नवीन लेखन...

संस्कार

अनेक जन्मानंतर मानवी जन्म मिळतो असे म्हणतात. सृष्टितील सर्व जीवसृष्टित मानवी जन्म हा सर्वश्रेष्ठ बुद्धिजीवी जन्म मानला जातो परमेश्वराने माणसाला विवेकबुद्धी, वाचा, स्मरणशक्ती, श्रद्धा, भक्तिप्रीती, वात्सल्य, जिव्हाळा, निःस्पृहता, निर्मलता, विश्वास, त्याग, कृतज्ञता, नम्रता, परोपकार, साहस अशा अनेक सुसंस्कारी संस्कारशक्ती जन्मताच प्रदान केल्या आहेत.

त्याच संस्करण होण म्हणजे संस्कार!!
संस्कार हे करून होत नाहीत ते घडावे लागतात त्यासाठी जीवनात उत्तम विवेकी सहवास लाभावा लागतो.
जन्मता:च आपल्याला मातृपितृत्वाच्या वात्सल्याचा दैवी स्पर्श होतो ही ईश्वरीय लीला आहे आणि आपले जीवन सुरु होते हे वास्तव आहे. घरात आईवडिल तर बाहेरील जगगात गुरुजन, नातेवाईक,शेजारी, पाजारी, मित्रत्व यांचा नैसर्गिक सहवास लाभतो आणि आपल्याला शिशु, शैशव, बाल्य, पौगण्ड, तारुण्य, ग्रहस्थ, वृद्धत्व ही जीवनावस्था लाभते हे वास्तव आहे.

माझी ९० वर्षाची प्रसन्न वदनी सुंदर अशी सरस्वती नावाची पणजी होती. अगदी तरतरीत पहाटे ३।। लाच उठायची. आकाशाकड़े पाहुन नमस्कार करायची, बाजेवरुन खाली जमिनीवर पाय ठेवताना रोज ‘ पादस्पर्शम क्षमस्वमे ‘ म्हणायची, तळहात चोळून चेहरा उजळून ‘ कराग्रे वसते लक्ष्मी ‘ म्हणायची .

या तिच्या संस्कारी आचरणाने तीचं सारं आयुष्य सर्वार्थानं कृतार्थ झालं..! अगदी निरोगी, निरामय सुखानंदी झालेलं हे मी स्वतः पाहिले आहे. तिची लौकर उठण्याची व तो मंत्र म्हणण्याची सवय आजही मला तिच्याच संस्कारी सहवासामुळे लागली.

तो संस्कारी सहवास मला माझ्या शिशु अवस्थेत लाभला. आजही स्मरतो आहे. हे स्मरणीय, उदात्त अनुभव म्हणजेच संस्कार..!!

आजच्या वास्तव कलियुगात समृद्धी आहे, पण अपेक्षित मन:शांति, समाधान नाही. नाती, मैत्र, प्रेम, आस्था, जिव्हाळा काहीच उरले नाही. माणसातील माणुसपण, आज हरवले आहे. याला कारण एकच संस्कार आणि संस्कृतीचे अध:पतन, ह्रास झालेला आहे. त्यासाठी पारंपारिक संस्कारांचे बीजारोपण सर्वत्र होणे अनिवार्य आहे. मानवी जीवनात संस्कारांच महत्व अनन्य साधारण आहे. जीवनाच्या आदर्श नीतिमुल्यांचा बीजांकुर हा सुसंस्कारातच आहे हे निर्विवाद..!!!

जीवात्म्याच्या गर्भधारणेपासुनच संस्कारांच महत्व आहे. म्हणूनच संस्कारांचे संस्करण होणं ही आपल्या सुखी जीवनातील इतिकर्तव्यता आहे संसारत प्रत्येकाला आपलं कुटुंब, मुलं उत्तम, कर्तुत्वसंपन्न होवून सदैव सुखऐश्वर्यात रहावित असे वाटत असते. आणि असे सुंदर उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी त्या मुलांवर उत्तम संस्कार होणेही गरजेचे असते. पूर्वी हे घडतही असे कारण पूर्वी घरातील वातावरण किंवा सहवास देखील संस्काराला पोषक असा होता.एकत्र कुटुंब पद्धती नांदत होती निश्चिंतता होती.

आजकाल विज्ञानामुळे आकाशात उंच उड़णे, सातासमुद्रापार सहज जाणे सारे जग कवेत घेणे हे आता मानवाला जमले आहे. पण कल्पनेला सहेली बनवून विवेकाच्या वाटाडयाला सोबतीला घेवून जमिनीच्या मातीवर संयमाने तोल सांभाळून चालणे देखील जमणे गरजेचे आहे. त्यासाठीच मात्र उत्तम संस्कारांची आवश्यकता आहे.

भौतिक सुखानं सारं जग आज सुखाधिन समृद्ध झाले आहे. पण माणसातली परस्पर आत्मिक आनंद देणारी ओढ़, आत्मीयता, नाती, प्रेम, वात्सल्य, संवाद पूर्णत्वाने लयास गेल्याचे जाणवते आहे. याचा विचार सर्व सुजाण व्यक्तिन्नी केला पाहिजे.

