इसवीसनाच्या पूर्वी तीन हजार मध्ये लिहिलेल्या ऋग्वेदामध्ये सारी या वस्त्राचा उल्लेख सर्वप्रथम आढळतो. याचा अर्थ सारी ही त्याही पूर्वी अनेक वर्षे वापरली जात असावी.
प्रत्यक्ष सारी वापराचे पुरावे उत्खननात सापडलेल्या इसवीसना पूर्वी अठ्ठावीसशे वर्षांपूर्वीच्या शहरांमधून सापडलेले आहेत.
अजिंठाच्या गुंफांमध्ये सारीचे असंख्य प्रकार आणि नक्षी बघायला मिळते.
काळाच्या निरनिराळ्या ओघांमध्ये झालेली ही पेंटिंग्ज म्हणजे भारताचा कलात्मक आणि सामाजिक इतिहासच आहे.
इसवीसन पूर्व हजार दोन हजार वर्षांपूर्वीच्या स्त्रिया दर्शवताना त्यांच्या अंगावर अधरीय आणि उत्तरीय अशा दोन साऱ्या बघायला मिळतात.
त्यातील उत्तरीय हे स्त्रीच्या इच्छेनुरूप वापरले जात असल्याचे दिसून येते.
अधरियाची सारी लांबीला जास्तीची घेतली की ती उत्तरियाचे पण काम करीत असल्याचे काही चित्रांमधून स्पष्ट दिसते. त्याही काळात परिचारिका होत्या आणि त्यांनी पांढरी साडी नेसण्याची परंपरा होती.
अधरियातली साडी नेसण्याची पद्धती बघितली तर ती दोन्ही पायांना लपेटून निऱ्या खोचून बांधण्याची प्रथा असल्याचे लक्षात येते. याचीच पुढे नऊवारी साडी झालेली असावी.
सुप्रसिद्ध चित्रकार राजा रविवर्मा यांच्या बहुतांशी चित्रांमध्ये स्त्री नऊवारी साडी नेसलेली असल्याचे दिसून येते. स्त्रीच्या निरनिराळ्या भावमुद्रा आणि शरीरसौष्ठव नऊवारी साडीतच उत्कृष्ठपणे दर्शवता येते असे त्यांचे म्हणणे होते.
अधरीय आणि उत्तरियाच्या सारीचे काळाच्या ओघात वन पिस झाल्याचे लक्षात येते.
गेल्या वीस पंचवीस वर्षात असेच साडी आणि ब्लाउजपीसचे वन पीस झाले आहे.
मॅचिंग उत्तरीय ऐनवेळेस सापडले नाही, त्यामुळे देवयानीला कचा समोर जाण्याची खूप लाज वाटली.
किंवा शकुंतलेच्या उत्तरीय आणि अधरियावरचे पूरक चित्र आणि नक्षीकाम बघून राजा शंतनू तिच्याकडे कधी आकर्षित झाला, हे त्याचे त्यालाच कळले नाही.
रामायणात सीतेने रामाला सुवर्णमृग आणून द्यायला सांगितला होता, यावरून रामायण काळातल्या स्त्रिया अद्यापही हरिणाजीन किंवा व्याघ्र जीन वापरत असाव्यात.
पाचवारी साडी आल्यावर ज्या प्रमाणे जुनी नऊवारी खोडं त्याला नावं ठेवीत असत, कसं ते पाचवारी नसतात बाई, लाज सोडल्या सारखं, मी एकदाच नेसली, मला एवढं मोकळं मोकळं वाटलं, म्हटलं परत नेसायची नाही म्हणजे नाही!
त्याच प्रमाणे तत्कालीन जंगल क्वीनस् एकमेकींच्यात बोलत असतील, कसं ते सुती फडकं नेसवतं? शी बाबा, नुसतं पातळ पातळ, मला बाई किमान हरिणाचं कातडं तरी लागतंच. मध्यंतरी आमच्या यांनी वाघ मारला होता, तेव्हा चांगलं पाच वर्षे अंगभर कपडे घालून फिरत होते, मध्यंतरी ते धुवून वळायला घातलं आणि चोरीलाच गेलं!
आता मला अंगभर कपडे घालायची सवय झाली आहे ना! पण मी सरळ सांगितलं, काहिही झालं तरी मी ते पातळ नेसणार नाही म्हणजे नाही!
मग काय केलं?
मग आमच्या यांनी रानातली एक म्हैसच कापली, आणि दिली मला नेसायला. थोडं जाड वाटतं, पण ठीक आहे! आता कसं बरं वाटतं.
उत्तर भारतामध्ये, हे अधरीय सलवार बनल्याचे आणि उत्तरीय ओढणी बनल्याचे दिसून येते. तर दक्षिण भारतात जाताना साडी घागऱ्या सारखं रूप घेऊन गेलेली दिसते. तीच पुढे महाराष्ट्रात पाचवारी बनून आली.
महाराष्ट्रात ती नऊवारी होऊन आली तर आसाम मध्ये ती सारी आणि ब्लाउज वेगळा घेऊन गेली.
प्रत्येक प्रदेशातील हवामानाप्रमाणे सारी आपली रूपं बदलत गेली.
वास्तविक ओरिजिनली पुरुषांचे धोतर आणि स्त्रियांची सारी एवढी दोनच वस्त्रे असावीत.
कधीकधी राजप्रासादातून अर्जंट बोलावणे आले तर शंतनू प्रियांवदेला विचारत असेल, प्रिये, माझं धूत वस्त्र दे.
नाथ, तुमचं धूत वस्त्र नुकतंच वाळत घातलं आहे, तुम्ही कुडकूड करू लागाल, पेक्षा माझी सारी धूत आहे, स्वच्छ नारिंगी रंगाची साडी तुम्ही धोतर म्हणून घातलीत तर माझ्या साडीला राजदरबार बघावयास मिळेल आणि महाराजही त्या रंगावर प्रसन्न होऊन आपणास अधिकच्या मुद्रा देतील.
असे सुख संवाद होतही असतील.
शिंप्यांनी आपले धंदे वाढविण्यासाठी हे सेपरेट जेंडरच्या सेपरेट कपड्यांचे फॅड आणले असावे.
शिंप्याच्या नादी न लागता अजूनही अनेक स्त्रियांच्या आवडीची, सहा सात हजार वर्षे जुनी असलेली फॅशन म्हणजे साडी आहे.
शिंप्यांनी विणकरांशी संधान बांधून त्यावर नाजूक चित्रं जरी काम बुट्ट्या मोर अशी असंख्य डिझाईन बनविण्याचे त्यांना सांगितले असावे, त्यामुळे पुरुषाच्या एखाद्या कोट आणि सूटच्या शिलाई पेक्ष्या जास्तीची शिलाई जाळी लावणे आणि फॉल पिको करण्याला पडू लागली आहे, हा शिंप्यांचा कावा आहे.
वास्तविक शिंप्यांचा आणि साडीचा बारीक सुईच्या नाका एवढा सुद्धा संबंध नाही.
मूळच्या साध्या सुध्या सुती धाग्यापासून लवकरात लवकर विणून होणाऱ्या या वस्त्रालंकाराला हुषार विणकरांनी महागडं बनवलं.
साडीवर सुवर्णमृगाची शिकार करणाऱ्या रामाचा प्रसंग वीण, नाहीतर निरनिराळ्या फुलांचे काठ आणि पदर वीण, त्यात रंगकाम कर क्रोशा वर्क कर असे उद्योग करून विणकरांनी समस्त पुरुष जमातीच्या खिशाला भोकं पाडून ठेवली आहेत आणि तो धोतर नेसणारा असेल तर त्याचा काष्टा ढिला करून ठेवला आहे.
