माया परांजपे यांचा जन्म १९ मार्च १९४५ रोजी झाला.
मराठी स्त्रियांच्या गरजा व सामाजिकीकरणाची जाणीव ठेवत सौंदर्य प्रसाधनकलेतील ज्ञानवर्धनाचे काम केले ते माया परांजपे यांनी. पुण्याच्या वैद्यकीय पार्श्वभूमी असणाऱ्या तुळपुळे यांच्या घरात जन्माला आलेल्या मायाताईंना लहानपणापासूनच व्यवसायाचे धडे मिळाले होते. वडिलांना वैद्यकीय व्यवसायात फारसं स्वारस्य नसल्यानं मेडिकलचं शिक्षण अर्धवट सोडून ते हॉटेलक्षेत्रात उतरले. त्यांच्या वडिलांचं पुण्यातलं ‘बॉम्बे रेस्टॉरंट’ इतकं लोकप्रिय होतं की त्यावेळी ना.सी. फडके यांच्या एका कादंबरीतही त्यांच्या या रेस्टॉरंटच्या नावाचा उल्लेख आहे. त्या जेमतेम सात वर्षांच्या असतानाच वडिलांचं निधन झालं. त्यानंतर त्यांच्या आईनं ते रेस्टॉरंट चालवलं. तिथेच आपल्या पायावर उभं राहाण्याचा आणि व्यावसायिक वृत्तीचा पाया घातला गेला. माया परांजपे यांनी १९६४ साली पुणे विद्यापीठातून रसायनशास्त्राची पदवी मिळवली. बी.एससीचं शिक्षण पूर्ण होतानाच विजय परांजपे यांच्याशी लग्न होऊन त्या जिनिव्हाला गेल्या. आपल्या पतीच्या बरोबर वर्षभर स्वित्झर्लंडच्या जीनिव्हा विद्यापीठात प्रयोगशाळा साहायक म्हणून काम करत, व-रसायनशास्त्राबरोबरच ‘ब्यूटी कल्चर’चाही अभ्यास करून त्या मुंबईत परतल्या आणि ‘ओव्हेशन इंटरनॅशनल’ या सौंदर्य प्रसाधनांची निर्मिती करणाऱ्या कंपनीत सल्लागार म्हणून रुजू झाल्या.
याच कंपनीने त्यांना लंडनला ‘ब्यूटी थेरपी’चा अभ्यास करण्यासाठी पाठवले होते. सत्तरचे दशकभर त्यांनी सौंदर्य प्रसाधन, केशभूषा या विषयांतील विविध शास्त्रीय अभ्यासक्रम पूर्ण केले आणि १९७७ मध्ये त्यांना ‘ब्रिटिश असोसिएशन ऑफ ब्यूटी थेरपी अँड कॉस्मेटोलॉजी’चे सदस्यत्व मिळाले. हे पद मिळवणाऱ्या त्या दुसऱ्या भारतीय! त्यानंतरही त्या या क्षेत्रातील बदलती तंत्रे आत्मसात करत होत्या. मग ते केशभूषा तंत्र असो, अरोमाथेरपी असो वा हॉट स्टोन थेरपीसारखी अद्ययावत गुंतागुंतीची तंत्रे; ती जिथे उत्तमपणे शिकविली जात, अशा संस्थांतून त्यांचे शिकणे चालूच होते. त्याबरोबरच स्वत: शिकलेले इतरांना वाटणेही. त्यासाठी त्यांनी तीन मार्ग अवलंबले.
पहिला व्यवसायाचा. ‘ब्युटिक’हे त्यांचे सौंदर्य प्रसाधनालय त्यांनी सुरू केले ते १९६८ साली. मुंबईत तीन व पुण्यात एक अशा चार शाखा त्यांनी यशस्वीपणे चालवल्याच; पण १९७६ पासून सौंदर्य प्रसाधनांचे उत्पादनही सुरू केले. दुसरे म्हणजे प्रसाधनकलेचे अभ्यासक्रम शिकविणाऱ्या संस्था त्यांनी सुरू केल्या आणि तिसरा, महत्त्वाचा मार्ग लेखनाचा. वर्तमानपत्रीय लेखन त्यांनी केले. या कलेच्या प्रसारासाठी विपुल लेखन केले. ‘सौंदर्यसाधना’, ‘सौंदर्ययात्री’, ‘तुम्हाला ब्यूटी पार्लर चालवायचंय?’, ‘लेटेस्ट हेअरस्टाइल’ ही त्यांची प्रमुख पुस्तके. ‘ग्रंथाली’च्या एका पुस्तकाच्या ब्लर्बमध्ये निवृत्त राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी परांजपे यांचा विशेष उल्लेख केला आहे. ‘पुण्यातली एक मुलगी विज्ञानाची पदवी घेऊन बाहेर पडते, सौंदर्य प्रसाधनकलेत नैपुण्य मिळवते, इतर महिलांनाही रोजगार निर्मितीची संधी देते आणि बघता-बघता जगाच्या नकाशावर भारताचा झेंडा रोवते, हे तिचे रोमांचकारी जीवन आहे,’ असा हा गौरव आहे.
‘सौंदर्ययात्री’ हे त्यांनी आत्मकथनही लिहिले आहे.
माया परांजपे यांचे २२ सप्टेंबर २०१९ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply