” सुख म्हणजे नक्की काय असतं?”हा मानवी प्रवृत्तीला, विचार विश्वाला पडलेला चिरंतन प्रश्न आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने सुखी होण्यासाठी धडपड करत आहे. जमेल त्या मार्गाने सुखी होण्याचा प्रयत्न करीत असतो.
या जगाची रचना ही मोठी अजब आहे. येथे दुःख कोणालाच नको आहे. पण ते टाळायचे कसे? ते सहजासहजी कोणाला कळत नाही. येथे सुख प्रत्येकाला हवे आहे. पण ते नेमके मिळवायचे कसे? ते सामान्यतः आता कोणाला कळत नाही.
तरी प्रत्येकाची त्यासाठी धडपड सुरू आहे. अविरत प्रयास सुरू आहे.
सुख मिळवण्यासाठी आपल्या सामान्य माणसाला प्रारंभी शरीराचाच आधार आहे. या भौतिक शरीराचा द्वारे सुखप्राप्ती चे पाच मार्ग उपलब्ध आहेत.
त्यांना आपण पंचज्ञानेंद्रिय असे म्हणतो.
कानाचा द्वारे उत्तम स्वरांचे श्रवण करून, डोळ्यांच्या द्वारे उत्तमोत्तम दृश्यांचे दर्शन करून, जिव्हेच्या द्वारे रसग्रहण करून, नासिके द्वारे गंध, तर त्वचे द्वारे स्पर्शाची अनुभुती घेऊन आपण सुख मिळवण्याचा प्रयास करतो.
सामान्य माणसाला या गोष्टींच्या प्रत्यक्ष उपलब्धतेनेच सुखाची अनुभूती येते. मात्र व्यक्तिमत्त्व जेव्हा अधिक प्रगल्भ होते, जेव्हा मनाचा विकास अधिक सुंदर होतो त्यावेळी मानसिक पातळीवर चिंतनाच्या द्वारे देखील या अनुभूतींचा आस्वाद घेता येतो. ही प्रक्रियाच काव्याचा रसग्रहणाचा आधार असते.
आपण जेव्हा एखाद्या अद्वितीय काव्याचा आस्वाद घेत असतो त्यावेळी त्यात वर्णन केलेल्या गोष्टी आपल्या समोर प्रत्यक्ष रुपात नसतात. मात्र कवीच्या प्रतिभेच्या दिव्य स्पर्शाने आपण मानसिक पातळीवर या शब्द, स्पर्श आदी पंच संवेदनांच्या माध्यमातून त्यांचा मानसिक आस्वाद घेऊ शकतो.
अशा स्वरूपात प्रत्येक रसिक वाचकाला सर्वांगीण सुखाचा मानसिक आस्वाद देण्याची लोकविलक्षण क्षमता असलेला अद्वितीय रसिकप्रिय ग्रंथ म्हणजे महाकवी कालिदासाचे मेघदूत.
आपल्या प्राणप्रिय पत्नीपासून शापवशात् दुरावलेला यक्ष मेघा च्या माध्यमातून तिला संदेश पाठवू इच्छितो ही कल्पनाच अत्यंत रोमांचक आहे.
मेघ प्रवास करतो आणि त्याला आवाज आहे याचा अर्थ तो माझा संदेश पोहचवेल या कल्पनेतून यक्षाची उत्कटता लक्षात येते.
आता असे कसे होईल? असा प्रश्न विचारून रसभंग करू नये यासाठी महाकवी सांगून ठेवतात, “कामार्ताहि प्रकृतिकृपण: चेतनाचेतनेषु !”
तर अशा त्या मेघाला आपल्या अलका नगरीत पाठवताना यक्षाने केलेल्या मार्गाच्या आणि पुढे जाऊन अलका नगरीतील वर्णनाच्या माध्यमातून महाकवींनी या पंचसंवेदनांची जी अपूर्व उधळण केली आहे त्याला साहित्य विश्वामध्ये खरोखरच तोड नाही.
शब्द ,स्पर्श, रूप, रस आणि गंध असा जरी संवेदनांचा क्रम वर्णिलेला असला तरी सर्वात प्रबळ संवेदना म्हणजे दृक संवेदना.
