नवीन लेखन...

संथ वाहते कृष्णामाई 

तब्बल ३३ वर्षांपूर्वी १९८३ च्या हिवाळ्यातील एका सुंदर सकाळी मी वाईच्या बस स्थानकात प्रवेश केला. आयुष्यात प्रथमच या गावात आलो आणि प्रथमदर्शनीच त्याच्या प्रेमात पडलो. गावातील कामं आटोपल्यानंतर पाचगणी-महाबळेश्वर मार्गे कोकणात जाण्याची योजना असल्यामुळे बसची चौकशी करण्यासाठी त्या बस स्टँडच्या छोट्याशा इमारतीत शिरलो आणि समोरच्या भिंतीकडे भान हरपून बघत राहिलो. त्या भिंतीवर एक विलक्षण सुंदर पेंटिंग लावलं होतं. खळाळून वाहणारी कृष्णा नदी, तिच्या तीरावरील सुंदर दगडी घाट व रेखीव देवळं त्यात चितारली होती आणि त्या पेंटिंगच्या खाली १९६७ मध्ये प्रदर्शित झालेल्या एका मराठी चित्रपटातील गीताच्या दोन ओळी लिहिल्या होत्या. –

‘संथ वाहते कृष्णामाई,
तीरावरल्या सुखदुःखांची जाणीव तिजला नाही.’

त्यानंतर कृषी क्षेत्रातील कामाच्या निमित्ताने कृष्णेच्या किनाऱ्यावरील त्या शांत आणि सुसंस्कृत गावात अनेकदा जाणं झालं. बहुसंख्य कौलारू घरं असलेलं ते गाव इतकं छोटं होतं की कृष्णामाईच्या पाण्याचा खळखळाट व देवळांमधील घंटानादाचा व आरत्यांचा ध्वनी कुठूनही कानावर पडत असे. वाढदिवसाच्या निमित्ताने गल्लोगल्ली स्वतःवरून आरत्या ओवाळून घेणाऱ्या मोठमोठ्या जाहिराती लावण्याऐवजी गावकरी पहाटे देवावरून आरत्या ओवाळण्यात धन्यता मानीत. जीवनदायी कृष्णेचं पाणी धोम धरणाच्या तुरुंगात बंदिस्त न झाल्यामुळे मळ्यांमधून अल्लडपणे बागडत ज्वारी, बाजरी, ऊस, हळद, आलं, भाजीपाले, फुलं व स्ट्रॉबेरीचं भरघोस पीक शेतकऱ्यांच्या पदरात टाकत असे. पाचगणी व महाबळेश्वरकडे रात्रंदिवस जीव घेऊन सुसाट पळणारी वाहने नसल्यामुळे त्या शांतताप्रिय गावाच्या शब्दकोशात ‘प्रदूषण’ हा शब्द नव्हता.

काळ बदलला आणि त्याचबरोबर माणसेही बदलली. फ्लेक्स प्रिंटींगच्या क्रांतीने त्या सुंदर गावातली प्रत्येक गल्ली जाहिरातींने विद्रूप करून टाकली. परिसरात जंगलतोड होऊन टोलेजंग इमारती उभ्या राहू लागल्या. पाचगणी-महाबळेश्वर व कोकणाच्या दिशेने जाणाऱ्या असंख्य वाहनांनी धूर व धुळीचे ढग निर्माण करण्यास सुरवात केली. भूतकाळात हरवत चाललेलं ते माझं प्रिय गाव शोधण्याच्या नादात मेणवलीला नाना फडणवीसांच्या वाड्यामागील कृष्णेच्या तीरावरील घाटावर पोहोचलो. शंकराच्या देवळातील मिट्ट काळोख असलेल्या तळघरातील देव्हाऱ्यात प्रवेश केला.

स्मार्ट फोनवरील तानपुऱ्याच्या स्वरांचा प्रचंड प्रतिध्वनी देव्हाऱ्यात घुमू लागला आणि नकळत माझ्या गळ्यातून गदिमांचे शब्द पाझरू लागले – ‘संथ वाहते कृष्णामाई’!

श्रीकांत पोहनकर 
98226 98100 
shrikantpohankar@gmail.com

श्रीकांत पोहनकर
About श्रीकांत पोहनकर 40 Articles
श्रीकांत पोहनकर हे १९९८ पासून सतत सोळा वर्षे समाजातील विविध घटकांसाठी काम करणार्‍या टर्निंग पॉईंट, पोहनकर फाऊंडेशन, टर्निंग पॉईंट पब्लिकेशन्स व दिलासा या संस्थांचे नेतृत्त्व करत आहेत.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..