भारतीय संस्कृतीनं जीवनाच्या सर्व अंगांचा विचार केला आहे. हा विचार करताना या संस्कृतीचे पाय सदैव जमिनीवर राहिले आणि म्हणूनच ‘ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या’ । असा संपूर्ण विरक्तीचा विचार या संस्कृतीनं दिला असला तरी त्या परब्रह्मापर्यंत पोहोचण्यासाठी जीवनाचा, जीवनातल्या सुख-सुविधांचा तिरस्कार तिनं शिकवला नाही. माणसाच्या ऐहिक गरजा, त्या पूर्ण करण्यासाठी लागणारं वैभव या साऱ्यांची तिला जाण आहे व म्हणूनच ‘अभ्युदय’ आणि ‘निःश्रेयस ‘ असे जीवनाचे दोन्ही भाग तिनं गौरवले आहेत.
सर्व ऐहिक गरजा जास्तीजास्त चांगल्या तऱ्हेनं तृप्त होणं, संसारातलं समाधान, ऐश्वर्य, वंशवृद्धी, यश, कीर्ती या साऱ्याला ‘अभ्युदय’ म्हटलं जातं, तर षड्रिपूंपासून मुक्त होऊन सर्व वासनांचं दमन होऊन मोक्षप्राप्ती होणं म्हणजे निःश्रेयस. या दोन्ही गोष्टींना तिनं समान महत्त्व दिलं.पुरुषार्थ करून वैभव मिळवत असतानाच हे वैभव, हा अभ्युदय हे काही जीवनाचं अंतिम ध्येय नाही. जीवन चांगल्या तऱ्हेनं घालवण्याचं ते साधन आहे. जीवनाची खरी कृतार्थता निःश्रेयसाच्या प्राप्तीत आहे याचं भान इथे फार पूर्वी जोपासलं जायचं. म्हणूनच वैभव मिळवताना ते चांगल्या मार्गानं मिळवणं, त्याबद्दल वृथा गर्व न करणं आणि वैभवाच्या आहारी न जाणं हे महत्त्वाचं मानलं जायचं.
पैसा माणसाच्या हातात असायचा. माणूस पैशाच्या हातात सहसा जायचा नाही.
जीवनातलं पैशाचं, समृद्धीचं महत्त्व किती मर्यादिपर्यंत आहे याची जाणीव माणसांना होती. आज मात्र ऐहिक प्रगतीचं एक एक नवं पाऊल उचलत असतानाच माणूस अधिकाधिक स्वार्थी, संकुचित आणि सामान्य वैचारिक कुवतीचा होताना दिसतो. याचं कारण निःश्रेयसाचं विस्मरण हेच तर नसावं? केवळ नि:श्रेयसाच्या मागे लागून स्वतःच्या ऐहिक जीवनाकडे दुर्लक्ष करणारा समाजही प्रगती करू शकत नाही. दारिद्रय, उपासमार, अज्ञान आणि बुभुक्षितता यांनी ग्रस्त समाज भूषणावह निश्चित नसतो. अशा वेळी अभ्युदय आणि त्यासाठी
कष्टाची तयारी यांचं महत्त्व समजून सांगावं लागतं. स्वतःची संस्कृती, स्वत:च्या विचारांचा, तत्त्वांचा, आदर्शाचा वारसा यांची जपणूक करायची तर समाज आर्थिकदृष्ट्या आणि प्रसंगी शस्त्रास्त्रांच्या दृष्टीनंही समृद्ध हवा. दुर्बळ, दीन समाज परतंत्र होण्याची शक्यता खूप असते आणि पारतंत्र्यामध्ये स्वतःच्या विचारांचं, संस्कृतीचं संरक्षण शक्य नसतं. काहीशी अशीच अवस्था असलेल्या समाजाला रामदास, तुकारामादि संतांनी ‘आधी प्रपंच करावा नेटका’ किंवा ‘जोडुनिया धन उत्तम व्यवहारे – उदास विचार वेच करी’ असा अभ्युदयाचा मार्ग सांगितला.
पण फक्त अभ्युदयाच्याच मागे लागलेला नैतिकदृष्ट्या स्खलनशील होऊ शकतो. ‘पैसा’ हेच ज्या समाजाचं अंतिम ध्येय आहे त्याला चांगल्या वाईटाची चाड राहात नाही. साधनशुचिता संपते. अतिहव्यासापोटी दुसऱ्याचं हिसकावून घेणं, ज्याच्याकडे पैसा आहे त्यांची एकतर लाचारी पत्करणं किंवा त्यांचा द्वेष, मत्सर करणं हे निर्माण होतं. स्पर्धा जीवघेणी बनत जाते आणि मानसिक स्वास्थ्य, शांती, समाधान हरवून जातं. अशा वेळी निःश्रेयसाचं महत्त्व मान्य करावं लागतं.
याचसाठी भारतीय संस्कृतीनं संपत्ती मिळवताना आणि तिचा उपभोग घेताना मनानं निष्काम, अलिप्त राहायला शिकवलं. ऐश्वर्याचा झगमगाट भोगताना हे सारं क्षणभंगुर आहे, गंमत म्हणून भोगायला ठीक आहे, पण मौल्यवान जीवन केवळ याच्याच मागे गमवावं इतक्या मोलाचं नाही. याहीपेक्षा मिळवण्यासारखं दुसरं काही जगात असतं हे सांगितलं. थोडक्यात अभ्युदय आणि निःश्रेयस यांची सुरेख सांगड घातली. यामुळं माणूस तृप्त ऐहिक जीवन जगत असतानाही त्याची धाव दिव्य आनंदाकडे जाते आणि तो मिळवण्यासाठी त्याग, प्रेम, सेवा, करुणा अशा सद्गुणांची तो जोपासना करतो, विचारांनी हिमालयाची उंची गाठतो आणि ऐश्वर्यात राहूनही उंबरातल्या किड्याप्रमाणे फक्त त्याच्यातच वळवळ करीत नाही.
