साहित्यिक, सामाजिक आणि पारमार्थिक अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये आत्मभान करणाऱ्या संत जागृत ठेवून कार्य कवयित्रींची आठवण आजसुद्धा या गतिमान कालप्रवासात स्त्रियांना मार्गदर्शन – प्रोत्साहन देणारी आहे. इसवी सन बाराव्या शतकाच्या काळात ‘न स्त्री स्वातंत्र्यम् अर्हति’ या मनूच्या वचनामुळे स्त्रीला परावलंबी, दुर्बल बनवली होती. बालविवाहामुळे शिक्षण वर्ज्य म्हणजे ज्ञानकवाडेही बंद. पतीचे निधन झाल्यावर एकतर त्याच्या चितेबरोबर स्वतःला जाळून घेऊन सती जाणे किंवा केशवपन करून उर्वरित आयुष्य संन्यस्त वृत्तीने विषण्णपणे जगणे. याशिवाय स्त्रियांना पर्यायी मार्ग नव्हता. एकंदरीत रूढीबद्ध, अपमानास्पद आणि बालविवाहाबरोबरच विषमविवाह, सती, वैधव्य इत्यादी दुष्ट प्रथांना बळी पडलेले असे स्त्रीचे केविलवाणे जीवन होते. अशावेळी तत्कालीन संत स्त्रियांनी समाजाच्या चाकोरीबाहेर पडून स्वत:च्या आणि अवतीभवतीच्या स्त्रियांच्या विकासासाठी केलेला प्रयत्न म्हणजे स्वतंत्रपणे स्वत:च्या सामर्थ्यावर आखलेला स्वातंत्र्याचा मार्ग होता. मुख्य म्हणजे त्या काळच्या समाजाला अभिप्रेत असलेल्या रूढ स्त्री प्रतिमा नाकारून या स्त्रियांनी मुक्त स्त्रीची नवी प्रतिमा उभी केली आणि ती जनमानसामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी परमार्थ हेच मानवी जीवनाचे अंतिम ध्येय मानले जात होते. स्त्रियांना परमार्थ प्राप्तीच्या मार्गातली धोंड असे म्हणायचे. पुरुषांच्या या नसत्या स्वार्थी तत्त्वाशी संघर्ष करीतच संत स्त्रिया परमार्थाकडे वळल्या. आपली अस्मिता ओळखून त्यानुसार ध्येय बाळगणे. त्यासाठी एकनिष्ठेने अनन्यसाधना करणे, सगळ्या अडचणी-संकटांना दूर करून प्रसंगी जीव पणाला लावून वैचारिक संघर्ष करणे हे सगळे मनस्वी कार्य संत भगिनी करीत होत्या.
‘स्त्री स्वातंत्र्य’ हे एव्हरेस्टसारखे २८,००० फूट उंचीचे, मोजता येणारे एक शिखर नाही. ती एक निरंतर अशी वाटचाल आहे, कालच्या पेक्षा आज आणि आजच्या पेक्षा उद्या माणूस म्हणून अधिकाधिक समृद्ध होण्यासाठी केलेला हा सततचा प्रवास आहे, अर्थातच या समर्थ-माणुसकीकडे नेणाऱ्या प्रवासातील संत स्त्रियांचे कार्य अनमोल असे आहे. खरं तर महदाईसा, जनाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई आणि वेणाबाई या स्त्रिया समाजातल्या वेगवेगळ्या आणि भिन्न भिन्न आहेत. महदाईसा, काळातल्या स्तरावरच्या वेणाबाई या बालविधवा, मुक्ताई अविवाहित, परंतु समाजाने बहिष्कृत केलेल्या अभिजन कुटुंबातली आहे, बहिणाबाई विवाहिता-संसारी तर जनाबाई अविवाहिता नामदेवांच्या घरातली दासी आहे. मुख्य म्हणजे सर्वसामान्य स्त्रीचे स्थान तिच्या कर्तृत्वापेक्षा, तिच्या नवऱ्याच्या कर्तृत्वावरून ठरते. या गैरसमजामुळे पतिहीन स्त्रियांना तत्कालीन समाजाने निकृष्ट दर्जा दिला होता. या संत स्त्रियांनी जरी देहातील पातळीवर स्वातंत्र्याचा आणि आध्यात्मिक विकासाचा अनुभव घेतला असला तरी त्यांच्या लिखाणात जागोजागी बाईपणाचा दाहक अनुभव आपल्याला दिसतो. बाईपणाचे त्यांच्यावर झालेले घाव किती खोलवरचे आणि वेगळे होते हे सारखे जाणवत रहाते. त्याचबरोबर भक्तीच्या माध्यमातून त्यांनी घेतलेला माणुसकीचा शोधही अनुभवाला येतो.
