नवीन मालिकेत संस्कृत साहित्यातील काही नाटकांच्या, काव्यातील किंवा गद्यातील कथा सांगणार आहे.
ह्यापूर्वी मी मृच्छकटिक नाटकाची कथा आपल्याला सादर केली होती.
संस्कृत साहित्य म्हटल्यावर नेहमीच पहिले नांव कालिदासाचे येते.
“पुरा कविनां गणनाप्रसंगे कनिष्ठीकाधिष्टीत कालिदास:। ततस्तत्तुल्यकवेर्भावात् अनामिका सार्थवती बभूव॥
पूर्वी श्रेष्ठ कवींची गणना करतांना करंगळीवर प्रथम कालिदासाचे नांव घेतले.
मग त्या तोडीचा कवी न मिळाल्याने अनामिका हे नाव (डावीकडून दुसऱ्या बोटाचं) सार्थ झालं.
अशी त्याची महती.
त्यांत जर्मन विद्वान गटेने “शाकुंतल” वाचले (जर्मन भाषेतील) तेव्हां तो तें डोक्यावर घेऊन नाचला.
नाटकाचं नांव आहे “अभिज्ञानशाकुंतलम्” अभिज्ञानचा अर्थ “ज्ञात होणे, ओळख होणे, इंग्रजीत रेकग्निशन”.
शकुंतलेची कथा ही महाभारतांत येते.
त्या कथेवरच हे नाटक आहे.
शकुंतलेची कथा सर्वांना सुपरिचित असली तरीही हे नाटक सोडून आपण पुढे जाऊ शकत नाही.
मराठीत ह्या कथेवर चार नाटके झाली आहेत.
१. मराठी शाकुंतल (लक्ष्मण लेले),
२. महाराष्ट्र शाकुंतल (केशव गोडबोले),
३. मौजेच्या चार घटिका (महादेव चिमणाजी आपटे) आणि
४. शाकुंतल (कृष्णशास्त्री राजवाडे)
नाटकाची सुरूवात नांदीने होते.
नटी आणि सूत्रधार आपल्या संवादात रंगमंच, विद्वान आणि रसिक प्रेक्षक, तयारी, अभिनय, इ. बद्दल बोलून वातावरण निर्मिती करून नाटकाचे नांव सांगतात.
शेवटी महाराज दुष्यंत वनांत शिकारीला आलेत, ते इकडेच येताहेत, असा उल्लेख करून जातात.
राजा दुष्यंत प्रवेश करतो.
शिकारीला आलेला राजा चुकून कण्व ऋषींच्या आश्रमाभोवतीच्या उपवनांत पोंचलेला असतो.
मुनींचे शिष्य तिथे शिकार करायला मनाई आहे, असे सांगतात.
राजा क्षमा मागतो.
ऋषी तेव्हां यात्रेवर गेलेले असतात.
कण्व ऋषींची मानलेली कन्या शकुंतला आपल्या सख्यांसह त्याला तिथे भेटते.
प्रथमदर्शनीच दोघे प्रेमांत पडतात.
शकुंतला ही विश्वामित्र व त्यांचा तपोभंग करणारी अप्सरा मेनका यांची मुलगी असते पण मेनका तिला रानांत सोडून स्वर्गलोकी निघून जाते आणि विश्वामित्र तपश्चर्या पूर्ण करायला निघून जातात.
रानांत शकुंत पक्षी तिचा सांभाळ करतात.
पुढे ती कण्व मुनींच्या शिष्यांना सांपडते.
कण्व ऋषी तिला आपली मुलगी मानून तिचा सांभाळ करतात.
राजा दुष्यंत आपल्या सैनिकांना परत पाठवून कांही काळ आश्रमांतच रहायचं ठरवतो.
त्या वास्तव्यांत त्यांच प्रेम फुलतं.
शकुंतला राजाला कमळाच्या पानावर प्रेम-पत्र लिहिते.
दोघेही मीलनोत्सुक असतात.
शकुंतला आणि तिच्या सख्या ह्यांच्या संवादातून तिची तर त्याच्या स्वगतांमधून ती दोघं कशी प्रेमविव्हल असतात, हे फार सुंदर पध्दतीने दाखवलं आहे.
मग दोघांचा गांधर्व-विवाह होतो.
त्यानंतर कांही दिवसांनी राजा दुष्यंताला बोलावण्यासाठी दूत येतात व राजकारभार खोळंबल्याचे सांगतात.
राजा लगेच परत जातो.
जातांना राजा आपली अंगठी शकुंतलेला खूण म्हणून देतो.
कण्व ऋषी आल्यावर शकुंतला राजाकडे जाणार असते.
दुष्यंत परत गेल्यानंतर एकदा आश्रमांत दुर्वास ऋषी येतात.
