सर्व प्राण्यांना जे काही नटवायचे ते निसर्गाने स्वतः:च नटविले आहे. पण मनुष्य प्राण्याला मात्र निसर्गाने दिलेले सौंदर्य अपूर्ण वाटते.अनादिकालापासून तो अधिकाधिक सौंदर्य प्रसाधनांच्या शोधात आहे. सौंदर्यवर्धक वस्तूंचा शोध आणि निर्मिती त्याने हजारो वर्षांपासून चालविली आहे. अगदी मोहेंजोदरो आणि हडप्पा , ईजिप्शियन, ग्रीक अशा पुरातन संस्कृतीतून त्याची बीजे दिसतात. निसर्गाने जे सौंदर्य द्यायचे ते त्याने सर्व प्राण्यांमधील नरांना दिले आहे. सुंदर दिसण्यासाठी त्यांने विविध प्राणी, पक्षी आणि कीटक यांच्यातील नरांना सुंदर रंग,पिसारा,तुरे,आयाळ,आवाज,आकार दिलेले आहेत. पण मनुष्य प्राण्याने मात्र हे असे निसर्गदत्त सुंदर दिसणे नाकारून स्वतः कांही वेगळी परिमाणे निर्माण केली. त्यानुसार तसे सुंदर दिसणे त्याने मुख्यत्वेकरून स्त्रीकडे सोपविले आहे. त्यामुळे साहजिकच सर्व प्रकाशझोत हे स्त्री सौन्दर्य साधनांवर वळतात. आज जागतिक पातळीवर सौन्दर्य साधनांची व्यावसायिक बाजारपेठ अब्जावधी रुपयांच्या पलीकडे आहे.
आपल्या आजच्या कित्येक सौन्दर्य साधनांची कालपरवांची आवृत्ती मात्र फार मनोरंजक होती. आज पैसा आणि नवनवीन वस्तूंची उपलब्धता या दोन्ही गोष्टी मुबलक आहेत प्रामुख्याने ” घ्या, वापरा आणि फेकून द्या ” असा कल आहे .
पण कालपरवा असे नव्हते. तेव्हां या केवळ “वस्तू” नव्हत्या. त्या वापरणाऱ्या स्त्रीच्या अनेक भावनांचा, आठवणींचा सुंदर गोफ त्याभोवती विणलेला असे. सामाजिक संदर्भ होते, उपयुक्तता होती. वैविध्य होते. गेल्या पिढीतील अशाच काही परिचित तर काही पूर्ण अपरिचित अशा सौन्दर्य प्रसाधनांची आणि वेगळ्या अशा काही गोष्टींची ही ओळख आणि स्मरणरंजनही !
फणी करंडा पेटी किंवा ऐना पेटी — स्त्री साजशृंगाराची ही महत्वाची ठेव. सागवानी पेटीत झाकणाच्या आतल्या बाजूला आरसा बसविलेला असे आणि त्यातील विविध खणांमध्ये कुंकवाचा करंडा, फणी, काजळाची डबी,( सुरमा डबी), केसात खोवायचे आकडे, कांचेच्या बांगड्या अशा वस्तू असत. कुंकवाचा करंडा हा पितळी किंवा चांदीचा असे. या करंड्याचे दोन भाग असत. वरच्या भागात छोटा गोल आरसा आणि नैसर्गिक मेण तर खालच्या भागात पिंजर / कुंकू असे. काजळाची डबी सहसा चांदीची असे. त्यावेळी काजळ घरीच बनविले जात असे. पूर्वी सर्वसाधारणतः स्त्रियांचे केस जाड, लांब, घनदाट असायचे. त्यामुळे कंगव्यापेक्षा फणीचा वापर अधिक होई. ही फणी चांदणी किंवा कडुलिंबाच्या लाकडाची असे. ऐपतीनुसार हस्तिदंती, चांदीच्या मुठीचीही असे. आज आपला देश अन्य प्रगत राष्ट्रांचे उपग्रह लीलया आकाशात सोडण्याइतका प्रगत आहे. पण तेव्हा केसात खोवायचे आकडेसुद्धा ” Made In England ” असत. रोजच्या वापरातील बांगड्यांचा यात एक कप्पा असे. अंबाड्यात खोचायची फुले ( चांदीच्या फुलांच्या लांब आकड्यांना सोन्याचा मुलामा दिलेला असायचा ) एका खणात असत.
एक गंमत म्हणजे अनेक पेट्यांना अंगचेच चांगले कुलूप असे. या पेटीची मालकीण या कुलुपाची किल्ली एखाद्या गोफात किंवा लोकरी धाग्यात घालून गळ्यात घालून ठेवीत असे. अगदी त्या वेळीसुद्धा, आजच्या मालिकांमध्ये दाखवितात तशा एकमेकींच्या वस्तू चोरून वापरल्या जात. मग एकमेकींवर आरोप — खरंखोटं — साक्षीपुरावे असेही होई. म्हणून मग कुलुपाच्या पेट्या सुरक्षित वाटत. त्यावेळी प्रामुख्याने वस्तुविनिमय ( बार्टर सिस्टीम ) चालत असल्याने लोकांकडे रोकड कमी असे. बाईला तर स्वातंत्र्य कमीच असे. मग अशा पेटीत माहेरून मिळालेला एखादा चांदीचा रुपया जपून ठेवलेला असायचा. एखाद्या साधुपुरुषाचा अंगारा असायचा. लहानपणची एखादी आठवण असायची.माझ्या आजीने सांगितलेली सुमारे ८०- ८५ वर्षांपूर्वीची एक आठवण अगदी आठवणीत राहण्यासारखीच आहे. तिच्या एका मैत्रिणीच्या पेटीत मुचकुंदाचे एक वाळलेले फुल होते. शेजारच्या वाड्यातील एका मुलाने तिला ते दिले होते. नंतर या मैत्रिणीचे १० व्या वर्षीच दुसरीकडे लग्न झाले आणि हा फूल देणारा, पुढे सैन्यात भरती झाला. दोघांची पुन्हा भेट झालीच नाही. पण ते मुचकुंदाचे फूल मात्र या पेटीत कायमची आठवण होऊन राहिले होते.
अशी ही फणी – करंडा पेटी आणि आजची व्हॅनिटी बॉक्स म्हणजे आजी आणि नात म्हणावी लागेल पण आज या नातीला अशा भावना चिकटलेल्या असतील का ?
शृंगार डबी– आजच्या ‘मेक अप कॉम्पॅक्ट ‘ ची पूर्वज म्हणजे “शृंगार डबी”.. मधोमध लांब दांडीचा आरसा. त्या आरशाच्या मागेपुढे दांडीवरच बसविलेले आणि सरकवून उघडता येणारे दोन खोलगट गोल. या दोन खोलगट भागात कुंकू आणि काजळ असायचे आणि पाहायला छोटा आरसा.या दोन गोलांच्या बाहेर शृंगाराची द्योतक अशी राघूमैनेची जोडी. सगळ्या भागांवर छान कोरीव काम . सहजपणे कुठेही अडकवायला टोकाशी एक छानसा आकडा ! पूर्वी चेहेऱ्याला लावायला पावडर, क्रीम्स, लोशन्स, लिपस्टिक अशा काही गोष्टी नसल्याने कुंकू, काजळ आणि आरसा या तीन गोष्टीच महत्वाच्या होत्या.
