नम्र, साधेपणा, कामाप्रती प्रामाणिकपणा या वैशिष्टय़ांनी सुरुचीची छायाचित्रं खुलतात…
अनेक मराठी कलाकारांना शून्यातून यशाच्या शिखरापर्यंत पोहचताना मी पाहिलंय. काहींचा हा प्रवास अगदी वर्षा – दोन वर्षांत झालाय. तर काहींना त्यासाठी बरीच वर्षे खर्ची पाडावी लागलीत. यातील काहीजण अनेक वर्षांच्या अंती अजूनही एका सीमेपर्यंतच पोहोचलेत तर काही या इंडस्ट्रीतूनच बाहेर फेकले गेलेत. या सगळ्यांचा प्रवास पाहता एक वाक्य नेहमीच समोर येत ते म्हणजे,’ अक्रॉस प्रोफेशन्स, कन्सिस्टन्सी इज अ डायरेक्ट प्रोडक्ट ऑफ वर्क एथिक’. आपल्या कामात सातत्य राखण तस फार कमी लोकांना जमत. त्यातही स्त्रियांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या समस्यांमुळे हे सातत्य राखण कठीण जात. आपल्या कामात सातत्य राखत, त्यातल्या नीतिमूल्यांना जरा देखील धक्का लागणार नाही याची नेहमीच काळजी घेत गेली अनेक वर्षे विविध माध्यमांतून आपल्या अभिनयाच्या जोरावर सतत दिसणारा चेहरा म्हणजे सुरुची अडारकर.
सुरुचीने आजवर अनेक माध्यमांसाठी काम केलय. छोटयापडद्यावर, रंगभूमीवर, रुपेरी पडद्यावर ती लीलया वावरलीये. आज प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या याच सुरुचीचा अभिनय क्षेत्रातला हा प्रवास किती खडतर होता हे गेल्या दशकातल्या तिच्या कारकिर्दीवर नजर टाकल्यास दिसून येईल. प्रभाकर पणशीकर निर्मित ’अवघा रंग एकचि झाला’ या नाटकातून सुरुचीने २००७ साली अभिनय क्षेत्राचा श्रीगणेशा केला. यानंतर ’उंच माझा झोका’, ’ओळख, ’कूंकु’, ’जन्मगाठ’, ’राम राम महाराष्ट्र’, ’लेक लाडकी या घरची’, ’पेहचान’, ’एक तास भुताचा’, ’आपलं बुवा असं असतं’, अशा नाना मालिकांतून ती सतत दिसत होती. या मालिकांनी तिच्यातला अभिनय जिवंत ठेवण्याचं काम केलं. मात्र, सुरुचीला ओळख दिली ती झी मराठीच्या ’का रे दुरावा’ या मालिकेनी. या मालिकेतली ’आदिती’ चांगलीच लोकप्रिय ठरली आणि सुरुची या मालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर घरघरांत पोहचली. आदितीने सुरुचीला प्रसिद्धी दिली, चेहरा दिला आणि बघता बघता तिचा चेहरा सातासमुद्रापारही सुपरस्टार झाला. या मालिकेनंतर सुरुचीने कमबॅक केलं ते झी युवाच्या ’अंजली’ मालिकेतून. मालिकेतली मध्यवर्ती भूमिका तरुणाईत चांगलीच लोकप्रिय ठरली आणि सुरुचीला तिच्या यशाचा आलेख चढता राखण्यात यश मिळालं.
सुरुचीने छोटया पडद्यावरच्या अभिनयाच्या अनुभवाच्या जोरावर रुपेरी पडद्यावरही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. ’मात’, ’नारबाची वाडी’, ’तथास्तु’ अशा मराठी आणि हिंदी सिनेमांतून तिचा अभिनय पाहायला मिळाला. मात्र ती लक्षात राहिली आदिती आणि अंजली या भूमिकांमुळेच. आदितीची भूमिका संपल्यानंतर आणि अंजलीच्या भूमिकेत वावरण्यापूर्वी सुरुचीने ’स्ट्रॉबेरी’ नाटकातून रंगभूमीवर काम बॅक करण्याचा प्रयत्न केला. परंतु तिला फारस यश आलं नाही.
साधारण २०१२ साली मला दिवाळी निमित्त विशेष शूट करण्यासंदर्भात विचारण्यात आलं होत. यासाठी मला मराठी चेहरा हवा होता. पारंपरिक वेशभूषा, मराठमोळा शृंगार असल्याने यासाठी आम्ही सुरुचीचा चेहरा निश्चित केला. मेकअप, हेअर, कॉश्च्युम हे सारं आधीच ठरलं होत. चंद्रकोर टिकली, नाकात नथ, गळ्यात, कानात दागिने असा मराठमोळा शृंगार सुरुचीवर फारच शोभून दिसत होता. तिच्या या लुकच्या सोबतीला दिवाळीसाठीच कंदील, दिव्यांच तोरण असं सगळं शूटसाठी वापरलं होत. सुरुची यावेळी फार नम्र होती. शूटच्यावेळी नम्रतेनं सर काही समजून घेऊन अदबीने बोलत होती.
या शूटनंतर सुरुचीच एका मराठी वृत्तपत्रासाठी शूट करण्याची संधी मला मिळाली. त्याकाळात सुरुची थोडी बिझी होती. परंतु ठरल्याप्रमाणे वेळ काढून सुरुची शूटला आली. मराठमोळ्या वेशातली सुरुची मी टिपली होती. वेस्टर्न लूकमधली सुरुची टिपण्यासाठी सुरुचीच दोन – तीन कौस्च्युममध्ये आम्ही शूट प्लॅन केलं. ठरल्याप्रमाणे सुरुची स्टुडिओला आली. सुरुवातीला सुरुचीचे काही पोर्ट्रेट मी टिपले. प्रत्येक चेहरा काहीतरी बोलतो. त्याला त्याची एक विशिष्ट अशी भावमुद्रा असते. त्यावर कितीही रंगरंगोटी केली तराही त्यातली सात्विकता बदलत नाही. आणि असा प्रयत्न केला तर ते खूप कुत्रिम वाटत. सुरुचीचा चेहरा तसा खूप भोळा, नम्र आणि पारंपरिक ठेवणीसाठी उत्तम आहे. हेच लक्षात घेऊन तिला फार मॉडर्न लूक न देता तिच्यातला साधेपणा, सहजपणा टिपण्याचा प्रयत्न मी करत होतो. सुरुचीचा वेस्टर्न लूक आणि तो ग्लॅमरस वाटावा म्हणून लाइटिंगची वेगळी योजना स्टुडिओत केली. तिचा हा लूक तिच्या हावभावातून न दाखवता लाईटिंगच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न होता.
कॅमेयाच्या समोर लाईट ठेवून फोटो टिपण हे खरंतर शास्त्रानुसार चुकीचं मानलं जात. मात्र या शूटसाठीची हि गरज होती. या लाईटिंगमुळे एक ड्रमॅटिक लाईट मला मिळवता आला. कॅमेयाच्या लेन्सवर आलेल्या ग्लेअर्समुळे हा लाईट इफेक्ट आणखी सुंदर वाटत होता. या लाईटिंगमध्ये निळ्या – गुलाबी रंगाची शेड असलेले काही फोटो मी टिपले. यानंतर स्टुडिओत सुरुचीचे काही पोट्रेट आणि कँडिड फोटो टिपण्यात मला यश आलं. साधारणपणे पाच ते सहा तास हे शूट चाललं. सुरुची न कंटाळता, न थकता शूट करत होती. शूटच्यावेळी सुरुची फारच मदतशीत असल्याने शूटसाठीच दडपण माझ्यावर नव्हतं.
सुरुचीने नाटक, मलिका आणि सिनेमा अशा तिन्ही क्षेत्रात आपला ठसा उमटवला. कलाकृती किती गाजल्या यापेक्षा त्यातली सुरुचीची भूमिका, तिचा अभिनय हा किती उंचीचा होता हे तिला पुढे मिळत गेलेल्या अभिनयाच्या संधीवरून समजतं. सुरुचीला नेमकं काय करायचंय हे तिला माहित असतं. परंतु नवीन कलाकृतीला ती नाही म्हणत नाही. कारण त्यातली आव्हानं पेलण्याची तयारी तिने केलेली असते. सुरुचीच्या याच अभिनयातल्या सातत्यामुळे, तिने जपलेल्या नीतिमूल्यांमुळे आणि आव्हानं पेलण्यासाठी नेहमीच दाखवलेल्या तयारीमुळे गेल्या बारा वर्षांत सुरुचीच्या अभिनयाच्या प्रवासानं जोरदार वेग पकडलाय.
धनेश पाटील
Leave a Reply