नवीन लेखन...

सप्तपदी – लघुकथा

अग्नीच्या साक्षीनं आज रमाबाई रमाकांतांच्या आर्धांगिनी झाल्या होत्या.सासरचा उंबरठा ओलांडतांना त्या हलकेच गतकाळात हरवल्या.

“बालपणीचा काळ सुखाचा”ह्याचा प्रत्यय प्रत्येकिच्या वाटाल्या येईलच ,हे काही सांगता येत नाही.”छकुली,ए छकुली काय करतेस बाळा?ये.बस जरावेळ मांडीवर.”अवघी तीन वर्षाची रमा.आजीने रमाला मांडीवर घेतलं.तीला आंजारलं,गोंजारलं.आणि अचानकच घरात रडारड सुरू झाली. बिच्चारी रमा,”आजी गं काय झालं.का रडतात गं सगळे. बाबा तर बोलतपण नाही नं.आजी सांग ना.”काय बोलणार .आज रमाच्या आईनं सगळ्यांचा कायमचा निरोप घेतला होता.

रमा हळूहळू जाणती झाली.रमाला आजी आणि काकांजवळ सोडून रमाच्या बाबांनी दुसरं लग्न केलं होतं.

काकांनी रमा उपवर झाल्या नंतर ,सुयोग्य स्थळ बघून तिचं लग्न लावून दिलं होतं.

माप केव्हा ओलांडलं आणि रमाकांताबरोबर केव्हा घरात प्रवेश केला ,हे रमाला कळलच नाही.

संसारानी छान बाळसं धरलं होतं.संसारवेलीवर गोंडस दोन फुलं डवरली होती.सप्तपदी चालतांना घेतलेल्या आणाभाकांना स्मरून रमाबाई एक एक जबाबदारी पार पाडत होत्या.

कुठतरी गालबोट लागलं,रमाकांत नशेच्या आधीन केव्हा झाले हे त्यांना कळलच नाही.”अहो,आपला हा संसार कसा सोन्यासाररखा,नका जाऊ तुम्ही नशेच्या आहारी.”दिवसाकाठी शंभरदा सांगूनही रमाकांतांच्या डोक्यात प्रकाश पडेना.

मुलांकडे बघून पांगळा झालेला संसाररथ ओढणे क्रमप्राप्तच होते.

सुयोग्य स्थळ शोधून मुलाचं व मुलीचं लग्न पार पडलं.सुन जावई मना सारखे मिळाल्यामुळे रमाबाई आज खुशीत होत्या.नातवंडांची हौस भागली.अडीअडचणीतून मार्ग काढून आज रमाबाई आपल्याच संसाराची दृष्ट काढण्यास सरसावल्या.

“अगं सुनबाई,”रमाबााईंनी सुनेला हाक मारली.”आई,काही हवय का तुम्हाला?बरं का वाटत नाही.”

अशी चौकशी करतच सुनबाई रमाबाईंजवळ येऊन पोहोचली. रमाबाईंना आज खुप थकल्या -भागल्या सारखं वाटत होतं.आवाज क्षीण झाला होता.अंगातलं बळ अचानक नखहीसं झाल्यासारखं वाटत होतं.

रमाकांत,मुलगा आणि सून सगळेच काळजीत पडले.रुग्णवाहिका बोलवण्यात आली.इस्पितळात दाखल केल्यानंतर सगळ्या प्रकारच्या तपासण्या झाल्या.आणि रमाबाईंना एडस् असल्याचं निष्पन्न निघालं.सगळ्यांना पायाखालची जमीन सरकल्याचा भास झाला.कसंतरी सगळ्यांनी एकमेकांना सावरलं. आजार सक्रीय असल्यामुळे रमाबाईंना परिचारीकेच्या देखरेखीखाली दवाखान्यातच ठेवण्यात आलं.वरचेवर वैद्यकीय उपचार सुरुच होते.त्याबरोबरच घरातल्या प्रत्येकाची तपासणी अनिवार्य होती,तद्वत तपासणी झाली.कुणालाही हा आजार नाही,तर मग रमाबाई का बरे बळी पडल्या;याचा उहापोह झाला.

त्याला झालंही तसच.काही वर्षापुर्वी रक्तपेढीतील दुषित  रक्तपुरवठ्यामुळेच आज सगळा घोळ झाला होता.

