नवीन लेखन...

संत तुकारामांचे मानवतावादी चरित्र

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये प्रा. धनराज धनगर यांनी लिहिलेला हा लेख


मध्ययुगीन कालखंडात आपल्या समाजाभिमुख आचारसंहितेच्या बळावर वारकरी संप्रदाय हा सर्वात लोकप्रिय संप्रदाय ठरलेला दिसतो. या संप्रदायातील एक महत्त्वाचे संत म्हणून संत तुकारामांचा उल्लेख केला जातो. केवळ वारकरी संप्रदायाच्याच नव्हे तर एकूण सर्वच संप्रदायातील साहित्यनिर्मितीचा विचार करता सर्वाधिक लोकप्रिय साहित्यनिर्मिती ही संत तुकारामांचीच असल्याचे आढळते. सर्वसामान्य लोकांना त्यांच्याच दैनंदिन जीवनातील अनुभव-उदाहरणांद्वारे शहाणे करून सोडण्यासाठी तुकारामांनी आपली लेखणी झिजवली. सर्व सामान्यांच्या जीवनानुभवाद्वारे भक्ती आणि अध्यात्माला घातलेली ही गवसणी लोकांना रूचली, पचली म्हणूनच वेदादीग्रंथ माहित असणाऱ्या आणि नसणाऱ्यांनाही तुकारामांची गाथा पाचवा वेद वाटतो. तुकारामांवर आजतागायत हजारोंवर ग्रंथ लिहिले गेलेले आहेत. एखाद्या कवीच्या किंवा साहित्यिकाच्या साहित्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लेखन, वाचन, प्रवचने व्हावी अशा जगातील विरळ्या साहित्यिकांच्या यादीत संत तुकारामांचा आवर्जून समावेश करावा लागेल. आज तुकाराम गाथेची जगातील विविध भाषांमध्ये भाषांतरे देखील झालेली आढळतात. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगातील विविध देशांमध्ये संत तुकारामांच्या अभंगावर कीर्तन प्रवचनांचे कार्यक्रम हाताना आढळतात. मराठी माणसांच्या तर घराघरात तुकाराम आपल्या अभंगांद्वारे अवश्य पोचलेले असतात.

त्यांच्या अभंगामधील काही सुभाषिते तर दैनंदिन जीवनात हमखास वापरली जातात. अशा संत तुकारामांच्या लोकप्रिय अभंगवाणीची समाजसन्मुखता वेगवेगळ्या अंगानी अनेक समीक्षक, संशोधकांनी तपासलेली आढळते. मात्र इतर संतांच्या साहित्याप्रमाणे विठ्ठलाला केंद्रवर्ती ठेऊन मानव समाजसमुहाचे प्रबोधन करणारी तुकारामांची ही अभंगवाणी मानवतावादाच्या कसोटीवर तपासून पाहणे नाविन्यपूर्ण म्हणावे लागेल. तुकारामांच्या अभंगांचे निरीक्षण करता त्यांचे व्यक्तित्व आणि कवित्व एकमेकांमध्ये गुंफले गेलेले असल्याचे दिसते. त्यामुळे तुकारामांच्या अभंगवाणीतील मानवतावादी मूल्यांचा शोध त्यांच्या व्यक्तित्व आणि कवित्वाच्या अनुषंगाने घेणे उचित ठरेल.

संत तुकारामांचे चरित्र:
संत तुकारामांचे नाव तुकाराम बोल्होबा आंबिले (मोरे). त्यांच्या आईचे नाव कनकाई. संत तुकारामंच्या जन्म वर्षासंबंधी विद्वानांमध्ये, अभ्यासकांमध्ये मतभेद दिसतात. श्री. बा. अ. भिडे, जनार्दन रामचंद्र आदी अभ्यासकांनी संत तुकारामांचे जन्मवर्ष शके १५१० असल्याचे म्हटले आहे. तर श्री. भारदे, वि. ल. भावे आदी अभ्यासकांनी त्यांचा जन्मशके १५२० मानला आहे. तर संत तुकारामांचे चरित्रकार महिपती बुवा तुकाराम गाथेचे संपादक त्र्यंबक हरी आवटे, विष्णु बुवा जोग, प्रा. रा. द. रानडे, प. र. मुंगे इ. विद्वानांनी तुकारामांचे जन्मवर्ष शके १५३० मानले आहे. अशाप्रकारे तुकारामांचा जन्मशके १५३० असल्याचे मान्य केले आहे. ‘ एकूणच वरील सर्व मतांवरून इ. स. १६ व्या व १७ व्या शतकाच्या जोडावरील तो काळ होता असे दिसते. समाजामध्ये चातुवर्ण्य व्यवस्था होती. जातीत शूद्र असले तरी व्यवसायाने वाणी असल्याने पैसा-अडका समृद्धी होती. संत तुकारामांचे वडील हे देहूचे महाजन होते. घरात विठ्ठलभक्ती परंपरेने चालत आलेली होती. मात्र चातुवर्ण्याचा त्रास संत तुकारामांनाही झाला असावा. तथाकथित उच्चवर्णीयांची दांभिकता त्यांनी अनुभवलेली असावी. त्यांच्या अभंगामधून शूद्र असल्याने या दांभिकतेतून सुटल्याचे ते म्हणतात,