केस वाळवणारे आणि गुंता सोडविणारे आकडे- ( Hair dryer and untangler )-
पूर्वी आपल्या देशात स्त्रियांना पडणारी अंगमेहेनतीची कामे आणि हवामान लक्षात घेता डोक्यावरून स्नानाची पद्धतच होती. दक्षिण भारतात तर स्त्रिया डोक्याला रोज तेल लावून स्नान करीत. नदीत डुबकी मारून स्नान करतांना डोकं भिजणे अनेकदा अपरिहार्य ठरे. मग हे दाट आणि लांबलचक केस वाळवायचे कसे ? कडक उन्हात केस वाळविणे शक्य नसे. नाहताना केसांच्या होणाऱ्या गाठी सोडविणे आणखी त्रासदायक. यासाठीच पूर्वी असे आकडे वापरले जात असत. हे आकडे दणकट आणि पितळेचे किंवा चांदी, तांबे इ. धातूंचे असत.त्यावेळी बहुतांशी स्त्रियांचे केस भरघोस आणि बळकट असल्याने लाकडी किंवा हस्तिदंती आकडे टिकत नसत . २ किंवा ३ काट्यांचे हे आकडे ओल्या केसांतून सतत फिरवत राहिल्याने गुंतलेले केस सुटायला आणि केस वाळायलाही मदत होई. अत्यंत कलात्मकतेने घडविलेल्या या आकड्यांवरील नक्षीकाम आणि त्यांच्या कलात्मक मुठी पाहण्यासारख्या असत. ओलसर तेलकट हाताने वापरताना हा काटा हातातून निसटू नये म्हणून मुठीला खास कंगोरे ठेवलेले असत. काट्यांवर कलाकुसर करता आली नाही तरी मुठींवर मात्र फुले, महिरपी, मोर, पोपट, मोरपीस, अप्सरा,यक्षिणी,नर्तिका इ. कोरलेल्या असत. सोबतच्या आकड्यांवर अप्सरांच्या अत्यंत रेखीव मूर्ती कोरलेल्या दिसतात.
धूप-पळी- – वाळलेल्या केसांना सुगंधित करण्यासाठी केसांना धुरी दिली जाई. धुपाटणे, धूपदाणी, लांब दांडीच्या पळ्या इ.चा वापर केला जाई. यात निखारे ठेऊन वर चंदन, धूप, ऊद, नागरमोथा. गव्हलाकाचरी इत्यादी पदार्थांचे चूर्ण टाकल्यावर धूर निर्माण होई. ह्या धुरावर केस धरले जात. त्यामुळे केस कोरडेही होऊ लागत आणि सुगंधी धुरामुळे केसांनाही सुगंध येई. अशा धुरजनक गोष्टी सौम्य जंतूनाशकही असल्याने केसांसाठी ते वरदानच ठरे. दक्षिण भारतात अनेक ठिकाणी आजही केसांना अशा तऱ्हेने धुरी दिली जाते.
सोबतच्या चित्रातील लांब दांडीच्या हलक्या पळीमध्ये अशाच पद्धतीने निखारा आणि धूप, ऊद अशी सुगंधी पूड टाकून केसांना धुरी दिली जाई. ही पळी लांब केसांमध्ये, आतपर्यंत सहज पोचू शकत असे. दांड्याची लांबी आणि त्यावरील नक्षीमधील अनेक छिद्रे यामुळे हा दांडा लवकर तापत नसे. पळीवर खोदून आणि कोरून अशी दोन्ही प्रकारे सुंदर नक्षी काढलेली असून टोकावर पुन्हा छानशी अप्सरा आहेच.
वज्री– पायाच्या खोटेवर त्वचेचा जाड थर साचल्याने पायांच्या सौंदर्याला बाधा येते. पायांना भेगाही पडतात. त्यामुळे स्नानाच्या वेळी इथली त्वचा नरम झाल्यावर ती हलक्या हाताने घासून काढली जाई. या खोट-घासणीला ” वज्री ” म्हणतात. पितळ, चांदी, पंचधातू यापासून बनविलेल्या वज्रींवर अत्यंत कलात्मक अशा मोर, हत्ती,पोपट यांच्या जोड्या असत.आंघोळीचे पाणी आत अडकून राहू नये म्हणून तळाशी या वज्री जाळीदार असत. त्यात एखादी धातूची गोळी किंवा घुंगुर असल्याने त्वचेवर घासताना त्यातून छानसा आवाजही येई. या वज्रीच्या तळाला मुद्दाम तयार केलेला खरखरीत भाग ओल्या त्वचेवर घासून जाड थर काढून टाकला जाई. आजसुद्धा या कामासाठी प्युमीस स्टोन, टेराकोटा किंवा फायबर स्क्रबर वापरले जातात पण त्याना अशा वज्रींची सर नाही !