आज सकाळपासनंच वातावरणात काहीसी उदासी पसरलेली होती.ढगाळ वातावरणामुळे त्यात आणखिनच भर पडली.सकाळची धावपळीची वेळ .रमाबाईंच्या सुनेची तारेवरची कसरत सुरूच होती.रमाबाईंना भेटायला येणाऱ्यांच्या राबता संपता संपत नव्हता.

मुलांची शाळा,स्वत:च्या नोकरीचा व्याप,सासऱ्यांची सरबराई हे सगळं करता करता तिला आपण तर नाही ना आजारी पडणार;अशी सारखी भिती वाटू लागली.

हे असं सगळं विचार चक्र चालू असतांनाच भ्रमणध्वनी खणाणू लागला. कानाशी फोन लावून संवाद साधण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरुच होता,आणि ती धपकन खाली कोसळली.झालेला आवाज ऐकून घरातले इतर सदस्य स्वयंपाक घरात धावतच आले.सासुबाईंसाठी भरलेला डबा हातात तसाच होता,आणि ती फक्त हमसून हमसून यडत होती.दु:खाचा भर ओसरल्यावर सासूबाई देवाघरी गेल्या हे कसंबसं सांगितलं.आणि तिचा आकांत पुन्हा सुरू झाला.

रमाबाईंचं शव ताब्यात घेतल्यानंतर सगळेच घरी परतले.औपचारिक रिवाज पुर्ण झाल्यावर त्यांचा देह विद्युत दाहिनीला समर्पित झाला.

अवघ्या पंधराविस दिवसांत सगळा खेळ संपला.रमाकांत एवढ्या पंधरा दिवसात फारच मवाळ झालेले.प्रत्येक गोष्टीतला त्रागा हळूहळू मंदावला.रमाबाईंच्या वस्तूनं त्यांना त्यांचाच भास होऊ लागला.हातोपाती मिळणाऱ्या वस्तू शोधतांना तारांबळ उडू लागली.कपाटातला सदरा शोधतांना अचानक…………… रमाबाईंनी जीवापाड जपलेला शालू त्यांच्या हातात आला.भरून आलेल्या डोळ्यातून उष्मधारा शालूवर ओघळल्या.अन्………

स्वत:च्या नकळत ते भविष्यात शिरले.तो सुदिन त्यांना आठवला.मंगलाष्टकं कानात रुंजी घालू लागले.सोनपावलांनी आलेल्या रमाबाईंचा मंजूळ स्वर त्यांना ऐकू येवू लागला.बांगड्यांची किणकिण ,पायातले वाजणारे चाळ,जोडव्यांचे घुंगरू,खळखळणारं हसू,सारं सारं चलचित्र डोळ्यासमोरून सरकू लागलं.

“रमा,बस गं जरा.किती करायचं हं काम.मी आल्यावर मुळीच काम करायचं नाही हं”

असे पत्नीशी झालेले संवाद त्यांना छळू लागले.दिवास्वप्न बघावं त्या प्रमाणे रमाबाई त्यांना ठायी ठायी दिसू लागल्या. स्वयंपाक घरातील सुग्रास स्वयंपाकाचा दरवळ त्यांच्या नाकात शिरू लागला.जळी स्थळी पाषाणी त्यांना फक्त रमा रमा रमा आणि रमाच दिसू लागल्या.वेड लागायचं काय तेवढं बाकी होतं.

व्हायचं तेच झालं.रमाकांत आजारी झाले.पार मनोरुग्ण.इलाज सरल्यावर नाईलाज म्हणून रमाकांतांना मनोरुग्णालयात हलवण्यात आले. रमाकांत दिवसेंदिवस खंगतच होते.मुलाला,सुनेला नातवाला ,नातीला ओळखेनासे झाले.सगळ्यात त्यांना दिसत होती ,ती फक्त त्यांची रमा.

सकाळची वेळ होती.रमाकांत मोठमोठ्याने सगळ्यांना बोलवू लागले.दवाखान्यातील कर्मचारी वर्ग धावतपळतच आले.

बघा,बघा माझी रमा किती छान दिसतेय.होम-हवन झाले.सप्तपदीची तयारी सुरू झाली.

