाळराव साश्रू नजरेने मला पहात होते. त्यांनी मला दोन्ही हातांनी एकदम जवळ ओढले व पोटाशी घेउन थोपटून माझी समजूत काढू लागले.
घोड्यावरून आलेली संक्रांत अशा रितीने टळलेली पाहून माझ्या मावशीने देवापाशी दिवा लावून सगळ्यांना सुखरूप भेटवल्या बद्दल देवाचे आभार मानले.
त्या प्रसंगा नंतर कितीतरी दिवस मी टांग्याचा धसका घेतला होता. .
— अविनाश यशवंत गद्रे
Leave a Reply