नवीन लेखन...

साठाव्या आठवणी

आयुष्याच्या मध्यान्ही, संध्याछाया झाकोळण्याआधी
कधी वाटतं थांबावं, बसावं घडीभर निवांत
आठवणींच्या रेशीमघड्या पसराव्या अलगद उलगडत
सावलीला आठवणींचा पदर नि घ्यावी क्षणभर उसंत
वळवावी नजर दूर मागे, मनाला रग लागेपर्यंत

शिरावं मनाच्या पडवीतून भूतकाळाच्या माजघरात
उघडावी कवाडं सारी, आजीबाईंच्या कपाटागत
धुंडाळावे भ्रमिष्टागत ते सारे क्षण, काने-कोपरे
जगाव्या, हुंगाव्या गतस्मृती, होऊन जिवंत क्षण सारे
धुडकावून वर्तमानाचे सारे सावध पोलादी पहारे
त्या लहानमोठ्या आठवणींनी उठवावे अंगभर शहारे
अनुभवावा तो जुनाट श्वास मिटल्या पापण्यांमधूनी
उष्ण निश्वासासंगतीने पाघळावी स्निग्धता डोळ्यांकडांनी

जगता न येतो भूतकाळ, क्षण होतात हे निसरडे
आकंठ डोहात डुंबूनही, रहातो आपण कोरडे कोरडे
चुटपुटतो जीव धापा टाकत उसासतो वेड्यागत
उगा मन रहातं हिंदकळत दगड टाकल्या पाण्यागत

तो ओढाळ-ओढाळ वास अजूनही येतो
दाटून येतात कढ, श्वास घुसमटून जातो
मन होतं वेडंपिसं सांडलेले क्षण वेचता वेचता
लगबगतो जीव पाठी फिरता-फिरता
तेवढ्यातही फुटतात कोंब, मनाच्या गाभ्याला
क्षणिक का असो, उमलतेही पालवी मनाला

आठवणींच्या काळोख्या कप्प्याकप्प्याला आहे काचेचे दार
अंधुकसे दिसतात चेहरे सारे पण होता नाही येत पार
जाणवतात बंद दाराआडचे निश्वास नि दूरवर खोल हुंकार
घुमतात परिचित आभास नि परावर्तित होणारी गाज
दूर पहाता दिसतात लुकलुकताना माणुसकीचे दिवे
काळोखाचा होतो निचरा, प्रकटतात आठवणींचे थवे
धुसर चेहेऱ्याच्या बऱ्याच आठवणी करतात एकदम गलका
आतुरतेने, आकांताने देतात दारावर वारंवार धडका

दिसते रांगणारी गोंडसता ते दुडदुडणारी दांगटगर्दी
मस्तीखोर बेशिस्तीपासून ते शिस्तपूर्ण कवायती
दाराआडून डोकावतो मग गोबरा एक चेहेरा
सवय लागेस्तोवर शाळेचा कंटाळा करणारा
आईचा सोडताना पदर, डोळे भरुन येणारा
उगा कौतुकाला आसुसलेला हळवा निरागसपणा

झरझरतो काळ जलद चलचित्रागत डोळ्यांसमोर
जाणवतो हात तुमचा आयुष्यचित्राच्या रेखेरेखेवर
धाकाच्या धपाट्यापासून ते जिवाच्या जिव्हाळ्यापर्यंत
पाठी लागलेल्या शिस्तीपासून पाठ राखणाऱ्या आश्वस्त मिठीपर्यंत
जगण्याच्या सुरवातीपासून ते जग जिंकायच्या इर्षेपर्यंत
काळजातल्या ओलाव्यापासून नजरेतल्या निखाऱ्यापर्यंत
लोखंडाच्या परीसस्पर्शाच्या ध्येयप्रक्रियेच्या पूर्ततेपर्यंत

जागतात आठवणी, बापुडा जीव आसुसतो क्षणाक्षणाला
आपुलकीच्या ओढाळपणाला, मायेच्या वर्षावाला
आभाळाच्या छायेला नि सांभाळणाऱ्या सावलीला
चांदोमामाच्या सोबतीने, तिन्हीसांजेच्या दीपज्योतीला

आयुष्याच्या प्रगतीला होती जिद्द तुमच्या ध्येयाची
वळून पहावं जेव्हा, पाठराखण तुमच्या सावलीची
स्वप्नांना घेऊन उशाशी, आम्ही घरटी आभाळात केली
भावनेची गुंतवणूक तुमची, क्षितीजे आमची विस्तारित गेली

साठाव्या आठवणी, या आठवाव्या साठवणी
कराव्या हळूवार गोळा, नयनांच्या रांजणी
बनवावी दोन ओतीव, गाळीव त्यांची टिपं
असावी जी दाट, नात्याहूनही नीट
यावी त्यांना गूढ, सागराची अथांगता
ध्रुवाहूनही अढळ मिळावी चिरंतनता
रहावी तेवत ती शिल्पं कृतकृत्य
बनून दीपस्तंभ दोन्ही डोळ्यांत

– यतीन सामंत

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..