मित्रमैत्रिणींनो,
पत्रकार…तुमच्या भाषेत जर्नालिस्ट… आजच्या करिअरच्या जगात महत्त्वाचा ऑप्शन म्हणून निवडलं जाणारं क्षेत्र. कदाचित तुमच्यापैकी अनेक जण ह्या क्षेत्रात येण्यासाठी उत्सुक असतील. ह्या क्षेत्रात जरूर या. ह्या क्षेत्रात भारंभार करिअरच्या वाटा खुल्या आहेत. ई-जगतात तुमचा अधिक वापर असल्यामुळे त्याबद्दल मी तुम्हाला अधिक सांगणार नाही. कारण तुमच्या हातातल्या मोबाईलमध्ये माहितीचा खजिना आहे.
आमचं पत्रकारितेचं क्षेत्रही माहिती, मनोरंजन आणि ज्ञानाचा प्रसार करण्याचं क्षेत्र आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात वृत्तपत्रं निघाली ती प्रामुख्याने ब्रिटिशांच्या अन्यायविरोधात जनतेला जागं करण्यासाठी. यथावकाश वृत्तपत्रं बदलत गेली. पण लोकांना माहिती देण्याचं काम आजही ती करत आहेत. ९० च्या दशकानंतर खुल्या झालेल्या जागतिकीकरणाने झालेल्या परिणामाची सकारात्मक, नकारात्मक झळ वृत्तपत्रसृष्टीलाही बसली. २०००च्या दशकात इलेक्ट्रॉनिक वृत्तवाहिनीचा शिरकाव झाला आणि वृत्तपत्रं व वाहिन्या ह्यांत स्पर्धा सुरू झाली.
मी अहमदनगरसारख्या ग्रामीण भागातून आले आहे. तिथे लोकमान्य टिळकांच्या ‘केसरी’ त आणि नगर शहरातलं प्रमुख सायंदैनिक असलेल्या ‘समाचार’मध्ये मी प्राथमिक धडे गिरवले. त्यामुळे ग्रामीण आणि महानगरीय तसेच फॅक्स ते संगणकीय पत्रकारिता असा माझा प्रवास झाला आहे. म्हणूनच पत्रकारितेविषयी माझा अनुभव सांगत तरुणाईला ह्या क्षेत्रात येण्याचं आवाहन मी करते आहे.
पत्रकारितेची मला मुळातच आवड होती म्हणूनच अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून मी ह्या वाटेवर चालत आले आणि अनेक संकटं, अडचणी पार करून गेली २०-२२ वर्षं इमानेइतबारे काम करते आहे. कारण आज मी आजूबाजूला जे पाहते आहे त्यात ग्लॅमर म्हणून ह्या वाटेवर येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. केवळ ग्लॅमर किंवा पत्रकारांना समाजात मिळणारं स्थान म्हणून ह्या क्षेत्रात आलं आणि तुमची कष्ट, मेहनत करण्याची तयारी नसली की, काहींचा भ्रमनिरास झालेला मी पाहिला आहे. त्यामुळे तुम्ही पत्रकारितेचं औपचारिक शिक्षण घ्याल तेव्हा अथक मेहनतीची तयारी ठेवा.
आता पत्रकारितेचं क्षेत्र वृत्तपत्रीय, वाहिन्यांमधील पत्रकार एवढंच मर्यादित नाही. सरकारी तसंच विविध खाजगी आस्थापना, संस्था ह्यांमध्ये जनसंपर्क अधिकारी, डिजिटल क्रांतीमुळे समाजमाध्यमं हाताळण्यासाठी पत्रकारांना प्राधान्य दिलं जातं. शिवाय प्रूफ रीडर, समालोचक, फोटो जर्नालिस्ट, मीडिया संशोधक, स्क्रिप्ट रायटर, क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझर, कन्टेन्ट डेव्हलपर, मीडिया प्लॅनर, प्रॉडक्शन वर्कर्स, फ्लोअर मॅनेजर्स, साऊंड टेक्निशियन, कॅमेरा कामगार, प्रेझेंटर्स, ट्रान्समिशन एक्झिक्युटिव्ह, अनुवादक, कॉपीरायटर… अशा अनेक वाटा आहेत. त्याचबरोबर राजकीय व्यक्ती, कलाकार ह्यांना विविध माध्यमात प्रसिद्धी देण्यासाठी प्रसिद्धी अधिकारी हवे असतात. अर्थार्जनासाठी एवढी दालनं खुली आहेत. मात्र कोणत्याही संस्थेत पत्रकार म्हणून काम करताना, वावरताना तुम्हाला काही गोष्टी अंगी बाणाव्याच लागतील. मी वर सांगितलं तसं कष्ट करायची तयारी तर हवीच पण समाजाशी बांधिलकी, सत्य मांडण्याची, त्याचा पाठपुरावा करण्याची चिकाटी अंगी असणं आवश्यक आहे.
वास्तव आणि सत्याची नाळ हे पत्रकारितेचं खरं इंगित आहे. तुमच्यातील सामाजिक बांधिलकीचं भान जिवंत ठेवलं तर अनुभवाने समाज, सत्य आणि पत्रकार म्हणून ह्यांची नाळ जिवंत ठेवण्याचा तुमचा प्रयत्न काही अंशी तरी यशस्वी होऊ शकतो.
पत्रकाराची नोकरी १० ते ५ किंवा ९ ते ६ अशी घडाळ्याच्या काट्यावर कधीच नसते. पोलिसासारखं तुम्हांला २४ x ७ जागृत राहावं लागतं. कधी, कुठे, काय घडेल, ते तुम्हांला लोकांपर्यंत तातडीने पोहचवावं लागतं. स्पर्धेमुळे तुम्हांला अधिकच सतर्क, अलर्ट राहावं लागतं. अर्थात कामाची विभागणी असली तरी सध्या समाज एवढा संवेदनशील झाला आहे आणि निसर्ग, परिस्थिती ह्यांत एवढे बदल झालेले आहेत की, एका घटकाचा दुसऱ्या घटकावर लागलीच परिणाम होतो. त्यामुळे एखाद्या आपत्तीच्या घटनेची बातमी दुसऱ्याने दिली तरी तुमच्या कामाच्या भागात (बीट) झालेल्या बदलाची नोंद तुम्हाला टिपावी लागते.
समाजमाध्यमामुळे हे भान अधिक वेगाने जपावं लागतं. समाजमाध्यमाच्या वाढत्या प्रसारामुळे पत्रकार म्हणून काम करताना तुम्हांला आणखी एक भान अत्यंत जबाबदारीने सांभाळायचं असतं ते म्हणजे माहितीची वस्तुनिष्ठता. सत्य पारखून घ्यावं लागतं. कारण आता तळागाळापर्यंत माहितीचं महाजाल पोहचलेलं आहे. कधी हेतूतः, कधी अर्धवट माहितीच्या आधारे, कधी विकृत भावनेने, कधी गैरसमजातून काही संदेश पेरले-पसरवले जातात. तेव्हा पत्रकार म्हणून काम करताना तुमचा कस लागतो. खरी माहिती मिळवून ती जनतेपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी तुमची आहे. त्याद्वारे तुम्ही जनतेचा विश्वास अबाधित ठेवू शकता. मात्र त्यासाठी कमी वेळेत तुमच्या संपर्कांचा योग्य वापर करण्याचं भान तुमच्याठायी असावं लागतं. बातमीची शहानिशा करून ती योग्य शब्दांत प्रसिद्ध करणं हे पत्रकाराचं कर्तव्य आहे. निर्भयता हा एक महत्त्वाचा गुण पत्रकाराच्या अंगी असावा लागतो. कुणाच्या दबावाला त्याने बळी पडता कामा नये.
भाषेचा मुद्दाही महत्त्वाचा आहेच. आपल्या जगण्यातील भाषेवर महानगरीय सरमिसळ संस्कृतीचा प्रभाव होत असला तरी प्रमाण भाषा आणि तिचा यथायोग्य वापर पत्रकाराला करता यायलाच हवा आणि त्यासाठी एक चांगला वाचक आणि एक चांगला श्रोता पत्रकाराने असणं आवश्यक असतं.
पत्रकारितेतल्या अनेक दिग्गजांनी खूप चांगलं पेरून ठेवलं आहे. ती नाळ तशीच ठेवण्याची, समाजाच्या विश्वासाला पात्र ठरण्याची जबाबदारी पत्रकारावर असते. ह्या अत्यंत जबाबदारीच्या क्षेत्रात येताना आत्मविश्वास, पुरेसा अभ्यास, कष्टाची तयारी, सामाजिक बांधिलकीसोबत असू द्या.
-अनुपमा गुंडे
Leave a Reply