डॉ. यु. म. पठाण यांचा जन्म ९ मार्च १९३० रोजी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे झाला.
यु.म.पठाण यांच्या घरातील वातावरण मराठमोळं होते. त्यांचे वडील मामलेदार होते. त्यांचा विविध धर्मांवर अभ्यास होता. मामलेदार या नोकरीनिमित्त ते सतत फिरतीवर असत व सोबत त्यांचे कुटुंबही. बालपणीच बदलीने यु.म.पठाण यांचा रावेर, निफाड, नाशिक, धुळे, महाड असा महाराष्ट्र फिरले. त्यांचे कुटुंब उच्चशिक्षित व सुसंस्कृत होते. त्यांचे आजोबा (आईचे वडील) त्याकाळात लोकप्रिय डॉक्टर होते. व मामा शिक्षण संचालक होते. यांचे संस्कार त्यांच्यावर झाले. यु.म.पठाण यांचे कुटुंब मोठे होते. एकूण आठ भावंडे. त्यात तीन बहिणी व पाच भाऊ. दोन भाऊ सहकार खात्यात जॉइंट रजिष्ट्रार व एक भाऊ कलेक्टर झाले. भावंडात यु.म.पठाण हे सर्वांत मोठे. वडिलानंतर भावांच्या संगोपनाची जबाबदारी त्यांनी घेतली. १९५३ मध्ये यु.म.पठाण हे सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य करणाऱ्या डॉ.यु.म.पठाण यांची कारकीर्द खरी बहरली, ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागात.
सत्तरीच्या दशकात या विभागाचं नेतृत्व करताना डॉ. पठाण यांनी मराठवाड्यातील पाच हजार हस्तलिखित पोथ्यांचा संग्रह केला. ही पोथीशाळा आज विद्यापीठाच्या ग्रंथालयाचं वैभव आहे.
संत साहित्य, शिलालेख यांच्या अभ्यासाबरोबरच लघुकथा, ललित लेख, व्यक्तिचित्रे हे वाङ्मयप्रकार त्यांनी लीलया हाताळले आहेत. ‘मराठवाड्यातील मराठी शिलालेख’ या ग्रंथात त्यांनी १२० शिलालेखांचं संपादन केलं आहे. या व्यतिरिक्त साहित्य संस्कृती मंडळाने प्रसिद्ध केलेला फारशी – मराठी अनुबंध, सुफी संतांचं मराठी साहित्य, राज्य मराठी भाषा विकास संस्थेनं प्रकाशित केलेला मराठीतील पहिला मराठी – फारशी व्युत्पत्ती कोश, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं प्रकाशित केलेला ‘मराठी बखरीतील फारशीचं स्वरूप’ या ग्रंथांचा समावेश आहे. भाषाविज्ञान व सांस्कृतिक अध्ययन आणि संशोधन क्षेत्रातही डॉ. पठाण यांनी मोठे कार्य केले आहे. फार्सी-मराठी अनुबंध हा त्यांच्या लिखाणाचा विशेष राहिला आहे.
जगभर संत साहित्याचे थोर अभ्यासक आणि विश्लेषक म्हणून ज्यांच्या नावाचा डंका आहे अशा डॉ.पठाण यांनी अज्ञानसिद्धविरचित वरदनागेश, गोपाळदासकृत शुकदेवचरित्र, चोंभाविरचित उखाहरण, डिंभविरचित ऋद्धिपुरमाहात्म्य, दास आनंद विरचित सुदामचरित्र, नवरसनारायणविरचित शल्यपर्व, अशा कितीतरी दुर्मिळ पोथ्या संपादन करून प्रकाशात आणल्या आहेत. त्याखेरीज जितराब हा कथासंग्रह, ‘अजून आठवतं’ हा ललित लेखसंग्रह, ‘अलबेरूनीचा भारत’ हा अनुवाद, नागेश संप्रदायावर संशोधनपर लेखन, भाऊसाहेबांची बखर, मराठवाडी माणसं, मराठवाड्यातील लोककथा मराठवाड्यातील शिलालेख, मराठी संतों की हिन्दी वाणी, महानुभाव साहित्य संशोधन खंड-१, लीळाचरित्र : एकांक, लीळाचरित्र : दृष्टान्तपाठ, लीळाचरित्र : स्मृतिस्थळ, अशी मोठी ग्रंथसंपदा आहे.
डॉ. पठाण यांना त्यांच्या तत्त्वज्ञानविषयक कार्यासाठी डी.लिट. या पदवीने सन्मानित करण्यात आलं आहे. १९८८ साली झालेल्या सोळाव्या मराठवाडा साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद, १९९० ला पुणे इथं झालेल्या त्रेसष्टाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं. डॉ. पठाण यांना महाराष्ट्र सरकारचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार याबरोबरच अनेक मानसन्मान मिळाले. २००७ मध्ये भारत सरकारनं डॉ.यु.म.पठाण यांना पद्मश्री या किताबानं गौरवल आहे.
डॉ. यु. म. पठाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
काही व्यक्तिमत्वे प्रगल्भ असतात.गुगलला यु.म.यांची माहिती वाचून छान वाटले.पद्मश्री तेव्हाचा किताब म्हणजे मोठी हस्ती प्रतिभावान होती .धन्यवाद वेलणकर सर.