आपल्याला सगळ्यांना माहित आहे की, परमवीर चक्र हा भारतातला सर्वात मोठा सैनिकी शौर्यपुरस्कार आहे – अगदी ब्रिटनच्या ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ अथवा अमेरिकेच्या ‘मेडल ऑफ ऑनर’ च्या बरोबरीचा – जो सैनिकांना युद्धातील अतुलनीय शौर्याबद्दल दिला जातो. १९४७ पासून २१ वीरांना परमवीर चक्र मिळालेले असून त्यापैकी १४ जणांना ते मरणोत्तर मिळाले आहे. परमवीर चक्र पदक ३.४९ सेंटीमीटर व्यासाचे ब्राँझचे पदक असून त्यावर भारतीय राजमुद्रा आणि चार बाजूंना इंद्राचे अस्त्र वज्र चार दिशांना आहे.
पण आपल्यापैकी किती लोकांना माहित आहे की ह्या परमवीर चक्राच्या पदकाचे डिझाईन कोणी केले होते? ह्या पदकाचे डिझाईन केले होते सौ सावित्रीबाई खानोलकरांनी १९४७ मध्ये!
सौ सावित्रीबाई खानोलकर?!? कधीच ऐकलेले नाहीये हे नाव – कोण होत्या त्या? आणि असल्या मराठमोळ्या ‘खानोलकर’ नावाच्या बाईचे कसले आलेय ‘स्वीस कनेक्शन’ ?
ह्या सौ सावित्रीबाई खानोलकर पूर्वाश्रमीच्या ईव्ही मॅदे दे मॅरॉस. जन्म २० जुलै १९१३ – स्वित्झर्लंडमधील न्यूशातेलमधला. त्यांचं बालपण जिनेव्हात गेलं. वयाच्या १६ व्या वर्षी – १९२९ मध्ये – त्यांची भेट विक्रम खानोलकारांशी झाली. हे विक्रम खानोलकर तेव्हा ब्रिटनमधील सॅन्डहर्स्ट येथे रॉयल मिलिटरी अकॅडेमी मध्ये सैनिकी शिक्षणासाठी आलेले होते आणि सुट्टीमध्ये स्वित्झर्लंडमध्ये फिरायला आले होते. घरच्यांच्या विरोधाला न जुमानता ईव्ही विक्रम खानोलकरांना शोधत शोधत मुंबईत आल्या आणि हे जोडपे १९३२ मध्ये विवाहबद्ध झाले. हिंदू धर्माबद्दल त्यांना आकर्षण होतेच. लग्नानंतर त्यांनी धर्मांतर करून ‘सावित्री’ हे नाव घेतले आणि अश्या प्रकारे ‘ईव्ही मॅदे दे मॅरॉस’ च्या ‘सौ सावित्रीबाई खानोलकर’ बनल्या.
सैन्यात त्यांचे पती वरिष्ठ पदावर होतेच. आपल्याला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तेव्हाचे मेजर जनरल हिरालाल अटल ह्यांनी सौ सावित्रीबाईंवर सैनिकांसाठी सर्वोच्च शौर्य पदक डिझाईन करायची जबाबदारी सोपवली आणि सौ सावित्रीबाईंनी ती अतिशय व्यवस्थितपणे पार पाडली. हे आहे आपल्या परमवीर चक्राचे ‘स्वीस कनेक्शन’!
योगायोगाने पहिले परमवीरचक्र सौ सावित्रीबाईंच्या मोठ्या मुलीच्या दिराला – मेजर सोमनाथ शर्मा यांना – काश्मीर युद्धातील शौर्याबद्दल नोव्हेंबर १९४७ मध्ये मरणोत्तर मिळाले.
सौजन्य – संकेत कुलकर्णी (लंडन)
फोटो: सौ सावित्रीबाई खानोलकर आणि मेजर जनरल विक्रम खानोलकर, परम वीर चक्र, पहिल्या परमवीरचक्राचे (मरणोत्तर) मानकरी मेजर सोमनाथ शर्मा
Leave a Reply