बस देवा कुणबी केले ।
नाही तरी दंभेची असतो मेलो ।।
शूद्रवंशी जन्मलो म्हणोनि दंभे मोकलिलो।।

ल. का. मोहरीर लिहितात, “तुकारामांनी जातिश्रेष्ठत्व, पांडित्य, कर्मठपणा, ही मोठेपणाची गमके झिडकारून दिली. त्याजागी त्यांनी व्यक्तिगत चारित्र्य, भक्तिभाव (सेवावृत्ती), धर्मनिष्ठा (स्वकर्मकौशल्य), यांची स्थापना करून त्यांची थोरवी स्वतःच्या उदाहरणाने सिद्ध केली. “४ जन्माने प्राप्त होणाऱ्या जातीचे श्रेष्ठत्व तुकाराम नाकारतात. त्याऐवजी चारित्र्यसंपन्नता आणि कर्तव्यवपरायणता यांना ते महत्त्व देतात. ही तुकारामांच्या मानवतावादी चारित्र्याच्या जडण-घडणीतील महत्त्वाची बाब म्हणावी लागेल.

तुकारामांच्या घरात विठ्ठलभक्ती परंपरेने चालत आलेली होती. सावकारीचा व्यवसाय देखील तेजीत होता. सारे काही आलबेल होते. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा पहिला विवाह झाला परंतु पहिल्या पत्नीला, रखुमाईला दम्याचा आजार असल्याने त्यांचा दुसरा विवाह झाला. त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव जिजाई होते. ही देखील एका धनाढ्य सावकाराची मुलगी होती. सुरुवातीला तुकारामांचा संसार आनंदात चालला. मात्र वयाच्या सतराव्या वर्षीच तुकारामांचे मातापिता वारले. थोरला भाऊ सावजीचीही पत्नी वारली. त्यामुळे विरक्त होऊन तो घर सोडून निघून गेला. लहान वयातच तुकारामांवर संसाराची जबाबदारी आली. सुरुवातीला ती जबाबदारी तुकारामांनी समर्थपणे सांभाळली. मात्र अशातच १६२९-३० च्या सुमारास दुष्काळ पडला. या दुष्काळात तुकारामांची पहिली पत्नी रुख्माबाई व मुलगा संताजी यांचे निधन झाले. त्यामुळे तुकाराम दुःखी झाले. तुकाराम म्हणातात

दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान ।
स्त्री एकी अन्न अन्न करिता गेली ।।
लज्जा वाटे जीवा त्रासलो या दुःख ।
वेवसाय देखे तुटी येतां ।। ५

त्यांना झालेल्या या दुःखातूनच त्यांना सर्वसामान्यांच्या दुःखाची जाणीव झाली असावी आणि या जाणिवेतूनच ते काव्य निर्मितीकडे वळले असावे. डॉ. तानाजी पाटील म्हणतात, “तुकाराम सामाजिक जाणीवेतून काव्य निर्मितीकडे वळले. आई, वडील, पहिली पत्नी, मुलगा, सावजीची पत्नी, या जिवलग आप्तगणांचा एकापाठोपाठ एक मृत्यू घडला. त्यामुळे तो एकाकी बनला. सुखी प्रपंच दुभंगला. मायेच्या आधाराची माणसे एकाकी गेल्याने तो जीवनाबद्दल अधिक अंतर्मुख झाला. त्याच बरोबर या घटने पाठोपाठ १६२९-३० चा मोठा दुष्काळ पडला. कित्येक गावातील माणसे अन्न, अन्न करून मेली. चारा पाण्याविना जनावरे मेली. दुष्काळामुळे सामान्य माणसांच्या जीवनाची घडी विस्कटली. त्याला जगणेच अवघड झाले. माणूस माणसाला विचारेनासा झाला. तुकारामांची पत कमी झाली. तुकारामांचे भावजीवन कोसळले स्वतःचे भावजीवन उद्ध्वस्त झालेले तुकाराम अधिक समाजाभिमुख झाले. मानव, पशू, पक्षी यांचे होणारे हाल, तहान” भुकेने झालेली पिकल अवस्था पाहून तुकाराम व्यथित झाले. अपार करूणेने त्यांचे मन भरून आले. स्वतःचे दुःख पचविण्यासाठी या सर्व घटनांकडे सकरात्मकतेने पाहावयास त्यांनी सुरूवात केली. तुकाराम लिहितात –

बाईल मेली मुक्त जाली ।
पोर मेले बरे जाले ।। ७
बरे जाले देवा निघाले दिवाळे ।
बरी या दुष्काळ पीडा केली ।।

अशा प्रकारे माया, मोह, बंधनातून आपण मुक्त झाल्याचे ते म्हणतात. या उद्विग्न अवस्थेत ते गावाजवळील भंडारा डोंगरावरती एकांतात राहू लागले. तेथे त्यांनी पूर्वसुरींच्या साहित्याचा अभ्यास केला. त्यातून त्यांची दृष्टी विकसीत झाली. अभ्यासाचे महत्त्व प्रतिपादन करताना ते म्हणतात-
ओले मुळ भेदी खडकाचे अंग ।
अभ्यासासी सांग कार्यसिद्धी ।।
असाध्य ते साध्य करता सायास ।
कारण अभ्यास तुका म्हणे ।। १०
बौद्ध तत्त्वज्ञानाचाही अभ्यास त्यांनी केला असावा बौद्धकालीन लेणी त्यांच्या अभ्यासाची जागा होती. त्यांच्या अभ्यास स्थळाविषयी डॉ. तानाजी पाटील म्हणतात, “बौद्धकालीन कपाट ही त्यांची अभ्यास चिंतनाची नि काव्यनिर्मितीची जागा होती. देहूपासून घोरावड्याचा डोंगर जवळच होता. तेथील व भंडाऱ्याच्या डोंगरातील बौद्धकालीन लेण्यात जाऊन त्यांनी कलासाधना केली. त्यांच्यातील कलावंताच्या दृष्टिने ही ठिकाणे अतिशय मोलाची होती. या ठिकाणी कलावंताला आवश्यक असलेला एकांत त्यांना मिळत होता.”११ संत तुकारामांच्या या अभ्यास स्थळा विषयीचा सर्वप्रथम निर्देश दामोदर धर्मानंद कोसंबींनी केला असल्याचे सदानंद मोरे यांनीही नोंदविलेले आहे. १२ “देऊ कपाट की, कोण काळ राखो वाट”‘ असा उल्लेख संत तुकारामांच्याही एका अभंगात येतो. तुकारामांच्या अभंगातील समाजसन्मुखता, समतेचा विचार, लौकिकतेचा विचार, दया, क्षमा, शांती, अहिंसा या चिरंतन मानवतावादी मूल्यांचा आढळ पाहिला की त्यांच्यावरील बौद्ध तत्त्वज्ञानाचा प्रभाव लक्षात येतो.

संत तुकारामांची गुरुपरंपरा:
भंडारा डोंगरावर तुकारामांची ज्ञानसाधना सुरू होती. परंतु त्यांचे मन उद्विग्न होते. ते एका चांगल्या गुरूच्या शोधात होते. मात्र त्यांना तसा गुरू भेटत नव्हता, तेव्हा स्वप्नामध्येच गुरुपदेश झाल्याचे ते सांगतात.

