नवीन लेखन...

सावरकरांना मिळालेला वैचारिक वारसा

केसरीमधील लोकमान्य टिळकांचे आणिकाळपत्रातील शिवरामपंत परांजपे यांचे लेख वाचून सावरकर भारावून गेले होते आणि तेव्हापासून टिळक नि परांजपे यांना त्यांनी आपले गुरू मानले होते.

व्यास क्रिएशन्स द्वारा प्रकाशित “चैत्र पालवी” या नियतकालिकाच्या “सावरकर परिवार विशेषांक” मध्ये अक्षय जोग यांनी लिहिलेला लेख


स्वातंत्र्यवीर सावरकरांना तसे ८३ वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य लाभले होते आणि ते एक क्रांतिकारक, समाजक्रांतिकारक, महाकवी, लेखक, वक्ते, नाटककार, भाषा नि लिपिशुद्धीकार, संघटक, साहित्यिक, हिंदुत्वाचे उद्गाते असे शतपैलू व्यक्तिमत्व होते. सुरुवातीला भगूर नि नाशिकमध्ये शालेय जीवन, क्रांती संघटनेची स्थापना आणि कार्य, पुण्याला महाविद्यालयीन जीवन आणि विदेशी कपड्यांची होळी, नंतर लंडनला कायद्याचे शिक्षण, सोबत भारत भवन मधील उलाढाली, १८५७ चे स्वातंत्र्यसमर नि जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचा संक्षिप्त अनुवाद आणि त्याला लिहिलेली जहाल प्रस्तावना या दोन्ही ग्रंथांवर आलेली बंदी, सहकारी धिंग्राने केलेला वायलीचा वध, लंडनला अटक, तिथून भारतात आणताना फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरातील बोटीतून उडी मारून केलेला सुटकेचा अयशस्वी प्रयत्न, त्यानंतर भारतात आल्यावर ५० वर्षांची जन्मठेप, काळ्या पाण्याची शिक्षा, अंदमनातील त्या भयानक हाल-अपेष्टा, त्यातही तेथे सहबंदीवानांमध्ये केलेले, कार्य, तिथून भारताच्या इतर विविध कारागृहात स्थलांतर आणि रत्नागिरीममध्ये स्थानबद्धता आणि तेथे केलेले महान समाजक्रांतीचे कार्य, संपूर्ण मुक्ततेनंतर हिंदुमहासभेचे अध्यक्ष या नात्याने अखंड भारतासाठी आणि हिंदुजागृतीसाठी दिलेला लढा, अखेर भारताचे स्वातंत्र्य. गांधीहत्येमध्ये अटक आणि निर्दोष सुटका, पुन्हा नेहरु-लियाकत करारावेळी अटक, बेळगावला ९९ दिवस कारावास, त्यानंतर १९६२ चे चीन युद्ध, १९६५ चे पाकिस्तान युद्ध आणि शेवटी १९६६ मध्ये प्रायोपवेशन करून आत्मार्पण अशा असंख्य घटना, संकटे सावरकरांनी अनुभवली होती. त्यामुळे एका अर्थाने सावरकरांचे आयुष्य संकटरूपी अनुभवांनी समृद्ध होते.

माणसाला आयुष्यात एकच किंवा काही जणांचा वैचारिक वारसा असू शकतो, तर काही जणांचे वैचारिक वारसे बदलत जातात किंवा नवनवीन वैचारिक वारसे जोडले जातात. कारण मनुष्य मरेपर्यंत शिकत असतो, प्रदीर्घ आणि अनुभवसंपन्न माणसाच्या आयुष्यात आयुष्याच्या विविध टप्प्यांवर अनेकांचा काही वैचारिक वारसा मिळत जातो. ही प्रक्रिया निरंतर असते. वैचारिक वारसा आधीपासून एकच की अनेक ही गोष्ट व्यक्तिसापेक्ष असते. सावरकरांच्या बाबतीत ही गोष्ट पैलूसापेक्ष आहे. प्रत्येक पैलूचे त्यांचे वैचारिक वारसदार वेगवेगळे आहेत.

