नवीन लेखन...

सावरकर आणि पहिली विदेशी कपड्यांची होळी

७ ऑक्टोबर १९०५.. दसऱ्याचा दिवस होता तो. पण या दिवशी पुण्यात मात्र साजरी झाली ती होळी. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नेतृत्वाखाली साजरी झालेली ‘पहिली परदेशी कपड्यांची होळी’.

१९०२ मध्ये सावरकर शिक्षणासाठी पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयात दाखल झाले. नाशिकमधल्या तरुणांमध्ये क्रांतीचं स्फुल्लिंग चेतवण्यात यशस्वी झालेले सावरकर आता पुण्यातल्या तरुणांना क्रांतीची दीक्षा देणार होते. आपल्या लेखणी आणि वाणीच्या प्रभावानं त्यांनी पुणेकरांना जिंकलं होतं. राजकीय, सामाजिक सभा संमेलनांमध्ये सावरकरांचे विचार ऐकायला गर्दी होत होती. सावरकर हे स्वदेशीचे पुरस्कर्ते होते. स्वदेशीचा पुरस्कार म्हणजेच परदेशी मालावर बहिष्कार या विचारानं १ ऑक्टोबरला भरलेल्या सभेत सावरकरांनी देशबांधवांना विदेशी मालावर बहिष्कार टाकण्याचं आणि दसऱ्याच्या दिवशी परदेशी कपड्यांची होळी करण्याचं आवाहन केलं. सभेच्या अध्यक्षस्थानी साहित्यसम्राट न. चिं. केळकर होते. काळकर्ते शिवरामपंत परांजपे सभेला उपस्थित होते. सर्वांनीच सावरकरांच्या कल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कपडे जाळून वाया घालवण्यापेक्षा, ते कपडे गरिबांना वाटून टाकावेत असा विचार न. चिं. केळकरांनी मांडला. पण सावरकरांना हा विचार पटला नाही. या होळीची इंग्लंडपर्यंत पोहोचणारी धग सावरकरांना जास्त महत्वाची वाटत होती. या सभेच्या दिवशी लोकमान्य टिळक पुण्यात नव्हते. ते परत येताच सावकारांनी टिळकांना आपली योजना सांगितली. टिळकांनी त्याला मान्यता दिली पण थोडेथोडके नाही तर ढिगानं कपडे गोळा झाले पाहिजेत अशी अट घातली.

सावरकरांनी ती अट मान्य केली. आपल्या संघटन कौशल्यानं सावरकरांनी अनेक तरुणांना या कार्यासाठी उद्युक्त केलं, ढिगावारी कपडे जमा झाले. ते कपडे भरलेल्या गाडीची मिरवणूक निघाली. मिरवणुकीच्या शेवटच्या टप्प्यात लोकमान्य टिळक मिरवणुकीत सहभागी झाले. लकडी पुलापलीकडे होळी पेटणार होती. टिळकांनी सुचवलं की होळीच्या ठिकाणी भाषणं न घेता ती दुसऱ्या ठिकाणी घ्यावीत. सावरकरांना हे मान्य नव्हतं. होळीसमोर भाषणं झाली नाहीत तर त्याचा अपेक्षित परिणाम साधणार नाही हे सावरकरांचं म्हणणं टिळकांनी मान्य केलं आणि दसऱ्याच्या दिवशी पुण्यात धडाडली होळी.

“स्वदेशी वस्तूंच्या पुरस्कारासाठी तरुणांनी सुरू केलेली ही चळवळ नक्की यशस्वी होणार”, असा आशीर्वाद टिळकांनी दिला. शिवरामपंत परांजपे यांच्या जळजळीत, उपरोधीक भाषणानं त्या होळीत जणू तेलच ओतलं गेलं. या होळीचे चटके ब्रिटिशांना लंडनमध्येही जाणवले. ब्रिटिश सरकार हादरलं. सावरकरांचं हे ‘जहाल’ कृत्य फर्ग्युसन महाविद्यालयातल्या ‘मवाळां’ना झेपणारं नव्हतं. नेमस्तांच्या ‘इंदूप्रकाश’ या मुखपत्रात सावरकरांची निंदा करण्यात आली. फर्ग्युसनचे प्राचार्य र. पु. परांजपे यांनी सावरकरांना महाविद्यालयाच्या वसतिगृहातून काढून टाकलं, त्यांना दहा रुपये दंडही ठोठावला. याविरुद्ध महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली. लोकमान्य टिळकांनी तर ‘हे आमचे गुरुच नव्हेत’ या मथळ्याचा लेखच लिहिला. त्या काळानुरूप खूपच वाटणारा दंड भरण्यासाठी मुलांनी वर्गणी गोळा केली. पण सावरकरांनी जमा झालेली रक्कम ‘पैसा फंड’ आणि इतर काही संस्थाना देणगी म्हणून दिली आणि दंड स्वतःच भरला.

दक्षिण आफ्रिकेत असणाऱ्या गांधीजींनी या होळीवर टीका केली. इंग्लड बरोबर असणाऱ्या आपल्या संबंधांना यामुळे इजा पोहोचते. त्यामुळे बहिष्काराच्या या चळवळीत द्वेष आणि हिंसा दोन्ही आहे असं गांधीजींचं आणि त्यांचे गुरू गोपाळ कृष्ण गोखले यांचं मत होेतं. या घटनेनंतर १७ वर्षांनी मतपरिवर्तन झालेल्या गांधीजींनी १९२१ मध्ये मुंबईत विदेशी कपड्यांची होळी केली.

१९०५ मध्ये दसऱ्याच्या दिवशी, स्वदेशीच्या पुरस्कारार्थ झालेल्या विदेशी कपड्यांच्या होळीचे जनक ठरले स्वातंत्र्यवीर सावरकर. राजकारणासाठी शिक्षण संस्थेच्या वसती गृहातून हकालपट्टी झालेले सावरकर हे ‘पहिले’ विद्यार्थी ठरले.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..