चित्रपट जगप्रसिद्ध बंगाली दिग्दर्शक सत्यजित रे यांची पत्नी बिजोया रे तिने आपल्या वयाच्या ८४ व्या वर्षी आपल्या आठवणी लिहायला सुरुवात केली. त्या २००३ ते २००४च्या दरम्यान ‘देश’ या बंगाली मासिकातून ३७ भागात क्रमशः प्रकाशित झाल्या. नंतर त्या पुस्तकरूपात बाजारात आल्या.
बिजोया रे यांना रोजनिशी लिहिण्याचा छंद होता. त्या दररोजच्या घटना अगदी बारीकसारीक तपशीलांसह रोजनिशीत नोंदत असत. त्यामुळे त्यांनी व्यतीत केलेल्या ८० वर्षांपेक्षा अधिक असलेल्या त्यांच्या आयुष्य आणि कालाविषयी त्या सविस्तरपणे लिहू शकल्या. त्या सर्व हकीकतींना त्यांनी नाव दिले ‘आमादार कथा’ (आमची गोष्ट). मूळ बंगालीत लिहिलेल्या या पुस्तकाचे इंद्राणी मजुमदार या लेखिकेने अत्यंत काळजीपूर्वक आणि मूळ लिखाणाच्या छटा पकडून इंग्रजीत भाषांतर केले. त्यामुळे ते अधिक विस्तृत प्रमाणावर असंख्य वाचकांच्या वाचनात येऊ शकले.
अखंडपणे वाचन करणाऱ्या बिजोया रे या मनाने मोकळ्या, स्वतंत्र वृत्तीच्या, आणि साहसाची आवड असणाऱ्या आहेत. माणिकमध्ये (सत्यजित रेंना त्यांचे कुटुंबीय आणि जवळचा मित्रवर्ग याच ना-वाने अधिकपणे ओळखत असे.) मन गुंतण्यापूर्वी बिजोयांचे दोन वेळा वाङ्निश्चय झालेले होते. दोन्ही वेळा त्यांनीच या दोन प्रियकरांना निवडले होते. परंतु दोन्ही वेळा त्यांनी ‘ठरलेले’ मोडून टाकले होते. कारण त्यांना हे संबंध काही उपयोगाचे नाहीत, असे उमजून आले होते. अखेरी त्यांनी आपला एक मित्र त्याचबरोबर जवळचा नातलग असलेल्या माणिकशी जमविले.
त्याविषयी त्या लिहितात, ‘आम्ही दोघे एकत्र बसून (पाश्चिमात्य अभिजात) संगीत ऐकत असू. त्यातूनच मग आमच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. ‘ प्रेमात पडलेल्या या दोघांचे दिवस जसे भारलेले होते तसेच बिकटही होते. बिजोयांच्या घरच्यांना सत्यजित रेंचे स्थळ तितकेसे पटलेले नव्हते म्हणून बिजोयाच्या भोवती जे बरेच ‘लायक’ उमेदवार होते, त्यापैकी कुणी एक तिने निवडावा, असे त्यांचे प्रयत्न चालू होते. आपल्या घरच्या लोकांच्या मागणीपुढे तिने मान तुकविली नाही. परंतु आपले आर्थिक स्वातंत्र्य दुरावले जाऊ नये म्हणून तिने आपली नोकरी चालू ठेवली. एवढेच नव्हे तर अभिनयक्षेत्रात काही भूमिका वगैरे मिळविण्याची तिने खटपट केली. परंतु मनापासून नाही. कारण तिच्या मनाचा कल त्या व्यवसायाकडे नव्हता. त्यात पुन्हा सत्यजित रेंना ते पसंत नव्हते.१९४८ च्या ऑक्टोबर महिन्यात बिजोया आणि सत्यजित यांनी मुंबई येथे काही गाजावाजा न करता नोंदणी पद्धतीने विवाह केला.
पुढल्या वर्षी ब्राह्मो समाजाच्या रीतीरिवाजाप्रमाणे त्या दोघांनी लग्न केले. या विवाहाला सत्यजित रेंच्या आईने जी बिजोयाची दूरची आत्याही लागत होती – मोठ्या नाखुशीने या संमती दिली.
सत्यजित रे हे केवळ अपवादभूत चित्रपट निर्माते नव्हते तर ते असाधारण असे लेखक, चित्रकार आणि संगीतकारही होती. ‘संदेश’ हे नावाजलेले आणि मातब्बर असे लहान मुलांचे मासिक होते. त्याचे पुनरुज्जीवन त्यांनी केले. विशीच्या वयाच्या तरण्यांसाठी त्यांनी भरपूर ललित लिखाण केले. फेलुदा हे डिटेक्टिव पात्र आणि शोंकू हा विज्ञान काल्पनिकांचा नायक ही दोन्ही पात्रे बंगाली भाषेत चांगलीचं सुपरिचित आहेत.
बिजोया रेंनी लिहिलेल्या आठवणींमध्ये सत्यजित रेंच्या चित्रपट कारकिर्दीविषयी इत्थंभूत माहिती आलेली आहे. परंतु त्यांच्या ललित गद्याविषयी आणि चित्रकलेविषयी मात्र त्रोटक उल्लेख आलेले आहेत, ही गोष्ट सत्यजितच्या जाणकारांना निराशाजनक वाटते. सत्यजित रेंनी लिहिलेल्या पुस्तकांचे मानधन रे कुटुंबियांना भरपूर प्रमाणात मिळत असते. चित्रपटांचा पैसा मात्र फारसा नाही. कारण सत्यजित रेंचे जवळजवळ सर्वच चित्रपट खूप नावाजले गेले परंतु त्यांनी पैसा मात्र फारसा ओढला नाही. बिजोया रेंच्या या आत्मचरित्रात छोटे-छोटे किस्से, व्यक्तिचित्रे यांची अगदी लयलूट आहे. सत्यजित रेंचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या विस्तृत कारकिर्दीविषयी ज्यांना भरपूर जानपहचान आहे, हे पुस्तक वाचताना भरपूर आनंद मिळू शकेल. पुस्तकाच्या प्रारंभीच्या प्रकरणांमध्ये सत्यजित रे आणि बिजोया यांच्या निकट साहचर्याचे वर्णन आले आहे. त्यांतून सत्यजित यांच्या निर्मितीक्षम विकासाचा आलेख मिळतो. तो वाचक म्हणून आपले लक्ष वेधून घेतो. सत्यजित आणि बिजोया यांचे बौद्धिक आणि मानसिक पातळीवर होणारे स्थित्यंतर आपल्याला पाहायला मिळते. त्यांनी आंतरराष्ट्रीय प्रवास कसा केला, संगीत, कला आणि चित्रपट यांच्या जगाशी त्यांचा परिचय आणि जवळिक कशी झाली याच वृत्तान्त वाचताना मन रमून जाते. इंग्लंड आणि यूरप यांचा त्यांनी केलेला पहिला प्रवास विशेष वाचनीय ठरला आहे. नंतरच्या प्रकरणात सत्यजित रेंच्या देदीप्यमान कार्य कर्तृत्वाचा काळ आला आहे तर बिजोया हळूहळू सत्यजित रेंच्या संसारात कशी गुंतत गेली याचा इतिहास आलेला आहे. हा भाग मात्र तितकासा वाचनीय झालेला नाही. संदीप नावाच्या या दोघांच्या मुलाच्या जन्मानंतर जो मजकूर वाचायला मिळतो तो कंटाळवाण्या अशा तपशिलांनी पूर्ण भरलेला आहे सत्यजित रे यांच्या जीवनात दुसरी स्त्री आली. त्यांचे विवाह बाह्य असे संबंध निर्माण झाले. या विषयीचा मजकूर देताना भान ठेवायला हवे होते ते बिजोया रेंनी ठेवले नाही. तेवढा मात्र दोष या आत्मचरित्रात आढळतो.
Leave a Reply