नवीन लेखन...

संत

महाभारतामध्ये युधिष्ठिर आणि यक्षामध्ये संवाद आहे –

यक्ष धर्माला विचारतो- ” दिशा म्हणजे काय?”

युधिष्ठिर उत्तरतो – ” संत म्हणजे दिशा ! ”

जीवनाच्या समृद्धीसाठी आपण कितीही प्रयत्न केले तरी जोपर्यंत त्या प्रयत्नांना दिशा नाही तोवर ते यशस्वी होत नाहीत.

भागवत धर्म मानतो – संत हे समाजासेवी भक्त असतात. त्यांना दोन जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात – नामस्मरणातून भक्ती आणि समाजातील सर्व घटकांमध्ये एकजूट घडवून आणणे ! एखाद्या देवतेचे नाव अथवा मंत्र वारंवार उच्चारणे म्हणजे नामसंकीर्तन ! नामस्मरण अंतर्मुखता विकसित करते. कालौघात असे अंतर्मुख भक्त समाजासाठी कार्यरत होतात. या दोन्ही टप्प्यांमधील देवघेव वेगवेगळ्या पातळ्यांवर होत असते. अशारितीने उत्क्रांत झालेल्या व्यक्तीला “संत ” मानावे असे भागवत धर्म सुचवतो. थोडक्यात संत जरी समाजासाठी असले तरीही त्या प्रक्रियेचा पाया अंतर्गत शुद्धीकरण हाच असतो.

महाराष्ट्राला “संतांची भूमी ” म्हणतात. मोजता येणार नाहीत इतकी नावे आपल्याला पाठ आहेत. त्या सर्वांनी आपले जीवन आमुलाग्र बदलून टाकल्याचे दृश्य सतत नजरेला पडत असते. महाराष्ट्रातील संतपूर्व काळातील जीवन आणि आजचे जीवन यांच्यात अक्षरशः जमीन-आसमानाचे अंतर आहे.

समाजात एकजूट निर्माण करण्याच्या प्रयत्नांचा भक्तीमार्गात अडथळा येत नाही. उलटपक्षी संतांच्या साधनेचे ते बाह्य प्रकटीकरण असते. मुख्य म्हणजे संतांसाठी हे बंधनकारक असते आणि त्यांना निवड करण्याचा अधिकार नसतो. संतांनी सतत (पुढे ) चालायचे असते आणि (समाजाला) पुढे न्यायचे असते म्हणून ” वारी” ची परंपरा सुरु झाली.

योगी अरविंद म्हणतात – ” दिव्य /वैश्विक मनाची एक सूक्ष्म प्रतिकृती म्हणजे मानवी मन ! त्यामुळे कारंज्याच्या पाण्याप्रमाणे ऊर्ध्व दिशेने मानवी मनाची धाव कायम या वैश्विक रुपाकडे सुरु असते.षड्रिपू सतत त्याला खाली खेचायचा प्रयत्न करीत असतात.  मानवी मनाच्या या ऊर्ध्व प्रवाहाला  संत सहवासात कायम प्रेरणा आणि सत्व मिळते. ”

समाजात वैरभाव, द्वेषभावना कमी व्हावी, सर्वांभूती समत्व निर्माण व्हावे आणि मानवी मूल्यांवरची आपली श्रद्धा स्थिर व्हावी यासाठी संतांनी कायम प्रयत्न केले. मानवातील दिव्यत्व जोरकस व्हावं , सत्व / राजस /तमस गुणसूत्रांमध्ये समन्वय व्हावा यासाठी त्यांनी स्वतःचा आदर्श समाजापुढे ठेवला. संतांनी समाजप्रबोधनासाठी कीर्तन , प्रवचन हे भक्तिमार्ग सुचविले. याद्वारे सोपी उपासना शक्य होते. नामस्मरण ही व्यक्तिगत भक्ती असून कीर्तन /प्रवचन हे सामूहिक मार्ग आहेत. नामस्मरणाने अभूतपूर्व शांतता अनुभवायला मिळते. नामस्मरण करण्यासाठी विशिष्ट काळ -वेळेचे बंधन नाही. नामाचे माहात्म्य इतके अपूर्व आहे की नाम उच्चारणारा आणि ते श्रवण करणारा दोघांचाही उद्धार होतो. जड-जीवांना नाम तारून नेते. धर्मप्रबोधन आणि समाजप्रबोधन ही दोन्ही उद्दिष्ठे संतांना साध्य करायची होती म्हणून त्यांनी उपासना आणि भक्तीचा पुरस्कार केला.

संतसाहित्याने कायम हेच सुचविले – माणसाने आतला आवाज प्रमाणभूत मानावा कारण तोच आपल्या व्यक्तिमत्वाला नवे परिमाण देऊ शकतो. दैवी प्रेरणेचे प्रभावी माध्यम म्हणजे संत ! निःस्वार्थी संत स्वतःसारखाच सकारात्मक समाज निर्माण करण्याचे कार्य हाती घेत असतात.

संत आपल्याला आपल्या कर्तव्याचे ( गृहस्थ म्हणून कुटुंबाप्रती आणि नागरिक म्हणून राष्ट्राप्रती ) भान आणून देतात, व्यक्तिमत्वामध्ये सकारात्मकतेची पायाभरणी करतात, चांगुलपणासाठीं पाठपुरावा करतात आणि खंबीर समाजमन घडवतात.

संतांनी सुचविलेल्या मार्गाला तीन पायऱ्या असतात- प्रबोधन ——— प्रयत्न ——– प्रत्यय !

भारतीय मानसिकतेचा एक दृढ विश्वास आहे – संत मानव्याला मार्गदर्शन करण्यासाठीच असतात आणि त्यांच्या लेखणीतून जीवनाचे मार्ग दिसतात. वेदांनी दाखवून दिलेल्यI धर्माचे आचरण संत करीत असतात.

“दासबोधात ” समर्थ संत स्तुतीपर लिहितात- ” अध्यात्मिक जीवनाचे संत आश्रयस्थान असतात आणि त्यांच्या द्वारे जगाला भगवंताबद्दलचे गुह्य ज्ञान मिळते. संतांच्या सहवासात दुर्मिळ,अशक्यप्राय आणि नशिबानेच मिळू शकणाऱ्या गोष्टी सहजसाध्य होतात. संतांच्या मार्गदर्शनाने परिपूर्णतेची हळूहळू अनुभूती येते. संतांच्या ठायी शाश्वत आनंद आणि समाधान यांचे वास्तव्य असते. मनःशांतीचा स्रोत म्हणजे संत ! स्वातंत्र्य त्यांच्या ठायी वास करते , विसावते. धर्मांचे तीर्थस्थान म्हणजे संत ! सत्याचे पवित्र कुंभ म्हणजे संत ! सत्याचे गंतव्य स्थान म्हणजे संत ! पवित्र धर्मनिष्ठेचे प्रतीक म्हणजे संत ! संतांच्या अंतःकरणात शांततेचे मंदिर असते.” म्हणूनच ” साधुसंत येति घरा , तोचि दिवाळी दसरा ” असं आपण मानतो. जेव्हा जेव्हा एखादे संत-महंत, संन्यासी आपल्या घरी येतात तेव्हा आपण त्यांचे पाद्य पूजन करतो आणि आदरातिथ्य करतो. त्यांच्या कृपाप्रसादाने आपणास भगवत प्राप्ती होते असे आपण मानतो.

विज्ञान आणि तंत्रज्ञान यांनी मानवी जीवनात क्रांती घडवून आणली आहे. तरीही व्यथा, वेदना, दुःख सारे जैसे थे अशी परिस्थिती आहे. जीवनमान उंचावले आहे पण जीवनाची गुणवत्ता त्या प्रमाणात नाही. जीवनातील समतोल ढासळला आहे. मानवता व्यथित झाली आहे. अंतराळात पोहोचलेल्या मानवाला क्वचितच अंतर्मुख व्हायला सवड आहे. मानवी मनाला उभारी देण्यासाठी संत नावाचे दीपस्तंभ जागोजागी असतात.

संत म्हणजे दैवी निरोपे ! क्षणोक्षणी या विश्वात असमतोल जाणवत असताना, हे दैवी दूत आपल्याला सावरत असतात आणि म्हणूनच आपण त्यांच्या प्रती सदैव  कृतज्ञ राहायला हवे.

जेव्हा जेव्हा पृथ्वीतलावरून अध्यात्मज्ञान लुप्त व्हायला सुरुवात होते किंवा विस्मृतीत जाण्याची वेळ येते,  त्या त्या वेळी संत पुढाकार घेऊन आपल्या आत्मज्ञानाने  त्याची पुनर्स्थापना करतात.

आपण क्षणभरासाठीही संतांचे स्मरण केले तरी आपण ऊर्जेने भारीत होतो आणि प्रेरित होतो. त्यांच्या सदभावाने आपल्यात दिव्य तत्व संक्रमित होते. त्यांची नुसती आठवण काढली तरी आपल्याला हायसे वाटते आणि आपल्या समस्या सुटतील अशी आशा वाटते.

” संतांची शिकवण फक्त अभ्यासून चालत नाही तर ती अंमलात आणणे गरजेचे असते. त्यातील काही ओळी जरी अंगी बाणविता आल्या तरी आपल्या जीवनाचे सार्थक होईल ” असे स्वामी चिदानंद सरस्वती म्हणतात.

अध्यात्म ही जीवन जगण्याची कला आहे यावर संतांनी भर दिला. सर्वसाधारणपणे धार्मिक आणि अध्यात्म या दोन्ही संकल्पना एकच आहेत असा समज असतो. दोन्ही गोष्टी अंतिमतः श्रद्धेशी जोडल्या गेल्या असल्या तरीही एके ठिकाणी कर्मकांडावर विश्वास असतो आणि दुसरीकडे जीवनमूल्यांवर ! “ स्वतःच्या अस्तित्वाच्या मुळांचा शोध म्हणजे अध्यात्म “ अशी सोपी आणि सुंदर व्याख्या अम्मा (माता अमृतानंदमयी माँ ) करतात. प्रेम ही अंतर्गत भावना असते आणि त्याचे बाह्य परिष्कृत रूप म्हणजे आस्था ही संतांची शिकवण आहे.

स्वयंपाकात मीठ नसले की तो नासतो, तद्वत समाजात संत नसतील तर तो समाज नासतो असे ऋषिकेशचे स्वामी शिवानंद सरस्वती म्हणत.

संतांचे माहात्म्य साध्या फूटपट्ट्यांनी मोजता येत नाही. त्यांच्या सान्निध्यात केलेल्या ध्यानाने सर्व शंका दूर होतात आणि “आतील “दिवे प्रज्वलित होतात. संतांचे जीवन प्रेरणादायी असते, त्यांच्या पावलावर पाऊल टाकल्याने मुक्ती मिळते. त्यांच्यातील अध्यात्मिक स्पंदनांनी आपला भवताल स्वच्छ होतो. संत असे सारभूत असतात.

मानवाला आत्मानुभती देण्यासाठी संत जन्म घेतात आणि आपल्या कार्याचा अमीट ठसा समाजमनावर उमटवून परततात.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

2 Comments on संत

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..