माणसाचं मन असतं कुठे? त्यात काय, काय असतं? ते सगळं आपल्याला कळतं का? माणूस मनाचा वापर करतो, की मन आपल्यावर स्वार होतं? असे एका ना दोन अनेक प्रश्न प्रदीर्घ काळ माझं मन कुरताडत असतं. अस्वस्थ करीत असतं. माझ्या वयाच्या अकराव्या वर्षी मी पहिली चोरी केली. एका पानटपरीवाल्याचे आठ रुपये पंचेचाळीस पैसे मी लांबविले. ती घटना मी विसरलो, असं समजत होतो. नित्यजीवनावर त्या घटनेचे काही परिणामही जाणवत नव्हते; पण दहा वर्षांच्या कालावधीनंतर जेव्हा मी त्या पानवाल्याकडे या चोरीची कबुली दिली, त्याचे पैसे दामदुपटीने परत केले तेव्हा कळलं, की माझी चोरी त्याला त्याचवेळी ज्ञात होती. तो काही बोलला नव्हता. त्या दहा वर्षांत त्यानं कधीही या घटनेची आठवणही मला करून दिलेली नव्हती. मी चोर नाही, माझा सद्सद्विवेक जागा आहे, असा त्याचा विश्वास होता. एका अर्थानं चूक कबूल केल्यानंतरही तोच जिंकला होता. एक साधा पानवाला; पण मनाच्या नीतळपणाची साक्ष तो अजूनही मला देत असतो. माझी ही कथा मी एकदा लिहिली आहे, पुन्हाही लिहीन; पण सांगायचा मुद्दा असा, की माझ्या मनाचा थांग, त्याच्या मनाचा थांग मला नाही घेता आला. त्याच्या मनाच्या विश्वासाचा आधार त्यालाही सांगता आला नाही, मलाही शोधता आला
नाही. माणूस हा केवळ माणूस नसतो, तो सातत्यानं बदलत असतो. वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वात रूपांतरित होत असतो. त्याचं एखाद व्यक्तिमत्त्व आपण पकडून ठेवू पाहतो अन् मग कदाचित फसगत होते किंवा अपेक्षाभंगही! एक उनाड मुलगा, एक संस्काराच्या अभावात वाढलेला तरुण, एक कष्ट घेणारा पत्रकार, दुहेरी व्यक्तिमत्त्व बाळगणारा अधिकारी, एक आध्यात्मिक शोधक, एक संशयात्मा, एक अंधश्रद्धा विरोधक आणि एक श्रद्धाळू अशा अनेक व्यक्तिमत्त्वांची मालिका जेव्हा मला माझ्यातच गवसू लागते तेव्हा मनाचा व्यापार किती
अंतहीन आहे याचीच साक्ष
पटू लागते.
मन म्हणजे माहिती, क्रिया, प्रतिक्रिया, भाव-भावना यांचा एक साठा होय, असं माझे गुरू म्हणतात. खरंतर ते तुमच्यापुरतं मन आहे असं तुम्हाला वाटतं; पण तेही या ब्रह्मांडाच्या माहिती, क्रिया, प्रतिक्रिया, भाव-भावना यांचाच एक भाग असतं. त्याचं भान माणसाला अभावानंच असतं. आईच्या गर्भात आईच्या भावभावना स्वीकारीत आणि त्यावर प्रतिक्रिया देत मनाची उभारणी होते आणि `मी’च्या निर्मितीबरोबर त्याचा पेटारा अधिक कणखर होत राहतो. मी, माझ्या भावना, माझं मन, माझा स्वार्थ, माझे हितसंबंधी, माझ्या निस्वार्थतेच्या कल्पना आणि त्यात स्वतला शाबासकी देणाराही मीच. एकदा का हा `मी’ आकार, विकार, भावनांनी पुष्ट झाला, की मग सुरू होते ती दुःखाची मालिका. कारण माझं मन मला आता तू दुःखी हो, मत्सरी हो, संताप प्रकट कर हे सतत सांगत असतं. मी काय करावं यापेक्षा त्यानं काय करावं, काय करायला हवं यावर माझ्या आनंद-दुःखाच्या तीव्रता व्यक्त होऊ लागतात. माझा रोज भेटणारा सहकारी वरच्या पदावर गेला, की त्याला का? मला का नाही? या प्रश्नातून दुःख भळभळू लागते. त्याच्या आनंदात आनंदी होतानाही मन माझ्या हितसंबंधांचा अधिक विचार करू लागतं. मला परमेश्वरानं निसर्गदत्त आनंदी राहण्याचं वरदान दिलेलं असतानाही मग मी दुःखाचा
शोध घेऊ लागतो, ते कुरवाळू लागतो, अस्वस्थ होऊ लागतो आणि त्याच्या परिणामाची पर्वाही न करता मनात येईल तसं वागूही लागतो.
गेले दोन दिवस मी अस्वस्थ आहे. कदाचित माझ्या सामूहिक मनाच्या भावभावनांचा तो आविष्कार असावा. मी अस्वस्थ आहे म्हणून मी नित्यकर्म सोडलेले नाहीत. कुटुंबात मी हसतो, खातो, पितो, खरेदीसाठी भटकतो, आनंद घेण्याचाही प्रयत्न करतो; पण मनाच्या कोपऱयात दडलेल्या त्या `का?’चं उत्तर मला सापडत नाही अन् मग मी पुन्हा अस्वस्थ होतो. माझ्या मनातलं हे तुमच्यापर्यंत पोहोचविताना आज प्रमोद महाजनवर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख टाळणं अशक्य झालंय. त्याच्या सख्ख्या भावानं – प्रवीणनं त्याला गोळ्या घातल्या. कोणत्या प्रेरणा होत्या प्रवीणकडे मनाच्या? त्यातल्या अस्वस्थततेच्या, संतापाच्या, अवहेलनेच्या, अपमानाच्या? मनाचं अनारोग्य अद्याप या थराला जाऊन कायद्यानं मान्य केलेलं नाही. त्याला वेडंच व्हावं लागतं; पण वेडाचं दुःख, वेदना या मनाच्या अनारोग्यापेक्षा का कमी असतील? मला नाही वाटत. कारण एखादी वेडी महिला जेव्हा `आग-आग’ ओरडत आपले कपडे दूर करू लागते तेव्हा विवस्त्र होण्याच्या लाजेपेक्षाही आगीची अनुभूती प्रखर ठरत असावी. अर्थात, तो माझा विषय नाही; पण माणसाचं मन
सुदृढ ठेवण्याची काहीच रीत अस्तित्वात नसावी का? नाही, असं म्हणता येत नाही. मनाशी प्रामाणिक संवाद असेल, तर मनाचं हे टोकाला जाणं थांबविता येत असावं. दुःखाचे कढ सौम्य होत असावेत. विजयी स्पर्धकाबद्दल ईर्षा करण्यापूर्वी त्याचे बुट घाला आणि धावा. मग कळेल, की त्या बुटांना कोठे बोच आहे अन् मग या बोचेसह त्या धावणाराचं कौतुक करायला मन तयार होईल; पण नेहमी असं होतंच असं नव्हे. नेहमी जे काही होतं ते आपण बातम्या म्हणून वाचतो अन् हे माझं नव्हे, हे माझ्यासाठी नव्हे, मी हा असा नव्हेच म्हणून आपण ते अव्हेरतो, नाकारतो आणि दुःख, वेदना, संताप, ईर्षा यांच्या मालिकेत स्वतला अडकवून घेतो.
प्रमोद आज त्याच्या शारीरिक आघातांचा सामना करतोय. तो त्यात यशस्वी होईल कदाचित होणारही नाही. प्रवीणचं काय? एखाद्याला या जगातून नाहीसं केल्यानं त्याची, त्याच्या दुःख, वेदना, असूया, अपमान, अवहेलना यातून मुक्तता होईल? कायद्यानुसार त्याचं जे व्हायचं ते होईल. निसर्ग नियमानं, मानवी प्रयत्नानं, आंतरिक बळानं आणि सदिच्छांनी प्रमोदचंही जे व्हायचं ते
होईल; पण स्वयंसंवादाचं काय? खरंतर प्रेम, दया, शांती, क्षमा, सद्भावना
या शब्दांना अर्थ देण्याची आज खरी गरज आहे. या अर्थातून कदाचित एक नवा प्रमोद अवतरले, एक नवा प्रवीण जन्म घेईल.
तुमच्या, माझ्या मनात कोणाबद्दलही टोकाचा द्वेष, असूया, तिरस्कार असेल, तर ही वेळ आहे त्यापासून मुक्त होण्याची… कारण त्यातूनच मनाचं आरोग्य साधणार आहे. प्रेम, दया, शांतता, सद्भावना यातून ज्यांची निर्मिती होते त्यालाच `सत्यम् शिवम् सुंदरम्’ म्हटलं जात असावं. काय निवडायचंय ते आपण ठरवायचं आहे!
श्री. किशोर कुलकर्णी हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते लोकमतच्या ऑनलाईन आवृत्तीचे बराच काळ संपादक होते. सध्या ते पुणे येथे वास्तव्याला आहेत. अध्यात्म या विषयावर विपुल लेखन.
Leave a Reply