पण आज मात्र पैसा हे सुखाचं साधन आहे, जीवनाचं साध्य नव्हे, हे विसरलं जातंय. संपत्ती तर ऋषींमुनींनीही वेगवेगळ्या प्रार्थनांमधून मागितली. आपल्या वैदिक प्रार्थना याची साक्ष देतील. धन, धान्य, दूध-दुभतं, सत्ता, साम्राज्य या साऱ्यांची मागणी त्यात आहे. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र हे त्यांचे अभ्यासाचे विषय होते. पण त्यांचं मागणं संकुचित नसे. वैदिककाळात नसलेला साधा सत्यनारायणाच्या पूजेचा संकल्प जरी विचारात घेतला तरी हे लक्षात येतं. घरातले फक्त कुटुंबीयच नव्हते, तर नोकरचाकर, द्विपाद – चतुष्पाद प्राणी या साऱ्यांच्या सुखाची प्रार्थना त्यात केली आहे.
आज पैशाच्या शोधात माणूस माणसापासून दुरावत चाललाय. पैशाच्या मागे उर फुटेतो धावताना आपल्याला एकमेकांसाठी द्यायला वेळ नाही. एकमेकांच्या सुख-दुःखाबद्दल आपण तटस्थ असतो. माणसाचं मोल त्याच्या अंतरंगावरून, संस्कारांवरून नाही, तर त्याच्या उंची कपड्यांवरून आणि चकचकीत दागिन्यांवरून ठरू लागलं आहे. या साऱ्याचं ‘बालिश’ प्रदर्शन म्हणजे प्रतिष्ठा मानली जाते.
सख्ख्या नातेवाईकांच्या जिव्हाळ्यातही सांपत्तिक स्थिती एक अदृश्य भिंत बनून उभी राहते. या ‘वरलिया रंगा’ला भुलून आपलं जीवन वरून कितीही सजवलं, नटवलं तरी आतून केवढं पोकळ, किती उथळ बनत चाललंय ! चांगल्या मार्गानं मिळवलेला पैसा माणसाला सुखाची झोप देतो. आता मात्र नीतीमत्तेला, सुसंस्कारांना मध्यमवर्गीय मनोवृत्ती मानून तुच्छ लेखण्याची पद्धत पडत चालली आहे आणि म्हणूनच उंची गाद्यागिर्यांच्या घरात झोपेच्या गोळ्यांचा खपही वाढत चाललाय. संपत्तीची आत्यंतिक अभिलाषा माणसाकडून काय काय करवून घेते? माणसाचा पाठीचा कणा ती मोडून टाकते. पैसा असलेल्या व्यक्तीपुढे माणसं लाचार होतात. त्याची हांजी हांजी करतात तेव्हा कडक इस्त्रीच्या सुटाबुटात असली तरी ती कशी भिकाऱ्यासारखी केविलवाणी दिसतात आणि हीच माणसं आपल्यापेक्षा गरीब असलेल्या व्यक्तीला तुच्छतेनं वागवतात तेव्हा त्यांच्या विचारशक्तीची दया येते ! या साऱ्यांतून माणसातला ‘माणूस’ जपून ठेवण्यासाठी आपली संस्कृती संपत्तीकडे फक्त ‘साधन’ म्हणून पाहायला शिकवते. माणसानं मिळवलेली संपत्ती इथेच ठेवून त्याला जावं लागतं. पण त्याच्याबरोबर येतं ते मात्र त्यानं निष्काम भावनेनं केलेलं सत्कर्म हे सत्कर्मच त्याला निःश्रेयसाची प्राप्ती करून देत असतं आणि निःश्रेयस हे जीवनाचं अंतिम ध्येय आहे, ही जाणीव माणसाला उन्मत्त होऊ देत नाही.
‘यत् सुखम् साधनाधीन तत् सुखं दुःखमेवहि ।’ हे आपल्याला ही संस्कृती सांगते. जे सुख साधनाच्या अधीन आहे ते दुःखदायकच आहे आणि हेच खरं नाही का? वस्तूमुळं मिळणारा आनंद ती वस्तू मोडली, तुटली, चोरीला गेली की संपून जातो. उलट वस्तू गेल्याचं दुःख मात्र वाट्याला येतं. याउलट आध्यात्मिक आनंदासाठी माणसाला कशावरही अवलंबून राहावं लागत नाही. तो त्याचा आनंद कुणी हिरावून घेऊ शकत नाही. जी शांती, जो आनंद, सुख माणूस शोधतो आहे, तो केवळ अभ्युदयात केवळ संपत्तीच्या हव्यासात आणि प्रदर्शनात
नाही, तर उच्च विचारात आहे. आजच्या उपभोगवादी संस्कृतीतही हे विचार खरं तर कालबाह्य नाहीत. गरज आहे ती क्षणभर अंतर्मुख होण्याची ! प्रश्न फक्त एवढाच आहे, त्यासाठी स्वत:च्याच संस्कृतीकडे तुच्छतेनं पाहण्याची वृत्ती आपण विसरणार आहोत का?
Leave a Reply