अर्थातच या संत कवयित्रींच्या कार्य कर्तृत्वाकडे बघतांना सर्वांत आधी जनाबाई आठवते. ‘दासी’ म्हणून कष्टमय काम करणारी जनाई आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या नामदेवांकडून अक्षरे लिहायला व काव्य करायला शिकली. एकाकी जीवनात आधार यासाठी तिने नामदेवाकडून विठोबाची भक्ती उचलली आहे. तिला आलेल्या अनेक अनुभवाची प्रतिबिंबे तिच्या ओव्या-अभंगात उमटताना दिसतात. स्वत:ला ‘नाम्याची दासी’ म्हणवणारी जनाबाई विकसित होता होता एवढी धीट होते, एवढा आत्मविश्वास मिळवते की शेवटी देवाला ‘जाला तिचा हो चाकर’ म्हणते. परिस्थितीच्या फेऱ्यात जनाबाई दबून-घुसमटून न जाता आत्मविश्वासाने उभी रहाते. खुद्द विठोबालाच सोबती- सांगाती म्हणण्याचं धाडस करणारी जनाई केवळ धाडसी नाही तर स्वयंप्रकाशी समर्थ यासाठीच वाटते. ती -खुद्द विठ्ठलालाच तिच्या जगात खेचून आणते. ईश्वराला ‘ईश्वरपणा’ आपल्यामुळेच येतो हे जाणून ती म्हणते, ‘राग येऊनी काय करिशी? तुझे बळ आम्हापाशी’ परमेश्वराला परपुरुष किंवा परमपुरुष मानणे ही मला तर फार मोठी स्त्रीवादी भूमिका घेणे आहे असे वाटते. स्त्रीचे नाते इहलोकात जर पुरुषांना एका निष्ठेने व आदराने घेता येत नसेल तर आम्हाला अभिप्रेत असणारा खरा पुरुष आम्ही ईश्वराच्या स्वरुपात कल्पू – त्याच्या ध्यासात जगू आणि एका वेगळ्या आनंदाच्या वाटेने जाऊ – असेच या संतस्त्रिया म्हणत असाव्यात.
जनाबाईच्या आधीची महदाईसा महानुभाव पंथातली सात-आठ शतकापूर्वीच्या काळातली ‘तत्त्वज्ञानातील बालविधवा. समतेची बैठक या विचारांतून ती चक्रधरस्वामींचं शिष्यत्व पत्करते.
समोरची घटना, माणूस, अथवा परिस्थिती याबाबत मनात प्रश्न निर्माण होणे आणि त्याची उत्तरे शोधण्यासाठी धडपडत रहावेसे वाटणे, ही एक फार महत्त्वाची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेतच माणसाच्या माणूसपणाचे बळ आहे. महदाईसेला सतत प्रश्न पडायचे. मुख्य म्हणजे स्त्री-पुरुष भेदाभेद न करणे, महिन्यातील काही दिवस स्त्रीला अस्पृश्य न मानणे असे त्या काळात मान्य नसणारे विचार या संत कवयित्रीने आग्रहपूर्वक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मठातील कामाची विभागणी स्त्री-पुरुष सर्वांना समान करून दिली. नियम सारखे, समान करण्याबरोबर ‘माणूस’ या नात्याने सामाजिक सांस्कृतिक वातावरणाच्या पलीकडे जाताना बौद्धिक, आध्यात्मिक चर्चा करतानाही स्त्री-पुरुष समानता कृतीत येण्यासाठी महदाईसा प्रयत्नशील कर्तव्यदक्ष रहायची. जन्माला येणारा प्रत्येक माणूस, हा फक्त ‘माणूस’ म्हणूनच जगावा हेच तिला सांगायचे होते.