मी आणि रमाने चाललेली सप्तपदी.संसारातले सर्व प्रश्न एकमेकांच्या संगतिनं चालायचं ,ती आमची सप्तपदी.”रमा ,ठेव गं ह्या सुपारीवर पाय.अलगद ढकल तिला पुढे.मी आहेच बघ तुझा सांगाती.”

“रमा,ही दुसरी सुपारी.ढकल तिलाही पुढे.सुखी ठेवेन मी तुला .”

“रमा,ही तिसरी सुपारी.प्रामाणिक असेन गं मी सदा.”

“रमा,बघ चौथीसुपारी .एकमेकांना जपायचं अशी शपथ घेऊया.”

“रमा,पाचवी सुपारी.आदर्श संसारासाठी ढकललेली.”

“रमा,ही सहावी सुपारी.एकमेकांवर विश्वास दाखवून पार केलेली.”

“रमा,आणि ही सातवी सुपारी.सात जन्म एकमेकांना साथ देण्यासाठी ओलांडलेली.”

“बघ ,बघ ना हीच सप्तपदी आपण चाललो नां.कुठे आहेस गं तू.लाजलीस नां.मला फार भावतं गं हे तुझं रुप.काळजात कोरून ठेवलय बघ मी.”

अशी ही अखंड बडबड ऐकून सगळे कर्मचारी सुन्न झाले.

झोपेचं औषध देऊन कसातरी आळा घालण्यात परिचारिकांना यश आलं.

रमाकांताना झालेला दु:खावेग कमी व्हावा,म्हणून वारंवार हाच उपाय सुरू होता.

जवळपास एक आठवडा हाच हाच हाच सप्तपदीचा जयघोष साऱ्या रुग्णालययात घुमत होता.एक एक दिवस एक एक विधान जपजाप्य करावे ,त्याप्रमाणे रमाकांत घोकत होते.दिवसेंदिवस मानसिक संतुलन खालावण्याचं प्रमाण वाढतच होतं.

एकमेकांशी घेतल्या आणाभाकांशी आपण केलेली प्रतारणा आणि रमाने चकार शब्द न काढता प्रतारणेला दिलेला सवतिचा मान त्यांना अधिकच त्रासदायक ठरत होता.

गंडे,दोरे,धुपारे -अंगारे सारे -सारे सोपस्कार झाले.

आताशा खाणं-पिणं,कपडे ह्या कशा-कशाचंभान म्हणून त्यांना राहिलं नव्हतं.शुन्यात हरवलेले रमाकांत फराश्यांवर एकच खेळ खेळत होते.

सप्तपदी ………………….

सप्तपदी …………………

सप्तपदी……………….

आज सकाळची शेवटची चक्कर मारायला आली ,तेव्हा तिला खुप मोठमोठ्याने हसण्याचा आवाज आला,तोही रमाकांतांच्या खोलीतून .

क्षणात हसणे क्षणात रडणे आणि क्षणात नसणे.

हसता हसता रमाकांतांनी सप्तपदीची शेवटची सुपारी ढकलली ती शेवटचीच ठरली.

अवघ्या महिन्याभरात सगळा खेळ संपला होता.

रोहीतने रोहीला बाहेर नेले.बागेत गुलाब बहरला होता .दोन्ही गुलाबांना काय योगायोग एकाच वेळी सात -सात फुलं लगडली होती.

आधुनिक विचारसरणीचे म्हणून त्यांनी जल प्रदुषण रोखावं ,हा उद्देश समोर ठेवून रमा व रमाकांतांची रक्षा कुंड्यांमधे भरून त्यात गुलाब फुलवले होते.डोलणाऱ्या गुलाबाच्या फुलाफुलातून सप्तपदीचा एक एक गुढार्थच जणू काही उलगडत होता.

दोघंही घरात आले.आई-बाबांच्या फोटोला वंदन करून ,मुलांना शाळेत पाठवून तेही आपल्या कामावर गेले.

बघता बघता वर्ष सरलं.वर्षश्राद्धाला रोहीत आणि रोहीने एडस् ग्रस्त व मनोरुग्णांना

आधार सदनिका उघडली. त्याचं उद्घाटन सुद्धा त्यांच्याच हस्ते करून समाजात एक नविन पायंडा घातला.त्या सदनिकेचं नावं ठेवलं गेलं……..

“सप्तपदी”

— सौ. माणिक शूरजोशी
नाशिक

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..