विष्णुशास्त्री चिपळूणकर

शालेय वयातच सावरकरांनी महाभारताचे मराठी भाषांतर, काव्येतिहाससंग्रह या मासिकाचे पुष्कळसे अंक, विष्णुशास्त्री चिपळूणकरांची ‘निबंधमाला’ वगैरे ग्रंथ वाचून काढले होते. त्यामुळे सावरकरांच्या लेखनशैलीवर शेवटपर्यंत विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या पल्लेदार, लांबलचक वाक्यांचा प्रभाव टिकून होता. एका अर्थी सावरकरांनी विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या लेखनशैलीचा वारसा समर्थपणे चालवला असे म्हणता येईल.

चापेकर बंधू

पुण्यात रँड व आयर्स्ट या ब्रिटिशांचा चापेकर बंधूंनी वध केला व १८ एप्रिल १८९८ ला चापेकरांना फ़ाशी देण्यात आली, स्वकीयांच्या छळाचा सूड म्हणून चापेकर बंधू फ़ाशी गेले, त्यांनी आपल्या आहुतीने पेटवलेला यज्ञकुंड आपण असाच चेतवत ठेवून ह्यास चळवळीचे स्वरूप द्यावयास हवे, असा विचार सावरकरांच्या मनात आला आणि त्यांनी घरातील अष्टभुजादेवीसमोर, ‘देशाचे स्वातंत्र्य परत मिळविण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतु उभारून, मारता-मारता मरेतो झुंजेन!’ अशी शपथ घेतली. नंतर सावरकर आणि त्यांचे थोरले बंधू बाबाराव उपाख्य गणेश सावरकर यांनाही जन्मठेपीची शिक्षा ठोठावून अंदमानला काळे पाण्यावर धाडण्यात आले. दरम्यान नारायणराव म्हणजे त्यांचे धाकटे बंधू यांनाही सहा महिन्याची कारावासाची शिक्षा झाली होती, म्हणजे ज्याप्रमाणे चापेकर बंधूंप्रमाणे एका कुटुंबातील तीन सख्खे भाऊ देशस्वातंत्र्यासाठी फासावर गेले त्याप्रमाणेच हे तीनही सावरकर बंधूदेखील एकाचवेळी देशस्वातंत्र्यासाठी कारावास भोगत होते.

स्वत: सावरकरांनी चापेकर बंधूंच्या हौतात्म्याने प्रेरित होऊनच देशस्वातंत्र्याची शपथ घेऊन क्रांतिकार्यास आरंभ केला होता, त्याप्रमाणेच त्यांनी आपल्या बंधूंनाही प्रेरित केले होते, इतकेच नव्हे तर त्यांची वहिनी म्हणजे बाबारावांच्या पत्नी येसूवहिनी आणि स्वतः स्वातंत्र्यवीरांच्या पत्नी माई सावरकर या सावरकर घराण्यातील स्त्रियांनाही त्यांनी प्रेरित केले होते. म्हणून क्रांतिकार्यासाठी अटक अथवा शिक्षा झालेल्या क्रांतिकारक घराण्यातील स्त्रियांना आधार देण्यासाठी येसूवहिनी आणि माई सावरकरांनी आत्मनिष्ठ युवती संघ’ स्थापन केला होता. म्हणजे एका अर्थाने सावरकर हे चापेकर बंधूंच्या क्रांतिकार्याचे समर्थ वारसदार ठरतात. 

लोकमान्य टिळक आणि शिवरामपंत परांजपे

‘केसरी’मधील लोकमान्य टिळकांचे आणि ‘काळ’ पत्रातील शिवरामपंत परांजपे यांचे लेख वाचून सावरकर भारावून गेले होते आणि तेव्हापासून टिळक नि परांजपे यांना त्यांनी आपले गुरू मानले होते. नंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्याला आल्यावर टिळक नि परांजपे यांचा प्रत्यक्ष सहवास त्यांना लाभला. सावरकरांसारखे क्रांतिकारक हे तलवारीचं पातं असेल तर टिळक ही तलवाराची मूठ होते असे म्हटले जायचे ते उगाच नाही.

सावरकरांनी साऱ्या ब्रिटिश साम्राज्याचे लक्ष वेधून घेणारी विदेशी कपड्यांची होळी केली होती, त्याला अर्थात टिळक नि परांजपे यांचे मार्गदर्शन लाभले होते. त्यानंतर जेव्हा रँग्लर परांजपेंनी विदेशी कपड्याची होळी केली म्हणून सावरकरांना महाविद्यालयाच्या वसतिगृहातून काढून दंड ठोठावला होता, तेव्हा टिळकांनी ‘केसरी’मध्ये ‘हे आमचे गुरू नव्हेत’ हा अग्रलेख लिहून एकप्रकारे सावरकरांची बाजू घेतली होती.

श्यामजी कृष्णवर्मा यांनी सुरू केलेली शिष्यवृत्ती सावरकरांना मिळावी म्हणून स्वतः टिळकांनी पत्र लिहून शिफारस केली होती आणि त्यानुसार सावरकरांना लंडनला बॅरिस्टर होण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली होती. टिळकांनी जसे खाडिलकरांना नेपाळला पाठवून रायफल कारखाना स्थापन करण्याचे प्रयत्न केले होते, त्याप्रमाणेच सावरकरांनी लंडनला ‘भारत भवन’मध्ये एका लहानशा खोलीत बाँबची प्रयोगशाळा उभारली होती.

सावरकरांनी सेनापती बापट, हेमचंद्र दास आणि मिर्झा अब्बास यांच्या साहाय्याने पॅरिसमधून निर्वासित रशियन क्रांतिकारकांकडून मिळवलेले बाँब बनवण्याचे हस्तलिखित (मॅन्युएल) होतिलाल वर्मांच्या मार्फत पुण्याला टिळकांकडे पाठवले होते. तसेच त्याच्या प्रती करून भारतातील क्रांतिकारक संघटनांमध्ये त्या वितरित करण्यात आल्या होत्या. ‘अभिनव भारत’ संघटनेनेही वसईमध्ये बाँबचा कारखाना सुरू केला होता, पण जॅक्सन वधानंतर तो कारखाना गुपचूप अगदी ब्रिटिश गुप्तचरांनाही कळू न देता बंद करण्यात आला होता.

भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत कोणालाही याची वार्ता नव्हती. नंतर ‘अभिनव भारत’चे एक सदस्य आणि सावरकरांचे मावस भाऊ वि.म.भट यांनी प्रथम त्यांच्या ‘अभिनव भारत’ या पुस्तकात वसईतल्या बाँबचा कारखाना प्रकरण उघडकीस आणले होते.

एकप्रकारे सावरकर हे क्रांतिकारकांचे मुकुटमणी होते तर टिळक हे या क्रांतिकारकांचे आश्रयस्थान होते. म्हणजे टिळकांचाच जहाल राजकारणाचा वारसा सावरकरांनी पुढे चालवला असे म्हटल्यास वावगे ठरू नये. पण ज्याप्रमाणे राजकारणात सावरकरांनी टिळकांचा वारसा पुढे चालवला. त्याप्रमाणे समाजकारणात त्यांनी गोपाळ गणेश आगरकरांचा वारसा पुढे चालवला होता. जसे आगरकरांनी आधी ‘केसरी’मधून आणि मग ‘सुधारक’मधून आपले विचार मांडले तसे सावरकरांनी ‘श्रद्धानंद’ आणि इतर पत्रातून आपले सामाजिक विचार मांडले होते; हे सर्व लेख आपल्याला ‘जात्युच्छेदक निबंध’ आणि ‘विज्ञाननिष्ठ निबंध’ या ग्रंथात वाचायला मिळतात.

राजकारणात टिळकांचा आणि समाजकारणात आगरकरांचा वारसा पुढे चालवून सावरकरांनी राजकारण आधी की समाजकारण आधी या मुद्द्यावर सुवर्णमध्य साधून दोन्ही गोष्टी समांतर आहेत, त्यामुळे राजकीय स्वातंत्र्यासोबत समाजस्वातंत्र्यही आवश्यक आहे हे ठामपणे सिद्ध केले होते.

आज एकविसाव्या शतकात सावरकरांच्या विज्ञाननिष्ठ, बुद्धिवादी, मानवतावादी नि लोकशाहीवादी विचारांची आपल्या समाजाला नि राष्ट्राला गरज आहे. आपण त्यांच्या या विचारांचे वैचारिक वारसदार होऊन समर्थ समाज नि राष्ट्रनिर्माणात आपापला वाटा उचलूया.

अक्षय जोग.

व्यास क्रिएशन्स द्वारा प्रकाशित “चैत्र पालवी” या नियतकालिकाच्या “सावरकर परिवार विशेषांक” मध्ये अक्षय जोग यांनी लिहिलेला लेख

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..