देवाने प्रत्येक देशातील रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी स्वर्गातून पृथ्वीवर देवदूत पाठविले होते.. कुठं त्या देवदूतानं, चार्ली चॅप्लीन नावाने जन्म घेतला तर महाराष्ट्रातील देवदूतानं, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे नावाने जन्म घेतला. १९१९ साली जन्माला आलेलं हे सुदृढ बाळ तिसऱ्या वर्षांतच पाच वर्षांचं दिसत होतं. त्यांचे आजोबा हे लेखक, कवी व संस्कृत आणि बंगाली भाषेचे अभ्यासक होते. तेच गुण या गुणी नातवात उतरले. त्यांचं शिक्षण एम.ए., एलएल.बी. पर्यंत मुंबई व पुण्यातून झाले. नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांच्याकडून नाट्यक्षेत्र व प्रसिद्ध हार्मोनियमपटू दत्तोपंत राजोपाध्ये यांच्या सहवासातून संगीतक्षेत्राकडे ते ओढले गेले. दरम्यान त्यांनी कारकून, शिक्षक, प्राध्यापक अशा नोकऱ्या केल्या. या नोकऱ्यांच्या कालावधीत त्यांना जी माणसं भेटली , तीच पुढे त्यांच्या लेखणीतून कागदावर उतरुन अजरामर झाली.
पुढे आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर मराठी नाट्यविभाग प्रमुख व दिल्लीच्या दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमाचे पहिले निर्माते व आकाशवाणीवरील अखिल भारतीय मराठी नाट्यविभागाचे प्रमुख निर्माते अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. १९४८ साली लिहिलेल्या पहिल्या ‘तुका म्हणे आता’ या नाटकापासून नाट्य लेखनास सुरुवात केली. त्यानंतर ‘अंमलदार’, १९५७ चे ‘तुझे आहे तुजपाशी’ या एव्हरग्रीन नाटकाचे हजारो प्रयोग झालेले आहेत. ‘सुंदर मी होणार’ या नाटकाने देखील प्रचंड यश मिळविलेले आहे.
‘पुढचं पाऊल’ या तमाशा चित्रपटात त्यांनी नायकाची भूमिका साकारली होती. ‘गुळाचा गणपती’ या चित्रपटासाठी त्यांनी कथा, संवाद, दिग्दर्शन, संगीत व प्रमुख भूमिका या सर्व जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पडल्या. या चित्रपटातील ‘इथेच टाका तंबू’ हे गाणं फार लोकप्रिय झाले.
वयाच्या पाचव्या वर्षी आजोबांनी लिहून दिलेले दहा पंधरा ओळींचे भाषण या मुलाने वर्गात खणखणीत आवाजात सर्वांना ऐकवले. सात वर्षे अशीच भाषणे केल्यानंतर बाराव्या वर्षी स्वतःच लिहिलेलं भाषण ते करु लागले व इतरांनाही लिहून देऊ लागले.
पुलं चं चे सुरुवातीचे दिवस हे मुंबईतील गावदेवी परिसरातील कृपाल हेमराज चाळीत गेले. त्या चाळीतील अविस्मरणीय अनुभवांचा उल्लेख त्यांच्या लेखनातून दिसून येतो.
त्यांनी १९६२ साली लिहिलेल्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ या पुस्तकास साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. मराठी समाजात, विशेषतः मध्यमवर्गीयात पहावयास मिळणारी नमुनेदार माणसांची ती जिवंत, प्रातिनिधीक व्यक्तीचित्रे आहेत. मी हे पुस्तक अनेकदा वाचलं, त्यांच्या कॅसेट्स ऐकल्या तरी देखील त्या पुन्हा पुन्हा ऐकतच रहाव्यात असं वाटतं.. त्यांच्या शब्दात जादू आहे, ती व्यक्ती शब्दांतूनच आपल्यासमोर उभी राहते. त्यांचं हे पुस्तक वाचूनच मला लेखन करण्याची प्रेरणा मिळाली.
कॉलेज जीवनात त्यांचं ‘तीन पैशाचा तमाशा’ हे अप्रतिम नाटक पाहिलं. व्यवसाय करीत असताना ‘एक होता विदूषक’ हा चित्रपट पाहिला. सुयोग, मुंबई निर्मित ‘सुंदर मी होणार’ नाटकाच्या बालगंधर्व रंगमंदिरातील एका प्रयोगाला स्वतः पुलं आले होते. त्यावेळी मी सर्व कलाकारांसोबत त्यांचे फोटो काढले. ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक यांचे सोबत एकदा पुलं च्या घरी गेलो होतो. तेव्हा त्यांच्या चरणांना स्पर्श करण्याचे भाग्य मला लाभले.
अशी जगावेगळी अष्टपैलू व्यक्तिमत्त्व वारंवार जन्माला येत नसतात.. आज पुलं ना जाऊन २१ वर्षे झाली. मराठी भाषेला समृद्ध करणारे पुलं गेल्यानंतर, विनोदी लेखन करणाऱ्या लेखकांची कमतरता भासू लागली आहे. आजच्या सिने, नाट्य, दूरदर्शन वरील मालिका पाहताना हे प्रकर्षाने जाणवते आहे..
आजच्या या स्मृतीदिनी पुलं ना विनम्र अभिवादन!!!
© सुरेश नावडकर.
मोबाईल ९७३००३४२८४
१२-६-२१.
Leave a Reply