पानाचा आम्रडबा — भारताची पानविडा ( तांबूल) संस्कृती फार जुनी. ते एक व्यसन न मानता खानदानी शौक म्हणून मानला जाई. अगदी धार्मिक विधींमध्ये पानसुपारीला पहिला मान तर विडा उचलण्यावर शौर्याचे मोजमाप होई. मित्रमंडळीची बैठक पानसुपारीच्या भोवती फिरे. लावणीची बैठक, नृत्यांगनेची अदाकारी, संगीताची मैफिल, कवालीचा मुकाबला, शायरांचा मुशायरा, गायनाची जुगलबंदी या गोष्टी विड्याशिवाय रंगणेच अशक्य ! पूर्वी पुरुषांप्रमाणेच अनेक स्त्रियाही विडा खाण्याच्या शौकीन होत्या.त्यांच्यासाठी अत्यंत आगळेवेगळे आणि कलात्मक नजाकतीने पानडबे बनविले जात असत.
सोबतच्या चित्रात असाच हा एक आंब्याच्या आकाराचा पितळी पानडबा ! याच्या पितळी पानाच्या टोकाने विड्याच्या पानाला चुना लावायचा. त्याला बसविलेल्या घुंगुरामुळे नाजूक आवाज येई. नंतर छोट्या खणातल्या सुपारी,लवंग ,वेलची, कात अशा अन्य सर्व चिजा पानात भरायच्या. एक साग्रसंगीत विडा तयार .स्त्रीसुलभ विचार लक्षात ठेऊन या डब्याच्या झाकणाला एक छोटासा आरसाही आहेच ! त्यामुळे पान खाल्ल्यावर आपले ओठ किती रंगले हे लगेच पाहता येई. या आम्रडब्याशेजारचा मिथुन अडकित्ताही रंगत वाढविणारा आहे.
कट्यारीचा अडकित्ता — पान खाणाऱ्या शौकीन स्त्रिया नाजूक हाताने सुपारीही छान कातरतात. पण म्हणून त्यांनाच नाजूक समजण्याची चूक कुणी करायला नको. कारण सोबतच्या चित्रात दाखविलेला हा खास अडकित्ता ! या अडकित्त्यावर नाजूक कोरीवकाम असून त्याचा वेगळा घाट लक्षवेधक आहे. मात्र या अडकित्त्यापासून सावध ! एखाद्या संकटाच्या वेळी सुपारी कातरण्याचा हा छोटासा अडकित्ता क्षणार्धात एक जीवघेणे शस्त्र बनतो. त्याच्या दोन्ही मुठी उलट्या वळविल्या की स्वसंरक्षणाची कट्यार होत असे. स्त्रीच्या मुठीत उत्तमपणे बसणारी ही कट्यार तिचे संरक्षण करायला नक्कीच पुरेशी आहे .सोबतचे २ अडकित्ते हे पोलाद आणि जर्मन सिल्व्हर पासून बनविलेले आहेत.
चंची- सुंदर सुंदर पानडबे, नाजूक अडकित्ते, कलात्मक चुनाळी वगैरे गोष्टी अभिजनांना, चांगल्या आर्थिक स्तरातील मंडळींना ठीक आहेत. पण कष्टाची कामे करणाऱ्या आणि थोड्या कमी आर्थिक स्तरातील स्त्रियाही उत्तम अभिरुची जपत असत. त्यांची पानविड्याची कापडी चंची ही गोंडे, आरसे, घुंगुर, रंगीत काठ यांनी सजलेली असे. ४ / ५ खणांच्या या चंचीमध्ये कात, चुन्याची डबी, सुपारी आणि हो, चक्क तंबाकूसुद्धा असे. विड्याची पाने ताजी राहावी म्हणून मेणकापडाच्या छोट्या तुकड्यात गुंडाळून चंचीत ठेवत. चंचीच्या टोकाला लांब दोरी, घुंगुर व गोंडा असायचा आणि या दोरीने चंची गुंडाळून बांधली जाई. क्वचित याच दोरीला अडकित्ताही अडकविला जात असे. तर शेतात, वाडीत, मळ्यात अशा ठिकाणी काम करणाऱ्या स्त्रियांची चंची आकाराने छोटी, सहज कमरेला खोचता येणारी आणि याच सर्व पदार्थांनी सज्ज असे. अनेक स्त्रिया अशाच सज्जतेचा बटवा वापरीत आणि तो देखील कलात्मकतेने सजलेला असे.
तांबोळा — भारतात प्राचीन काळापासून चालत असलेली तांबूल संस्कृती आणि नंतरच्या मुगल राजवटीतील पान –हुक्का पद्धतीमुळे या दोहोंच्या संयोगाने समाजात त्यावेळी एक वेगळाच सार्वजनिक शिष्टाचार रुजला. छोट्याछोट्या बैठकीत पानविडा बनविण्याच्या सर्व पदार्थांनी सज्ज असे तबक फिरविले जाई. प्रत्येकजण आपला विडा आपल्या आवडीप्रमाणे बनवून घेई. बैठकीला जास्त मंडळी असतील तर तबक सहजपणे फिरविणे अडचणीचे होई. त्यामुळे विमान, मोटारी, गाडीचे इंजिन अशा आकारांचे आणि चाके असलेले पानाचे नाविन्यपूर्ण डबे अस्तित्वात आले. त्याला असलेल्या चाकांमुळे असे डबे एकमेकांकडे सरकविणे सोपे होई . काही पानडब्यांना तर सिगारेट व काड्यापेटी ठेवण्याची सोय असे व ash trey बसविलेला असे. अशा नाविन्यामुळे यजमानांची शान वाढत असे. याच कारणांमुळे अडकित्ते, चुनाळी, चुनपट्ट्या, कातगोळ्यांच्या डब्या, तयार विड्यांसाठी छोट्या डब्या.तस्त ( थुंकदाणी ), यांचे असंख्य कलात्मक प्रकार अस्तित्वात आले. त्यापैकी एक अत्यंत दुर्मिळ असा प्रकार म्हणजे ” तांबोळा ” !
एका कडीत अडकविलेल्या नारळासारख्या निमुळत्या कलशाला सर्व बाजूंनी साखळ्या सोडलेल्या असत. या प्रत्येक साखळीच्या टोकाला एकेक काटा आणि त्या प्रत्येक काट्यात ३ / ४ विडे अडकविलेले असत. आणखी काही तयार विडे वरच्या कलशात सज्ज ठेवले जात असत. एका वेळी पूर्ण तांबोळ्यात ६० / ७० विडे ठेवण्याची सोय असे. नृत्य किंवा गाण्याच्या मैफिलीत गाद्यागिरद्यांवर बसलेल्या शौकिनांना तबकाऐवजी तयार विडे अत्यंत रसिकतेने घेता येतील अशी सोय असलेला हा तांबोळा.! .. तांबूल धारण करणारा म्हणून “तांबोळा “.. बसलेल्या शौकिनांसमोरून हा तांबोळा फिरविला जाई आणि ते त्यातून सहजपणे विडा काढून घेत असत. साखळीच्या टोकाला बसविलेल्या घुंगुरांमुळे विडा काढून घेऊन साखळी सोडून दिल्यावर एक नाजूकसा आवाज येत असे.वरच्या कलशावर आणि त्याच्या झाकणावर सुंदर नक्षी पाहायला मिळते. तांबूल संस्कृतीतील हे एक अत्यंत वेगळं लेणं म्हणायला हवे.
सुरमादाणी- अधिकतर मुस्लीम स्त्रियांमध्ये डोळ्यांमध्ये काजळाऐवजी सुरमा घालण्याची पद्धत आहे. पुरुषही आपल्या डोळ्यात सुरमा घालतात. गरज आणि उपयोग वाढत गेला तसतसे सुरमादाण्यांमध्येही कलात्मक बदल होत गेले.
अनेक प्रकारच्या कलाकुसरीच्या सुरमादाण्या आणि कांड्या पाहायला मिळतात. सुरमादाणीच्या फिरकीच्या झाकणालाच एक नाजूक शलाका जोडलेली असे. तशाच वेगळ्या नक्षीदार कांड्याही असत. यावरील नक्षीकाम मुस्लिम धाटणीचे असले तरी बरेचसे आकार मासा,आंबा, कोयरी, पिंपळ पान असे असत. सोनेरी रंगापेक्षा रुपेरी चमकदारपणा अधिक लोकप्रिय असे. त्यामुळे पितळी सुरामादाण्यांना चांदीचा किंवा नंतरच्या काळात निकेलचा मुलामा दिला जाई.
सुरमादाणीच्या मागे किंवा जोडून एखादा छोटासा आरसाही असे. सुरमा घालायच्या कांड्या धरण्यासाठी मधोमध अगदी छोटीशी मूठ आणि दोन्ही बाजूंना निमुळती गुळगुळीत टोके असत. त्यामुळे एकाचवेळी दोन्ही डोळ्यांमध्ये सुरमा घालणे शक्य होई आणि टोकांच्या गुळगुळीतपणामुळे डोळ्यांना इजा होत नसे. आज नटनट्यांचे तात्काळ अनुकरण केले जाते. पूर्वी राष्ट्रीय नेत्यांचे अनुकरण केले जाई. महात्मा गांधींच्या कमरेला साखळीत एक डबी सारखे घड्याळ असे. त्याचेच अनुकरण करणारी, तशीच साखळी असलेली आणि वरती घड्याळ कोरलेली एक सुरमादाणी सोबतच्या चित्रात पाहायला मिळते. अन्य दोन सुरमादाण्या आणि कांड्याही तशाच आकर्षक आहेत !
आज आपल्या संस्कृतीतून अशा हजारो कलात्मक वस्तू वेगाने मागे पडून लुप्त होत आहेत. जुन्या लेख
ण्या,दौती, पेन स्टँड्स, वजने-मापे, पूजेची उपकरणी,स्वयंपाकाची साधने, भांडी, दिवे, पुस्तके, पोथ्या, मूर्ती, चित्रे, शिल्पे, शस्त्रे, नाणी, वाद्ये…. किती किती वस्तू.सांगायच्या ? . .. यादी पूर्ण होणारच नाही बदलत्या काळाबरोबर असे घडणारच. पण आज कित्येक उत्तमोत्तम आणि सांस्कृतिक ठेवा असलेल्या वस्तू जुन्या बाजारांमार्फत विदेशात जात आहेत. प्रत्येकाने आपल्या घरातील, जुन्या काळी वापरात असलेल्या, आपापल्या घराण्याचे वैभव असलेल्या, कुटुंबासाठी खास असलेल्या किमान ५ / ५ वस्तू तरी जपून पुढच्या पिढीपर्यंत पोचवीत राहिले तर हे सर्व वैभव आपल्या देशातच राहील.
इतिहास आणि फॅशन यांची नेहेमी पुनरावृत्ती होत असते. याही गोष्टी नवनवीन स्वरूपात पुन्हा येत आहेत. पण त्या तशाच्या तशा येणारच नाहीत. त्यामुळे आपल्याला याच वस्तू, एक अमोल सांस्कृतिक ठेवा म्हणून जपाव्या लागतील.
— मकरंद करंदीकर.
डी / १००२,विजयनगर सोसायटी,
स्वामी नित्यानंद मार्ग,
अंधेरी-पूर्व, मुंबई -४०००६९.
दूरध्वनी — ०२२ २६८४२४९०
दिव्यांचा संग्रह पाहायला मिळू शकतो का?
खूप छान माहिती सर..यातील खूप कमी गोष्टी माहिती होत्या..