सद्गुरुराय कृपा मज केली ।
परी नाही घडली सेवा काही ।।
सांपडविले वाटे जाता गंगास्नाना ।
मस्तकी तो जागा ठेविला कर ।।
राघव चैतन्य केशव चैतन्य |
सांगितली खुण माळीकेची ।।
बाबाजी आपले सांगितले नाम ।
मंत्र दिला रामकृष्ण हरी ।।
माघ शुद्ध दशमी पाहुनि गुरुवार ।
केला अंगीकार तुका म्हणे ।। १४ (३६८)
अशा प्रकारे राघव चैतन्य, केशव चैतन्य ही आपली गुरुपरंपरा असल्याचे ते सांगतात. खरेतर त्यांना झालेला हा गुरुपदेश स्वप्नातील आहे. आपली सर्वच कविता वास्तवानुभूतीवर आधारित प्रसवणारे तुकाराम स्वप्नातील गुरुपदेश का स्वीकारतात ही विचार करायला लावणारी बाब वाटते. तत्कालीन समाजव्यवस्थेत गुरुसंस्थेचे प्राबल्य होते. गुरुशिवाय आपल्या विचारांना समाज मान्यता न मिळण्याची शक्यता तुकारामांना वाटली असावी. तथापि समाजव्यवस्थेत गुरुसंस्थेविषयीचे वाईट अनुभव त्यांच्या गाठीशी असलेले दिसतात. म्हणूनच गुरुशिष्य संबंधांविषयीचे नकारात्मक चित्रण त्यांनी केलेले असावे. ते म्हणतात,
जळो जळो ते गुरुपण |
जळो जळो ते चेलेपण ।। १५
शिष्या सांगे उपदेश ।
गुरुपुजा हे विशेष ।।१७
एक करिती गुरु गुरु ।
भोवतां भारु शिष्यांचा ।।
गुरुशिष्यपण । हें तो अधमलक्षण ।।
गुरु खरेतर ज्ञानाचा सागर असतो. मार्ग दाखविणारा मार्गदर्शक असतो. विवेकी बुद्धी देणारा विवेकानंद असतो. मात्र तत्कालीन समाजव्यवस्थेत गुरुपरंपरेने विषयीचे तुकारामांना आलेल्या प्रतिकूल अनुभवांमुळेच त्यांनी स्वप्नातील गुरू केलेला असावा. आपल्या कवित्वाच्या स्फूर्तिसंदर्भातदेखील तुकाराम स्वप्नातीलच आदेश मानतात.

संत तुकारामांची कवित्वस्फूर्ती :
संत तुकाराम आपल्याला मिळालेल्या कवित्व प्रेरणांविषयी सांगताना म्हणतात,
नामदेवे केले स्वप्नामाजी जागे ।
सवे पांडुरंग येवोनिया ।।
सांगितले काम करावे कवित्व ।
वाऊगे निमित्त बोलो नये ।।
माप टाकी सळे धरीले विठ्ठले ।
थोपटोनी केले सावधान ||
प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी ।
उरले ते शेवटी लावी तुका ।। १९
तुकारामांना भंडारा डोंगरावरील ज्ञानेश्वर, नामदेवादी संतांच्या ग्रंथव्यासंगामुळे त्यांना संत नामदेवांच्या शतकोटी अभंग रचनेच्या प्रतिज्ञेविषयी ज्ञात होतेच. त्यामुळे सुरूवातीला आपल्या कवित्वास समाजमान्यता प्राप्त होण्यासाठी तुकारामांनी त्याचा आधार घेतला असावा. नामदेव हयात नसल्याने आणि विठ्ठलाचे व्यक्ती म्हणून अस्तित्वच सिद्ध होऊ शकत नसल्याने त्यांच्या प्रत्यक्ष भेटी ऐवजी ही स्वप्नभेट अधिक वास्तवदर्शी ठरते. आपल्या या कवित्वाचे श्रेयदेखील तुकाराम स्वतःकडे घेत नाहीत. शिवाय त्यांचा ‘वाऊगे निमित्तमात्रही न बोलण्याची अनुभूती’ सर्वांनाच प्रेरणादायी ठरावी.

श्रोते वक्ते सकळ जन ।
बरे पारखून बांधा गाठी ।।
फोडिले भांडार धन्याचा हा माल ।
मी तव हमाल भारवाही ।। २०
काय म्या पामरे बोलावी उत्तरे ।
परि त्या विश्वंभरे बोलाविले ।।
संताची उच्छिष्टे बोलतो उत्तरे ।
काय म्या गव्हारे जाणावे हे ।।
विठ्ठलांचे नाम घेतां नये शूद्रा ।
तेथे मज बोध काय कळे ।।
तुका म्हणे मज बोलावितो देव ।
अर्थ गुह्य भाव तोचि जाणे || २२
संताचीच वचने आपण बोलतो आहोत किंवा देवच आपल्याला बोलावितो आहे यातील काल्पनिकता वगळून त्यामागे असणारी त्यांची नम्रता फक्त ध्यानात घ्यावी लागेल. शिवाय आपल्या म्हणण्याची प्रामाणिकता देखील सांगण्याची त्यांची त्यामागची भूमिका दिसते. तथापि, कोणीही सांगितले म्हणून ते खरे मानण्याची गरज नाही तर विवेकी बुद्धीने ते पारखून घेण्याचा तुकारामांचा सल्ला त्यांच्या प्रामाणिकतेची खूण सांगतो. तुकारामांनी आपल्या काव्यप्रतिभेचा घडविलेला आविष्कार हा खरेतर स्वयंस्फूर्त होता असेच म्हणावे लागेल. पुढील अभंगांमधून त्याचा प्रत्यय येतो,

अंतरीचे धांवे स्वभावे बाहेरी ।
धरिता ही परी आवरे ना ।।
सूर्य नाही जागे करीत या जना ।
प्रकाश किरणा कर म्हून ॥
तुका म्हणे मेघ नाचवी मयुरें ।
लपविता खरे येत नाही ।। २३ (२८९ शा. गा.)
तुका म्हणे झरा ।
आहे मुळीचाचि खरा ।। २४ (३५०० शा.गा.)
अशा प्रकारे त्यांच्यातील कवित्वाचा मूळ झरा वाहू लागल्याचे दिसते. मात्र तुकारामासारख्या शूद्राने कवित्व करावे, कीर्तन, प्रवचनाद्वारे समाजजागृती घडवावी हे तत्कालीन तथाकथित उच्चवर्णीयांना मान्य नसल्याने त्यांनी तुकारामांना छळायला सुरुवात केली. त्यांच्या या छळाविषयी महाराष्ट्र सारस्वतकारांनी पुढील नोंद केलेली आढळते. “रामेश्वर भट नावाच्या ब्राह्मणाने गावच्या दिवाणात फिर्याद देऊन गावच्या पाटलाकडून त्याला गावातून निघून जाण्याविषयी ताकीद देवविली. त्यावेळी त्यांनी त्यांच्या वह्या स्वतःच इंद्रायणीत बुडविल्या तेव्हा हे कृत्य पाहून लोक तुकोबास म्हणू लागले की, पूर्वी खते, चोपड्या बुडवून स्वार्थाचें साधन बुडवून टाकीले व आतां परमार्थ जोडून कवित्व केले होते, तेही बुडवून टाकिले. तुकोबा दोन्ही बाजूंनी आता साफ धुतले गेले आणि वर हे गावकऱ्यांचे बोलणे ऐकून ते आणखी खिन्न झाले. ते उद्विग्न होऊन एका दगडाच्या शिळेवर तेरा दिवस स्वस्थ पडून राहिले, असे सांगतात की, तेरा दिवसांनी कागद (फुगून?) वर आले तेव्हा तुकोबाला मोठा आनंद वाटला व ते पुन्हा भजन व कीर्तन करू लागले. पुढे लवकरच रामेश्वरभट हा तुकारामबुवांस शरण गेला व त्यांच्याबरोबर भजन आणि कीर्तन करू लागला, पाण्यामधून अशा ॥२५ पद्धतीने तुकारामांच्या वह्या कोरड्या निघणे हे वैज्ञानिकदृष्ट्या संभवत नाही. मात्र तुकारामांचे काव्य एवढे लोकप्रिय होते की तुकारामांनी अन्न सत्याग्रह केल्यावर लोकांना मुखोद्गत असणारे अभंगच त्यांनी तुकारामांना ऐकविले असणार व त्यामुळे ते अभंग तरले असे म्हटले गेले असणार असे वाटते. किंवा स्वतः तुकारामांनाही ते आठवत असावेत आणि तेरा दिवसांच्या काळात नदीकाठी बसून त्यांनी ते पुन्हा लिहून काढले असावेत व तुकारामांचे अभंग जणू काही इंद्रायणीनेच आपणास परत दिले ही तुकारामांनी भावना व्यक्त केली असावी असे वाटते. अर्थात शेवटी हे सर्व तर्कच आहेत पण सत्याच्या अधिक जवळ जाणारे वाटतात.