शकुंतला आपल्या पतीच्या म्हणजेच दुष्यंत राजाच्या विचारांत गढलेली असते.
तिला दुर्वास ऋषी आल्याचे कळत नाही.
ती त्यांचे यथोचित स्वागत करत नाही.
तेव्हा कोपिष्ट दुर्वास ऋषी तिला शाप देतात, “हे कन्ये, तू ज्याच्या विचारात गढली आहेस, तोच तुला विसरेल, तुला ओळखणार नाही.”
तिच्या सख्या त्यांच्या पाया पडून त्यांना परत बोलावतात पण ते परत येत नाहीत.
शकुंतलेची सखी अनुसूया तिच्या वतीने त्यांची माफी मागते.
ती म्हणते, “तिने ह्यापूर्वी केलेला आपला आदर सत्कार लक्षांत घेऊन तिला माफ करा.”
तेव्हा ते म्हणतात, “माझा शाप खोटा होणार नाही पण मी उ:शाप देतो की तिने जर त्याला आठवण होईल अशी खूणेची वस्तू दाखवली तर त्याला लगेच आठवण होईल.”
शकुंतलाच्या सख्यांना राजाने अंगठी दिलेली माहित असते म्हणून त्या नि:शंक होतात.
हा सर्व प्रसंग फक्त अनुसूया आणि प्रियंवदा ह्यांच्या संवादातून प्रेक्षकांना समजतो.
दुर्वासांची शापवाणी पडद्यामागून फक्त ऐकू येते.
कण्व ऋषी आश्रमांत आल्यावर त्यांना शकुंतलेच्या विवाहाची बातमी कळते.
ते म्हणतात की आपल्या कन्येचा विवाह चांगल्या वराबरोबर व्हावा, यापेक्षा अधिक पित्याला काय हवं असतं ?
त्यांना आनंद होतो.
बरोबरच आता लाडक्या कन्येचा वियोग होणार म्हणून दु:ख होते.
एक पिता कन्येची सासरी पाठवणी करतांना किती कातर होतो व काय उपदेश करतो, हे सांगणारे कालिदासाचे चार श्लोक संस्कृत साहित्यात सर्वोत्तम मानले जातात.
निरोप घेतांना केवळ शकुंतलाच दु:खी नसते तर आसपासचे वृक्ष, वेली, सारा निसर्गच व्याकुळ झाल्याचे वर्णन कण्व ऋषींच्या सुंदर शब्दात केले आहे.
अत्यंत जड अंत:करणाने शकुंतला जायला निघते.
तिच्या बरोबर तिला राजाकडे पोहोचवायला गौतमी आणि दोन आश्रमवासीही निघतात.
त्यानंतरच्या अंकात राजा व विदूषकाच्या संवादात राजाची कर्तव्ये, वेळ आणि मनोरंजन, इ ची चर्चा चालू असते.
राजाला नेहमी सजग आणि कर्तव्यदक्ष रहावं लागतं.
चुकीच वर्तन करून चालत नाही, असं बोलत असतानाच, गौतमी आणि दोन आश्रमवासी शकुंतलेला घेऊन येतात.
त्यांना रक्षक आंत सोडायलाही तयार नसतात.
ते आंत येताच दुष्यंत राजा शकुंतलेला पहातो पण ओळखत नाही.
गौतमी आणि दोघे आश्रमवासी परोपरीने विनवतात.
शकुंतलेला हीच भीती वाटत असते.
ती स्वत: राजाला बोलू लागते.
त्याला आठवण करून देण्यासाठी वेगवेगळे प्रसंग, अगदी एकांतातील प्रसंगही सांगते पण राजाला कांहीच आठवण होत नाही.
राजा मनांत म्हणतो, “ही स्त्री खरोखरच खूप सुंदर, मनमोहक आहे पण मी जर तिच्या खोट्या हक्काचा फायदा घेतला तर लोक मला “लोभी” म्हणतील.”
राजा तिचा स्वीकार करायला ठाम नकार देतो.
त्याला कांहीच आठवत नसतं.
शकुंतलेला अंगठीची आठवण होते आणि ती म्हणते, “थांब, माझ्या बोटांतील तुझी राजमुद्रा कोरलेली तुझी अंगठीच तुला दाखवते.”
राजा म्हणतो, “हां, हे ठीक राहिलं.”
शकुंतला बोटांतून अंगठी काढायला पहाते आणि तिला जाणीव होते की बोटात अंगठीच नाही.
गौतमी तिला म्हणते, “आपण येतांना वाटेत गंगास्नान केलं, तेव्हां तुझ्या बोटांतून ती निसटली असावी.“
शकुंतला खूप दु:खी होते.
आपल्या दैवाला दोष देते.