आपल्याला मिळणाऱ्या अनुभूतीं पैकी तब्बल ८३% अनुभूती सामान्य माणूस डोळ्यांच्या माध्यमातून मिळवतो असे शास्त्र सांगते. त्यामुळे या संवेदनेला सर्वात प्रबळ संवेदना म्हटले.
मेघदूतम् मध्ये दृक संवेदना इतकी प्रबल आहे की महाकवींच्या शब्दाच्या आधारे १२० श्लोकांवर १२० चित्रे काढणे शक्य आहे. नव्हे अनेकांनी तशी ती प्रत्यक्ष काढली देखील आहेत.
रामगिरी ला एखाद्या हत्तीप्रमाणे वप्रक्रीडा करणारा मेघ, त्याच्यासोबत उडणारे चातक, बगळे, उत्सुकतेने त्याच्याकडे पाहणाऱ्या विरहिणी, श्रीकृष्णाच्या मोरपिसा प्रमाणे मेघावर फुललेले इंद्रधनुष्य, आम्रकूट पर्वतावर मेघ बसल्यावर घडणारे भूमातेच्या स्तनाचे दृश्य, विंध्य पर्वताच्या पायथ्याशी हत्तीच्या अंगावरील वेलबुट्टी प्रमाणे भासणारी नर्मदा, सुंदरीच्या नाभी प्रमाणे आवर्त दाखवणारी निर्विंध्या, भगवान महाकाला च्या मंदिरातील नृत्य करणाऱ्या नर्तिका, प्रियकर गृहाचे मार्ग ओलांडणाऱ्या अभिसारिका, चर्मण्वतीचे जल प्राशन करताना मोत्याच्या माळेत गुंफलेल्या इंद्रनीला सारखा दिसणारा मेघ, हिमालया वरचे त्याचे सौंदर्य, प्रियकराच्या मांडीवर बसलेल्या प्रेयसी प्रमाणे त्यावर असणारी अलका नगरी, तेथील अद्भुत महाल, देवतांनी आकांक्षा करावी अशा कन्या, त्यांच्या अद्भूत क्रीडा, नंदनवन, सगळ्या घरात सहज लक्षात येणार आहे यक्षाचे अतुलनीय घर, पाचूनी बांधलेली विहीर, इंद्रनील मण्यांनी सजवलेला, सोन्याच्या कर्दळीचे कुंपण असणारा क्रीडा पर्वत, तेथील वृक्ष वाटिका, तेथे नाचणारा मयूर,भगवान ब्रह्मदेवाची सर्वोच्च रचना ठरेल अशी अनुपमेय यक्ष पत्नी, विरहामुळे तिची झालेली अवस्था, या विरहास्थेत ती करत असलेल्या वेगवेगळ्या गोष्टी, अशा एक ना अनेक गोष्टींचे चित्र श्लोकागणिक आपल्या डोळ्यासमोर उभे राहिले नाही तरच आश्चर्य !
महाकवींच्या प्रतिभेचे हे वैभव आहे की त्या प्रत्येक स्थानी आपण स्वतःच उभे राहून ते दृश्य पहात आहोत अशी अद्वितीय अनुभूती ते प्रत्येक रसिकाला बसल्याजागी देतात.
दृश्य संवेदनेनंतर प्राधान्याने आलेली संवेदना म्हणजे श्रुती संवेदना.
मेघाच्या गर्जनेमुळे, त्याला असणार्या आवाजामुळे त्याच्या संदेशवहन क्षमतेचा विचार यक्षाच्या मनात आला. त्या मेघगर्जनेसह आपला श्रवणानंद आरंभ होतो. सोबत उडणाऱ्या चातकांचा, प्रसन्न बगळिनींचा आवाज त्याच्या प्रवासाचे सोबती आहेत. मार्गात प्रत्येक जागी स्वागत करणाऱ्या मयूरांचा केका कालक्षेप करणार आहे. पक्ष्यांच्या किलबिलाटाने ग्राम चैत्य आकुल झालेले आहेत. उज्जैनी मध्ये सारसांचे कूजन, संध्याकाळी भगवान महाकाला च्या आरतीच्या वेळी मेघाने केलेले मृदंगोपम गर्जन, नर्तिकांच्या कंकणांचा, मेखलांचा आणि पैंजणांचा आकर्षक नाद, बांबू मधून शीळ वाजवणारा वारा, सिद्ध आणि किन्नर यांचे वीणावादन आणि गायन, सायंकाळी मोराला नाचविणारा यक्षिणीचा ताल, तिचे वादन, गायन, सर्वत्र भरून असलेला भ्रमरांचा गुंजारव ,कानात हळुच सांगावा असा आणि आता दुर्दैवाने ओरडून दुसऱ्याच्या तोंडून सांगावा लागणारा संदेश अशा प्रत्येक गोष्टी आपल्याला ऐकू आल्या नाही तर आपल्या रसिकते वरच प्रश्नचिन्ह उभे राहावे.