‘तुमचा काई जीव आणि त्यांच्या काई जिऊलिया’ म्हणजे पुरुषांचे जीव तेवढे महत्त्वाचे आणि बायकांचे जीव – जगणे क्षुद्र – महत्त्व नसलेले आहे का? ती रोखठोक प्रश्न विचारायची.
या समानतेच्या तत्त्वाला धरूनच संन्यासमार्ग अभ्यासमार्ग स्त्रियांनाही खुला करून ईश्वरज्ञान प्राप्त करून देण्याचा सर्वोच्च अधिकार महदाईसेने स्त्री-पुरुष दोघांनाही सारखाच असल्याचे सांगितले होते आणि माणसाने हे ज्ञान मिळवताना इतर जाती धर्मापेक्षा ‘माणुसकी’ धर्म जपण्याचा मोलाचा संदेश या संत कवयित्रीने दिला होता.
संत मुक्ताबाईला महायोगी, आदिमाया, विश्वमाला असे परंपरेने मानले आहे. ऐहिक जगाकडे जरी तिने जाणीवपूर्वक पाठ फिरवली होती, तरी माणसांमध्ये असणाऱ्या शक्तीची जाण तिला पुरेपूर होती. यासाठीच माणूस आणि माणूसपणाला पोषक असे विचार तिने आपल्या काव्य अभंगातून पुरस्कृत केले. विश्वरहस्याचा ध्यास घेऊन जगणारी मुक्ताई सांगते,
अहो आपण जैसे व्हावे ।
देवे तैसेची करावे ॥
स्वत:चा विकास करतांना इतरांच्या नादी लागण्यापेक्षा, शांतपणे-
आप आपणा शोधून घ्यावे।
विवेक नांदे त्यांच्या सवे ।।
सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून स्वत:चा शोध घ्यावा, अशी विनम्र विनंती स्त्रियांना करते –
वाद घालावा कवणाला।
अवघा द्वैताचा हो घाला।।
भेदाभेद करणाऱ्या या जगात कोणाशी वाद घालण्यापेक्षा समोर येणारे कार्य – कर्तव्य पार पाडावे-असा संदेश देऊन सर्वसामान्य स्त्री-पुरुषांना भक्तीतून मुक्तीचा मार्ग सोपा करून सांगते. नि:स्पृह, सडेतोड बोलणाऱ्या मुक्ताईने पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्वतःला ज्येष्ठ-श्रेष्ठ म्हणवणाऱ्या भक्तिचा अहंकार करणाऱ्या नामदेवांसारख्या पुरुषाचे गर्वहरण केले होते.
रात्रंदिन ज्याला देवाचा शेजार।
कां रे अहंकार नाही गेला? ।
मान-अपमान वाढविसी हेवा ।
दिस असता दिवा हाती घेसी ॥
अरे नामदेवा, अखंड मान-देवाच्या सहवासात राहूनसुद्धा तुझा अहंकार नष्ट नाही झाला रे अपमानाच्या काळोखात तुझं मनही बुडलेलं आहे आणि म्हणूनच लख्ख प्रकाशातही दिवलीच्या मिणमिणत्या उजेडात तुला वाट शोधावी लागतेय.
अगदी अधिकारवाणीने -मुक्ताईने नामदेवाला स्पष्टपणे सांगितले होते. चौदाशे वर्षे तपश्चर्या करणाऱ्या सिद्धयोगी चांगदेवानांही परमेश्वराचा खरा अर्थ सांगून त्यांना झालेला सिद्धीचा अहंकार दूर केला होता.
नाही सुख-दुःख । पाप-पुण्य नाही ।
नाही कर्म धर्म । कांही नाही ।
अरे चांगदेवा भेदाभेद, सुख-दुःख, पाप-पुण्य, कर्मकांडे यांतून माणसाला परमेश्वर प्राप्त होत नाही रे, तर मनाबुद्धी पलीकडचां, संवेदनांच्या पलीकडचा जो अध्यात्माचा प्रदेश आहे, तिथे पोहचले पाहिजे. तिथे पोहचल्यावर लहान-मोठा, धर्म-अधर्म चांगले-वाईट, सत्य-असत्य असा कोणताही वाद निर्माण न होता फक्त विश्वाची एकरूपता अनुभवाला येते. ज्ञानातून, अनुभवातून ‘स्वयंप्रज्ञ’ झालेली मुक्ताई आजच्या काळातील स्त्रियांना आपणच आपली परीक्षा घ्यावी नि त्यात उत्तीर्णसाठी भौतिक शरीरासह – मना – बुद्धीला सुधारणा करण्याची संधी द्यावी. असा अमूल्य संदेश देते.
संत बहिणाबाई स्त्रियांना फार जवळची वाटते. तिची कहाणी चारचौघींप्रमाणे वाटली, तरी ती फार वेगळी आहे. परिस्थितीच्या चौकटीतून बाहेर पडतांना बहिणाईने ती चौकट वाकवली, विस्तारली आणि प्रसंगी मोडलीसुद्धा. वयाच्या तिसऱ्या वर्षी तीस वर्षाच्या माणसाशी झालेले लग्न संसार म्हणजे काय हेच कळत नव्हते. पुढे या छोट्या मुलीला वासराचा लळा लागला. कथा कीर्तनाची आवड निर्माण झाली. जयरामस्वामींच्या कीर्तन-प्रवचनातून भक्तिमार्गाकडे वळली. बहुजन समाजातल्या संत तुकारामांना गुरुस्थानी मानले म्हणून नवऱ्याने छळ केला. नवऱ्याची मारहाण सहन करतच ती कार्य करत राहिली. प्रत्यक्ष गुरुचे मार्गदर्शन न मिळतांही बुद्धिमान, स्वयंप्रकाशी बहिणाईने विविध विषयांचे ज्ञान मिळविले. एक मनस्वी – जिद्दी स्त्री म्हणून ती आपल्याला तिच्या ओव्या अभंगातून भेटत रहाते. आपल्या चरित्रग्रंथात बहिणाबाई लिहितात,
स्त्रियेचे शरीर पराधिन देह ।
न चाले उपाव विरक्तीचा ।
भ्रतार तो मज वोढती एकांती।
भोगावे मजसी म्हणोनिया ।
शरीरभोगाबद्दल ती स्पष्टपणे त्यातून अध्यात्मिक बोलते. पिंड असलेल्या बुद्धिमान स्त्रीची पदोपदी होणारी कुचंबना दिसून येते. जीवनातील संघर्षाचे ठळक मुद्दे सापडतात. आणि ‘स्वत्व’ जगवण्यासाठी बहिणाईने केलेली पराकाष्ठा लक्षात येते. आपली व्यथा-वेदना मांडताना आजच्या काळातल्या स्त्रियांनाही अंतर्मुख करून विचार करायला ती भाग पडते. प्रपंच आणि परमार्थ या दोन भिन्न टोकांमध्ये चाललेली कुतरओढ इथे दिसते. तरीही स्त्रियांना धीर देऊन बहिणाबाई म्हणते,
स्त्री जन्म म्हनोनी न व्हावे उदास.
मुख्य म्हणजे एक महत्त्वाचा सिद्धांत ती आपल्या साहित्यातून मांडते.