राजा म्हणतो, “पहा, हे तुमचे सगळे खोटे आहे, हे सिध्द झाले.
तुम्ही ह्या स्त्रीला येथून घेऊन जा.”
सुरूवातीला विनवण्या करणारे आश्रमवासी त्याचा उग्र शब्दात धिक्कार करतात.
गौतमी म्हणते की तुम्ही धनवान आणि बलवान असेच वागतां.
स्त्रीच्या दुर्बलतेचा फायदा घेता.
त्यावेळचे तुझे आश्रमांतील वागणे कसे होते आणि आता कसे आहे.
तू सरळ सरळ आपली जबाबदारी नाकारतो आहेस.
दोघे आश्रमवासीही राजाची निंदा करतात.
कण्व मुनींना हे कळेल तेव्हा त्या वयस्कर ऋषींना किती वाईट वाटेल, त्याचा तरी विचार कर म्हणतात.
मग ते म्हणतात, “आम्ही तर हिला आश्रमांत परत नेणार नाही.
तू प्रजेचा पालनकर्ता आहेस.
तिला आम्ही इथेच सोडून जाणार.”
ते गेल्यावर राजाचा वयस्कर कारभारी म्हणतो की राजा ह्या स्त्रीला संरक्षण देणे, ही जबाबदारी तर राजा म्हणून तुझ्यावर आहेच.
ही अशी गरोदर स्त्री एकटी कुठे जाणार ?
तर तुझ्या परवानगीने मी हिला माझ्या घरी घेऊन जातो.
माझ्या कुटुंबाबरोबर ती राहिल.”
राजा म्हणतो, “ते काय तें तू पहा. मी हीचा स्वीकार करू शकत नाही.
एका राजाला तें शोभून दिसणार नाही.”
तोवर ह्या धक्क्याने शकुंतला बेशुध्द पडलेली असते.
तेव्हा आकाशातून एक वीजेची शलाका यावी तसा आवाज होऊन एक अतिशय सुंदर स्त्री येते आणि शकुंतलेला उचलून परत आकाशमार्गे निघून जाते.
मेनका आपल्या मुलीला घेऊन जाते.
एका कोळ्याला राजाचे शिपाई पकडतात.
त्याच्याकडे एक मौल्यवान अंगठी आहे.
त्या अंगठीवर राजाची मु्द्रा आहे.
त्याने ती अंगठी चोरली असावी, असा शिपायांना संशय आहे.
ते म्हणतात, “तू ही विकून पैसे मिळवायला शहरांत आला असशील.”
तो कांही सांगायचा प्रयत्न करतोय पण शिपाई ऐकून घेत नाहीत.
ते त्याला अंमलदाराकडे नेतात.
तो अंमलदाराला सांगतो, “मी कोळी आहे.
मासेमारीचा धंदा करून उपजिविका करतो.
मी चोर नाही.
माझ्या जाळ्यांत एक मासा सांपडला होता.
तो कांपताना त्याच्या पोटात ही अंगठी सांपडली.
त्यावरील राजमुद्रा पाहून मी राजाला ती देण्यासाठी शहरांत आलो.”
अंमलदार अंगठीचा वास घेऊन म्हणतो, “ह्याला माशाचा वास येत आहे.”
तो त्याला घेऊन राजाकडे येतो.
त्याला व शिपायांना बाहेर थांबवून तो आत जातो.
शिपाई त्या कोळ्याशी उध्दटपणे बोलत असतात.
अंमलदार थोड्या वेळाने परत येऊन सांगतो, “त्याची तात्काळ सुटका करा.”
शिपाई आश्चर्यचकीत होतात तर कोळी म्हणतो, “तुम्ही तर मला जीवदान दिलेत.”
अंमलदार म्हणतो, “तू राजाची खूपच मौल्यवान वस्तू परत केलीयस.
ती अंगठी सामान्य नव्हती.
ती पहातांच राजाला त्याचं जिच्यावर प्रेम होतं, अशा खूप जवळच्या व्यक्तीची आठवण झाली आणि तो विलाप करू लागला.
तू अंगठी आणून दिलीस त्याबद्दल तुला राजाने हे मौल्यवान कडं दिलं आहे.
ते अंगठीइतकच मौल्यवान आहे.”
आतापर्यंत त्या कोळ्याला हिडीस फिडीस करणारे शिपाई म्हणू लागले, “तुला तर मोठ्ठाच धनलाभ झाला.
आम्हाला ओली पार्टी तरी दे.”
तो कोळी म्हणाला, “चला, मी तुम्हाला हवी तेवढी दारू पाजतो.”
(शिपायांचे खिसे वा घसे गरम करणे, हे त्या काळीही चालू होते, असे समजावं काय ?)