दृक आणि श्राव्य संवेदने सोबत मेघदूतम् ची गंध संवेदना देखील लोकोत्तर स्वरूपाची आहे.
मेघा चा संबंध असल्यामुळे प्रत्येक जागी दरवळणारा मृद्गंध, स्वागताला घेतलेल्या कुटज कुसुमांचा गंध, आम्रकूटावरील पिकलेल्या आंब्यांचा गंध, मार्गात येणारा जांभळांचा, उंबराचा गंध, दग्ध अरण्य सुरभी, नीचैस् पर्वताच्या गुहेत घुमणारा शृंगारपूर्ण ग्रामीणांचा उद्दाम परिमल, उज्जयिनीत क्षिप्रावातासोबत पसरणारा कमल गंध, केशसंस्कार धूपांचा सुगंध, हिमालयावर बसलेल्या मृगनाभीचा कस्तुरी गंध, अलका नगरीत एकाच वेळी सहाही ऋतूं मधील समस्त पुष्पांचा सुगंध, युवतींच्या प्रसाधन आणि क्रीडा साहित्यातील चूर्णांचा गंध असे अनेकानेक गंध प्रवासात पावलोपावली आपल्याला प्रसन्न करण्यासाठी उपलब्ध आहेत.
रसग्रहण हा तर मेघाच्या दृष्टीने एक वेगळाच विषय. मार्गात येणारी प्रत्येक नदी त्याची प्रेयसी आहे. त्याच्या विरहात ती रोडावली आहे. त्या प्रत्येकीचे पाणी (णि) ग्रहण करीत रसग्राही मेघ पुढे सरकत राहतो. पाथेय म्हणून कमलतंतु धारण करणारे राजहंस, कर्दळीच्या कळ्या खाणारे हरीण शावक, मकरंद ग्रहणाने धुंद झालेले भ्रमर या सगळ्या रसांच्या सोबत भगवान महाकालाच्या मंदिरात आणि हिमालयावर प्रत्यक्ष भगवान शंकरांच्या सानिध्यात ओसंडून वाहणारा भक्तिरस हा एक वेगळाच आनंदोत्सव आहे.
वाऱ्याच्या विविध स्वरूपांच्या स्पर्शोत्सव, छाया स्पर्शाने लाभणारी प्रसन्नता, सुरतग्लानी दूर करणारा वातस्पर्श, नखव्रणांना सुखविणारा नवजल कणिकास्पर्श, मयूर पिच्छाचा अवर्णनीय रोमांचक स्पर्श, चंद्रकांत मण्यामधून स्रवणाऱ्या जलाचा प्रेमक्रीडाजनित ग्लानी हरण करणारा स्पर्श आणि यक्ष सदैव लोलुप असणारा आनन स्पर्श अशा विविध स्पर्श संवेदनांचा आस्वाद देत मेघदूतम् आपल्या पंच संवेदनांना परिपूर्णता प्रदान करते.
अशा पाचही अंगांनी प्रचुर प्रमाणात सर्वांग सुख देणारे अन्य कोणते काव्य क्वचितच उपलब्ध असेल.
मेघदूतम् च्या या पंचसंवेदना खरोखरच त्याचे अपूर्व बलस्थान आहेत. महाकवींच्या प्रतिभा स्पर्शाने पावन होत आपणास देखील असे सर्वांग सुंदर सुख अखंड लाभत राहो अशीच त्या राजराजाच्या चरणी प्रार्थना.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड.
९८२२६४४६११
सुरेख