नवीन लेखन...

सावरकर सदन आणि अहेवपण

(व्यास क्रिएशन्स् च्या ‘माई सावरकर’ ह्या पुस्तकातील साधना जोशी ह्यांचा हा लेख)

एकोणीसशे सदतीस साल उजाडलं. स्वारी पूर्ण मुक्त होणार हे निश्चित झालं. बॅरिस्टर जमनादास मेहता यांच्या प्रयत्नांना यश आलं. आमच्या दोन चिमण्या बाळांसोबत आम्हाला हिंदुस्थानी ज्या ठिकाणी बरं वाटेल व स्वारींना राजकारणाच्या दृष्टीने योग्य ठरेल असं स्थान निवडायचं ठरलं. स्वारींनी पूर्ण विचारांती मुंबईत दादरच्या शिवाजी उद्यान या भागात राहायचं ठरवलं. शेठ वालचंद यांचे आर्थिक साहाय्य यावेळी कामी आले. या निर्णयात मी कुठेच नव्हते. अर्थात मी असावं अशी माझी अपेक्षाही नव्हती. सारा स्वारींचाच बेत. मी स्वतःला वेगळं असं काही समजतच नव्हते. दादरचं ‘सावरकर सदन’ हे आमचं यानंतर अखेरपर्यंत निश्चित असं स्थान राहिलं. मुंबईत राहायचं ठरलं तरी स्वारींचं खरं खरं प्रेम पुण्यावरच होतं. पण सर्वच दृष्टीने मुंबई सोयीचं ठरत असल्याने तेच ठिकाण अंतिम झालं.

रत्नागिरी सोडण्यापूर्वी तेथील नागरिकांनी भव्य समारंभ करून आम्हाला निरोप दिला. ‘माई, तात्या आम्हाला विसरू नका. रत्नागिरीला विसरू नका. केव्हाही या आपलेपणाने रत्नागिरी तुमची आहे. तुम्ही रत्नागिरीचे आहात.’ असं अगदी मनापासून सारे म्हणत होते. आर्जव करत होते.

यावर स्वारी हसत म्हणायचे, ‘हो रत्नागिरी माझीच. पण माझं भगूर, माझं नाशिक, माझं पुणं सारं माझंच की! पण खरं म्हणजे ही सर्व भारत भूमीच माझी आहे.’ यावर सारे हसत आणि वातावरण हलंक होई.

प्रभा, विश्वास यांना तर सारे आवर्जून सांगू लागले, ‘तुम्ही दोघांनी तर इथे यायचंच. ही तुमची जन्मभूमीच आहे.’ अशा प्रेमळ वातावरणात, आनंदाच्या सागरात, तृप्ततेची अनुभूती घेत, अतीव सौख्यप्रद अशा त्या रत्नागिरीचं दर्शन घेत घेत आम्ही तिला राम राम केला. पुढे एकदा स्वारी रत्नागिरीला येऊन गेले. पण माझा मात्र हा रत्नागिरीस अखेरचा दंडवत ठरला. कारण पुढील आयुष्यात फिरून मला रत्नागिरीचं दर्शन झालंच नाही.

एक मात्र इथं सांगावसं वाटतं, स्वारी पूर्णपणे मुक्त झाल्यावर निदान त्या दिवशी तरी ते माझ्याजवळ बसून भविष्याबद्दल चर्चा करतील, काही सांगतील, काही विचारतील, प्रभा आणि विश्वासच्या शिक्षणासंदर्भात भविष्यासंदर्भात आम्ही काही बोलू. पति-पत्नीचा प्रेमळ संवाद रंगवू…असं अगदी मनापासून वाटत होतं. पण असं काही घडलं नाही. कारण स्वातंत्र्याखेरीज दुसरा विचारच स्वारींच्या मनाला कधी शिवला नाही.

फक्त त्या दिवशी एवढंच सांगणं झालं. ‘माई मुलांना घेऊन तू दादरच्या आपल्या घरी रहायचं.

‘आणि आपण?’
मी मागाहून येईन, ‘पण आता एका जागी थांबणं नाही.

मी काय समजायचे ते समजले. स्वारींच्या कोणत्याही निर्णयास का? म्हणून विचारणं मला उभ्या आयुष्यात कधीच शक्य झालं नाही. स्वारींची आज्ञा मान्य करून मुलांना घेऊन आम्ही दादरला निघून आलो. आम्ही सर्वजण कोल्हापूरपर्यंत एकत्र आलो. तिथून स्वारी भव्य स्वागत घेत कोल्हापूर, सांगली, मिरज, पंढरपूर, पुणे वगैरे ठिकाणी भेटी देत भारावलेल्या जनतेस दर्शन देत मागाहून मुंबईस आले. सदन तयार होईपर्यंत प्रथम आम्ही सध्याच्या शिवाजी नाट्य मंदिराच्या मागील गणेशपेठ गल्लीत असलेल्या बाळ भाऊजींच्या स्वतःच्या घरात ‘सावरकर भुवन’ येथे राहिलो. तेव्हा मोठे भाऊजी समोरच्या बैठ्या घरात राहात.

त्यानंतर स्वारी मुंबईस आल्यावर आम्ही हे घर सोडून दादरच्या हरी निवास समोरच्या ‘भास्कर भुवन’मध्ये दुसऱ्या मजल्यावर काही दिवस राहिलो व नंतर ३ जून १९३८ रोजी आम्ही ‘सावरकर सदन’ या स्वतःच्या इमारतीत रहायला आहे. आम्ही म्हणजे संपूर्ण साघरकर कुटुंब ! तळमजला, पहिला मजला व गच्ची अशी इमारतीची रचना होती. तळमजल्यावर मोठे भाऊजी, बाळ भाऊजी त्यांच्या कुटुंबासहित राहत. पहिल्या मजल्यावर आम्ही चौघे राहत असू. १९३८ ते १९४२ पर्यंत तिन्ही भावंडांचे सावरकर सदनात एकत्र वास्तव्य होते. मलाही बऱ्याच वर्षांनी साऱ्यांचा सहवास लाभत होता. मी पुन्हा नव्याने संसार मांडायला घेतला. आता माझी दोन्ही मुलं मला मदत करीत होती तो सावरायला.

आमच्या या सावरकर सदनात अनेक महापुरुषांची ये-जा व्हायची.

अखिल भारतातील थोर थोर नेते इकडं भेटावयास येत असत. त्यामुळेच मलाही या थोरांचं ओझरतं का होईना पण दर्शन व्हायचं. स्वारींच्या महानतेमुळे मीही समृद्ध होत होते. यातही लख्ख आठवते ते २२ जून १९४० रोजी नेताजींची सावरकर सदनाला भेट!

खरं तर मी काय पाहिलं, काय ऐकलं, काय अनुभवलं हे सांगायचं नाही. अगदी मरेपर्यंत. असं वचन दिलंय ना स्वारींना. पण मी आता जिवंतच नाही. त्यामुळे तुमचे लौकिकाचे नियम, वचन मला लागूच नाहीत. आणि ही गोष्ट किंवा ही भेट ऐतिहासिक होती. भारताची स्वातंत्र्याकडे वाटचाल सुकर करणारी होती. स्वारींच्या दूरदृष्टीची आणि सैनिकीकरणाच्या धोरणाच्या उदात्तीकरणाची होती. म्हणून तुम्हाला हे सांगायलाच हवं. स्वारींची आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भेट झाली.

सदनाच्या वरच्या मजल्यावर हे दोन्ही महापुरुष भारताचं भविष्य ठरवत होते. आणि खोलीच्या बाहेर काही अंतरावर मी या क्षणाची मूक साक्षीदार ठरत होते. स्वारी आणि रासबिहारी बोस यांच्या योजनेप्रमाणे स्वारींनी दिलेल्या कानमंत्र घेऊन सुभाषचंद्र बोस ह्या वैनतेयाने बर्लिनला भरारी घेतली. तिथून पाणबुडीतून सिंगापूरला गेले. रासबिहारींच्या आजाद हिंद फौजेचे नेतेपद स्वीकारून जपानच्या साहाय्याने अंदमानात जिथे स्वारींना बंदी केले होते. त्या अंदमानात गेले. व जपानच्या मदतीने अंदमानातून ब्रिटिशांना हाकलून तिथे व्याघ्रचिन्हांकित राष्ट्रध्वज फडकवून भारताच्या आधी अंदमान स्वतंत्र केले. स्वारींना काळ्या पाण्याची शिक्षा देणाऱ्या ब्रिटिशांनाच या क्रांतिकारकांनी पाणी पाजले!

घडलेली कुठलीही गोष्ट थेट स्वारींकडून मला कधीच समजली नाही. नेहमीप्रमाणे इतरांना अभिमानाने हा वृत्तान्त सांगत असताना मी ऐकला. आणि अंदमानातील क्रूर छळाच्या दुःखावर फुंकर घातली गेल्याची अनुभूती मला झाली. स्वारींवरील अन्यायाचा कुठेतरी बदला घेतला गेला. धन्य ते बोस! धन्य ते रासबिहारी. किती प्रेम. आणि आदर स्वारींबद्दल!

आणि सोबतच स्वारींच्या विचारांची ताकद! न सांगताही कार्य घडवून आणत होती. जनतेच्या मनात स्वारींबद्दल केवढा आदरभाव निर्माण झाला होता! ते मला पदोपदी प्रत्ययाला यायचं, अनेकांच्या तोंडूनही ऐकायला मिळायचं. मला धन्य धन्य वाटायचं. पण या मोठेपणामध्ये आणि या प्रवास आदरभावामध्ये माझा अर्धा वाटा आहेच, कारण अर्धांगी म्हणून, धर्मपत्नी म्हणून ज्या दिवशी आपल्या हातात माझा हात सप्तपदीच्या वेळी स्वारींनी घेतला त्याच दिवशी सर्व चराचराच्या साक्षीने हे वाटणीपत्र सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलं. अर्थात माझ्या अबोल, सोशिक स्वभावाने वाटणीचा हा अधिकार मी कधीच मागितला नाही. सर्वस्व दान केल्यानं, स्वतःला विसरून सेवाभावाने राबल्यानं निसर्गानं प्रसन्न होऊन मला जे समाधान दिलं तेच माझ्यासाठी फार मोलाचं होतं.

सदनात आता आम्ही रूळू लागलो. इथूनच स्वारींनी हिंदू महासभेच्या व्यासपीठावरून आपल्या ध्येयाच्या प्रचारार्थ हिंदुस्थानभर झंझावती दौरे काढले. प्रचार दौऱ्यासाठी जेव्हा भारतभर गरुडभरारी संचार व्हायचा तेव्हा, परत आल्यावर त्या दौऱ्यातील गोड अनुभव, लोकांशी बोलणं होत असताना मला ऐकायला मिळत. अगदी क्वचित मलाही सांगणं होत असे प्रत्येक गोष्ट मला कळावी अशी अपेक्षा मात्र मी कधीच केली नाही. आताही स्वातंत्र्यासाठी चाललेले स्वारींचे ते कष्ट पाहिले की मला अगदी गुदमरायला व्हायचं.

कधी कारावास म्हणून, कधी जीवाउपरान्त कष्ट म्हणून, कधी असाध्य आजार म्हणून, मी वारंवार चिंताग्नीत उभी होते. स्वारी घरी असताना रोज रात्री त्यांचे पाय चेपल्याशिवाय झोपायचं नाही असा माझा नित्याचा नेम होता. पण तेव्हाही त्यांच्या थकल्या शरीराकडे पाहून कष्टी व्हायला व्हायचं. मनात यायचं, ‘पुरे ना आता हे धकाधकीचं जगणं, होईल सगळं छान, सामान्य पति-पत्नीप्रमाणे आपणही राहूयात, मुलांमध्ये गुंतूयात, प्रेमाच्या चार गोष्टी करूयात, हिंडूयात फिरूयात, कौटुंबिक जीवनाचा आस्वाद घेऊयात’. पण हे सारं मनात… मूकपणे… अबोलपणे… माझं हे मागणं स्वारींपर्यंत कधी पोचलंच नाही.

सर्वसामान्य गृहस्थ जीवन माझ्या कधी वाट्यालाच आलं नाही. सतत, दडपण, चिंता, स्वारींच्या धाडसामुळे उभं ठाकणारं संकट याची भीती माझ्यासोबत. त्यामुळे वाटायचं स्वारींची जन्मठेपेची शिक्षा संपली पण माझी मात्र अजूनही सुरूच आहे. कदाचित माझ्या मृत्यूसोबतच ती संपेल!

संसारात असं त्यांचं लक्षच नसे. सतत डोक्यात विचार, लिखाण,भाषणं. त्यामुळे घरातील इतर गोष्टींसाठी स्वारींकडे वेळ कुठला? त्यांनी प्रभात आणि विश्वास यांचा कधीच अभ्यास घेतला नाही किंवा प्रसंगी कधी एखादा धडा शिकवला नाही. मात्र परीक्षेच्या आधी एक-दोन महिने ते मुलांसाठी शिकवणी ठेवत पण स्वतःहून लक्ष घालून कधी अभ्यास किंवा ऐतिहासिक किंवा अन्य विषयांवरील विशेष माहिती त्यांनी मुलांना कधीच सांगितली नाही. वक्तृत्व किंवा लेखनातील बारकावे वा पाळायाची पथ्ये आदि मार्गदर्शन करण्याची मेहनत त्यांनी कधीच घेतली नाही. स्वारी कधीच सार्वजनिक विषयांवर मुलांशी चर्चा करीत नसत. परंतु त्यांच्या इतरांशी ज्या चर्चा व्हायच्या त्या मात्र दोन्ही मुलं आवडीने ऐकत असल्याने त्यांचा परिणाम, संस्कार परोक्षपणे मुलांवर झाला. स्वारींनी आम्हा कुटुंबीयांना कधीही कुठल्याही समारंभाला नेलं नाही. कधीही ते आम्हाला स्वतःहून छायाचित्रात समाविष्ट करीत नसत. चार लोकांत त्यांनी कधीही स्वतःहून मुलांचा परिचय करून दिला नाही. आपल्या विलक्षण बुद्धीमत्तेचा, अनुभवाचा उपयोग आपल्या मुलांना घडविण्यासाठी, पुढे आणण्यासाठी त्यांनी कधीच केला नाही. त्या दृष्टीने तसा माझ्या दोन्ही मुलांना त्यांच्या लोकप्रियतेचा कोणताच लाभ झाला नाही.

असो. जगी सर्व सुखी असा कोण आहे? त्यामुळे माझी याही बाबतीत काही तक्रार नव्हती. आम्हाला स्वारींचा सहवास मिळतोय. त्यांच्या मोठेपणात आम्हाला मोठेपणा मिळतोय यातच आम्ही सुखी होतो. आमच्या सदनात म्हणजे इथे रहायला आल्यावर घरी गणपती पूजा, नवरात्रात दुर्गादेवीची पूजा होत असे. गणपती दिवसात गणपतीची स्थापना, पूजा-अर्चा आदी धार्मिक विधी पार पडत. यावेळी घराभोवती स्वारींनी फुलझाडे, शोभेची झाडे, विविध विपुल लावून फुलबाग फुलवली. त्यातील शोभेच्या झाडांच्या कुंड्या, वस्तू आरास करताना उपयोगात आणीत असू. सुवासिक फुलांचे हार, रांगोळ्या काढण्यात मी त्यांचा फार हौसेने उपयोग करीत असे. इतर पूजासाहित्यही मी तत्परतेने सिद्ध ठेवत असे. मोठे भाऊजी यात प्रामुख्याने पुढाकार घेत. कुटुंबातील सर्वात वडील म्हणून बाबांचा पुढाकार असल्याने इतर लहान-मोठी माणसेही उत्साहाने व उल्हासाने यात सहभागी होतं. नऊ दिवस कुलदेवता दुर्गादेवीची पूजा आम्ही करीत असू. दसऱ्याच्या दिवशी व गुढीपाडव्याला घरावर कुंडली कृपणांकित भगवा ध्वज उभारून त्याची पूजा मी करीत असे. दसऱ्याला शस्त्रपूजा करण्याचा प्रघात म्हणून जांबिये ठेवून त्याचीही पूजा करीत असू. वरील शस्त्राची, ध्वजाची पूजा करावी असा स्वारींचा दंडक होता. त्यासाठीही सर्व सिद्धता मी करून ठेवत असे.

अशा व्यग्रतेत आमचे दिवस चालले होते. स्वारींचे दौरे नियमित सुरू होते. अशाच एका दौऱ्याहून स्वारी परत आले ते एक असाध्य दुखणं घेऊन. त्या शरीराला बालवयापासून बरीच दुखणी झाली होती. देवी, प्लेग, ताप आणि अंदमान… आणि आता हे असाध्य दुखणं म्हणजे, ‘सायटिका.’ उपचार सुरू झाले. पण त्यातही ‘काय करणार? अशा आणीबाणीच्या वेळी आजारी पडलोय’ अशी खंत वारंवार बोलून दाखवायचे. उपचार झाले. दुखणं बरं झालं आणि फिरून पुन्हा काम सुरू! याच सुमारास स्वारींना एकसष्टावं वर्ष लागलं मग काय विचारावं? या महान देशभक्ताच्या सक्रिय कर्तृत्वाची गौरवगाथा गाण्याची ही श्रेष्ठ संधी कोण दवडणार? हा आनंद व्यक्त करण्यासाठी एक अखिल भारतीय योजना निर्माण झाली. आनंदाचं आणि गौरवाचं प्रतीक म्हणून आहेर रूपानं बऱ्याच मोठ्या रकमेची थैली अर्पण करायचं ठरलं. त्यासाठी एक सत्कार समितीही नेमली गेली.