राजाला ती अंगठी पहाताच शकुंतलेची आठवण होते.
तिची भेट, तिच्या बरोबर केलेला गांधर्व विवाह, इ. सर्व आठवून आपण तिला न ओळखतां निष्ठुरपणे नाकारले, ह्याचा पश्चात्ताप होतो.
तो विरहाने व्याकुळ होतो.
इथे कालिदासाने गंधर्वनगरीतून मेनकेच्या सांगण्यावरून आलेला एक गंधर्व दाखवला आहे.
तो राजाच्या बागेत अदृश्य रूपांत राहून सर्वांचे बोलणे ऐकतो.
शकुंतलेला राजाने नाकारले असते तरी तिला राजाबद्दल एव्हढे प्रेम कां वाटत असते, हे त्याला पहायचे असते.
राजाचे विरहदु:ख कालिदासाने दासींच्या मुखाने, विदूषक आणि राजा ह्यांच्या संवादातून रंगवले आहे.
राजाचे विरहदु:ख त्याने नकार देऊन ओढवून घेतलेले असल्यामुळे, जास्तच गहिरे झालेले असते.
राजाच्या दु;खाचा परिणाम आसपासच्या निसर्गावरही झालेला असतो.
आता राजाला शकुंतलेचे रूप, गुण आठवतात.
त्याला हे ही आठवते की तिला आपण नाकारले तेव्हां ती गर्भवती होती. आपल्याला मूल नाही, ह्याचेही दु:ख असतेच.
लपून सर्व बोलणे ऐकणारा गंधर्व राजाची अवस्था पाहून व सर्व ऐकून आनंदीत होतो आणि हे वृत्त मेनकेला सांगायला परत जातो.
असे दिवस जात असतांना इंद्राचा सारथी मातली राजाला येऊन सांगतो, “असुरांच्या सततच्या त्रासाने इंद्र हैराण झालेला आहे व त्याला असुरांविरूध्द युध्द करण्यासाठी तुझी मदत हवी आहे.”
राजा लगेच मातली बरोबर इंद्रलोकी जातो.
इंद्रदेवाला असुरांवर विजय मिळवायला मदत करून परत येत असतांना राजा आणि मातली ह्यांच्यात आकाशांतून इंद्रलोकातून पृथ्वीवर येताना दिसणाऱ्या दृश्यांबद्दल संवाद आहे.
मातलीचा आकाशगमन करून पृथ्वीवर उतरणारा रथ पूर्णपणे त्याच्या आज्ञेत आहे.
मातली तिथल्या मरिची ऋषींच्या आश्रमाचे सौंदर्य वर्णन करून सांगतो.
आता तिथे मरिची ऋषींचा पुत्र कश्यप ऋषी आश्रमाचा प्रमुख असतो.
राजा तिथे उतरायची इच्छा व्यक्त करतो.
तिथे उतरल्यावर त्याला दोन स्त्रिया व एक लहान बालक यांचे आवाज ऐकू येतात.
त्या म्हणत असतात, “अरे खट्याळ मुला, सोड त्या सिंहाच्या छाव्यांना.”
राजाला एक बालक सिंहाच्या बछड्यांबरोबर खेळतांना दिसतो.
सिंहाच्या छाव्याला पकडून तो बालक म्हणत असतो, “तू तोंड उघड. मला तुझे दांत मोजायचे आहेत.”
राजाला त्या मुलाचा धीटपणा अचंबित करतो.
सिंहाशी खेळतांना मुलाच्या हातांतलं कडं खाली पडतं.
राजा ते उचलायला जातो तर त्या दोघी मनाई करतात.
मरिची ऋषींनी मंत्राने भारलेल्या त्या कड्याला आई-वडिलांशिवाय कोणी हात लावल्यास त्याचा साप होतो, असं सांगतात.
राजा तरी ते उचलतो पण कांही होत नाही.
त्या दोघींना आश्चर्य वाटते.
राजा विचारतो, “ह्याच्या आईचे नांव काय ?”
तेवढ्यात शकुंतला तिथे येते.
राजा तिला ओळखतो. ती राजाला ओळखते.
दोघे आपल्या पुत्रासह कश्यप ऋषींना भेटतात.
कश्यप ऋषी त्यांना आशीर्वाद देतात.
ते आपल्या एका शिष्याला आकाशमार्गे जाऊन ही बातमी कण्व मुनींना कळवायला सांगतात.
दुष्यंत ह्या पुरू वंशीय राजाचा पुत्र भरत पुढे मोठा होऊन राज्याचा विस्तार करतो.
तें राज्य भरतवर्ष म्हणजेच भारत म्हणून ओळखलं जाऊ लागलं.
-अरविंद खानोलकर
Leave a Reply