केवळ संस्कारांच्या कथा, गोष्टी ऐकुन किंवा वाचून संस्कार होत नाहीत. तर संस्कार हे सहवासातूनच घडावे लागतात. त्यासाठी उत्तम सहवास लाभणे महत्वाचे असते. हे सुंदर सत्य आहे. भारतीय संस्कृतीमध्ये सोळा संस्कारांचे महत्व विशद केले आहे. मानवी जीव सर्वार्थाने आदर्शभूत कसा असावा त्या साठी साऱ्या जीवनात संस्कार कोणते असावेत याचे मूल्यमापन या सोळा संस्कारातून केलेले दिसून येते.

कुठलीही व्यक्ती कधीही घाणीच्या साम्रज्यात राहू इच्छित नाही. तिला सुंदर मोहक वातारणात, सुखात रहायला आवडते हा मानवी स्वभाव प्रकृती आहे. मग अशावेळी सर्वच दुर्गुणांचा तसेच दुष्प्रवृत्तीचा समूळ त्याग करून फक्त सगुण सदगुणांची कास धरणे हे उत्तम संस्कारांचे कल्याणकारी लक्षण आहे. द्योतक आहे. आणि असे उदात्त जीवन उत्तम सुसंस्कारित सहवासातूनच लाभते.

याचे उदाहरण देताना……
गुरुवर्य डॉ. न.म.जोशी सरांनी एका कार्यक्रमात सांगितलेली एक गोष्ट सांगून मी हा लेखांक थांबवीत आहे. एका गावात, एका मोठ्या वाड्यात एक सद्गृहस्थ रहात होते. आपल्या घरातील देवपूजा ते रोज करत असत. रोज प्रात:काळी उठायचे . स्नानग्रहात जाताना वाड्याच्याच अंगणात असलेल्या बागेतील फुले काढून आणण्यासाठी सुंदर फुलांची परडी घेवून जात असत.

शुचिर्भूत स्नान झाले की त्या परडीत पत्री, फुले,बेल, तुळस गोळा करून आपल्या वाडयातील माजघरात असलेल्या देवघरात येवून यथासांग मनोभावे देवपूजा करीत असत. ही त्यांची श्रद्धेय दिनचर्याच होती.पण एक दिवस ते अनावधानाने ते नित्याची फुलांची परडी घेवून जाण्यास विसरतात. वयस्कर असल्यामुळे पुन्हा स्नानगृहातून माजघरापर्यंत परत येवून ती फुलांची परडी घेवून येण्याचा कंटाळा करतात. पर्याय म्हणून नेहमी प्रमाणे स्नान झाल्यावर आपल्या अंगावरच्या उपरण्याचा सोगा करून त्यातच फुले, पत्री वगैरे गोळा करतात माजघरात देव्हाऱ्यापाशी येतात नेहमी प्रमाणे यथासांग पूजाही करतात. एव्हड्यात त्यांचे एक परमस्नेही घरात त्यांना भेटावयास येतात. ते मित्र दिवाणखान्यात बसलेले असतात. त्यांना सुंदर सुगंध येत असतो. तिथुनच ते त्यांच्या मित्राला विचारतात ” अरे दत्ता केवढा सुंदर सुवास येतो आहे अरे कुठले अत्तर तू लावलेले आहेस ?

तेंव्हा दत्तोपंत म्हणतात नाही रे बाबा मी कुठलेच अत्तर लावलेले नाही. पण अरे मी आज सकाळी आंघोळीला जाताना फुलांची परडी नेण्यास विसरलो होतो. म्हणून आज या उपरण्यातच फुले गोळा करून आणली . त्या पारिजात, गुलाब, चाफा, मोगरा, बकूळ फुलांचाच सुगंध या उपरण्याला येतो आहे, मीही आज मोहरुन गेलो आहे………
मित्रहो, त्या उपरण्यात काही क्षण फुले गोळा झाली तर त्या फुलांचा सहवास त्या उपरण्याला लागला आणि *ते उपरणं सुगंधित झालं !!!

सात्विक गंधित संस्कार त्या उपरण्यावर झाला. तेंव्हा जीवनात तुम्हाला लाभलेल्या सुंदर, विवेकी निर्मोही, निष्पाप, प्रेमळ, आणि वात्सल्यपूर्ण सहवासाचा संस्कार तुमचं जीवन सर्वार्थाने सुंदर कृतार्थ करीत असतो. म्हणून विवेकी, वैचारिक उत्तम सहवासात राहण्याचा प्रयतन मनुष्याने करावा.

हे मात्र खरं.!!
असा सहवास लाभणं देखील एक दैवयोग असतो
हेच संस्कारांचे महत्व आहे….
इति लेखन सीमा

– वि.ग.सातपुते. (साहित्यिक)

अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे

दिनांक : २५-७-२०२२

Avatar
About विलास सातपुते 459 Articles
मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..