१२ जुलै १९६१ रोजी पानशेत धरण फुटले व पुणे शहराची अपरिमित हानी झाली. हजारो कुटुंबांचे संसार वाहून गेले. त्या पुरामध्ये डेक्कन परिसरात आपल्या आईसोबत राहणाऱ्या पारू या तरुणीचं घरही वाहून गेलं.
स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेल्या भिल्ल समाजातील पारूला लहानपणापासून शिक्षणाची ओढ होती. ती लहान असतानाच वडिलांचे निधन झाल्यावर आईने तिला घेऊन पुणे गाठलं. धुणी भांड्यांची कामे करुन पारूला शाळेत घातले. सातवी पास झाल्यानंतर ही पुराची घटना घडल्याने तिच्या आईने अहमदनगर मधील सुपे येथे मुक्काम हलवला. पारूचं शिक्षणही थांबलं. यथावकाश आईनं, मनाजी बर्गे याच्याशी तिचं लग्न लावून दिलं.
पारूला लग्नानंतर एक दोन नव्हे तर सहा मुलं व सहा मुली अशी बारा अपत्ये झाली. या मुलांचे संगोपन करता करता तिच्या आयुष्यातील पन्नासहून अधिक वर्षे उलटून गेली.
आता नव्वदीला पोहोचलेल्या पारूने या वयातही आपली वाचनाची आवड जोपासलेली आहे. साड्या ठेवण्याच्या सुटकेसमध्ये तिच्या पुस्तकांचे त्यांनी ग्रंथालय जमवलेले आहे. त्यात भगवत् गीता, हरिपाठ, चाणक्य नीती, गणेश पुराण, गरुड पुराण, ज्ञानेश्वरी, हरिविजय, नवनाथ कथासार, राजा हरिश्चंद्र, नवा करार अशी धार्मिक व तत्त्वज्ञान देणारी अनेक पुस्तके आहेत.
नव्वदीतही त्या स्वतःची कामे स्वतः करतात. उच्चार स्पष्ट नसले तरीही त्या हळूहळू वाचतात. जिथं वाचन थांबवलं तिथं कागदाचा तुकडा खूण म्हणून ठेवतात. त्यांचं हे वाचनवेड, गावामध्ये कौतुकाचा विषय आहे.
माझे मित्र, मनोहर कोलते यांनी ज्ञान फाउंडेशनच्या वतीने या वर्षीचा ‘सावित्रीची लेक’ हा पुरस्कार देण्यासाठी, प्रा. डाॅ. बाळासाहेब देविकर यांची व्हाॅट्सअपवर आलेली पोस्ट वाचून पारूबाई बर्गे यांची निवड केली.
३ जानेवारी रोजी हा कार्यक्रम करता न आल्याने काल ८ जानेवारी रोजी संपन्न झाला. मनोहर कोलते, आलदर साहेब व मी असे तिघेजण पारूबाईंना भेटण्यासाठी अहमदनगरमधील म्हसे गावी गेलो. गावापासून लांबवर असलेल्या माळवाडीवर घोडनदीच्या काठी, त्यांचं बैठं घर आहे. सोबत दोन नंबरचा मुलगा, त्याची पत्नी व दोन मुलं असे राहतात. घरामागेच नदी आहे. सकाळी नदीतील मासे पकडायचे व त्यांची विक्री करुन गुजराण करायची हा त्यांचा दिनक्रम आहे.
मला घरासमोरच एका जाळीच्या पिंजऱ्यात मोर दिसला. त्याच्याबद्दल विचारल्यावर पारूबाईंच्या मुलाने सांगितले की, मला मोराची तीन अंडी ह्या परिसरात सापडली. ती कोंबडीकडून उबवल्यावर, मोर लहानाचे मोठे झाले. ते मुक्त होते. मात्र कुणीतरी दगड मारल्याने एक मोर जखमी झाला. तो कुत्र्यांची शिकार झाला. दुसरा मोर झाडावरुन घराच्या पत्र्यावर झेपावत असताना विजेच्या तारेतील प्रवाहाने गतप्राण झाला. आता जो आहे, त्याला पिंजऱ्यात सुरक्षित ठेवले आहे. पारूबाईंना साक्षात सरस्वतीच्या वाहनाचाही अशाप्रकारे अभूतपूर्व सहवास लाभलेला आहे.
पारूबाईंशी गप्पा मारता मारता संध्याकाळ झाली. प्रा. डाॅ. बाळासाहेब देविकर व त्यांचे मित्र आल्यानंतर मनोहर कोलते यांनी पारूबाईंना स्मृतिचिन्ह, वाचनीय पुस्तके, रोख रक्कम व माहेरची साडी भेट दिली.
सूर्य मावळला होता. आम्ही पारूबाई व त्यांच्या कुटुंबियांचा निरोप घेऊन परतीचा प्रवास सुरु केला. मनात विचार आला, आपण शतकांपूर्वीच्या सावित्रीबाईंना फक्त चित्रांतूनच भेटत होतो.. मात्र आज प्रत्यक्ष तिच्या लेकीला भेटलो. ज्ञानरुपी लाखों तेवणाऱ्या पणतीतील, प्रकाशलेली एक पणती जवळून अनुभवली.
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
९-१-२२.
Leave a Reply