नवीन लेखन...

सरकार दरबारी यश पहिला पुरस्कार

कार्यक्रमांसाठी मी थोड्या वेगळ्या वाटेने जायचे ठरवले आणि तशी संधीही मला लवकरच मिळाली. सरकारतर्फे एक निवेदन टाईम्स ऑफ इंडियामध्ये आले होते. हे निवेदन मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि डिपार्टमेंट ऑफ कल्चरतर्फे छापले होते. नॅशनल इंटिग्रेशन थ्रू म्युझिक अॅन्ड डान्स या विभागात समता, बंधुता, राष्ट्रीय एकात्मता अशी शिकवण देणारे संगीत व नृत्याचे प्रोजेक्टस् मागवले होते. त्यांचे कार्यक्रम छोट्या शहरातून व गावातून सरकारतर्फे केले जाणार होते. मी ‘प्रभू मोरे’ ही हिंदी भजनांची कॅसेट केली होती. त्यातील भजने संत कबीर, संत मीराबाई, संत तुलसीदास आणि संत सूरदास यांची होती. ती सर्व भजने समता, बंधुता यांचा संदेश देणारीच होती. ‘प्रभू मोरे’ या नावाचाच हिंदी भजनांचा कार्यक्रम मी सादर करेन आणि निवेदक राष्ट्रीय एकात्मतेबद्दल सांगतील असा प्रोजेक्ट मी सरकारकडे पाठवला. सोबत ‘प्रभू मोरे’ ह्या कॅसेटच्या कॉपीजही पाठवल्या. लवकरच सरकारतर्फे हा प्रोजेक्ट मंजूर झाल्याचे पत्र मला दिल्लीहून आले. भारतातील छोट्या दहा शहरांमध्ये याचे दहा कार्यक्रम सादर करायचे होते. मला अतिशय आनंद झाला. मला वेगळी वाट सापडली होती. वेगळी शहरे आणि वेगळा श्रोतृवर्ग सरकारतर्फेच मिळणार होता. कार्यक्रमांचे मानधन जास्त नव्हते, पण सर्व खर्च सरकारतर्फे केला जाणार होता. लवकरच हे कार्यक्रम चार विविध राज्यांतील छोट्या शहरात सादर झाले. त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. एक वेगळेच समाधान या कार्यक्रमांनी दिले. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने माझा सत्कारदेखील केला. एकूण हे प्रोजेक्ट महत्त्वाचे होते, हे मला सर्व कार्यक्रम संपल्यानंतर कळले आणि हे प्रोजेक्ट पुढे माझ्यासाठी किती महत्त्वाचे ठरणार आहे, याची पुसटशी कल्पनादेखील मला नव्हती. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने हा प्रोजेक्ट केल्यामुळे १९९५च्या इंदिरा गांधी प्रियदर्शनी पुरस्कारासाठी माझ्या नावाची शिफारस केली. एके दिवशी ठाण्याच्या कलेक्टर ऑफिसमधून फोन आला आणि कलेक्टरसाहेब श्री. पिंगुळकर यांनी दुसऱ्या दिवशी चहासाठी आमंत्रित केले. मी गेल्यावर माझ्या गाण्याविषयी त्यांनी चौकशी केली आणि मला १९९५ चा ‘इंदिरा गांधी प्रियदर्शनी पुरस्कार’ जाहीर झाल्याचे सांगितले. मला आश्चर्याचा धक्काच बसला. मला असे कोणतेही पत्र मिळाले नसल्याचे मी सांगितले.