इसवीसनाच्या पाचव्या शतकांत चीन मधून सिल्क यायला लागल्यानंतर तर साडीची अलंकारिणी झाली.
सोनेरी रेशमाची साडी त्यावर लालचुटुक रंगाची बुट्टी, त्याला हिरवे लाल नक्षीदार काठ. या रेशमी साडीकडे बघताना नजर हटत नाही आणि साडीच्या आतल्या ऐवजाचा भलताच गैरसमज होऊन बसतो.
पूर्वी ठीक होतं, शारदा सौदामिनीला सांगायची, अगं सौदामिने (इकारांती स्त्रीलिंगी प्रथम वचनी संबोधन मिने, मिनू, मिनूली, असे शब्द आधुनिक काळात चालवले जातात, गिर्वाण भाषा आजकालच्या सुंदऱ्यांना समजत नाही) बाणभट्ट माझ्यावर भलतेच लट्टू झालेत गे, आज सकाळ पासून! ते सारखेच बघत आहेत माझ्याकडे!!
सखे ते तुला कसे गे कळले?
जा बाई मिने, तू असे शब्दांचे पेच नाही बाई घालायचे!!
आजची शारदा तो बघतोय म्हटल्यावर काय ऐकून घेईल होय?
जाऊ देत त्या जुन्या नाजूक प्रेम कथा जुन्या साड्यांबरोबरच बोहरणीला दिल्या गेल्या त्याचे स्टीलचे जेवणाचे डबे सुद्धा झाले.
यादव राजांनी खास राजस्त्रीयांसाठी सोनं आणि चांदीचे धागे विणून जरीच्या साड्या बनवून घेतल्या आणि त्या महाराष्ट्राच्या पैठण्या म्हणून जगभर मिरवू लागल्या.
कलावंतांच्या कलेला पूर्णपणे न्याय देऊ शकणारं जगातील एकमेव वस्त्र म्हणजे साडी.
यंत्रयुगात जॉर्जेट नायलॉन पॉलिईस्टर वगैरे अगदी स्वस्त आणि परवडणाऱ्या साड्या आल्या आणि साडी पुन्हा एकदा गरिबांचे वस्त्र म्हणून मिरवू लागली.
रंगांच्या छापाने त्या साड्यांमध्ये मजा आणली. रंग विटला की साडी रंगवून नवी करून आणायची सोय झाली.
नेसायला जरासा अवघड आणि सांभाळायला बोजड प्रकार असला तरी साडीचा थाट मात्र राजेशाहीच असतो.
साडी नेसून चालताना कोणत्याही स्त्रीच्या चालीमध्ये विश्वसुंदरीचा ग्रेस असतो.
राम आधुनिक युगात झाला असता तर सीतेला म्हटला असता, शिते हे हरीणा जीन जाउंदेत, मी तुला फर्स्ट क्लास लक्ष्मीरोड वरून चमचम करणारी टिकल्या लावलेली आणि अशी बांधणी केल्याने चुरली गेलेली लई भारी साडी आणून देतो, कुठं या हरणाच्या नादी लागतेस?
मग रामायणच झालं नसतं.
तसं ते आजही होत नाही.
आजकाल बायका त्यांना कंटाळा आलेल्या साड्यांचे शर्ट बनवून ते नवऱ्याला घालायला देतात, असे ऐकून आहे! ते खरे का खोटे ते देवच जाणे.
कदाचित यानंतर साडीच्या एका बाजूला जसा ब्लाउजपीस जोडलेला असतो तसा दुसऱ्या बाजूला शर्टपीस सुद्धा जोडून येईल यात शंका नाही.
विजोड जोड्यांचे सूत जुळवून संसार विणून देण्याचा तो एक प्रयत्न म्हणून पहावा लागेल.
सारी डे च्या सगळ्यांना गोधडीभर शुभेच्छा.
–विनय भालेराव.
Leave a Reply