कोणते दुःख तुला छळते
अकारण कां व्यथित होते ।।धृ।।
प्रेमळ छत्र पित्याचे असतां
गेले जीवन तुझे बागडतां
लाड पुरविले आईने तव
शिकवीत असतां आनंदी भाव
आठव सारे याच क्षणीं ते ।।१।। अकारण तूं कां व्यथित होते
बांधून घेतां राखी हातीं
आश्वासन तुजला मिळती
पाठीराखा भाऊ असूनी
येईल तुजसाठीं धावूनी
कसली शंका मनांत येते ।।२।। अकारण तूं कां व्यथित होते
संसार भरला सुख-दुःखानी
घे शिरावर तुझ्याच समजूनी
जीवन मार्गी होता बदल
नको होऊस वेडे चंचल
सावध असूं दे चित्र तुझे ते ।।३।। अकारण तूं कां व्यथित होते
नाते गोते वाढवीत जावे
सर्वामध्यें प्रेमळ व्हावे
छत्राखालती होती आजवर
छत्रचि बनावे तूं इतःपर
संस्काराचे मधूर फळ येते ।।४।। अकारण तूं कां व्यथित होते
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply