नवीन लेखन...

सावली प्रेमाची

अॉफीसमधून घरी आल्यावर नेहमीप्रमाणे बॅग बायकोकडे दिली व फ्रेश व्हायला गेलो. पंधरा मिनिटांत फ्रेश होऊन किचनमधे आलो. तो पर्यंत अंजूचे पोहे तयार झाले होते. मी व अंजू पोहे खात होतो त्याचबरोबर तिची चहाची तयारी चालू होती. मी म्हणालो “अग पोहे तरी शांतपणे खा मग चहा कर.” नको, मला आता इतके वर्ष तुमच्या बरोबर राहून माहिती झालंय की पोहे संपले की शेवटच्या घासाबरोबर तुम्हाला चहा प्यायला आवडतो. त्यावर मी नेहमी प्रमाणे मी तिच्याकडे बघून हसलो. हा रोजचाच सुसंवाद. मी तिला नंतर चहा केलास तरी चालेल असे म्हणायचो व तिने नेहमी प्रमाणे न ऐकता पोहे खाता खाता चहाचे आधण ठेवायचे. गेली विस वर्ष हे असेच चाललेलं त्यामुळे तिलाही याची सवय झालेली व मलाही. त्यामुळे एखादे दिवशी जर असा संवाद झाला नाही तरच आश्चर्य.
बरं, सोनूचा काही फोन.
काय म्हणतीय.
सोनू म्हणजे माझी एकुलती लेक. नुकतीच या वर्षी तिने कोल्हापूरला एम.बी.ए. ला अॅडमीशन घेतली आहे.
होय,
आत्ताच तुम्ही येण्यापूर्वीच तिचा फोन येऊन गेला. तीही घरी यायला निघालीय. साधारण नऊ वाजता पोहोचेल.
आणी हो, येताना तिच्या बरोबर तिची एक मैत्रीण पण येत आहे.
अग, काय हे? अजून तिला कोल्हापूरला जाऊन महीना पण झाला नाही. एवढ्यात तिला अशी कोण मैत्रीण भेटली? की तिला ही घरी घेऊन यायला निघालीय.
नुसती घेऊन येत नाहीय. तिचा प्लॅन पण ठरलाय. शनिवार व रविवार तुमच्या अॉफीसला नेहमीची सुट्टी व सोमवारी कुठली तरी सार्वजनिक सुट्टी आहे त्यामुळे आपण ऊद्या सकाळी नेहमीप्रमाणे मुरुडला चाललोय. सोनूने आपल्या जोशी काकांना फोन करुन दोन रुम बुक करुन ठेवायला सुध्दा सांगीतल्यात.
अग, हो हो मला जरा विचार करायला वेळ तरी देशील का नाही?
कसला विचार? मुरुड म्हणलं की तुम्ही एका
पायावर तयार होता हे मलाच काय आता सोनूला पण माहिती आहे. आणी हो ड्रायव्हरची काळजी करु नका. सोनूच्या या मैत्रीणीला ड्रायव्हिंगची चांगली सवय आहे. ती मागच्याच महिन्यात बंगलोर, मैसूर, ऊटी असे जाऊन आलीय. संपूर्ण प्रवास एकटीनेच ड्रायव्हिंग केले. बाकी एकाही मुलीला ड्रायव्हिंग येत नव्हते. येथे तुम्ही तर थोडं ड्रायव्हिंग करु शकता.
बरोबर होते दोन वर्षांपूर्वी माझा टूव्हिलरवर अपघात झाल्यापासून माझा एक पाय घोट्यामधे दुखावला होता. व पायावर ताण येत नसल्याने मी हल्ली लॉंग ड्राईव्ह करत नव्हतो. व असं कुठं लांब जायचं ठरवलं तर तर बरोबर ड्रायव्हर घेऊन जात असतो.
या मायलेकींना चांगले माहीत होते की मुरुड
हा माझा वीक पॉइंट आहे व मी नाही म्हणणे
शक्य नाही. त्यामुळे मी अॉफीसमधून घरी येण्यापूर्वीच सुट्टीचा प्लॅन तयार झाला होता.
ओके मॅडम, जशी आज्ञा. आपण म्हणाल तर या प्रमाणे हा बंदा आपल्या बरोबर यायला तयार आहे. बरं ठिक आहे मी गाडी बाहेर काढून ठेवतो. नऊ वाजता स्टॅण्ड वरुन त्या दोघींना घेऊन येतो. तसेच पेट्रोल ही फुल करून टाकतो.
थांबा, मी पण बरोबर येते. थोडं लवकर बाहेर पडू. थोडी फळ, व अजून काही कोरडे खायला घेऊन येऊ. तुमच्या लेकीला गाडीत बसल्या पासून चरायला लागते. त्याप्रमाणे आम्ही दोघेही आठलाच बाहेर पडलो. फरसाण, चिवडा, व फळे घेऊन नऊ
वाजता स्टॅण्डवर पोहोचलो. व नेहमीच्या ठराविक ठिकाणी गाडी लाऊन थांबलो. गाडीच्या बाहेर येऊन आम्ही दोघेही गप्पा मारत उभे होतो. एवढ्यात, बाबा…… अशी
जोरदार नेहमीची हाक ऐकू आली. आवाजाच्या दिशेने पाहिले तर सोनू व तिच्या बरोबर तिची मैत्रीण गेटमधून बाहेर येत होत्या. सोनुच्या तुलनेत तिची मैत्रीण जरा जास्तच उंच दिसत होती. तशी आमची सोनूही चांगली पाच फूट पाच इंच उंच होती त्या मुळे तिच्या पेक्षा एवढी उंच मुलगी कोण असावी? मी असा विचार करे पर्यंत दोघीही गाडीपाशी येऊन पोहोचल्या होत्या. बाबा, ओळख करुन देते ही माझी मैत्रीण जूली फर्नांडिस व जूली हे माझे बाबा अशोक परांजपे आणी आई अंजू परांजपे. मी फर्नांडिस हे नाव ऐकताच थोडे आश्चर्याने
पाहिले.तर एक गोरीपान शिडशिडीत युरोपियन मुलगी समोर उभी होती. मी तिला
हाय करुन आम्ही सर्वजण गाडीतून घरी आलो. सोनू व तिची मैत्रीण फ्रेश व्हायला सोनुच्या रुममध्ये गेल्या. थोड्याच वेळात त्या आवरुन आल्यावर सर्वांनी मिळून एकत्र
डायनींग टेबल वर जेवण केले व मग अंगणात गप्पा मारत बसलो. जुली ही मुळची ब्रिटीश. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी भारतात आली होती. संपूर्ण भारतभर भ्रमण
करुन सध्या ती कोल्हापूर येथे शिवाजी युनिव्हर्सिटी मधे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील मराठी साम्राज्याचा विशेष
अभ्यास करत होती व गेले सहा महिने कोल्हापूर येथे एका कुटुंबात पेईंग गेस्ट म्हणून रहात होती. तेथेच एका कार्यक्रमास सोनू गेली होती व एकमेकींना पाहताच दोघी अगदी जवळच्या मैत्रिणी केव्हा झाल्या
हे त्यांना कळले नाही. जेव्हा सोनुने आपले नाव सोनाली अशोक परांजपे असं सांगितलं व आपण सातारा येथे रहातो असं सांगितलं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांची मराठा
साम्राज्याची राजधानी असल्याने सातारला भेट द्यायला आवडेल असे सांगितले व ती सोनू बरोबर सातारला आली होती असं सांगितले. पण हे सगळं बोलताना ती हळूच माझ्याकडे सारखं चोरुन पहात असल्याचा मला भास होत होता. तिचे अशा प्रकारे पहाणे आणी फर्नांडिस हे नाव मला नाही म्हणले तरी अस्वस्थ करत होते. ही कोणत्या देशातून आलीय. सोनुची हिची ओळख कशी झाली व एका महिन्यात घरी येण्या इतकी जवळीक कशी काय निर्माण होऊ शकते. मनात नाही म्हणले तरी असंख्य प्रश्र निर्माण झाले होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघायचं ठरवलं तरी निघायला आठ वाजले होतेच. गाडी जुली चालवायला बसली व तिच्या शेजारी सोनु व आम्ही दोघेही मागील सिटवर
निवांत बसलो होतो. ड्रायव्हिंगचे टेन्शन नसलेने आजुबाजुचे निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्याची संधी मिळाली होती त्याचा
पुर्ण आनंद घेत प्रवास सुरु होता. कोयनानगर येथे नाष्टा करुन दोन वाजता मुरुड येथे पोहोचलो. रहायचं बुकींग केले असल्याने जोशींच्या गेस्ट हाऊसमध्ये जाऊन
रुम मध्ये जाऊन फ्रेश झालो तोपर्यंत जोशींनी जेवण तयार असल्याचे सांगितले. गरमागरम तांदळाची भाकरी, काळ्या वाटाण्याची उसळ, लोणचं, पापड, नारळाची चटणी असा मस्त बेत होता. जेवण करून मग झकास ताणून दिली. दोन्ही मैत्रीणी गप्पा मारत बसल्या होत्या. संध्याकाळी सहानंतर समुद्र किनारी फिरायला गेलो होतो. थोडा वेळ फिरुन मी व अंजू एका जागी गप्पा मारत बसलो. मुलींचा दंगा चालू होता. शेवटी अंधार पडायला लागल्यावर परत रुमकडे आलो. रात्री सामीश भोजनाची व्यवस्था केली होती.
फ्राय पापलेट व फिशकरी, कोकणी पध्दतीचे चिकन व फ्रॉंजबिर्याणी असा झकास बेत. माझी वर्षानुवर्षाची आवड माहिती असल्याने आचाऱ्याला काही सांगावं
लागायचे नाही. जेवण झाल्यावर रुमवर येऊन पडलो. थोड्याच वेळात अंजू गाढ झोपी गेली पण मला झोप येत नव्हती म्हणून मग पुस्तक वाचावे म्हणले तर लाईट लावल्यास अंजुची झोपमोड होईल म्हणून तसाच बाहेर अंगणात आलो तर बाहेर सोनूची मैत्रीण जूली एकटीच आभाळाकडे बघत बसली होती. मला तिचं असं एकटं बाहेर बसणं नाही म्हणले तरी थोडं खटकलच. मी जवळ जाऊन विचारले काय ग जूली एकटीच बाहेर बसलीस? सोनू बरोबर भांडलीस की काय? नाही नाही अंकल तसं काही नाही. सोनूला झोप येत होती त्यामुळे ती लगेच झोपली मला झोप येत नव्हती म्हणून मग मी बाहेर येऊन बसले
इतकंच. तुम्हालाही झोप आली नाही का? मग तुम्हीही बसा ना गप्पा मारत. नाही तरी मलाही झोप येत नव्हतीच म्हणून मग मीही तिथेच शेजारी गप्पा मारत बसलो. तीला बघितल्या पासून अस्वस्थ करणारी बाब मी तिला शेवटी विचारायचे ठरवले. जुई तू कोणत्या देशातून आलीस? तुझे आई बाबा काय करतात? माझ्या प्रश्र्नाने जुली थोडी अस्वस्थ झाल्याचे मला जाणवले. मी पुन्हा एकदा विचारल्यावर ती थोडी भानावर आली. अंकल मी ईंग्लंड देशाची नागरिक आहे. लंडन जवळील एका छोट्या गावात मी लहानाची मोठी झाले. नंतर पुढील महाविद्यालयीन शिक्षण मी लंडन मधे पुर्ण केले. माझ्या आईचे नाव जेसीका फर्नांडिस एवढेच मला माहित आहे. आई वडिलांबरोबर रहात नाही. मी त्यांना कधीच पाहिले नाही इतकेच काय मला त्यांचे नावही
ठाऊक नाही. पण एकदा केव्हातरी माझे वडील एक भारतीय आहेत एवढेच मला कळले पण आईने मला कधी त्यांच्या बद्दल काही सांगीतले नाही व पुन्हा त्याविषयी जास्त चौकशी करु नकोस अशी शपथच घातली. त्यामुळे मीही पुन्हा तिला विचारले नाही. तिला त्रास होतो म्हणून मीही कधी तिला याविषयी विचारले नाही. जुली तुझ्या आईचे शिक्षण भारतात झाले होते का? तिने
भारतीय तरुणाबरोबर लग्न केलेय म्हणून विचारतोय? नाही अंकल शिक्षण तिचे लंडन
मधेच झाले पण एकदा ती त्यांच्या फुटबॉल टीम बरोबर भारतात खेळायला आली होती. तेव्हा तिची येथे कोणा भारतीय तरुणाबरोबर ओळख झाली व पाहताक्षणी ती त्याचे प्रेमात पडली. नंतर ती ईंग्लंडला परत आली पण तिने अन्य कोणाशी लग्न केले नाही. माझ्या जन्मानंतर तिने एकटीने माझा सांभाळ केला. मला तर माझ्या बाबांचे
नावही ठाऊक नाही. या भारतात ते कोठे असतील हेही ठाऊक नाही. मी भारतात आले खरी पण मला ते भेटतील असे काही वाटत नाही.
जेसीका हे नाव ऐकताच मी काय समजायचे ते समजलो. शेवटी तिने आपले म्हणणे खरे केलेच तर. कॉलेजचे शेवटचे दिवस होते. इंटर कॉलेज फुटबॉल टुर्नामेंट सुरु होत्या. आमच्या टीमचा कॅप्टन व कोच मीच होतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आमची टीम चॅम्पियन ठरली होती. मॅचेस संपल्यावर
सर्वांनी कोकण ट्रीपला जायचे ठरवले व आम्ही सर्वजण कोकण ट्रीपला गेलो. शेवटी
मुक्काम मुरुडला होता. तेथेच लेडीजटीम आली होती व त्यामध्ये त्यांची कोच जेसीका सुध्दा होती. सहा फूट उंच व सडसडीत बांधा. बघताक्षणी कोणीही प्रेमात पडावे असेच रुप होते. टुर्नामेंट सुरु झाल्यापासून मी पहात होतो की ती कायम माझ्यासोबत यायचा प्रयत्न करत होती. ती माझ्या प्रेमात पडली होती हे तर मी जाणून होतो. पण मी एक हिंदू ब्राह्मण कुटुंबातील एकुलता एक मुलगा व कोणत्या परिस्थितीत मला माझ्या आई वडिलांनी लहानाचे मोठे केले ते मी जाणून होतो. त्यामुळे त्यांचे ईच्छे विरोधात जाऊन एका ख्रिश्र्चन मुलीबरोबर लग्न हे कदापी शक्य होणार नाही हेही मी पुर्णपणे जाणून होतो. त्यामुळे मी माझ्या बाजूने जेसीकाला कधीच प्रोत्साहन दिले नव्हते. व शक्यतो तिला टाळण्याचाच प्रयत्न केला होता.
सर्व मुले मुली धमाल करत हिंडत फिरत मौजमस्ती करत फिरत होती. दोन दिवस गेल्यावर तिसऱ्या दिवशी सकाळी सर्वांनी बंदरावर फिरायला जायचे ठरवले व सर्वजण
आपापल्या रुममध्ये झोपायला गेली. पण रात्री उशिरा रात्री मेघ गर्जनेसह पावसाने झोडपून काढायला सुरुवात केली. बाहेर जोरदारपणे पाऊस पडत होता व जोरदार वारे वहात होते. वारा व पाउस यामुळे लाईट
गेली होती. त्यात टुर्नामेंटचा शिणवटा व कोच म्हणूनही रोज ताण यामुळे रात्री माझी तब्येत बिघडली व थंडी व ताप यामुळे मी जाम झालो. सकाळी पाऊस जरा कमी आला होता पण मला ऊठणेही शक्य नव्हते. पण मुलांचा हिरमोड होऊ नये म्हणून मी सर्वांना बोलावून दोन तीन जेष्ठ खेळाडूंना जबाबदारी घेऊन सर्वांनी मिळून जाऊन या असे सुचवले व माझी तब्येत ठीक नसल्याने मी रुमवर विश्रांती घेण्याचे ठरविले. सर्वजण
त्याप्रमाणे बंदर पहायला बोटीवर बसून डॉल्फीन पहायला गेले. दरम्यान इकडे पावसाचा जोर वाढला होता व बरोबरीने माझा तापही वाढत होता. बाहेर पाऊस अक्षरशः थैमान घालत होता त्यामुळे दवाखान्यात जाणेही अशक्य झाले होते. नंतर तापाच्या ग्लानीत केव्हा झोप लागली ते कळले नाही. नंतर जेव्हा थोडी जागा आली तर बाहेर अंधार दिसत होता. मी उठण्याचा प्रयत्न केला पण चक्कर येऊन मी
अंथरुणावर पडलो त्यावेळी पडताना कोणी तरी आपल्याला सावरले आहे एवढीच जाणीव झाली व शुध्द हरपली. रात्री उशिरा घाम येऊन ताप कमी झाला व थोडीशी जाग
आली त्यावेळी सर्वत्र अंधार होता पण कोणी
तरी उशाशी बसून डोकं दाबून देत होते हे जाणवले. त्या ग्लानीतही तो स्पर्श एका स्त्रीचा आहे हे जाणवले. मी उठून बसण्याचा प्रयत्न केला पण शक्य झाले नाही. मी तसाच पडून राहिलो. शेजारील स्त्री
माझ्या डोक्यावर हात फिरवत तशीच माझ्या शेजारी पडून होती.
सकाळी जाग आली तर पाहतो तर बाहेर स्वच्छ उजेड पडला होता. सर्व मुले मुली शेजारी उभी होती. मी डोळे उघडल्यावर सर्वांचे चेहरे आनंदाने भरून ओसंडून वहात होते. अरे पाउस थांबला वाटत? केव्हा आलात तुम्ही? एंजॉय केले का नाही मला मात्र तुमच्या बरोबर काल येता आले नाही त्याबद्दल वाईट वाटते. पण आता मी एकदम ठीक आहे. आपले ठरले प्रमाणे आज आपण अंजर्ला गणपतीचे दर्शन घेऊन परतीला लागू काय? माझ्या या प्रश्र्नाने सर्वांचे चेहरे आश्र्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले. कोणाला काय बोलावे तेच सुचत नव्हते. शेवटी एका मुलाने
धाडस करून विचारले. सर तुम्हाला काहीच
आठवत नाही काय? अहो वादळात आम्ही दोन दिवस बंदरावर अडकलो होतो व आता
तिसऱ्या दिवशी येथे पोहोचतोय. आम्ही निघालो त्यावेळी तुम्हाला खुपच ताप होता व त्यामुळे आम्ही सर्वजण जायचे रद्द ठरवत होतो पण जेसीका मॅडमनी सांगितले की त्या येथे थांबून तुमची काळजी घेतील आम्हाला जायला काही हरकत नाही. तसे संध्याकाळी आम्ही सर्वजण परत येणार होतोच. त्यामुळे त्या येथे तुमच्या जवळ थांबल्या व आम्ही सर्वजण गेलो पण वादळात दोन दिवस तेथेच अडकलो होतो. या जेसीका मॅडमनी दोन दिवस व रात्र आपली सेवा केली व त्यामुळे आपण आता ठणठणीत बरे झालात. खरोखर त्या देविचे आभार मानले पाहिजेत.
मला बसलेल्या धक्याने मी अजून सावरलो नव्हतो तेवढ्यात स्वत: जेसीका आत आली व तिने सर्वांना सांगितले की सरांची तब्येत अजून पुर्ण बरी नाही तेव्हा सर्वांनी आज आपापल्या रुममध्ये विश्रांती घ्यावी ऊद्या आपण सर्वजण परत निघू. सर्व मुले आपापल्या रुममध्ये गेली. मी विचारले जेसीका खरोखर दोन दिवस मी झोपून होतो
का? आणी मग माझे कपडे वगैरे कोणी बदलले? त्यावर माझ्याकडे बघून जेसीका गोड हसली व म्हणाली आता दोन दिवस जर येथे माझ्या शिवाय कोणी नव्हते तर मग
हे सर्व कोण करणार? माझी मान लाजेने खाली वळली. तेव्हा जेसीका अजूनच हसू लागली. अरे बाबा आता राजरोस कसला दोन दिवस व रात्र मी तुझे कपडे बदण्यापासून सर्व केलेच पण पहिला दिवस व रात्र सुध्दा तुझी थंडी मलाच घालवावी लागली.
म्हणजे ? तु अस केलंस तरी काय?
जेव्हा कशाचाच उपयोग नव्हता व बाहेरील पाऊस व वादळात येथे डॉक्टरांनाही येणे अशक्य होते त्यावेळी माझ्या शरिरातील ऊष्णता देण्याशिवाय माझ्याकडे कोणताही पर्याय शिल्लक नव्हता. पण मी यात तुला काही जबाबदार धरणार नाही. हा सर्वस्वी माझा स्वत:चा वैयक्तिक निर्णय होता. व याच्या सर्व परिणामास मी जबाबदार असेन. तुझी घरची धार्मीक परिस्थिती मी जाणून आहे त्यामुळे मी तुझ्यावर लग्न करण्याचे बंधन घालणार नाही. जर मी प्रेग्नंट राहिले तर मी त्या बाळाला जन्म देऊन त्यांचा सांभाळ करीन. एवढे बोलून जेसीका तिच्या रुममध्ये निघुन गेली. माझी तब्येत ठीक होती पण हे सर्व ऐकून मी सुन्न झालो होतो. नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही परत आलो. जेसीका अचानक तिचा कोचचा जॉब सोडून परत गेली. जाताना फक्त मी आपल्या बाळाला सांभाळीन तु लग्न करून सुखी हो एवढेच सांगून गेली.
आज जुलीच्या रुपाने जेसीका माझ्या समोर उभी होती पण मी माझ्या मुलीला प्रेमाने जवळ सुध्दा घेऊ शकत नव्हतो. मी जुलीला
फक्त एवढंच विचारले जुली सध्या आई ? तेव्हा फक्त तिला एक हुंदका फुटला. शेवटी माझाही बांध फुटला व मी म्हणालो बेटा मीच तो दुर्दैवी, पण पुढचं बोण्यापुर्वीच ती माझ्या कुशीत शिरली होती व म्हणाली मी आईच्या बॅगेत माझ्या बाबांचा फोटो पाहिला होता. पण तिने माझ्याकडून जाताना वचन घेतले होते की मी तुमच्या आयुष्यात ढवळाढवळ करणार नाही. मला एकदा फक्त तुम्हाला डोळेभरून पहायचे होते. त्यासाठीच फक्त मी भारतात आले होते व आता मी परत माघारी जाणार आहे. तिने एवढे बोलून मी काही बोलण्यापुर्वी माझ्या तोंडावर हात ठेवला होता. सहजच माझं लक्ष माझ्या रुमच्या खिडकीकडे गेले उगाचच मला तेथील पडदा हलल्याचा भास झाला.
रात्रीचे दोन वाजून गेले होते समुद्राच्या लाटांचा आवाज आज पहिल्यांदाच मला भिषण वाटत होता. दुसऱ्या दिवशी फिरायला बाहेर पडताना अंजू म्हणाली अग सोनू जुली गाडी छानच चालवतीय पण पायाने बाबांना मागे बसताना फारच अवघड
होतंय तर तू मागे बैस म्हणजे बाबांच्या पायांना त्रास होणार नाही व अधूनमधून बाबा गाडी चालवतील व जुलीलाही थोडी विश्रांती मिळेल. त्याप्रमाणे दोन दिवस जुली व मी शेजारी बसून आलटून पालटून गप्पा मारत गाडी चालवत होतो. नंतर घरी आलो सोनू व जुली सुट्टी संपवून परत निघाल्या. जाताना जुलीने खाली वाकून मला व अंजूला नमस्कार केला. अंजुच्या पापण्या ओल्या झालेल्या मला जाणवल्या तिने जुलीला छातीशी कवटाळून साश्रू नयनांनी निरोप दिला व तिच्या हातात हात दिला व मुठ घट्ट मिटली. तिने चमकून फक्त एकदा माझ्याकडे व एकदा अंजूकडे पाहिले दोघींनी हात हालवून आमचा निरोप घेतला.सकाळच्या सोनेरी किरणांनी सुर्य चमकत होता व त्या कोवळ्या ऊन्हाच्या माझ्या सावलीत दोन्ही मुली चालवल्या होत्या. मी अंजूकडे पहात होतो ती अजूनही हात हलवून निरोप देत होती पण तिच्या हातातील सोन्याचे दोन बिल्वर मला कमी झाल्याचे दिसत होते व डोळ्यातील अश्रू मोती बनून गालावर थांबले होते.

सुरेश काळे
मो.९८६०३०७७५२
सातारा
२३ अॉगस्ट २०१८

******©******

‌‌

सुरेश गोपाळ काळे
About सुरेश गोपाळ काळे 48 Articles
मी आयडीबीआय या बँकेच्या सेवेतून अधिकारी म्हणून जुन २०१७ मधे निवृत्त झालो. महाविद्यालयीन जीवनापासून काव्य लेखनाची आवड होती. नोकरीतील व्यापामुळे मधील काही वर्ष लेखन कमी होते. निवृत्तीनंतर त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. विविध विषयांवर वैचारिक लेख लिहून ठेवले आहेत. परंतु लेख लिहिण्यापेक्षा कविता लिहिण्यामागे जास्त कल आहे. जुन २०१७ मधे "शब्दसूर" हा काव्यसंग्रह प्रकाशित.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..