एकदा मी `जीवनमुक्त अवस्था म्हणजे काय?’ या विषयावर बोलत होतो. अध्यात्म हे वाचण्यासाठी, सांगण्यासाठी, शिकण्यासाठी नव्हे, तर रोजच्या आचरणासाठी आहे. जीवनमुक्त अवस्थेत माणूस त्याचा नित्यक्रम, कामे, व्यवसाय करू शकतोच असं नव्हे, तर तो अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतो, असं माझ्या भाषणाचं सूत्र होतं. भाषण झालं. प्रश्नोत्तराचा कार्यक्रम सुरू झाला अन् प्रश्नांची सरबत्तीही! जीवनमुक्त अवस्था ही काहीतरी काल्पनिक बाब असावी. तुम्हाला कधी कोणाचा राग येत नाही का? माणसाला रागच आला नाही, तर त्याची प्रगतीच थांबणार नाही का? अशा आशयाचा एक प्रश्न आला. खरंतर राग येणं यात अस्वाभाविक काहीच नाही. तो कसा येतो, तो का आला? या प्रश्नांची उत्तरं शोधणं महत्त्वाचं. माणसाच्या जीवनात मान-सन्मान आणि अपमान या शब्दांपासून आणि त्याच्या अर्थाच्या प्रचितीपासून कोणी अलिप्त राहिला असेल असं संभवत नाही. कोणीही आपलं कौतुक केलं, सन्मान केला तर त्यानं जगण्याची उभारी येते. आपल्याला, आपल्या कामाला दाद देणारं कोणीतरी आहे, ही भावनाच खूप महत्त्वाची असते. `आजची भाजी छान झाली आहे हं’ हे पसंतीचं वाक्य आपल्या बायको, सून, बहीण किंवा आईपुढं म्हणा अन् पाहा काय चमत्कार होतो. आपल्याला सर्वांनी चांगलं म्हणावं, आपण नेहमीच यशस्वी व्हावं ही माणसाची स्वाभाविक भावना. ती माणसाला सुखावते, काही वेळा त्या व्यक्तीमधल्या अहंकारालाही सुखावते अन् क्वचितप्रसंगी ती अहंकाराला आमंत्रणही देते. चांगली भाजी करण्यातलं किंवा होण्यातलं श्रेय केवळ आपलंच आहे असं वाटू लागतं. अपेक्षाही वाढतात. मग कधी कौतुकाचा शब्द आला नाही तर दुःख होतं, वेदना होतात. कोणी जर आपलं कौतुक केलं नाही म्हणून वेदना होत असतील तर कोणी आपला अपमान केला तर काय होईल? राग ही त्याची स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. काही वेळा तो व्यक्त करता येतो, तर बर्याच वेळा तो गिळावा लागतो.
अपमान मग असाच मनाच्या अंतरंगात साठविला जातो. ती व्यक्ती, तशी घटना किंवा प्रसंग पुढे आला, तरी आपण अस्वस्थ होतो. आपल्या झालेल्या अपमानाचं मूळ कशात आहे हे शोधण्याऐवजी, `माझी कोणाला किंमत नाही.’ किंवा `त्याला काय वाटतं, अक्कल काय त्याला एकट्यालाच आहे का?’ अशा शेलक्या शेऱयांनी आपण आपलं समाधान करण्याचा प्रयत्न करतो. इतरांना दोष देणं, परिस्थितीवर खापर फोडणं हेही मार्ग मग सहज स्वीकारले जातात. नेमकं कारण बाजूला पडतं. मनाच्या गाभाऱयातील अस्वस्थता अन्य कोणत्याही कामामध्ये जीव ओतू देत नाही आणि मग पुन्हा येतो तो अपमानाचाच प्रसंग. असा राग मग व्यक्त होतो आणि होतही नाही; पण तो सातत्यानं तुमचा ताबा घेतो. तुमचा आत्मविश्वास कमी होतो, जनजीवनात वावरणं कमी होतं, अलिप्तपणा आवडायला लागतो. बोलणं कमी होतं. अपमानाच्या परिस्थितीचा विचार न करता त्या क्षणाचा प्रदीर्घ परिणाम जीवनावर होत जातो. हा परिणाम टाळणं, त्या परिस्थितीला, त्या अपमानाला सामोरं जाणं, त्याच्या कारणांचा शोध घेणं हा वास्तव उपाय होय. तो रागात विरून जातो. राग, संताप ही काही केवळ नकारात्मक परिणामाचीच प्रक्रिया आहे असं नव्हे. जेव्हा स्वाभिमान डिवचला जातो त्या वेळी त्याचं स्वत्वही जागं होतं. माझा एक संपादक मित्र आहे. मेहनती अन् हुशार. त्याच्या उमेदीच्या काळात त्याला त्याची लायकी दाखवून देण्याचा प्रयत्न त्यावेळच्या एका ज्येष्ठ नेत्यानं केला. माझ्या मित्राला राग आला, पण तो त्यानं खचला नाही. त्यानं मुळातनं आपली पात्रता पाहिली. उणिवा जाणून घेतल्या आणि अवघ्या 10 वर्षांच्या अवधीत त्या ज्येष्ठ नेत्याच्या बरोबर जाहीर समारंभामध्ये त्यानं आपली क्षमता अप्रत्यक्ष सिद्ध केली. पत्रकारितेच्या प्रारंभी `ण’च्या जागी `न’ करणारा मी अपमानित झालो होतो; पण आज ज्यांनी माझा अपमान केला त्यांनाही हा आता गावरान राहिलेला नाही, याची जाणीव झालेली होती. राग किंवा संताप या अभिव्यक्तीचे हे दोन परिणाम. म्हटले तर परस्परविरोधी. त्यामुळे जीवनमुक्त होणं म्हणजे राग किंवा संताप यापासूनच मुक्तता नव्हे. राग किंवा संताप तुमच्या जीवनावर किती दीर्घकाळ दुष्परिणाम करतो याची जाण येणं, संतापाच्या कारणापर्यंत जाण्याची वृत्ती जोपासणं म्हणजे जीवनमुक्तीचा एक टप्पा. कोणावर तरी संतापून एखादी गोष्ट साध्य करणं यात वाईट काही नाही; पण या सांध्याच्या जवळ जातानाची अस्वस्थता तुमच्यातील प्रेरकशक्तीची हानी करीत आहे का, याची जाणीव येणं महत्त्वाचं. कोणत्याही बाह्य घटना – घडामोडींचे परिणाम जसे बाह्य होतात त्यापेक्षा अधिक ते अंतरंगात होतात. अंतरंगात विपरित परिणाम होऊ न देता रागाचं प्रामाणिक परिमार्जन करणं म्हणजे जीवनमुक्तीचं एक चरण.
— किशोर कुलकर्णी
Leave a Reply