रामेश्वर भटासारखाच मंबाजी गोसावी या खल प्रवृत्तीच्या व्यक्तीने तुकारामांना त्रास दिला, मारले. सालो मालो नावाच्या कवीने तुकारामांचे काव्य, स्वतःच्या नावावर खपविण्याचा प्रयत्न केला. अशी अनेक संकटे तुकारामांवर आली. मात्र तरीही
असो खेळ ऐसे फार ।
आम्हां त्यांचे उपकार ।।
निंदक तो परउपकारी ।
काय वर्णु त्याची थोरी ।। २६
असे म्हणून व आपल्या वाटचालीत त्यांचे उपकारच मान्य करून आपली समाजोद्धाराची तळमळ त्यांनी सोडली नाही. त्यांच्या या संघर्षातही अभंग राहणाऱ्या त्यांच्या काव्यप्रवाहाबद्दल गं. बा. सरदार म्हणतात, “तुकारामांना आपल्या आयुष्यात पावलोपावली झगडा करावा लागल्यामुळे त्यांच्या साहित्यात शीतल क्षमतेचा मागमूसही नाही. उलट वास्तवतेच्या खडकाळ प्रदेशातून वेडीवाकडी वळणे घेत त्यांचा काव्यनिर्झर वाट काढताना दृष्टीस पडतो. “२७ तुकारामांचा पावलोपावली असणारा हा झगडा असा बाह्य स्वरूपाचा होता तसाच तो अंतर्गत स्वरुपाचाही होता. तुकाराम म्हणतात,
रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग ।
अंतर्बाह्य जग आणि मन ।। २८
बाह्य जगताशी असणाऱ्या संघषपिक्षाही अंतर्मनाशी असणारा संघर्ष नेहमीच कठीण असतो असे म्हटले जाते. मात्र मनावर अंकुश ठेवल्याने, मन काबूत ठेवल्याने या संघर्षातही विजय संपादन करता येतो. मनावर असा अंकुश ठेवण्यासाठी नेहमी जागृत असण्याची भूमिका तकारामांनी मांडली.

तुका म्हणे मना पाहिजे अंकुश ।
नित्य नवा दिस जागृतीचा ।। २९
याच जागृतीतून तुकारामांनी आपली अभंग रचना केलेली दिसते. परंतु ही अभंगरचना करताना वारकरी संप्रदाय, विठ्ठलभक्ती या गोष्टीही प्रामुख्याने केंद्रस्थानी होत्या. अशा परिस्थितीत संत तुकारामांच्या भंगांमधील मानवतावादी विचारांचा मागोवा घेणे, मानवतावादी घटकांचा शोध घेणे निश्चितच महत्त्वाचे वाटते.

संत तुकारामांचे महानिर्वाण:
तुकारामांच्या चरित्रातील एक वादग्रस्त विषय म्हणून याकडे पाहिले जाते. संत तुकारामांनी सदेह वैकुंठगमन केले. मृत्युनंतर ते गुप्त झाले. त्यांनी जलसमाधी घेतली. जीवनाच्या शेवटी ते तीर्थयात्रेला गेले ते पुन्हा आलेच नाहीत. तुकारामांचा खून झाला इ. अनेक मते प्रचलित आहेत. परंतु “तुकारामांचे भक्त, शिष्य व देहूतील त्यांचे वंशज मानतात की तुकारामांना वैकुंठात नेण्यासाठी स्वतः भगवान विष्णु आले होते व त्यांना विमानात बसवून वैकुंठात घेऊन गेले. रामेश्वर भट, महिपती इ. संतांनी त्यांचे सदेह वैकुंठगमन स्वीकारले आहे, अशी नोंद कृ. ज्ञा. भिंगारकर यांनी केली आहे. तथापि अशा स्वरुपाचे वैकुंठगमन शक्य होऊ शकत नाही कारण आजतागायत वैकुंठाचे अस्तित्वच सिद्ध होताना आढळत नाही. शिवाय पंढरपुरालाच वैकुंठापेक्षाही श्रेष्ठ मानणारे तुकाराम आपल्याला अनेक अभंगात भेटतात.

जववरी नाही देखिली पंढरी ।
तंववरी थोरी वैकुंठीची ।। ३१
सांडानिया वाळवंट |
काय इच्छिसी वैकुंठ? ||३२
काय वैकुंठ बापुडे । तुझ्या प्रेमसुखापुढे ||३३
का रे न घ्यावे हे जन्म ।
काय वैकुंठा जाऊन ।।

सारस्वतकर वि. ल. भावेंच्या मते, “अनेक लेखक हे स्वर्गारोहण प्रत्यक्ष घडल्याचे सांगतात आणि पुन्हा पुन्हा प्रतिपादितात. हे या लेखकांचे म्हणणे मी प्रामाणिकपणाचे समजतो. यात बुद्धीपुरस्सर लबाडी नाही. मात्र हे एक पूर्ण भक्तीचे, अंधश्रद्धेचे आणि गचाळ बावळेपणाचे उदाहरण आहे. “३५ अतिशय संयत भाषेत सारस्वतकारांनी भक्ती, अंधश्रद्धा आणि बावळटपणामधील संबंधदेखील आपल्या उपरोक्त विधानातून मांडलेला दिसतो. बा. रं. सुंठणकरांनीदेखील भांडारकरांच्या ‘It is great relief to find Tukaram working no miracles’ या मताचा हवाला देऊन हे चमत्कार संतांच्या चरित्रकारांनी घुसडल्याचे म्हटले आहे. ३६ “दाऊ नेणे जडीबुटी । चमत्कार उठाउठी ।।

अशा अभंगावरून स्वतः तुकाराम अशा चमत्कार कथांच्या विरोधी असल्याचे दिसते. तथापि पुढील काही अभंगांवरून असे वाद पुन्हा पुन्हा निर्माण होतच राहतात. असे अभंग तुकारामांचेच असल्याची विश्वासार्हता तपासणे हे देखील संशोधकांपुढील
आव्हानच आहे.

वाराणसीपर्यंत असो सुखरुप ।
सांगावा निरोप संतांसि हा ।।
येथुनिया आम्हा जाणे निजधामा ।
सर्व असे आम्हा गरुड हा ।।
कृपा असो द्यावी मज दीनावरी ।
जातसे माहेरी तुका म्हणे ।।
शके १५७१ एकाहत्तरी विरोधनाम संवत्सरी
फाल्गुन वद्य द्वितीया सोमवारी प्रथम पहरी तुकोबा गुप्त झाले. ।।१।। ३८

वेगवेगळ्या पुराव्यांचा धांडोळा घेऊन वि. ल. भावेंनी पुढील विष्कर्ष नोंदविलेला आढळतो. “तुकोबांनी इंद्रायणीजवळ किंवा पलीकडे क समाधीस्थान बांधविले होते व ज्ञानेश्वराप्रमाणेच त्यांनी तीत समाधी घेतली. आत गेल्यावर दार बंद करून टाकले. तीन दिवस त्या समाधी मंदिरात आवाज येत होता. पंचमीचे दिवशी आवाज थांबला व सर्व सामसूम झाले, असे झाल्यावर तुकोबांचा प्राण गेला, तेव्हा उगाच अट्टाहास करून येथे बसण्यात आता काही हासील होणार नाही, असे जाणून मंडळी घरोघर परत गेली. तुकोबा फाल्गुन वद्य द्वितीयेस बांधलेल्या समाधी मंदिरात गेले व पंचमीस ते निर्वाण पावले. “३९ शेवटी ही सर्वच मते तर्कावर आधारीत आहेत. तुकारामांच्या विद्रोही विचारांमुळे सनातन्यांकडून त्यांचा खून झालेला असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तसेच तुकारामांच्या एका अभंगावरून ते उत्तरेकडे तीर्थयात्रेस गेले व पुन्हा परत आलेच नाहीत, अशीही एक शक्यता नाकारता येत नाही. तुकारामांचे महानिर्वाण हा एक स्वतंत्र संशोधनाचा विषय होऊ शकतो. शेवटी मृत्यू हा अटळ आहे. मृत्यू नाकारता येत नाही. जन्माला आलेला प्रत्येक सजीव मनुष्यप्राणी हा मरणार आहेच ही मृत्युची अपरिहार्यता लक्षात घेतल्यावर जन्म, मृत्यू व व त्या संदर्भातील वाद निरर्थकच म्हटले पाहिजेत, जन्म ते मृत्युपर्यंतच्या प्रवासात व्यक्तीने केलेल्या कार्यावरच लक्ष केंद्रित केले जाणे व त्याआधारे त्याचे श्रेष्ठ, कनिष्ठपण ठरविणे हे अधिक उचित ठरते. संत तुकारामांचे जीवनकार्याचे श्रेष्ठपण ही आज सर्वमान्य बाब आहे. त्यांच्या जीवनकार्याचे श्रेष्ठपण त्यांच्या अभंग काव्यनिर्मितीत आहे. ते त्यांच्या मृत्यूविषयक आख्यायिकांवर ठरवले जाऊ नये. तुकारामांचे लौकिकत्व मान्य करणे, त्यांची मानवतावाद विचारसरणी मान्य करणे आणि तिचा अंगीकार करणेच खरी तुकारामांची भक्ती ठरू शकेल व असे करणाऱ्यासच स्वतःस वारकरी किंवा तुकारामांचा अनुयायी म्हणवून घेण्याचा अधिकार प्राप्त होऊ शकेल.

संदर्भ सूची:
१. डॉ. कृ. ज्ञा. भिंगाकर-संत तुकाराम आणि संत कबीर, स्नेहवर्धन प्रकाान पुणे, प्रथम आवृत्ती २००९, पृ. १४ ते १८
२. संत तुकाराम-तुकाराम गाथा, अभंग क्र. ३२० ३. तत्रैव-अभंग क्र. २७६६
४. ल. का. मोहरीर-संत तुकारामांची जीवननिष्ठा, सविता प्रकाान औरंगाबाद, पहिली आवृत्ती २५ मे १९९४. पृ. २५०
५. तत्रैव-अभंग क्र. १३३३
६. डॉ. तानाजी पाटील-समाजजीवनातील तुकाराम. पद्मगंध प्रकाशन, पुणे, प्र.आ. २०८, पृ.क्र.४४
७. संत तुकाराम-तुकाराम गाथा, अभंग क्र. ७७८
८. तत्रैव-अभंग क्र. १३३५
९. तत्रैव- अभंग क्र. १४००
१०. तत्रैव-अभंग क्र. २९८
११. डॉ. तानाजी पाटील-समाजजीवनातील तुकाराम, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, प्र.आ. २००८, पृ.क्र. ५४ १२. डॉ. सदानंद मोरे-तुकारामदर्शन, गाज प्रकाशन, अहमदनगर, प्रआ. १९९६, पृ. ३३२
१३. संत तुकाराम-तुकाराम गाथा, अभंग क्र. ३३९१
१४. तत्रैव-अभंग क्र. ३६८
१५. तत्रैव-अभंग क्र. ४४४६
१६. तत्रैव-अभंग क्र. ४४६७
१७. तत्रैव-अभंग क्र. १२३५
१८. तत्रैव-अभंग क्र. २७९७
१९. तत्रैव-अभंग क्र. १३२०
२०. तत्रैव-अभंग क्र. ६९६
२१. तत्रैव-अभंग क्र. २९५०
२२. तत्रैव-अभंग क्र. ९१९
२३. तत्रैव-अभंग क्र. २८१.
२४. तत्रैव-अभंग क्र. ३५००
२५. वि. ल. भावे-महाराष्ट्र सारस्वत, खंड १, सहावी आवृत्ती, पृ. २९०.
२६. संत तुकाराम-तुकाराम गाथा, अभंग क्र. १७२३
२७. सरदार गं. बा.-संत वाङ्मयाची सामाजिक फलश्रुती, लोकवाङ्मय गृह प्रकाशन, आठवी आवृत्ती, २०१०, पृ. १०८
२८. संत तुकाराम-तुकाराम गाथा, अभंग क्र. ४०९१
२९. तत्रैव-अभंग क्र. १५४१
३०. डॉ. कृ. ज्ञा. भिंगारकर-संत तुकाराम आणि संत कबीर, स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे, प्र.आ.२००९, पृ. २९
३१. संत तुकाराम-तुकाराम गाथा, अभंग क्र. ८१२
३२. तत्रैव-अभंग क्र. १११२
३३. तत्रैव-अभंग क्र. १२१२
३४. तत्रैव-अभंग क्र. ३२८४
३५. वि. ल. भावे-महाराष्ट्र सारस्वत, खंड १, सहावी आवृत्ती, पृ. ३०२
३६. बा. रं. सुंठणकर महाराष्ट्रीय संतमंडळाचे ऐतिहासिक कार्य, लोकवाङ्मय गृह प्रकाशन, तिसरी आवृत्ती, २००८, पृ. ६८
३७. संत तुकाराम-तुकाराम गाथा, अभंग क्र. २७२
३८. तत्रैव-अभंग क्र. १६०९

–प्रा. धनराज धनगर

(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..