“अहो ही माहिती आमच्याकडे आधी येते. तुम्हाला दोन-चार दिवसांतच पत्र येईल. You have made Thane proud पुरस्काराबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन!” कलेक्टरसाहेब हसत म्हणाले. घरी येऊन आई आणि प्रियांकाला ही बातमी सांगितली. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. प्रियांकाच्याही आनंदाला पारावार उरला नाही. आणि मी? कसलीही अपेक्षा नसताना एखादी मोठी गोष्ट अचानक तुमच्या हातात पडल्यावर जे होईल ते माझे झाले होते. खूप मेहनत करूनही जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला मिळत नाही तेव्हा वैतागून नेहमीच आपण नशिबाला आणि ईश्वराला दोष देतो. यावेळी प्रकार नेमका उलटा होता. मी मनापासून ईश्वराचे आभार मानले. लवकरच पुरस्कार मिळाल्याचे पत्र पोहोचले आणि बातमी सगळीकडे पसरली. पेपरात बातमी वाचून अनेक चाहत्यांनी, नातेवाईकांनी, मित्रांनी अभिनंदन केले. अनेक संगीतकार आणि मान्यवर गायक-गायिकांनीही अभिनंदन केले. प्रथितयश गायक अजित कडकडे यांनी एक सुंदर कार्ड मला पाठवले. त्यांनी लिहिले होते. “Aniruddh, you have many more miles to go.” त्यांनी चटकन माझ्या ध्येयाची आठवण करून दिली. मी भानावर आलो. कारण पुरस्कार हे माझे ध्येय नव्हते, तर एक हजार कार्यक्रम हे माझे उद्दिष्ट होते. या क्षणी भाऊंची प्रकर्षाने आठवण झाली. यावेळी त्यांचे काम अजितजींनी केले होते.

पुरस्कार वितरण समारंभ दिल्लीला होणार होता. माहिती आणि नभोवाणी केंद्रीय मंत्री श्री. वसंत साठे यांच्या हस्ते पुरस्कार मिळणार होता. समारंभाच्या एक दिवस अगोदर रिहल्सल होती. स्टेजवर कोणत्या बाजूने जायचे, कुठे उभे रहायचे याच्या सूचना दिल्या जाणार होत्या. कडक सुरक्षा व्यवस्था असणार होती. समारंभासाठी मी, प्रियांका आणि शर्वरी दिल्लीला रवाना झालो. दिल्लीला गेल्यावर मला समजले की, हा पुरस्कार यापूर्वी ज्येष्ठ गायक मन्नाडे आणि हेमंतकुमार यांना मिळाला होता. त्यानंतर हा पुरस्कार मिळवणारा गायक मीच होतो. या दोन थोर गायकांची गाणी ऐकत ऐकत मी लहानाचा मोठा झालो होतो. मला गहिवरून आले. या पुरस्काराचे महत्त्व माझ्यासाठी अनेक पटींनी वाढले. पुरस्कार वितरण सोहळा सरकारी इतमामात पार पडला. ठाण्याला परतल्यावर कलेक्टर साहेबांना पुन्हा भेटायला गेलो. त्यांनी एक नवी बातमी सांगितली. प्रियदर्शनी पुरस्कार मिळाल्यामुळे महाराष्ट्राच्या गव्हर्नरसाहेबांसाठी माझ्या खास कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार होते. त्याची तयारी करायची होती. हा कार्यक्रम राजभवनमधील दरबार हॉल येथे होणार होता. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी नेहमी याच हॉलमध्ये होत असे. मलबार हिलवरील राजभवनात एका बाजूला अथांग समुद्र आणि दुसऱ्या बाजूला गुलाबांची बाग यांच्या मध्यभागी दरबार हॉल आहे. अशी मोठी परंपरा लाभलेल्या नितांत सुंदर ठिकाणी जायला मिळणे हीसुद्धा मोठी बाब. मला तर या सुरेख सभागृहात गाण्याची संधी मिळणार होती. लवकरच ८ फेब्रुवारी १९९६ रोजी सांस्कृतिक कार्य संचालनालयाने या कार्यक्रमाचे आयोजन केले. राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर आणि त्यांच्या पत्नी यांच्या उपस्थितीत हिंदी आणि मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम मी सादर केला. कार्यक्रमानंतर प्रियदर्शनी पुरस्काराबद्दल राज्यपालांच्या हस्ते माझा सत्कार करण्यात आला. एकूणच माझ्या कारकिर्दीतला हा एक मोठ्या मानाचा आणि अविस्मरणीय कार्यक्रम ठरला.

-अनिरुद्ध जोशी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..