नवीन लेखन...

निसर्गरम्य तळकोकणचा  प्रवास – आरामदायी  तेजस एक्सप्रेसने

तेजस एक्सप्रेसचा आरामदायी प्रवास एकदातरी करायलाच हवा..
तेजस एक्सप्रेसचा आरामदायी प्रवास एकदातरी करायलाच हवा..

कोकणचा निसर्ग रसिक पर्यटकाना सतत बोलावत असतो. त्यातही  ज्याला रेल्वे प्रवास प्रिय त्यांच्यासाठी तर पर्वणीच. विशेषतः खवय्यांना  तर मांडवी एक्सप्रेस चांगले २०-२५ पदार्थ पेश करते. हिरवा गार निसर्ग,लाल मातीचे डोंगर, घाट मार्गात अनेक बोगदे. रत्नागिरी स्टेशन आखीव नीटस मनात भरणारे. स्टेशन बाहेर रेल्वे बांधणीत मृत्यू पावलेल्या कर्मचारी वर्गाच्या स्मृतिस्मारकासमोर आपण नतमस्तक होतो. रस्ते प्रशस्त व उत्तम बांधकाम. तासाभरात गणपतीपुळे वरून मालगुंड या टुमदार गावाच्या टोकास समुद्र किनाऱ्याला लागून माडाच्या बनात पोहोचतो. उत्तम राहण्याची जागा.सतत वाहणारा गार वारा आणि  साथीला समुद्राची गाज.जेवणाच्या पानात मोदक, आंबरस, घावन,सोलकढी ते विविध मत्स्यमंडळी हजर असत.

मालगुंड कवी केशवसुतांचे जन्मगाव. उभे आयुष्य जेमतेम ४० एकवर्षांचे.   पेशाने शिक्षक. शिक्षण व नोकरी करता नागपूर, वर्धा, मुंबई, सावन्तवाडी, धारवाड अशी आयुष्याची फरफर व शेवटी हुबळी येथे प्लेगने मृत्यू.एवढ्या अल्प काळात शेकडोंनी लिहिलेल्या कविता अजरामर ठरल्या. स्वातंत्र्यप्रेम, विश्वबंधुत्व,याचे उद्घोष शब्दा शब्दातून शस्त्रासारखे बाहेर पडत.अशा थोर कोकणपुत्राचे मालगुंड मधील केशवसुत स्मारक हा त्यांना मराठी जनतेचा मानाचा मुजरा आहे.त्यांचा  उभ्या आयुष्यात  एकही फोटो काढला गेला नव्हता. कल्पनेतून काढलेले रेखाचित्र, व तुतारीची प्रतीकृती मनाला भावते. त्यांच्या अनेक कविता सुवाच्य अक्षरात गुळगुळीत पांढऱ्या दगडावर लिहिलेल्या आहेत. संपूर्ण एक दालन अनेक कवींच्या रेखाचित्रांचे. लागून २० ते २५ हजार पुस्तकांची व्यवस्थित वर्गवारी केलेले वाचनालय. बाजूला १८९० सालातील त्यांचे राहते घर. त्याकाळातील भांडीकुंडी,संपूर्ण स्मारक हिरव्या गर्द झाडीत झाकलेले.मन प्रसन्न करणारी जागा.

गणपतीपुळे गणेश मंदीर अगदी समुद्रकाठावर वसलेले पुरातन मंदीर. अतिशय देखणे वास्तुशिल्प.स्वच्छता डोळ्यात भरणारी. दर्शन व प्रसाद घेण्याची चोख व्यवस्था.परीक्रमेचा हिरव्या गार झाडीतून काढलेला रस्ता. मनाला शांती देणारे हे देवस्थान कोकणची शान आहे.

प्राचीन कोकण हे एक डोंगरावर उभारलेले १० ते १५ एकरात पसरलेले अनोखे स्थान. गणपतीपुळेपासून ३ किमी अंतरावर औषधी झाडांच्या दाट जंगलात वसविलेले.चढउताराचे ,लालमाती व दगडाचे रस्ते.मधेच गुहेतून जाणारा मार्ग.बाजूनी प्राचीन कोकणातील घरे, त्यामध्ये अगदी ५०० वर्षाची परंपरा असलेल्या बारा बलुतेदारांचे उत्तम पद्धतीचे अगदी जिवंत वाटणारे पुतळे,कोकणी पद्धतीची साडी व दागिने घातलेल्या कोकणी बायका,खोताचे घर,भिल्ल, जुनी अवजारे, बांगड्या भरणारा कासार,नदीवर पाणी भरणारी हातात हंडा घेतलेली निटस तरुणी,पाखाडी,बैलगाडी, लोहार व बाजूनी असलेल्या वृक्षांची माहिती. त्यांचे व नक्षत्रदेवतांचे नाते आणि  हया सर्व परिसराची उद्बोधक माहिती देण्यास गावातील चुणचुणीत गाईड मुली.वाटेत वारुळाच्या आकाराचे मातीचे गार पिण्याचे पाणी भरलेले माठ.विक्रीकेंद्रात अनेक खाण्याचे कोकणी पदार्थ, कलावस्तू व ते विकत  घेतल्यावर नेण्यासाठी वर्तमानपत्राच्या बनविलेल्या आकर्षक पिशव्या.आंबा सरबत,पन्हे पिऊन ताजेतवाने झाल्यावर आपण शिरतो शंख शिंपल्यांच्या अनोख्या दुनियेत.रस्ता संपतो आणि कवी माधवांच्या कवितेच्या शेवटच्या दोन ओळी तेथे लिहिलेल्या दिसतात. ‘राष्ट्रंदेवीचे निसर्ग निर्मित एैसे नन्दनवन ,सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळकोकण ‘ हा अनुभव चिरंतन स्मरणात राहणारा.

 गणपतीपुळे पासून रत्नागिरी किनारा मार्गे मोटर प्रवास म्हणजे निसर्ग सौंदर्य लुटावे तेवढे थोडेच.लाल चुटूक मातीच्या टेकड्या,एका बाजूनी हिरवीगार वनश्री,तर दुसऱ्या बाजूनी पसरलेला अथांग समुद्र.निर्मनुष्य उत्तम डांबरी रस्ता.वाटेत आरे आणि वारे या गावांना जोडणारा समुद्र किनारा ३ किमी. चंद्राकृती आकाराचा.सोनेरी पिवळसर मुलायम वाळू, त्यावर समुद्र कीटकानी केलेली विविध नक्षीकामे आणि आसमंतात आम्ही इन मीन ७/८ माणसे,इतका अस्पर्शित किनारा पाहण्याचे थोर भाग्यच. लाल भडक सूर्याचे मडके समुद्राला स्पर्श करीत होते. वर्णनातीत सोहळा पाहात डोंगरमाथ्यावर पोहचलो. अविस्मरणीय संध्याकाळ कायम लक्षात राहील अशी.किनाऱ्याला लागून सुरूचे बन. त्यात नागमोडी लाल फरशीची वाट, आवर्जून भेट देण्याचे ठिकाण.

जयगड किल्ला भग्ना अवस्थेत,भव्य परिसर. जवळच असलेले दीपगृह उठून दिसते भव्यतेमुळे. १८३२ सालात बांधलेले,दाभोळ ते रत्नागिरी पट्ट्यातील बोटीना मार्गदर्शक. वर पर्यंत जाण्यास गोलाकार जिना ६५- ७० लोखंडी पायऱ्या.भक्कम जाड भिंती,लाल पांढरा रंग, वरून दिसणारा अथांग समुद्र पाहून आपण खुजे ठरतो. जिंदाल कंपनीने उभारलेल्या  गणेश मंदीराचा परिसर टेकडीवर असून जाण्यासाठी पायऱ्यांचा रस्ता.बाजूनी उत्तम बाग.परिसरात केलेली रोषणाई.गणपती व हनुमानाच्या सुशोभित मूर्ती.स्वच्छता तर पराकोटीची.मन प्रसन्न करणारी जागा.

रत्नागिरी शहराला तर वैभवशाली इतिहास. रत्नदुर्ग,भगवती किल्ला, लोकमान्य टिळक यांच्या जन्मस्थानाचे स्मारक,सावरकरांचे पतित पावन मंदीर, मायन्मार (ब्रम्हदेश) राजाचा थिबा राजवाडा ,भाट्ये खाडीचे दिसणारे विहंगम दृश्य,मत्स्यालय आणि एकूणच संपूर्ण शहर कोकण निसर्गाला साजेसे.

  अशा रमणीय स्थळीच्या स्मृतीची सांगता तितकीच मनात रेंगाळत रहाते ती रेल्वेच्या तेजस एक्सप्रेस या आलेशान गाडीमुळे. तेजस शब्दाच्या अर्थात अनेक छटा आहेत.तेज, चमक, दिमाख, धारदार, ही गाडी त्या साजेशी आहे.गोवा (करमाळी ) ते मुंबई ५५१ किमी अंतर ती   ८ तास ३० मिनिटात पुरे करते.संपूर्ण गाडी वातानुकुलीत,त्यात १२ डबे चेअर कार. ३+२ आसने (प्रत्येक डबा ७२ चा) तर पहिला वर्ग दोन डबे चेअर ( ५६ आसने ). प्रत्येक आसन लांब होणारे .खिडकीच्या काचा नितळ पारदर्शक.आतून लांबवरचा बाहेरील प्रदेश पाहताना खरे नेत्रसुख देणाऱ्या.उन्हाचा त्रास होत असेल तर पातळ पडदा खेचण्याची सोय.सर्व आसनांना मुलायम ई लेदर,डब्यात मध्यावर व दोन आसनात एैसपैस जागा. डोक्यावर उत्तम LED प्रखर दिव्यांची सोय,वाचन सहजपणे करता येते.डब्यात दोन्ही बाजूनी सामान ठेवण्यास उंच मोकळी जागा.प्रत्येक आसना समोर TV screen2 edt phone sockets,ear phones ,finger touch screen displayतीनही भाषेतील भरपूर मनोरंजनाचे कार्यक्रम.वाचण्यास अनेक वर्तमानपत्र. प्रत्येक डब्याला चार प्रशस्त टॉयलेटकक्ष. सर्व जागी biovacuum toilet pots which use only 1.5 litre water instead of 10 liters used in other trains.सांडपाणी रेल्वे रुळांवर पडत नाही. हात पुढे केल्यावर ठराविक वेळ पाणी पडण्याची सोय,सतत मंद सुवासिक फवारा. माहोलच प्रसन्न वाटणारा. डब्यात आत शिरण्याचे दरवाजे बाजूला सरकत उघडणारे व गाडी थांबल्या नंतरच उघडत असल्याने उतरताना घाई गर्दी नाही व सुरक्षित वाटते.प्रत्येक डब्यात cctv आहेतच.

गाडीत खानपानाची सोय एच्छिक असून तिकीट काढताना पैसे घेतले जातात.डब्यात दिमतीला असणारी मुले गोवानीज पद्धतीची काळी हॅट,निळ्यावर  रंगीबेरंगी डिझाईनचे शर्ट, काळी पॅट,अशा पेहरावात पाहून मजा वाटते. रत्नागिरी दादर प्रवास साडे पाच तासाचा.खाण्याची चंगळच. अगदी घरगुती पोळ्या, बासमती भात, कुर्मा ,चविष्ठ तडका डाल, चिकन मसाला ,गोडाचा शिरा, सोलकढी सर्व गोष्टी उत्तम कागदात सील केलेल्या, वर तारीख वेळ जागा छापलेली.हा आस्वाद घेताना गाडीला अजिबात धक्के जाणवत नाहीत, व गाडी सुसाट पळत असते.या गाडीचे इंजिनही निळ्या रंगाचे आकर्षक असून ते आधुनिक पद्धतीचे डीझेल इंजिन आहे, ते १८० किमी. वेगाने जाऊ शकते.ही संपूर्ण गाडी भारतात बनलेली आहे.या गाडीचे भाडे शताब्दी पेक्षा २० ते ३० टक्के ज्यास्त ( मुंबई करमाळी साधा वर्ग रु ११९० तर पहिला वर्ग रु २५९० व नाश्ता  जेवण रु ३२५ वेगळे )

संपूर्ण गाडीच्या डब्यांचा रंग, त्यावरील सूर्याचे पसरलेले किरण फारच मोहक. ही दिमाखदार गाडी स्टेशनात शिरताना मनाला भावते. युरोपातील उत्तम गाडीच्या तोडीची असून जेवण तर असे कुठेच मिळणार नाही.

ह्या गाडीचे उद्घाटन सुरेश प्रभू यांनी मे २०१७ मध्ये केले.त्यानंतर काही समाजकंटकानी काचा फोडल्या, गाडीतील गोष्टी पळविल्या. दिलेल्या अन्नातून विषबाधा झाल्याचे खोटे आरोप झाले.प्रसार माध्यमांनी त्याला अतीच प्रसिद्धी दिली. आज गाडी पूर्ण भरत नाही अशी तक्रार आहे.  कोणतीही गोष्ट रुळण्यास वेळ लागतो. जेंव्हा राजधानी एक्सप्रेस सुरु झाल्या तेंव्हा या गाड्या बंद पडतील अशी भावना होती पण आजमितीला ३ राजधानी एक्सप्रेस नुसत्या मुंबईतून जात आहेत.

अशा अनेक तेजस एक्सप्रेस दिल्ली, अहमदाबाद, लखनौ या मार्गावर धावणार आहेत. पहिला मान कोकण रेल्वेने मिळविला आहे. भविष्यकाळात ती प्रगतीचे प्रतीक ठरणार आहे.

— डॉ. अविनाश वैद्य
मो.न. ९१६७२७२६५४

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 179 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..