कर्म तेचि ब्रह्म। ब्रह्म तेचि कर्म॥
प्रत्येकाच्या कार्य – कर्मामध्ये परमेश्वराचे स्वरूप दिसत असते. Action and reaction is equal and opposite क्रिया तशी प्रतिक्रिया – भाव तैसा देव – आणि यासाठी माणसाने समोर येणारे कार्य कर्तव्य स्वीकारून समाधानाने पार पाडावे. मात्र बुद्धीच्या विवेकी डोळ्याने पाहून निरीक्षण करून मनाने ते आपलेसे करावे. आत्मबलाच्या जोरावर स्वत:ला विकसित करणे, त्यासाठी मेहनत, जिद्द, चिकाटी आत्मसात करणे आणि स्वयंपूर्ण होणे ही मोठी शिकवण संत बहिणाबाईंकडून साऱ्याजणींना मिळते.
परंपरावादी असणारे समर्थ रामदास यांनी परमार्थात स्त्री–पुरुष समान अधिकारी आहेत ही भूमिका स्वीकारली. समर्थांची शिष्या वेणाबाई आपल्या कर्तृत्वामुळे बालविधवा असूनही रामदासी पंथाचे एक समर्थ नेतृत्व करणारी मार्गदर्शिका ठरली. अध्यात्मिक विकासाचा आणि स्वातंत्र्याचा मार्ग तिच्यापुढे उजळत गेला, परंतु त्याआधी तिला समाजाची कित्येक दूषणे सोसावी लागली.
स्त्रियांना जाचक अशा परंपरेशी संघर्ष करीतच वेणाई लोकमान्य – स्वयंसिद्ध ठरली.
१४ व्या शतकातल्या मराठी संत कवयित्री सोयराबाई तर आत्मबोधाच्या सामर्थ्यावर संपूर्ण समाजाशी बंड पुकारतात आणि देवाशीही वाद घालताना दिसतात.
देहासी विटाळ म्हणती सकळ ।
आत्मा निर्मड शुद्ध बद्ध।
देहीचा विटाळ देहीच जन्मला।
सोवळा तो झाला कवण धर्म ॥
‘अरे परमेश्वरा, शरीरात विटाळ बसतो, असे सगळे म्हणतात, पण मग हे पृथ्वी – आप -तेज-वायू-आकाश या पंचतत्वांनी युक्त असलेले शरीर कोणी निर्माण केले रे? आणि या भौतिक शरीरात असणारा ‘आत्मा’, तो तरी शुध्द, पवित्र आहे ना? अर्थातच देहाचा विटाळ मानणाऱ्यांना कुठला धर्म सोवळा वाटणार आहे सांग ना आणि मग
अवघा रंग एक झाला ।
रंगी रंगला श्रीरंग ।।
मी– तू पण गेले वाया।
पाहता पंढरीच्या राया ।।
अशा एकरूपतेतून अद्वैतातून ती सगळ्या जगाकडे-विश्वाकडे पहाण्याचा संदेश देते. हा व्यापक- विशाल दृष्टिकोन स्त्री-पुरुष सर्वांसाठी खूप गरजेचा आहे.
तर मुख्य सांगायचे म्हणजे या सगळ्या संत स्त्रियांच्या अभंग-ओव्या-काव्य माणुसकीचा शोध घेणारे, स्थूल प्रश्नातून सूक्ष्म प्रश्नांकडे बघण्याची दिशा देणारे, शिवाय एक समर्थ जीवन जगण्याचे भान आणि ज्ञान स्त्रियांना मिळत रहाते. आजच्या स्त्री-स्वातंत्र्याच्या साहित्यातून संदर्भातही या मध्ययुगीन मुक्तिवादी स्वतंत्र विचारांच्या संत स्त्रियांचे यश खूप प्रोत्साहन देणारे आहे. याचबरोबर मराठी स्त्रीच्या अस्मितेची, कर्तृत्वाची आत्मजाणिवेतून निर्माण झालेली, सर्वांना प्रेरणा देणारी समर्थ स्त्रीप्रतिमेची कथा सांगणारी आहे. आणि यासाठीच या सगळया संत स्त्रियांच्या साहित्याचा सर्व बाजूंनी खोलवर अभ्यास करणे खूप महत्त्वाचे गरजेचे आहे.
रेखा नार्वेकर
व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी – महिला विशेषांकातून साभार
Leave a Reply