१९८५ पासून कमर्शियल जाहिरातींची कामं करताना. टाईप सेटींग, फोटो टाईप सेटींग, निगेटिव्ह, ब्रोमाईड, फोटो प्रिंट, फोटोंवर स्क्रिन टाकणे, झेराॅक्स, प्रिंटआऊट, डिजिटल प्रिंट, विनायल, फ्लेक्स अशा प्रकारची कामं करुन घेण्यासाठी माझा अनेकांशी संपर्क आला.
सुरुवातीला टाईप सेटींग करुन घेण्यासाठी सायकलवरुन लाॅ काॅलेज रोडला, मला जावं लागायचं. सकाळी काम देऊन, संध्याकाळी आणायला पुन्हा जावं लागायचं. काही वर्षांनंतर फोटो टाईप सेटींग आलं. त्यासाठी खुन्या मुरलीधर चौकात तिसऱ्या मजल्यावर ‘पेस सेटर्स’ला जावं लागायचं. मग नवी पेठेत, टिळक रोडवर. मग ‘झेन’मध्ये डीटीपी करवून घेऊन, डिझाईन करीत असे. फोटोंवर स्क्रिन टाकण्यासाठी खाडिलकर प्रोसेस तर कधी बाळूकाका दातेंकडे जावे लागे.
निगेटिव्ह ब्रोमाईडसाठी एलके पाटील किंवा तात्या ऐतवडेकरांच्या ‘ग्राफिना’त चकरा होत असत.
प्रत्येक ठिकाणी काम करणारी मुलं, माणसं, रोजच्या भेटीमुळे ओळखीची होऊन जात असत. कधी घाईचं काम असेल तर ओळखीमुळे व गोड बोलण्याने, कामं तत्परतेने केली जात असत.
२०१० पर्यंत, कामं भरपूर होती. नंतर काॅम्प्युटर व इंटरनेटच्या वापरामुळे, हाताने केली जाणारी कलात्मक कामं कमी होऊ लागली. डिजिटल प्रिंटच्या कामासाठी डीजी, विकी, एक्स पाॅईंट, स्टार यांच्यासारखी अनेक दुकाने सुरु झाली. सगळ्यांकडे काम करता करता शेवटी मी चित्रशाळा चौकातील, ‘विकी काॅपिअर्स’कडेच नियमित जाऊ लागलो.
विकीमध्ये गेलं की, दोन पाठमोरे काॅम्प्युटर ऑपरेटर एकामागे एक बसलेले दिसतात. त्यातील पहिल्याकडे मी पेनड्राईव देतो. तो ‘स्माईल’ देऊन माझी फाईल ओपन करतो. डिझाईन मधील मजकूर वाचतो. कुठे शुद्धलेखन चुकलं असेल तर नजरेस आणून देतो. प्रिंट सोडतो. आत जाऊन प्रिंट आणून देतो. वेळ असेल तर त्याच्या कलेक्शनमधील, काही फोटो पेनड्राईव्हमध्ये लोड करुन देतो. हे सर्व आपुलकीने करणाऱ्या माझ्या मित्राचं नाव आहे. सावंत ‘विकी’!
सावंतचे काका चाळीस वर्षांपूर्वी, सदाशिव पेठेतील आमच्या घरी फुलपुडा द्यायचे. त्यांचं मरीआई चौकातील कोपऱ्यावर छोटं हार-फुलांचं दुकान होतं. सावंतच्या वडिलांचं शिवाजी मंदिरच्या मागे, स्टाॅल होता. ते देखील फुलांचा व्यवसाय करायचे. सावंतशी बोलताना हे संदर्भ कळल्यावर, त्याच्याबद्दल अधिक आपलेपणा वाटू लागला.
सावंतने विकीमध्ये नोकरी करण्यापूर्वी, अनेक ठिकाणी अशा कामांचा अनुभव घेतलेला होता. जिथं तिथं प्रत्येकाने, वापर करुन घेतला. मनासारखं मानधनही कधी त्याला मिळालं नाही. मात्र खूप काही ‘शिकायला’ मिळालं.
सावंतचा स्वभाव दिलखुलास व पारदर्शी असल्यामुळे कुणाशीही त्याची सहज मैत्री होते. विकीमध्ये लागल्यापासून कामाच्या निमित्ताने भेटणारे त्याचे शेकडो मित्र झाले आहेत. त्यामध्ये अनेक सुलेखनकार, कमर्शियल आर्टिस्ट, निसर्गचित्र काढणारे, मुखपृष्ठ करणारे, व्यंगचित्र काढणारे, चारकोल स्केचेस करणारे, ट्राॅफीज करणारे, नामवंत पुस्तक प्रकाशक, कॅलेंडर करणारे, अभिनवचे विद्यार्थी यांचा समावेश आहे.
सावंतला कॅलिग्राफीची आवड आहे. फावल्या वेळात आधुनिक टूल्स वापरुन तो अक्षरांना नवनवीन वळणं देत असतो. अशा काही निवडक कॅलिग्राफीचं त्यानं कलेक्शन केलं आहे. त्यांची काही वळणदार अक्षरं लक्ष्मी रोडवरील साईनबोर्डवर झळकत आहेत.
सावंत पक्का, पुणेरी खव्वैया आहे. पुण्यात भेळ, वडापाव, पॅटीस, मिसळ, नाॅनव्हेज कुठे चांगलं मिळतं. हे त्याला ठाऊक आहे. मी त्याच्यासोबत कित्येकदा त्या त्या ठिकाणी जाऊन, ‘तृप्त’ झालेलो आहे. कधी सकाळच्या भेटीत, तो घरचा डबा उघडून एखाद्या पदार्थाची चव पहायला सांगतो, तर कधी टपोरे गुजरातचे खारे दाणे हातावर ठेवतो. दुपारी चहाची तल्लफ आली की, माझ्या ऑफिसशेजारी असलेल्या चहावाल्याला, वन बाय टू ‘स्पेशल’ची ऑर्डर देतो.
गेल्या पंधरा वर्षांत सावंत कडून मी भरपूर काम करुन घेतलं आहे. दिवाळीच्या दिवसांत त्याच्या कामाचा लोड वाढलेला असतो. तरीही सावंत, हसतमुखाने काम करीत असतो. कोरोनाच्या पहिल्या लाटेत, सहा महिने विकी बंद होतं. पुन्हा दुसरी लाट येऊन गेली. त्या दिवसांत आमची भेट झालीच नाही. तिसऱ्या लाटेनंतर आता पुन्हा पहिल्यासारखी कामं सुरु झाली आहेत.
या पंचावन्न वर्षांत त्याच्या वाट्याला ‘सावन’ फार कमी आले. प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष हा असतोच, आता तो कमी होईल असा विश्वास आहे. उद्या त्याच्या घरात जावई, सूनबाईची भर पडेल. आणि त्याचं उर्वरित आयुष्य हे ‘फुलस्क्रिन’ शतायुषी होईल. कारण त्याच्या नावातच ‘बजरंगा’ची कमाल आहे!!!
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
११-२-२२.
Leave a Reply