एकसष्टी समारंभ पुण्यालाच ठरला. स्वारी भलतेच खुश झाले. पुणं त्याचं लाडकं ना? पुण्याचं वातावरणही उत्साही बनलं. स्वारींनी मला किंवा मुलांना कधीच बरोबर नेणं झालं नाही. स्वारींची मतं याबाबत निश्चित होती. कोणीतरी तरीही विचारी, ‘तात्या कित्येक पुढारी आपल्या पत्नीला किंवा मुलांना दौऱ्यांमध्ये सोबत नेतात, तुम्ही का बरं माईंना सोबत नेत नाही?’ यावर सांगण होई,

‘दौरा काढताना लवाजमा बरोबर न्यायचा की काय? अरे आम्ही लोकमान्यांच्या पठडीतले, आम्ही तोच ध्रुवतारा समजतो. लोकमान्य दौऱ्यावर कधी सत्यभामाबाईंना बरोबर नेत असत का? मग मी तो आदर्श का मोडावा? अरे पती पत्नीच्या प्रेमाचं प्रदर्शन करायचं नसतं. त्या प्रेमाचं प्रदर्शन करायची तुम्हा तरुणांना सवय झालीय. पति-पत्नीचं शुद्ध प्रेम प्रदर्शनीय नाही, तर ते पावित्र्यावर आधारलेलं एक दिव्य संजीवन आहे.’

यावर फारच आग्रह करीत ते कार्यकर्ते म्हणाले, ‘तात्या, अपवाद म्हणून तुमच्या मतानं आणि आग्रह म्हणून आमच्यासाठी, आम्हा कार्यकर्त्यांसाठी माई, प्रभाताई, विश्वास यांना घेऊन पुण्यास या ना! तात्या खरंच आणा त्यांना.’ त्यावर ‘अरे हो, पुण्याच्या श्रेष्ठींच्या निमंत्रणाप्रमाणे सर्व होईल’ असं स्वारींनी त्याला सांगितलं.

त्या तरुणांनी पुण्याच्या स्वागत समितीच्या श्रेष्ठींना सांगितलं असावं, म्हणा किंवा कसंही म्हणा, पण मला व मुलांना आग्रहाचं निमंत्रण आलं. आणि आम्ही सर्व स्वारींच्या एकसष्टी समारंभासाठी पुण्याला गेलो.

२८ मे १९४३ एकसष्टी समारंभाचा अभूतपूर्व सोहळा, त्यावेळी जनतेनं केलेलं स्वागत, विराट सभा, वगैरे मला प्रत्यक्ष मनमुराद पहावयास मिळालं. मलासुध्दा कित्येकजणी भेटायला येत होत्या. या समारंभासाठी वन्सं, धाकटे भाऊजी त्यांची पत्नी व मुलं, मोठे भाऊजी बाबा वगैरे सारी कुटुंबीय मंडळी आली होती. पण स्वारीचं श्रद्धास्थान पितृतुल्य भाऊ आणि मातृतुल्य आई मात्र हा सुवर्णक्षण पाहू शकले नाहीत. कदाचित वर स्वर्गातून हा सोहळा पाहून त्यांचे डोळेही माझ्यासारखे आनंदाश्रूंनी भरले असावेत. त्यावेळी भाऊ आणि आईची खूप आठवण येत होती. ज्यांनी आपल्या जावयासाठी इतके त्याग केले त्या जावयाचं मोठेपणही पाहण्याचं भाग्य त्यांना लाभायला हवं होतं. पण त्याच्या इच्छेपुढे कुणाचंच काही चालत नाही हेच खरं! भाऊंना लाभलेल्या इतर सहा जावयांपेक्षा स्वारी नक्कीच श्रेष्ठ ठरले होते. हिंदुस्थानच्या इतिहासात भाऊंचंही नाव अजरामर झालं स्वारींच्या तेजोमय जीवनामुळं. त्या सर्व खडतर कष्टमय कालखंडातील हा सर्वांत भाग्याचा दिवस आम्ही अनुभवत होतो. कृतकृत्य होत होते पण याही आनंदाला दुःखाची छटा लाभलीच, पण…असो.

पुण्याहून त्याच भारावलेल्या मनःस्थितीत आम्ही दादरला परतलो. आता प्रभात मोठी झाली होती. तिच्या बरोबरच्या मुली स्वारींची कीर्ती ऐकून मुद्दाम भेटावयास येत. प्रभात स्वारींची फारच लाडकी त्यामुळे स्वारींनी त्या मुलींना कधी नाराज केलं नाही. मुलांवर स्वारींचा विशेष लोभ होता.

दरम्यान स्वारींनी अखिल हिंदू तिळगुळ समारंभ आयोजित करावेत असे पत्रक काढले, ते पत्रक वाचून पुण्याच्या सौ. जानकीबाई जोशी. कु. सिंधु गोखले (नंतरच्या सौ. सिंधुताई गोपाळराव गोडसे) यांनी पुण्यातच असा समारंभ करण्याचे ठरवले आणि त्यासाठी मलाच निमंत्रण धाडले अर्थात कोणत्याही निमंत्रणाचा स्वीकार करणं, अथवा न करणं माझ्या हातात नव्हतंच. मी आपणहून प्रकृतीचं कारण सांगून निमंत्रण नाकारलं. या संदर्भात स्वारींनी पत्राद्वारे त्यांना कळवले की, ‘माईंची वाट न पाहता हा समारंभ साजरा करावा.’ पण मी समारंभास आलेच पाहिजे असा सिंधूताईंनी आग्रहच धरला. शेवटी नाइलाज झाल्याने स्वारींनी मला जाण्यास सांगितले. मी गेले. आणि ३० जानेवारी १९४४ ला पुण्यात माझ्या अध्यक्षतेखाली तो हिंदू महिलांचा तिळगुळ समारंभ साजरा झाला. यावेळी भाषणात मी म्हणाले, ‘राष्ट्र हेच माझे घर आणि घर हेच माझे राष्ट्र.’ असे मी मानीत आले. स्पृश्यास्पृश्यता किंवा जातीभेद न मानता या समारंभात १५०० स्त्रियांनी परस्परांना तिळगुळ दिला हे पाहून मला आनंद झाला. तरुण मुलींच्या मनावर जाती-उपजातीतील सर्व हिंदू समान असल्याचे संस्कार झाले म्हणजे त्या मोठ्या होतील तेव्हा समाजातील जन्मजात जातिभेद आणि अस्पृश्यता समाजातून नष्ट झालेली दिसेल,’ यावर टाळ्यांच्या कडकडाटाने या भाषणाला दाद मिळाली. नंतर जानकीबाई जोशी, गांगुर्डे, खोपकर नि गोखले यांचीही या संबंधी भाषणे झाली. व त्या कौतुकाच्या स्वीकारासह मी दादरला परतले.

पण आनंद माझ्या आयुष्यात फार काळ टिकणारच नाही असं कदाचित सटवाईने माझ्या भाळी लिहिलं असावं. कारण सावरकर घराण्यातील वडील बंधू बाबारावांची आता प्रकृती फारच ढासळली अशी बातमी डॉक्टरांकडून आली. बरेच उपचार झाले पण प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यांचं स्थानबद्धतेचं ठिकाण सांगली येथेच पुन्हा जाण्याचं ठरलं. त्याप्रमाणे बाबा, शांता व तिची मुले सांगलीला गेले. अखेर त्यांना कर्करोगाने गाठले. साऱ्या दुखण्यांनी त्यांना अगदी बेजार केले होते. स्वारी त्यांना एकदोनदा भेटूनही आली. सांगलीत बाबांच्या खर्चासाठी स्वारी दरमहा शंभर रुपये नियमाने धाडीत. त्यांच्या काळजीने माझाही जीव तीळ तीळ तुटत होता. शेवटचे काही दिवस त्यांना विलक्षण कष्ट झाले. स्वारींना भेटण्याचा ध्यासच ते घेऊ लागले. तसे निरोपही येऊ लागले. स्वारींना उसंत कुठे होती? आता सांगलीला जाण्यास. हिंदू महासभेचे झंझावती प्रचारदौरे भारतभर सुरू होते आणि आता निवडणुकाही जाहीर झाल्या होत्या. त्यामुळे त्या व्यवस्थेतूनही वेळ काढत. स्वारींनी बाबांना एक पत्र धाडले,

‘ज्यासाठी आपण अमाप हालअपेष्टा भोगल्या, कष्ट उपसले ते आपले प्राणप्रिय कर्तव्य आपण पुरे केले आहे. आपण कृतार्थ झालो आहोत. स्वातंत्र्याच्या ध्येयसिद्धीसाठी पूर्वी आपण अनेकदा मृत्यूला आव्हान दिले. आता कृतार्थतेच्या भावनेने मृत्यूला मित्र मानून हे कर्मवीरा, अत्यंत समाधानाने व शांतपणे अनंतात विलीन व्हावे.’

या पत्राचा व्हायचा तोच परिणाम झाला. कदाचित बाबांच्या प्रकृतीने उचल खाल्ली आणि शेवटी १६ मार्च १९४५ ला हा पुण्यात्मा पंचत्वात विलीन झाला. सावरकर घरावर दुःखाचा डोंगर कोसळला.

अशा या दिवसांमध्ये काही आंनदानं क्षणही मोत्यांप्रमाणे चमकत होते आमची प्रभा आता मोठी म्हणजे लग्नाची झाली. तिच्यासाठी वर संशोधन सुरू झाले. आणि दि. २ मे १९४५ ला माझी प्रभा चिपळूणकरांची सून झाली. हा विवाह म्हणजे स्वारींच्या ब्रिटिश राजवटीच्या बंदिवासातून १९३७ मध्ये मुक्तता झाल्यानंतर आमच्या घरात होणारे पहिलेच कौटुंबिक कार्य. कल्पनातीत असा हा सुखद सोहळा !

साहजिकच या विवाह सोहळ्यास खासगी स्वरूप न राहता तो एक सार्वजनिक उत्सवच झाला. पुण्याच्या सुमित्राबाई आणि मी या लग्नानिमित्त बऱ्याच जवळ आलो. अर्थात लग्न पुण्यालाच झालं. कित्येकांना न बोलवतासुद्धा कित्ती गर्दी झाली होती! का तर म्हणे स्वारींना कन्यादान करताना पहावयास मिळावे म्हणून! आमच्या प्रभेला पुणे येथील सुप्रसिद्ध विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे नातू माधवराव यांना दिले होते. नथुराम गोडसे व ना.द. आपटे यांच्या मध्यस्थीने हा विवाह जुळून आला होता. मी आणि स्वारींनी अगदी विधिपूर्वक प्रभेचे कन्यादान केले. वास्तविक अशा विवाह विधींवर स्वारींचा विश्वास नव्हता पण सर्व हितचिंतकांच्या आग्रहास्तव त्यांनी साऱ्यांच्या इच्छेचा मान ठेवला होता. शेवटी बापाचंच काळीज ते!

असा हा सोहळा संपल्यावर प्रभा सासरी जाण्याची वेळ आली. सारे निकटवर्ती एकत्र आले. प्रभा आम्हाला नमस्कार करून गाडीत बसली. तिला निरोप देताना ‘प्रभेला सांभाळा’ एवढेच उद्गार स्वारींनी काढले. त्यांचा कंठ सद्गदित झाला. डोळ्यातले अश्रू थोपविण्यासाठी त्यांनी हाताच्या मुठी आवळून धरल्या होत्या. मोटार निघून गेली आणि आमच्या आयुष्यात एक पोकळी, उणीव निर्माण झाली, प्रभा सासरी गेली. कौटुंबिक कर्तव्येही राष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या कर्तव्यापेक्षा न्यून प्रतीची मानणाऱ्या स्वारींची मनःस्थिती याप्रसंगी फार हळवी झाली होती. राष्ट्रकार्यासोबत आता त्यांच्या हातून कन्यादानाचे कौटुंबिक कार्यही पूर्ण झाले होते. अनपेक्षितपणे या विचारांनी ते पुन्हा भावुक झाले. कोणाशीही न बोलता स्वारी अतिथिगृहात गेले. खोलीत कुणालाही येऊ देऊ नकोस अशा सूचना कार्यवाहांना दिल्या आणि स्वारींनी खोलीचे दार आंतून बंद करून घेतले. कदाचित बराच वेळ थोपवून धरलेल्या अश्रूंना आता त्या बंद खोलीत मुक्त वाट मिळणार होती. सर्व आवरासावर करून आम्ही मुंबईला परतलो. घरात आपल्या खोलीत जाता जाता स्वारींनी सवयीप्रमाणे टेबलावर दिसलेले संस्कृत पुस्तक उचलले व ते वाचू लागले तो नेमके कण्वमुनींनी शकुंतलेची सासरी केलेली पाठवण या धड्याचे पान! काय योगायोग पहा. आपले दुःख विसरण्यासाठी स्वारींनी पुस्तक उचलेले खरे, पण वाचवायास मिळालेला मजकूरही त्याच विषयावरचा! पुढे विश्वासला हा प्रसंग सांगताना स्वारी म्हणत, ‘की मुलीला सासरी धाडताना कण्वमुनींप्रमाणे माझी अवस्थासुद्धा विरह भावनेने व्याकुळ झाली होती.’

पुढे काही दिवसांनी माझ्याशी स्नेह जुळलेल्या सुमित्राबाई घरी आल्या आणि कुठल्याशा समारंभासाठी मला निमंत्रण देऊ लागल्या. मी स्वारींच्या आज्ञेबाहेर नाही असं सांगताच मोर्चा स्वारींकडे वळला. बऱ्याच मार्गांनी त्यांनी स्वारींना विनंत्या केल्या, पण नाही. स्वारी काही ऐकेनातच! म्हणाले, ‘हे पहा सुमित्राबाई आताचं अशक्य दिसतंय. पण पुढे माई केव्हा तरी येईल. नक्की येईल.’

‘ठीक आहे, पुढच्या वेळी माई नक्की येतील’ असं सांगते मी साऱ्याजणींना. ‘माई तुम्ही नक्की याला ना?’

‘इकडनं पाठवणं झाल्यावर येईन की, मी कधीच स्वारींच्या शब्दांबाहेर नाही.’ अशा संवादावर तो प्रसंग संपला. मनात विचार आला. आपण किती एकरूप झालोय स्वारींसोबत ना? वेगळा असा, स्वतंत्र असा विचार आपण कधी करूच शकत नाही ना! कधी केलाही नाही, पण या साऱ्यात मात्र, माझा विचार असा स्वारींनीही कधी केला नाही. तक्रार नाही. पण कधीतरी माई तुला काय वाटतंय? म्हणून माझं मत निदान एकदा तरी विचारावं ना? खरंच स्वारींच्या जीवनाला माझ्या शालीनतेची जोड मिळाली. पण खरं सांगू, मोठी माणसं लोकांना फार फार चांगली वाटतात, असतातही.

पण जवळच्यांना त्यातील खाचाखोचा, जडण-घडण, बोच कळत असते. महानत्व राबवणं जितकं कठीण, तितकंच कठीण महापुरुषाच्या सहवासात राहणं, पत्नी म्हणून ते पत्नीपद भूषवणं. महापुरुषांच्या पत्नीला नित्य नवी सतीत्वाची सत्त्वपरीक्षा द्यावी लागते. जणू काही अग्नीशिवाय अग्निपरीक्षाच!

असो. स्वारी माझं सर्वस्व होते, एवढं मात्र खरं. त्यामुळे त्यांच्या इच्छेतच माझी इच्छा! प्रभेच्या पाठवणीनंतर मुळात घरातले कमी बोलणारे स्वारी जरा जास्तच एकांतप्रिय झाले. भेटावयास येणाऱ्यांची ये-जा फारच वाढल्याने स्वारींनी आपल्या भेटीच्या वेळेवर नियंत्रण घालून घेतले.भेटावयास येणाऱ्या सगळ्यांनाच चहा द्यावयाचं ठरवलं, तर ते अगदी अशक्यच होतं. लोकांनी याबाबत स्वारी आणि पर्यायाने माझ्यावरही बरीच टीका केलेली माझ्या ऐकिवात आहे. इतक्या अफाट जनसमुदायाशी संबंध आल्यावर हे कसं शक्य होणार? पण माणसं बोलतात. दुसऱ्याच्या जीवनाचा त्याच्या भूमिकेत जाऊन विचार करण्याची सिद्धता बहुतेकांची नसतेच नसते.

पण काहीजण मात्र हे सारं समजून आपलेपणानं वागत. स्वारींना आवडणारी कार्ल्याची भाजी, शेपूची भाजी, तसेच आमच्या आवडीचे विशेष पदार्थ माझ्या दोनचार मैत्रिणी आम्हाला आवर्जून आणून देतं ते भक्तीने आणि प्रेमानं दिलेले पदार्थ आम्ही दोघांनाही मनापासून आवडत.

स्वारींची राहणी अगदी साधी असायची. पणं थोडाबहुत अत्तराचा नाद होता. विशेषतः केवड्याचं अत्तर जास्त आवडत असे. कित्येक वेळा स्वारी मोठ्या आवडीनं घरात राजापुरी पंचाही नेसत असत.

स्वारी सकाळी साडेसहा-सात वाजता उठल्यावर त्यांना नाश्ता लागायचा. बरेचदा चहा, दूध व अंडी असा. त्यानंतर सारा पत्रव्यवहार स्वारी पाहत. दुपारी बारा वाजता मनमुराद स्नान झाल्यावर पुरुषसूक्त म्हणत. नंतर साधारण तासभर एकांतात चिंतन-मनन करीत. मला तर वाटतं अगदी समाधी अवस्थेपर्यंतचा अधिकार स्वारींना प्राप्त झाला असावा. तोपर्यंत दुपारच्या जेवणाची वेळ झालेली असे. मी खाली स्वयंपाकघरात स्वारींचं ताट वाढून ठेवत असे व ते कधी खाली येतील यांची वाट पाहत असे. जेवण अगदी गार होऊन जायचं. पण मी मात्र वाटच पाहत बसायचे. स्वारी एकटेच जेवत. साऱ्यांसोबत जेवणं त्यांना आवडत नसे. मात्र साऱ्यांनी आधीच जेवून घ्या. असा त्यांचा आग्रह असे. ते स्वतःच स्वतःला वाढून घेत. न बोलता जेवत. आवरून ठेवत आणि पुन्हा आपल्या खोलीत. संवाद असा नाहीच. मी फक्त ते वेळेवर जेवतात की नाही, काही त्रास होत नाही ना, याचीच काळजी घेत असे. आता वाटतंय एका घरात असूनही खालच्या मजल्यावर स्वारींची वाट पाहणं. ते कधी येतील? कधी जेवतील? वाट पाहणं.. म्हणजे अजूनही वाट पाहणं संपलेलं नव्हतं फक्त स्वरूप बदललं होतं. कदाचित ‘वाट पाहणं’ माझ्या पाचवीलाच पूजलेलं होतं. असो.

स्वारींचा स्वभावच भिन्न, त्यांना एकांत आवडे. घरातल्या मंडळींची वर्दळ त्यांना चालत नसे. ते आपल्या खोलीतच शक्यतो एकटे असत. कामावाचून कोणी आलेले वा गप्पा मारत बसलेले त्यांना नको असे… अगदी मीसुद्धा…

मला जेवणात तिखट पदार्थ जास्त आवडायचे. स्वारींच्या खास अशा आवडी निवडी नव्हत्या. मांसाहार कधी कधी घेत असतं. मासे, मटणही आवडीने खात. भजी, दही, गुलाबी आईस्क्रीम, श्रीखंड असलं की स्वारी खूश व्हायची. खूश असले की शीळ घालत गुणगुणायचे. आणि हो अंदमानातील सोबतीण तपकीर त्यांना सदा लागे. पुढे मात्र जाणीवपूर्वक त्यांनी ही सवय मोडली.

अंदमानातून आल्यापासून स्वारी फार एकान्तप्रिय झाले होते. तोच एकटेपणा माझ्या आयुष्याला पुरून उरला. अंदमानाच्या छळाची छाया कुटुंबावर शेवटपर्यंत राहिली माझी सोबतीण म्हणून. माझी जन्मठेप म्हणून. सासरी गेलेल्या प्रभेची मला सारखी आठवण यायची. एकदा तरी तिला पुण्याला जाऊन भेटावं, असं खूप वाटायचं. स्वारींना विचारलं तर, ‘माई काही गरज नाही. ती सुखात आहे. तू काही तिला भेटायला जाऊ नकोस.’ असं म्हणत स्वारींनी ते नाकारलं. कारण विचारण्याचा माझा स्वभाव नव्हता. पण मन मात्र आतून पिळवटून निघत होतं.

स्वारींच्या तब्येतीची मी काळजी घेतच होते, पण १९४५ मध्ये त्यांची प्रकृती फारच बिघडली. स्वारींनी आपल्या दुखऱ्या दाताबरोबर चांगले सर्व दातही काढून घेतले. सर्व दात फार थोड्या दिवसात काढल्याने त्याचा मज्जातंतूंवर परिणाम झाला. त्यात सार्वत्रिक निवडणुकीत हिंदू महासभेला पराभव पत्करावा लागला. याचं दुःख जास्त जिव्हारी लागलं. प्रकृती अधिकच खालावली. त्यामुळे त्यांना मधूनमधून भयग्रस्त असे भास होत. त्यांच्या मनावरचा ताण वाढे आणि त्यामुळे मीही अस्वस्थ होत असे. हे सगळं सोडून स्वारींसोबत कुठेतरी दूर दूर, शांत, एकांतात निघून जावं असं वाटे. पण माझ्या हातात काय होतं? फक्त काळजी करणं एवढंच! स्वारींना हळूहळू स्मृतिभ्रंशाची लक्षणे दिसू लागली. आता मात्र डॉक्टरांनी त्यांना मुंबईबाहेर एकांताच्या स्थळी सक्तीची विश्रांती घेण्याच्या सल्ला दिला. स्वारींनाही तशी आवश्यकता वाटू लागली. मग अशा स्थळाचा शोध सुरू झाला. तेव्हा अशी सक्तींची विश्रांती केवळ वालचंदनगरला मिळू शकेल असा सर्वांचा विचार झाला. स्वारींच्या वास्तव्याची तेथे व्यवस्था करण्यास शेठ गुलाबचंद यांनी तत्परतेने मान्यता दिली. सर्व व्यवस्था करून ३१ डिसेंबर १९४५ ला तेथे जाण्याचे ठरले. कागदपत्रे व सामानाची आवराआवर करून मी, स्वारी आणि विश्वास रात्रीच्या गाडीने निघालो.

सकाळी पुण्याला व तिथून गाडीने वालचंदनगरला आम्ही सर्व शेठजींच्या बंगल्यात आलो. स्वारींची क्रमांक एकच्या अतिथिगृहात राहण्याची सोय केली होती. ज्यामुळे शेठजींना स्वारींच्या प्रकृतीवर सोय-गैरसोयीवर लक्ष ठेवता येत असे. त्यांनी आमचीही म्हणजे माझी आणि विश्वासची व्यवस्थाही राजेशाही थाटाने ठेवली होती. शेट गुलाबचंद यांची सर्वांना कडक सूचना होती की स्वारींना कुणालाही भेटू द्यायचे नाही. स्वारींना इथेही सारखे भास होत. विचित्र आणि भीतिदायक. तेव्हा ते आम्हाला उठवून प्रतिबंध करण्यास सांगत. ‘माई, विश्वास जा अरे… जा त्यांना अडवा… थांबवा .. अरे जा’ असा त्यांचा आक्रोश सुरू झाल्यावर आम्ही बाहेर जाऊन पाहणी करून आल्याचे नाटक करून तसा कोणीही प्रयत्न करीतच नसल्याचे प्रत्येक वेळी स्वारींनी सांगून त्यांचे समाधान करीत असू. अशाने त्यांना ताप भरे. सर्दीही होत असे. काय आणि कशी घेऊ स्वारींची काळजी? मी मात्र हतबल होत असे. अशा अवस्थेतच २० जानेवारी १९४६ ला दुपारी स्वारींना हृदयविकाराचा झटका आला. बोलता बोलता स्वारी एकदम खुर्चीतच लवंडले आणि स्तब्ध झाले. माझ्या काळजाचा जणू ठोकाच चुकला. जवळ जवळ सात तास त्यांची प्रकृती चिंताजनक होती. पण सुदैवानं माझं कुंकू बळकट असल्याने डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले आणि स्वारींना आराम वाटू लागला. पुन्हा काही दिवसांनी असंच घडलं, पण डॉ. भिडे यांनी त्याही परिस्थितीला योग्य पद्धतीनं हाताळलं आणि आता प्रकृंतीत बरीच सुधारणा होऊ लागली. शेठ गुलाबचंद कधी कधी स्वारींना बाहेर फिरावयास घेऊन जात. कधी कधी विश्वासही त्यांच्या सोबत असे. पण मला मात्र स्वारींनी कधीही सोबत घेतलं नाही, ना कधी तशी विचारणा केली. पति-पत्नीच्या नात्यातील साध्या साध्या अपेक्षाही कधी पूर्ण होऊन मला त्या अनुभवायला मिळाल्या नाहीत. कारण एकच राष्ट्राचा संसार!

बाहेरील मोकळ्या वातावरणात वावरल्याने आणि थंड सुखकर हवेमुळे स्वारींची प्रकृती सुधारत होती. हीच माझ्यासाठी समाधानाची बाब होती. आमची प्रभा पुण्यातच राहत होती. ती मधून मधून स्वारींना भेटावयास येत असे. त्यायोगे मलाही लेकीशी चार गोष्टी करता येत असत. शेठर्जीची गुलाबाची बाग होती. त्यातील गुलाब तोडण्यास सक्त मनाई असे. पण प्रभेने एक आवडलेले गुलाबाचे फुल ‘तोडू का?’ म्हणून विचारले आणि शेटजींनी तिला आनंदाने अनुमती दिली. इतकी आमची प्रभा साऱ्यांची लाडकी होती.

वालचंदनगरला जाण्याचं ठरलं खरं, मात्र याचा विपरित परिणाम माझ्या विश्वासच्या शिक्षणावर झाला. तेव्हा त्याला एकाएकी शाळा सोडावी लागली. खरंतर स्वारींच्या प्रकृतीपुढे इतर कशालाच महत्त्व नव्हते. पण शिक्षणात खंड पडला होता हेही खरेच. तरीही विश्वास वेळ मिळेल तेव्हा अभ्यास करी. शेवटी या अस्थिरतेमुळे विश्वासच्या अभ्यासाचे ते वर्ष वाया गेलेच, स्वारींची प्रकृती सुधारली आणि ३ एप्रिल १९४६ ला आम्ही सर्वांनी वालचंदनगरच्या रहिवाशांचा जड मनाने निरोप घेतला. स्वारींच्या येथील वास्तव्याच्या काळात दादरच्या घरची व्यवस्था पाहण्यासाठी श्री. अप्पा कासार यांना स्वारींनी मुंबई येथेच घरी राहण्यास सांगितले होते. वालचंदनगरहून त्याच दिवशी आम्ही चतुःशृंगीच्या शेठजींच्या बंगल्यात आलो व आणखी एक महिना तिथेच राहिलो. मधून मधून प्रभाही भेटून जात असे. त्या बंगल्यात संगीत दिग्दर्शक सुधीर फडके यांनी स्वारींपुढे (सागरा प्राण तळमळला) हे गीत स्वतःच्या चालीत प्रथमतःच म्हणून दाखवले होते. महिन्यानंतर स्वारी व आम्ही पुणे स्थानकाजवळच्या अतिथिगृहामध्ये राहिलो. तेव्हाच त्यांनी विश्वासला पुण्याच्या वसतिगृहात ठेवण्याचे ठरविले. अशाही अवस्थेत विश्वासच्या शिक्षणाबद्दल स्वारींची काळजी पाहून मी मनोमन सुखावले. तिथेच काही दिवसांनी स्वारींना विषबाधा होऊन उलट्या व जुलाब सुरू झाले. ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले. मी आणि विश्वास दिवसभर रूग्णालयात सचिंत बसून होतो. स्वारी यांतूनही बरे झाले. त्या ठिकाणी साधारण एक महिना राहून आम्ही ऑगस्ट १९४६ मध्ये मुंबईला परतलो. विश्वास वर्षभर तिथेच वसतिगृहात राहिला. ते वर्ष त्याने तिथेच पूर्ण केले. नंतर पुन्हा घरी राहूनच त्याने शिक्षणास प्रारंभ केला.

पण पुढे स्वारीवरील अभियोगामुळे घरची सारी जबाबदारी विश्वासवर पडल्याने व राजकीय संकटामुळे त्याचे शिक्षण बंद पडले. नंतर जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्मध्ये १९५० ते ५२ मध्ये दोन वर्षांचा मुद्रणकला विभागाचा अभ्यासक्रम त्याने पूर्ण केला. पण एकंदरीतच या अस्थिरतेमुळे विश्वासच्या शिक्षणावर तेव्हा विपरीत परिणाम झाला. हे खरं! मध्ये बऱ्याच घडामोडी झाल्या. स्वातंत्र्य मिळालं. फाळणीचा शाप घेऊनच स्वारींचं स्वप्न अखेर सत्यात उतरलं. स्वारींना खूप आनंद झाला. ‘याचि देही, याचि डोळा, पाहिला स्वातंत्र्य सोहळा’.

आनंद यासाठी की थोडं का होईना स्वतःचं इच्छित पूर्ण झालं. सर्व हिंदुस्थान जरी अजून एकसंध राष्ट्र झालं नाही तरही हिंदुस्थानचा बराच भूभाग स्वतंत्र झालेला पहावयास मिळाला. शौर्याचं प्रतीक म्हणून असलेला अरुणिमा रंगाचा ध्वज आणि बहुमतानं सर्वमान्य झालेला राष्ट्रध्वज आमच्या निवासस्थानावर फडकू लागला. पण याही आनंदाला गालबोट लागलं.

— साधना जोशी

(व्यास क्रिएशन्स् च्या ‘माई सावरकर’ ह्या पुस्तकातील साधना जोशी ह्यांचा हा लेख)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..