सरोवरी पाहिले मी,
तुला अल्लद उतरताना,
राजहंसी होऊन डुंबताना,
देखणी जशी मासोळी,
पाण्यात विहरताना,
सुळकन् मारे उड्या,
वरखाली हालताना,
चपळ तुझ्या हालचाली ,
पाण्याचा वाटे हेवा,
ठिकठिकाणी स्पर्श त्याला,
रुबाब त्याचा पहावा,
तुझी कमनीय तनू ,
जशी असावी हरणी,
आनंदाने जणू हिंडते,
इकडून तिकडे वनी,
टपोरे मोठे डोळे,—
पाणीदार काळे काळे,
अगदी सरल नासिका,
केशसंभार मोठे,
नाजूक कोवळे,
ओठ तुझे,डाळिंबी,
दाण्यादाण्यांतून टिपावे,
अमृत, रसपानी,–!!!
लाल छोटीशी कोमल,
तुझी सुंदर जिवणी,
नुसती ती पाहून,
जीव काढून ठेवला मी,–!!!
धडधडते उरोज तुझे,
मदन कहर तारुण्याचा,
पुन्हा पुन्हा बघत रहावे,
सौंदर्या अशा खाशा,
गोरापान मुखडा तुझा,
हातात उमले केवडां,
वाट अडवून उभा राहतो,
मनातील दर्दी खडा,
प्रसन्न मुद्रा, ओघळे,
त्यावरून तेजस्विता,
विरघळून जाईल कठोर अगदी तुजला पाहता पाहता,–!!!
शिडशिडीत बांधा तुझा,
आभाळात उभी दामिनी,
कोसळू नकोस अशी,
माझी तुला विनवणी,
पाण्यात पोहताना,
प्रतिमा दिसते पारदर्शी,
कोण अधिक लावण्यवती,
कुणाची हो यात सरशी,
प्रतिमा आवडे अधिक,
पाणियाच्या उरांतली,
कदाचित हाती लागेल,
सहजी माझ्या मनातली,—!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply