सवाई माधवराव पेशवे यांचा जन्म १८ एप्रिल १७७४ रोजी पुरंदर किल्यावर झाला.
मराठेशाहीच्या पडत्या काळातील बाल पेशवा, बाळाजी बाजीरावच्या खून झालेल्या नारायणराव या पेशव्यांना गंगाबाई या पत्नीपासून पुरंदर किल्ल्यावर मरणोत्तर जन्माला आलेला पुत्र. त्यांचे बालपण पुरंदर किल्ल्यावर लष्करी बंदोबस्तात गेले. त्यामुळे या राज्यकर्त्यास योग्य असे शिक्षण त्याला मिळाले नाही.
या पेशव्यांला वाढविण्याची जबाबदारी कारभाऱ्यांवर म्हणजे नाना फडणिसादींवर आली.साहजिकच लिहिणे-वाचणे, हिशेब ठेवणे, घोड्यावर बसणे, कसरत करणे याचे जुजबी शिक्षण त्यांस मिळाले; पण शहाण्यासुरत्या मुत्सद्यी माणसांच्या गाठीभेठी,राजकारण्याच्या वाटाघाटी, लष्करी मोहिम यांपासून पेशवा वंचित राहिला.सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात बारभाईच राज्यकारभार पहात होते. श्रीमंत सवाई माधवराव नाममात्र पेशवे होते. बाळाजी विश्वनाथ, बाजीराव बल्लाळ, चिमाजीअप्पा, बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब, सदाशिवराव भाऊसाहेब, विश्वासराव, माधवराव यांच्यामुळेच पेशवे या तीन अक्षरांचाच भारतात दरारा निर्माण झाला होता. दिल्लीच्या लाल किल्यावर भगवे निशाण डौलदारपणे, दिमाखात फडकायला लागले. सवाई माधवराव पेशव्यांच्या कारकिर्दीत महादजी शिंदे यांनी दिल्लीची पातशाही कबजात घेतली. दरमहा ६५००० रूपये तनखा ठरवून दिल्लीच्या बादशहाकडून वकील ई मुतालिक आणि मिरबक्षी अशा स्वतंत्र दोन सनदा सन १७८४ साली मिळवल्या. दिल्लीचे संस्थान झाले. मथुरा, वृंदावन च्या सनदा व गोवध बंदीचे फरमान सन १७९० साली मिळवले. १२ मार्च सन १७९५ रोजी निजामाचा खर्ड्याच्या लढाईत संपूर्ण पराभव झाला. सवाई माधवराव पेशव्यांच्या कारकिर्दीत मराठेशाहीचे वैभव पुन्हा दिसू लागले होते.
श्रीमंत सवाई माधवराव पेशव्यांचे २७ ऑक्टोबर १७९५ रोजी अपघाताने निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply